या!!!

on सोमवार, नोव्हेंबर २४, २००८

नेहमीप्रमाणे सकाळी ५.३० लाच जाग आली. खरं तर रविवारचा दिवस तरी उशिरा जाग यावी की नाही? पण शरिराला फक्त २४ तासाचंच घड्याळ कळतं. वार नाही कळत. उन्हाळा नुकताच सुरू झाला होता तरी अजून मस्त थंड वाटत होतं. पहाटे पहाटे रजई लपेटून मस्तपै़की गुरफटून अंथरूणात लोळणं या सारखं सुख नाही. सारं जग आपल्या भोवती हळू हळू उलगडत असतं आणि आपण माज करत मस्त झोपून रहायचं. सुख सुख म्हणतात ते हे. आणि आज एकदम शांतही वाटत होतं. मनातल्या सगळ्या भावना / विचार एकदम थांबल्या सारख्या झाल्या होत्या. म्हणजे एरवी कधी शांत वाटत नाही असं नाही पण आज मला जरा जास्तच जाणवत होतं. गेल्या ८-१० दिवसांपासून मी खूप अस्वस्थ होतो. सारखं कोणीतरी आपल्याला बघतंय असं वाटायचं. आजूबाजूला नजर टाकली तर जो तो आपापल्या नादात धावपळ करत आयुष्याच्या गाड्याबरोबर लळत लोंबत ओढला जातोय. कोण कशाला माझ्या कडे बघतंय? कधी कधी तर आजूबाजूला चिटपाखरू पण नसायचं. पण भावना तीच व्हायची.

सगळा माझ्या एकटेपणाचा परिणाम. दुसरं काय? आज इतकी वर्षं झाली, एकटाच राहतोय. सातवीत असताना आई गेली, राहिलो फक्त वडिल आणि मी. आई गेल्यानंतर तर खूपच जास्त माया करायला लागले माझ्यावर. पण नाही म्हणलं तरी आई अशी अचानक गेल्याचं दु:ख खूप खोलवर गेलं होतं, आम्हा दोघांच्याही मनात. त्या मुळे असेल पण खूपच जवळ आलो आम्ही एकमेकांच्या. बारावीत असताना, साधं तापाचं निमित्त झालं ते वाढत वाढत न्युमोनियावर गेलं आणि गेलेच ते पण. डॉक्टर म्हणाले पण नंतर, त्यांची जगायची इच्छाच संपली होती. राहिलो मी एकटा. नाही म्हणायला एक मावशी आहे. बाकी जवळचं असं कोणीच नाही. मावशी आग्रहाने घेऊन गेली तिच्या कडे. पण तिच्या चाळितल्या दीड खोलीत कसं जमायचं? मग मीच तिला समजावलं आणि आलो परत घरी. तेव्हापासून मी हा असा एकटा. शिकायची खूप आवड होती. शिक्षण झालं आणि लगेच नोकरी पण मिळाली, मग या गावात आलो आणि आता ५-६ वर्षांपासून इथेच आहे. लग्न का नाही केलं याचं खरं कारण लग्न झालं नाही हेच. आणि आता असंच बरं वाटतंय. एकटा जीव सदाशिव. मस्तीत जगतो. कोणाचं काही घेत नाही, घेतलं तर ठेवत नाही. पण गेल्या काही दिवसांपासून माझं सगळं तंत्रच बिघडलंय. मगाशी म्हणलं तसं सारखं कोणीतरी बघतंय असं सतत वाटायला लागलं. आधी नीट लक्षातच येईना, पण मग सवयच झाली चक्क. मी मनाशीच समजूत घालून घेतली, सगळा आपल्या एकटेपणाचा परिणाम. माणसाचं मन फार गंमतीशीर आहे. थोडं दमात घेतलं की कशालाही सरावतं बिचारं.

