या!!!

on सोमवार, नोव्हेंबर २४, २००८

नेहमीप्रमाणे सकाळी ५.३० लाच जाग आली. खरं तर रविवारचा दिवस तरी उशिरा जाग यावी की नाही? पण शरिराला फक्त २४ तासाचंच घड्याळ कळतं. वार नाही कळत. उन्हाळा नुकताच सुरू झाला होता तरी अजून मस्त थंड वाटत होतं. पहाटे पहाटे रजई लपेटून मस्तपै़की गुरफटून अंथरूणात लोळणं या सारखं सुख नाही. सारं जग आपल्या भोवती हळू हळू उलगडत असतं आणि आपण माज करत मस्त झोपून रहायचं. सुख सुख म्हणतात ते हे. आणि आज एकदम शांतही वाटत होतं. मनातल्या सगळ्या भावना / विचार एकदम थांबल्या सारख्या झाल्या होत्या. म्हणजे एरवी कधी शांत वाटत नाही असं नाही पण आज मला जरा जास्तच जाणवत होतं. गेल्या ८-१० दिवसांपासून मी खूप अस्वस्थ होतो. सारखं कोणीतरी आपल्याला बघतंय असं वाटायचं. आजूबाजूला नजर टाकली तर जो तो आपापल्या नादात धावपळ करत आयुष्याच्या गाड्याबरोबर लळत लोंबत ओढला जातोय. कोण कशाला माझ्या कडे बघतंय? कधी कधी तर आजूबाजूला चिटपाखरू पण नसायचं. पण भावना तीच व्हायची.

सगळा माझ्या एकटेपणाचा परिणाम. दुसरं काय? आज इतकी वर्षं झाली, एकटाच राहतोय. सातवीत असताना आई गेली, राहिलो फक्त वडिल आणि मी. आई गेल्यानंतर तर खूपच जास्त माया करायला लागले माझ्यावर. पण नाही म्हणलं तरी आई अशी अचानक गेल्याचं दु:ख खूप खोलवर गेलं होतं, आम्हा दोघांच्याही मनात. त्या मुळे असेल पण खूपच जवळ आलो आम्ही एकमेकांच्या. बारावीत असताना, साधं तापाचं निमित्त झालं ते वाढत वाढत न्युमोनियावर गेलं आणि गेलेच ते पण. डॉक्टर म्हणाले पण नंतर, त्यांची जगायची इच्छाच संपली होती. राहिलो मी एकटा. नाही म्हणायला एक मावशी आहे. बाकी जवळचं असं कोणीच नाही. मावशी आग्रहाने घेऊन गेली तिच्या कडे. पण तिच्या चाळितल्या दीड खोलीत कसं जमायचं? मग मीच तिला समजावलं आणि आलो परत घरी. तेव्हापासून मी हा असा एकटा. शिकायची खूप आवड होती. शिक्षण झालं आणि लगेच नोकरी पण मिळाली, मग या गावात आलो आणि आता ५-६ वर्षांपासून इथेच आहे. लग्न का नाही केलं याचं खरं कारण लग्न झालं नाही हेच. आणि आता असंच बरं वाटतंय. एकटा जीव सदाशिव. मस्तीत जगतो. कोणाचं काही घेत नाही, घेतलं तर ठेवत नाही. पण गेल्या काही दिवसांपासून माझं सगळं तंत्रच बिघडलंय. मगाशी म्हणलं तसं सारखं कोणीतरी बघतंय असं सतत वाटायला लागलं. आधी नीट लक्षातच येईना, पण मग सवयच झाली चक्क. मी मनाशीच समजूत घालून घेतली, सगळा आपल्या एकटेपणाचा परिणाम. माणसाचं मन फार गंमतीशीर आहे. थोडं दमात घेतलं की कशालाही सरावतं बिचारं.

तर सांगत काय होतो, त्या दिवशी मात्र मी अगदी खूप शांत होतो. खूप मोठ्ठं वादळ येऊन गेल्यावर कसं सगळं एकदम शांत वाटतं तसंच वाटत होतं. मस्तपैकी आठ वाजेपर्यंत असाच लोळलो अंथरूणात. पेपरवाला पोर्‍या अंगणात पेपर टाकून, सायकलची घंटी वाजवून गेला मग मात्र मला राहवेना. सकाळी सकाळी मस्तपैकी वाफाळता चहाचा कप हातात घेऊन ताजं वर्तमानपत्र वाचणं हा माझा दुसरा वीकपॉईंट. चहाचा आणि त्या वर्तमानपत्राचा वास असा काही इफेक्ट करतो की पूर्ण दिवस उत्साह वाटतो. उठलो. चहा वगैरे बनवला आणि सोफ्यावर मस्त तंगड्या पसरून पेपर वाचत बसलो.