तर सांगत काय होतो, त्या दिवशी मात्र मी अगदी खूप शांत होतो. खूप मोठ्ठं वादळ येऊन गेल्यावर कसं सगळं एकदम शांत वाटतं तसंच वाटत होतं. मस्तपैकी आठ वाजेपर्यंत असाच लोळलो अंथरूणात. पेपरवाला पोर्‍या अंगणात पेपर टाकून, सायकलची घंटी वाजवून गेला मग मात्र मला राहवेना. सकाळी सकाळी मस्तपैकी वाफाळता चहाचा कप हातात घेऊन ताजं वर्तमानपत्र वाचणं हा माझा दुसरा वीकपॉईंट. चहाचा आणि त्या वर्तमानपत्राचा वास असा काही इफेक्ट करतो की पूर्ण दिवस उत्साह वाटतो. उठलो. चहा वगैरे बनवला आणि सोफ्यावर मस्त तंगड्या पसरून पेपर वाचत बसलो.

"डिंग डाँग"...... डोअरबेल वाजली.

च्यायला, रविवारी सकाळी ८.३० वाजता माझ्या कडे कोण तडमडलं बुवा? आश्चर्यमिश्रित राग गिळत मी दुर्लक्ष करावं का असा विचार करत होतोच तेवढ्यात डोअरबेल परत वाजली आणि या वेळी मात्र जरा लांबच वाजली. मी सणकून उठलोच. त्याच तिरीमिरीत जाऊन दार उघडलं, साले हे सेल्समन आता रविवारी सकाळी पण यायला लागले? दार उघडलं आणि चक्रावलो. एक काळा सावळा पण तजेलदार चेहरा दोन टप्पोर्‍या डोळ्यातून माझ्या कडे बघत होता. एक सेकंद मी गडबडलोच. माझा एवढा अपेक्षाभंग झाला होता की काय करावं बोलावं ते सुचेचना.

तेवढ्यात तो चेहरा हलला, जिवणी रूंदावली आणि हलकेच कुठून तरी लांबून यावे तसे शब्द आले, "काका, माझं नाव सुमित्रा". मी एकदम भानावर आलो. नीट बघितलं तिच्याकडे. एक ८ - १०वर्षांची चुणचुणित मुलगी माझ्यापुढ्यात उभी होती. साधे कपडे, केस नीट चापून चोपून बसवलेले. हातात शाळेची वाटावी अशी एक बॅग.

"काका, मी आत येऊ?"

मी भारावल्यासारखा बाजूला झालो आणि ती सरळ आत येऊन सोफ्यावर बसली. माझ्या एकदम लक्षात आलं की तिला जरा दम लागल्यासारखा झालाय. धाप लागली होती हलकी.

"कोण गं तू?" माझा पहिला प्रश्न तिला.

"काका, सांगते पण आधी पटकन मला पाणी देता का?" आणि ती परत लांब श्वास घ्यायला लागली.

माझी एकदम पंचाईतच झाली. ही कोण कुठली आणि सरळ आत येऊन बसते काय आणि पाणी मागते काय. पण तिला काहितरी त्रास होतोय हे स्पष्टच दिसत होतं. मी पटकन आत जाऊन पाणी आणलं. तिला दिलं. पाचेक मिनिटं ती तशीच डोळे मिटून शांत बसली. ती लहान जरी असली तरी एक प्रकारचं आकर्षण होतं तिच्यामधे. काय होतं ते कळत नव्हतं पण काहि तरी होतं खास. मी पण गप्प बसून ती नॉर्मलला यायची वाट बघत बसलो. थोड्यावेळाने तिने डोळे उघडले आणि परत ते मगाच्चं गोड हसू हसली.

"काका माझं नाव सुमित्रा. मी इथे जवळच ट्युशनला चालले होते. मला कधी कधी दम्याचा त्रास होतो. अचानक जड वाटायला लागलं. तेवढ्यात तुमचं घर दिसलं म्हणून तशीच आले अंगणात आणि दार वाजवलं. माफ करा हं..." परत ते गोड हसू.