"डिंग डाँग"...... डोअरबेल वाजली.

च्यायला, रविवारी सकाळी ८.३० वाजता माझ्या कडे कोण तडमडलं बुवा? आश्चर्यमिश्रित राग गिळत मी दुर्लक्ष करावं का असा विचार करत होतोच तेवढ्यात डोअरबेल परत वाजली आणि या वेळी मात्र जरा लांबच वाजली. मी सणकून उठलोच. त्याच तिरीमिरीत जाऊन दार उघडलं, साले हे सेल्समन आता रविवारी सकाळी पण यायला लागले? दार उघडलं आणि चक्रावलो. एक काळा सावळा पण तजेलदार चेहरा दोन टप्पोर्‍या डोळ्यातून माझ्या कडे बघत होता. एक सेकंद मी गडबडलोच. माझा एवढा अपेक्षाभंग झाला होता की काय करावं बोलावं ते सुचेचना.

तेवढ्यात तो चेहरा हलला, जिवणी रूंदावली आणि हलकेच कुठून तरी लांबून यावे तसे शब्द आले, "काका, माझं नाव सुमित्रा". मी एकदम भानावर आलो. नीट बघितलं तिच्याकडे. एक ८ - १०वर्षांची चुणचुणित मुलगी माझ्यापुढ्यात उभी होती. साधे कपडे, केस नीट चापून चोपून बसवलेले. हातात शाळेची वाटावी अशी एक बॅग.

"काका, मी आत येऊ?"

मी भारावल्यासारखा बाजूला झालो आणि ती सरळ आत येऊन सोफ्यावर बसली. माझ्या एकदम लक्षात आलं की तिला जरा दम लागल्यासारखा झालाय. धाप लागली होती हलकी.

"कोण गं तू?" माझा पहिला प्रश्न तिला.

"काका, सांगते पण आधी पटकन मला पाणी देता का?" आणि ती परत लांब श्वास घ्यायला लागली.

माझी एकदम पंचाईतच झाली. ही कोण कुठली आणि सरळ आत येऊन बसते काय आणि पाणी मागते काय. पण तिला काहितरी त्रास होतोय हे स्पष्टच दिसत होतं. मी पटकन आत जाऊन पाणी आणलं. तिला दिलं. पाचेक मिनिटं ती तशीच डोळे मिटून शांत बसली. ती लहान जरी असली तरी एक प्रकारचं आकर्षण होतं तिच्यामधे. काय होतं ते कळत नव्हतं पण काहि तरी होतं खास. मी पण गप्प बसून ती नॉर्मलला यायची वाट बघत बसलो. थोड्यावेळाने तिने डोळे उघडले आणि परत ते मगाच्चं गोड हसू हसली.

"काका माझं नाव सुमित्रा. मी इथे जवळच ट्युशनला चालले होते. मला कधी कधी दम्याचा त्रास होतो. अचानक जड वाटायला लागलं. तेवढ्यात तुमचं घर दिसलं म्हणून तशीच आले अंगणात आणि दार वाजवलं. माफ करा हं..." परत ते गोड हसू.

"अगं माफ करा काय? तू बरोबरच केलंस. आणि त्रास कसला मला त्यात. बरं आता कसं वाटतंय? डॉक्टरला बोलावू का? इथेच जवळ आहेत एक डॉक्टर."

"नको काका, आता खूपच बरं वाटतंय."

"बस जरा आराम कर." थोडा वेळ बसू तर दे बिचारीला, मग बघू काय करायचं ते. बसल्या बसल्या ती गप्पा मारायला लागली.

"आम्ही की नै, नविनच आहोत इथे. पाचवीत आहे मी. इथे जवळच शिकवणीला जाते मी. आठच दिवस झाले. मी बघते रोज तुम्हाला. यावेळी तुम्ही ऑफिसला जायला निघता ना. मला माहित आहे." तिची गाडी भरधाव सुटली होती.