"अगं माफ करा काय? तू बरोबरच केलंस. आणि त्रास कसला मला त्यात. बरं आता कसं वाटतंय? डॉक्टरला बोलावू का? इथेच जवळ आहेत एक डॉक्टर."

"नको काका, आता खूपच बरं वाटतंय."

"बस जरा आराम कर." थोडा वेळ बसू तर दे बिचारीला, मग बघू काय करायचं ते. बसल्या बसल्या ती गप्पा मारायला लागली.

"आम्ही की नै, नविनच आहोत इथे. पाचवीत आहे मी. इथे जवळच शिकवणीला जाते मी. आठच दिवस झाले. मी बघते रोज तुम्हाला. यावेळी तुम्ही ऑफिसला जायला निघता ना. मला माहित आहे." तिची गाडी भरधाव सुटली होती.

मला पण मजा वाटायला लागली. इतक्या बडबडीची सवयच नहिये मला पण छानच वाटतंय की.

"काय गं, तू राहतेस कुठे?"

"हे असं इथून सरळ पुढे गेलं की देशमुखांचा वाडा लागतो की नाही त्याच्या पुढे बघा एक मोठ्ठं आंब्याचं झाड आहे आणि त्याच्या बाजूला एक विहिर आहे ना तिथे."

"विहिरीत?", मला पण तिची चेष्टा करायची हुक्की आली.

"काय हो काका, विहिरीत नै कै. पण जवळच." ती एकदम जीभ चावून म्हणाली. मस्त गोड होती पोरगी. तिची बडबड चालली होती मी पण तिच्याशी गप्पा मारत होतो. थोड्यावेळाने तिचा चेहरा बराच चांगला वाटायला लागला.

"काका मी जाते आता. पण मला थोडं थकल्यासारखं वाटतंय. मी आता सरळ घरीच जाते. मी तुम्हाला अजून थोडा त्रास देऊ का?"

"अगं त्रास कसला, बोल की."

"तुम्ही मला सोडायला माझ्या घरापर्यंत याल? प्लीऽऽऽज"

आता नाही कसं म्हणणार. तसा थकवा दिसतच होता तिच्या चेहर्‍यावर. मी पटकन शर्ट पँट घातली आणि आम्ही निघालो. तिची बडबड चालूच.

"काका, तुम्ही कित्ती चांगले आहात हो. मला बाई कोणी मित्र मैत्रिणीच नाही अजून इथे. इतका कंटाळा येतो. आणि मला दमा आहे ना मग सगळ्यांच्या बरोबर खेळताच येत नाही. सारखं आपलं घरातच." मला पण वाईट वाटलं. एकटेपणा सवय नसताना कसा खायला उठतो हे माझ्यापेक्षा कोणाला चांगलं माहित असणार?

तिचे डोळे एकदम लकाकले. "काका, तुम्ही याल माझ्याशी खेळायला?" तिचा उत्साह बघून मलाच वाटलं, नाही कसं म्हणायचं.

मी म्हणलं, "येईन ना गं."

"बघा हां, प्रॉमिस?"

"यस, प्रॉमिस!!!" तिचा चेहरा अजूनच खुलला. बोलता बोलता वाट संपली कधी ते कळलंच नाही. तो वाडा मागे गेला आणि त्याच्या पुढेच अगदी १०० पावलांवर ते खुणेचं झाड होतं. आंब्याच्या झाडाला मोहोर अगदी मस्त आला होता.

"काका, मला कैर्‍या काढून देता?" ती नुसती उत्साहाने उसळत होती.

"अगं आत्ताशी कुठे मोहोर धरलाय. अजून कैर्‍या यायला वेळ आहे."