मला पण मजा वाटायला लागली. इतक्या बडबडीची सवयच नहिये मला पण छानच वाटतंय की.

"काय गं, तू राहतेस कुठे?"

"हे असं इथून सरळ पुढे गेलं की देशमुखांचा वाडा लागतो की नाही त्याच्या पुढे बघा एक मोठ्ठं आंब्याचं झाड आहे आणि त्याच्या बाजूला एक विहिर आहे ना तिथे."

"विहिरीत?", मला पण तिची चेष्टा करायची हुक्की आली.

"काय हो काका, विहिरीत नै कै. पण जवळच." ती एकदम जीभ चावून म्हणाली. मस्त गोड होती पोरगी. तिची बडबड चालली होती मी पण तिच्याशी गप्पा मारत होतो. थोड्यावेळाने तिचा चेहरा बराच चांगला वाटायला लागला.

"काका मी जाते आता. पण मला थोडं थकल्यासारखं वाटतंय. मी आता सरळ घरीच जाते. मी तुम्हाला अजून थोडा त्रास देऊ का?"

"अगं त्रास कसला, बोल की."

"तुम्ही मला सोडायला माझ्या घरापर्यंत याल? प्लीऽऽऽज"

आता नाही कसं म्हणणार. तसा थकवा दिसतच होता तिच्या चेहर्‍यावर. मी पटकन शर्ट पँट घातली आणि आम्ही निघालो. तिची बडबड चालूच.

"काका, तुम्ही कित्ती चांगले आहात हो. मला बाई कोणी मित्र मैत्रिणीच नाही अजून इथे. इतका कंटाळा येतो. आणि मला दमा आहे ना मग सगळ्यांच्या बरोबर खेळताच येत नाही. सारखं आपलं घरातच." मला पण वाईट वाटलं. एकटेपणा सवय नसताना कसा खायला उठतो हे माझ्यापेक्षा कोणाला चांगलं माहित असणार?

तिचे डोळे एकदम लकाकले. "काका, तुम्ही याल माझ्याशी खेळायला?" तिचा उत्साह बघून मलाच वाटलं, नाही कसं म्हणायचं.

मी म्हणलं, "येईन ना गं."

"बघा हां, प्रॉमिस?"

"यस, प्रॉमिस!!!" तिचा चेहरा अजूनच खुलला. बोलता बोलता वाट संपली कधी ते कळलंच नाही. तो वाडा मागे गेला आणि त्याच्या पुढेच अगदी १०० पावलांवर ते खुणेचं झाड होतं. आंब्याच्या झाडाला मोहोर अगदी मस्त आला होता.

"काका, मला कैर्‍या काढून देता?" ती नुसती उत्साहाने उसळत होती.

"अगं आत्ताशी कुठे मोहोर धरलाय. अजून कैर्‍या यायला वेळ आहे."

"ज्जा बाई, नका देऊ. नक्काच देऊ. पण सरळ नाही म्हणा ना. उगाच काहितरी कारणं सांगू नका." नाकाचा शेंडा तेवढ्यात लाल झाला होता बाईसाहेबांच्या. मला पण जरा लागलंच ते. मी नुसतं झाडावर चढून नाटक करायचं ठरवलं. तिचं मन राखायला. चढलो तसाच झाडावर. तशी मला काय सवय असणार झाडावर चढायची. धडपडत कसा तरी चढलो. एक फांदी आधाराला घट्ट धरून ठेवली. दुसर्‍या फांदीवर तोल सांभाळत उभा राहिलो. थोडवेळ उगाच इकडे तिकडे शोधायचं नाटक केलं. सुमित्राबाई खालून उगाच "ते बघा ते बघा, तिकडे दिसतीय वाटतं" करत होत्या. मी पण गुंगलो. माझ्या हालचालींमुळे झाडावरच्या मोहोराची बारीच फुलं खाली पडत होती.