"ज्जा बाई, नका देऊ. नक्काच देऊ. पण सरळ नाही म्हणा ना. उगाच काहितरी कारणं सांगू नका." नाकाचा शेंडा तेवढ्यात लाल झाला होता बाईसाहेबांच्या. मला पण जरा लागलंच ते. मी नुसतं झाडावर चढून नाटक करायचं ठरवलं. तिचं मन राखायला. चढलो तसाच झाडावर. तशी मला काय सवय असणार झाडावर चढायची. धडपडत कसा तरी चढलो. एक फांदी आधाराला घट्ट धरून ठेवली. दुसर्‍या फांदीवर तोल सांभाळत उभा राहिलो. थोडवेळ उगाच इकडे तिकडे शोधायचं नाटक केलं. सुमित्राबाई खालून उगाच "ते बघा ते बघा, तिकडे दिसतीय वाटतं" करत होत्या. मी पण गुंगलो. माझ्या हालचालींमुळे झाडावरच्या मोहोराची बारीच फुलं खाली पडत होती.

अचानक मला जाणवलं, खालून आवाज यायचा बंद झालाय. "अरे, गेली कुठं" मनाशीच विचार करत मी खाली बघितलं. तिथे कोणीच नव्हतं. आता हिला काय लपाछपी खेळायचा मूड आला की काय? काय काय करावं लागेल अजून कोण जाणे. पण मी सगळीकडे नजर फिरवली तर जवळपास कुठे आडोसा पण नव्हता. गेली कुठं. मला अस्वस्थता आली. काही कळेचना. इकडे तिकडे बघता बघता बाजूच्या विहिरीकडे नजर गेली. पाणी तसं बेताचंच होतं. काळं मिट्टं पाणी हलकेच डुचमळत होतं. मी सहज म्हणून थोडी मान लांबवून बघायला गेलो. जे काही मला दिसलं, मी क्षणभर सुन्न झालो,

त्या विहिरीच्या पाण्यावर आंब्याची फुलं पडली होती आणि त्यांचा एक आकार तयार झाला होता, पाण्यावर अक्षरं उमटली होती,

"या!!! तुमचं स्वागत आहे"

एक थंडगार शिरशिरी माझ्या अंगात चमकली. एक क्षणात सगळा उलगडा झाला. म्हणजे, ती सुमित्रा... ती... सुमित्रा नव्हतीच, छे ती सुमित्राच होती, पण मग ती... बाप रे... देवा हे काय रे... त्या धक्क्याने माझं अंग शहारलं, माझा आधाराचा हात सुटला, तोल गेला आणि मी खाली विहिरीच्या दिशेने जातोय एवढीच जाणीव झाली. मी जोरात ओरडलो.
.
.
.
.
.
.
एकदम माझे डोळे उघडले आणि मी भानावर आलो. घामाने अंग डबडबलेलं होतं आणि मी माझ्या बेडवर उठून बसलो होतो. बाप रे, म्हणजे हे स्वप्न होतं? शक्यच नाही. इतकं खर्‍यासारखं? बराच वेळ तसाच बसून राहिलो. भानावर आलो. घड्याळात अजून ४.३०च झाले होते. परत एकदा मी थरारलो. आई नेहमी म्हणायची "पहाटेची स्वप्नं नेहमी खरी होतात." तिला पण तिच्या मृत्यू आधी असंच पहाटे स्वप्नं पडलं होतं असं बाबा नेहमी म्हणायचे. मी बराच वेळ विचार करत शांत बसलो.
.
.
.
.
.
.
साडे आठ वाजत आले आहेत. मी सगळं आवरून शांत पणे बसलो आहे. सत्य अटळ आहे. मी पण मनाची पूर्ण तयारी केली आहे. आत्तापर्यंत जे जगलो तोच भास होता का? आणि आता कुठे खर्‍या जीवनाला सामोरं जातो आहे का? छे: सगळा कालवा झालाय, त्या पेक्षा शांत बसावं. वाट बघत.

"डिंग डाँग"...... डोअरबेल वाजली.

मी शांतपणे उठलो. दार उघडलं. तोच गोड चेहरा माझ्याकडे बघून हसत होता.

"आलीस? चल आलोच मी. जरा दोन मिनिटं थांब हं... निरोप घेऊ दे मला."

तर मंडळी, निघतो मी. भेटूच परत कधीतरी. अहो, आश्चर्य कसलं वाटतंय तुम्हाला. मला पूर्ण कल्पना आहे मी कुठे चाललो आहे. आणि तरी मी तुम्हाला भेटू परत म्हणतोय? अहो, सुमित्रा एकटी कंटाळली म्हणून मला घेऊन चाललिये बिचारी. पण आम्ही दोघंच्या दोघंच किती दिवस खेळणार एकमेकांशी? कंटाळू ना आम्ही एकमेकांना. मग आम्हाला नविन नविन मित्र मैत्रिणी नकोत का? म्हणून म्हणलं... भेटू परत. नक्की बरं का... येतो आता.

माझं खोबार... भाग ५

on रविवार, नोव्हेंबर ०९, २००८

माझं खोबार... भाग १ , ... भाग २ , ... भाग ३ , ... भाग ४

*************

मित्रहो, आत्तापर्यंत मी माझ्या खोबारपर्यंतच्या प्रवासाबद्दल (जो माझा पहिला परदेश प्रवास होता) लिहिलं. 'केल्याने देशाटन...' या उक्तिची सत्यता पटायला खरं म्हणजे हा एक प्रवासच पुरेसा होता. सौदी अरेबिया मधे वास्तव्य करताना तर खूपच अनुभव आले, माणसं भेटली. निरनिराळ्या विचारधारा जवळून बघायला मिळाल्या. लोक कसे विचार करतात, त्यांच्या विचारांमागची भूमिका काय असते हे कळले. आता मी काही अनुभव सांगत पुढे जाणार आहे. हे अनुभव केवळ विचित्र (आपल्या दृष्टीने) समजूती आणि चालीरिती वगैरे तुमच्या पुढे मांडायचे म्हणून नव्हे तर तेथिल जीवनावर किंवा त्यांच्या विचारपद्धतीवर थोडा प्रकाश पडावा म्हणून लिहिणार आहे. मागेच लिहिल्या प्रमाणे मी जे काही लिहिणार आहे ते संपूर्ण पणे सत्य असेल, आपल्या भारतिय मनाला त्यातल्या काही गोष्टी 'सुरस आणि चमत्कारिक' वाटतील नक्कीच, पण हेच तर आहे 'अरबस्तान'... सुरस आणि चमत्कारिक.

चला तर मग...

*************

.... मस्त पैकी आंघोळ केली आणि बेडवर येऊन पडलो. मनात विचार चालू होते, कसं असेल ऑफिस? कसे लोक भेटतील? बाजूलाच खिडकी होती. सहज लक्ष गेलं, आकाश निरभ्र होतं. छान चांदणं होतं. चंद्राची सुंदर कोर दिसत होती. खूपच प्रसन्न वाटलं... मी त्या उबदार अंथरूणात सुखावत होतो, सगळा शीण जात होता. डोळे कधी मिटले ते कळलंच नाही....