अचानक मला जाणवलं, खालून आवाज यायचा बंद झालाय. "अरे, गेली कुठं" मनाशीच विचार करत मी खाली बघितलं. तिथे कोणीच नव्हतं. आता हिला काय लपाछपी खेळायचा मूड आला की काय? काय काय करावं लागेल अजून कोण जाणे. पण मी सगळीकडे नजर फिरवली तर जवळपास कुठे आडोसा पण नव्हता. गेली कुठं. मला अस्वस्थता आली. काही कळेचना. इकडे तिकडे बघता बघता बाजूच्या विहिरीकडे नजर गेली. पाणी तसं बेताचंच होतं. काळं मिट्टं पाणी हलकेच डुचमळत होतं. मी सहज म्हणून थोडी मान लांबवून बघायला गेलो. जे काही मला दिसलं, मी क्षणभर सुन्न झालो,

त्या विहिरीच्या पाण्यावर आंब्याची फुलं पडली होती आणि त्यांचा एक आकार तयार झाला होता, पाण्यावर अक्षरं उमटली होती,

"या!!! तुमचं स्वागत आहे"

एक थंडगार शिरशिरी माझ्या अंगात चमकली. एक क्षणात सगळा उलगडा झाला. म्हणजे, ती सुमित्रा... ती... सुमित्रा नव्हतीच, छे ती सुमित्राच होती, पण मग ती... बाप रे... देवा हे काय रे... त्या धक्क्याने माझं अंग शहारलं, माझा आधाराचा हात सुटला, तोल गेला आणि मी खाली विहिरीच्या दिशेने जातोय एवढीच जाणीव झाली. मी जोरात ओरडलो.
.
.
.
.
.
.
एकदम माझे डोळे उघडले आणि मी भानावर आलो. घामाने अंग डबडबलेलं होतं आणि मी माझ्या बेडवर उठून बसलो होतो. बाप रे, म्हणजे हे स्वप्न होतं? शक्यच नाही. इतकं खर्‍यासारखं? बराच वेळ तसाच बसून राहिलो. भानावर आलो. घड्याळात अजून ४.३०च झाले होते. परत एकदा मी थरारलो. आई नेहमी म्हणायची "पहाटेची स्वप्नं नेहमी खरी होतात." तिला पण तिच्या मृत्यू आधी असंच पहाटे स्वप्नं पडलं होतं असं बाबा नेहमी म्हणायचे. मी बराच वेळ विचार करत शांत बसलो.
.
.
.
.
.
.
साडे आठ वाजत आले आहेत. मी सगळं आवरून शांत पणे बसलो आहे. सत्य अटळ आहे. मी पण मनाची पूर्ण तयारी केली आहे. आत्तापर्यंत जे जगलो तोच भास होता का? आणि आता कुठे खर्‍या जीवनाला सामोरं जातो आहे का? छे: सगळा कालवा झालाय, त्या पेक्षा शांत बसावं. वाट बघत.

"डिंग डाँग"...... डोअरबेल वाजली.

मी शांतपणे उठलो. दार उघडलं. तोच गोड चेहरा माझ्याकडे बघून हसत होता.

"आलीस? चल आलोच मी. जरा दोन मिनिटं थांब हं... निरोप घेऊ दे मला."

तर मंडळी, निघतो मी. भेटूच परत कधीतरी. अहो, आश्चर्य कसलं वाटतंय तुम्हाला. मला पूर्ण कल्पना आहे मी कुठे चाललो आहे. आणि तरी मी तुम्हाला भेटू परत म्हणतोय? अहो, सुमित्रा एकटी कंटाळली म्हणून मला घेऊन चाललिये बिचारी. पण आम्ही दोघंच्या दोघंच किती दिवस खेळणार एकमेकांशी? कंटाळू ना आम्ही एकमेकांना. मग आम्हाला नविन नविन मित्र मैत्रिणी नकोत का? म्हणून म्हणलं... भेटू परत. नक्की बरं का... येतो आता.

3 comments:

Unknown म्हणाले...

कथेची सुरुवात इतकी सुंदर. पण शेवट अगदी अनपेक्षित आहे. जणू काही एखाद्या अप्रतिम गाण्याचा स्थायी एका रागात आणि अंतरा दुसर्‍या रागात गायलेला असावा असा.

मात्र पूर्ण कथा हृदयाचा ठाव घेते. एखादे पुस्तक कसे शेवटची ओळ वाचेपर्यंत हातातून खाली ठेववत नाही तसेच काहीसे माझे झाले.

मी बिपिन. म्हणाले...

धन्यवाद मृदुला!!! तुमची उपमा पण छानच.

me म्हणाले...

हे वाचल्यावर मला jeffrey archer च्या twist in the tale ची आठवण झाली.