*************

सौदी अरेबिया प्रमाण वेळ आणि भारतिय प्रमाण वेळेत फक्त अडिच तासाचाच फरक असल्याने (सौदी वेळ मागे) जेट लॅग वगैरे तसा फारसा जाणवत नाही. पण थोडा फरक जाणवतोच. सकाळी तशी लवकरच जाग आली. उजाडायला अजून थोडा वेळ होता, मिट्ट काळोख होता. थंडी मात्र खूप होती. मला आश्चर्यच वाटलं. आपली अशी समजूत असते की अरबस्तानात वाळवंटंच आहेत सगळीकडे त्या मुळे कायम गरमी असणार. पण तसे नाही. इथे ऋतू दोनच. उन्हाळा आणि थंडी. आणि दोन्ही अत्यंत भयानक, एक्स्ट्रीम. उन्हाळ्यात तापमान ५०डिग्री सेंटिग्रेडच्या वर गेलेले मी अनुभवले आहे. तसेच हिवाळ्यात तापमान ५ डिग्री सेंटिग्रेडच्याही खाली जातं. पण थंडीची खासियत म्हणजे वारा. भयानक वेगाने हा वारा वाहत असतो. रस्त्यावरून चालताना वार्‍याच्या विरूद्ध दिशेला चालणं जवळपास अशक्य. मग एखाद्या इमारतीच्या आडोश्याला उभं राहायचं थोडा वेळ. आणि जर का २ इमारती खूप जवळ जवळ असतील तर त्या चिंचोळ्या चॅनेल मधून जाताना तर त्या वार्‍याला भयानक जोर यायचा आणि आवजही चढायचा त्याचा.

हिवाळ्यात अजून एक वाईट प्रकार म्हणजे 'वारा'. आणि त्यामुळे उठणारं 'सँडस्टॉर्म'. कुठल्यातरी एका चित्रपटात दाखवल्याचं आठवतंय की नायक वाळवंटातून जात असतो आणि प्रचंड वारा वगैरे सुटतो. वाळूचं वादळ वगैरे होतं. अगदी तसंच नाही पण बर्‍यापैकी जवळपास जातं हे शहरातलं सँडस्टॉर्म. खरं तर ही वाळूची वादळं १२ महिने मधून मधून चालूच असतात (आणि साली नेमकी गुरूवारी / शुक्रवारीच होतात, वीकेंड सगळा नासतो :( ). तिथे सगळ्या खिडक्या अगदी पॅकबंद असतात, धूळ आत येऊ नये म्हणून आणि घरात सतत एसी किंवा हीटर चालू असतात त्यामुळे. पण एकदा का असं वादळ सुरू झालं की, अतिशय बारीक धूळ घरात शिरतेच शिरते. संपूर्ण घरात एक तलम असा धुळीचा थर जमतो. बाहेर रस्त्यांवर व्हिजिबिलिटी खूपच कमी होते. तरी सुध्दा सौदी लोक आपापल्या गाड्या जोरात पळवत असतात. अश्या वातावरणात खूप आणि भयंकर असे अपघात होत असतात. सोसाट्याचा वारा सुटलेला असतो. मी जेव्हा गाडी चालवायला लागलो तेव्हा अश्या वातावरणात गाडी कशी बघताबघता नियंत्रणाबाहेर जाते याचे खूप अनुभव घेतले आहेत. म्हणजे, आपण असे हायवेवरून १००-१२० कि.मी. वेगाने जात असतो. अचानक वारा सुटतो, धूळ उडते आणि १-२ मिनिटांच्या आत काही दिसेनासं होतं. त्यातच वार्‍याच्या प्रचंड झोतामुळे (जर का तो वारा गाडीच्या डावी-उजवी अश्या दिशेने असेल तर) गाडी सारखी एका बाजूला ढकलली जाते. स्टीअरींग व्हील गच्च धरून ठेवावं लागतं. नाहीतर क्षणात गेलीच गाडी रस्त्याच्या बाहेर. वार्‍याचा जोर प्रचंड असतो, विशेषतः शहराबाहेर पडलं आणि मोकळा भाग सुरू झाला की वार्याणने घातलेला धुमाकूळ सहज लक्षात यायचा. एकदा मी एक खूपच खतरनाक दृश्य बघितलं. हायवे वरून जात होतो आणि एका ठिकाणी जाहिरातींची होर्डिंग्ज लावायला मोठे मोठे स्टीलचे खांब उभे केले होते. एक दिवस जोराचं वादळ झालं आणि दुसर्‍या दिवशी ते खांब जागोजागी वाकलेले होते. दिवसच्या दिवस सूर्यदर्शन होत नसे. मी पुढे जेव्हा माझ्या स्वतःच्या घरात राहायला गेलो तेव्हा काढलेली छायाचित्रं खाली देत आहे.


दुपारी बारा - साडेबाराला काढलेला सूर्याचा फोटो.




असंच एक वादळ ऐन भरात असताना बल्कनीतून काढलेले फोटो. वेळः भर माध्याह्नीची.


वरील ४ फोटोंपैकी पहिल्या फोटोत जी मशिद अंधुक दिसते आहे तिचा स्वच्छ सूर्यप्रकाशात काढलेला फोटो.

*************

तर मी असा जागा होऊन अंथरूणात लोळत होतो. खूपच फ्रेश वाटत होतं. तेवढ्यात एक खतरनाक रामसे चित्रपटांसारखा भयानक आवाज यायला लागला. एखाद्या भयाण निर्मनुष्य अश्या जागी एक भूतबंगला असतो आणि तिथे कसा एक प्रकारचा शिट्टी मारल्या सारखा भेसूर आवाज येतो थेट तसा. माझी झोप पूर्ण उडाली. (त्या वेळी प्रियालीला ओळखत नव्हतो, नाही तर तिचीच आठवण आली असती ;) ) काही केल्या कळेना. थोड्या वेळाने एक सहकारी उठला तेव्हा त्याला पहिला हाच प्रश्न केला. तो खूप हसला. म्हणाला, 'अरे या खिडक्या एकदम एअरटाईट नसतात रे. त्या मधे कुठेतरी गॅप राहते आणि मग बाहेर हवेचा वेग खूपच असल्याने ती हवा या फटीतून आत घुसत राहते त्या मुळे असा आवाज येतो'. बाप रे.... असला आवाज? कधी एखाद्या ठिकाणी एकटं रहावं लागलं तर आफतच आहे, (दैवयोगाने तो पण प्रसंग आला माझ्यावर २-३ वेळा. तेव्हाची माझी अवस्था पूर्ण आठवते आहे अजूनही.)

लगेच आंघोळ वगैरे करून तयार झालो. इथे आयता नाश्ता मिळणार नव्हता. घरी म्हणजे कपडे वगैरे करुन तयार झालं की तो पर्यंत आई / बायको ब्रेकफास्ट समोर ठेवत असे. इथे सगळे तयार होऊन एकदम बाहेर पडत असत. जवळच एक 'कॅफेटेरिया' होता. तिथे चहा / सँडविच वगैरे खाऊन मग सगळे आपाआपल्या कस्टमरकडे जात असत. काही लोक ऑफिसमधे जात. कंपनीने एक गाडी आणि ड्रायव्हर ठेवला होता सगळ्यांच्या दिमतीला. बाकीच्यांचं आटोपेपर्यंत वाट बघत बसलो. समोरच पेपर पडला होता. रोज सकाळी मस्त ब्रेकफास्ट करत करत पेपर वाचायची सवय होतीच, इथे आधीच पेपर पडला होता हातात. इथले पेपर कसे असतात हे कुतूहल होतंच. अरब न्यूज हे तिथलं एक प्रसिद्ध वर्तमानपत्र. सहज चाळता चाळता एक बातमी नजरेस पडली. आदल्या दिवशी विमानतळावर बघितलेल्या सुरक्षेचा आणि एका पाकिस्तानी कुटुंबाला पकडून नेताना पाहिले होते त्या घटनेचा उलगडा झाला.

अंमली पदार्थांच्या बाबतीत सौदी अरेबियाचे कायदे फार म्हणजे फारच कडक आहेत. अंमली पदार्थ देवन करणार्‍याला किंवा त्यांची तस्करी करणार्‍याना 'देहांत' हे एकमेव शासन आहे. आणि या शिक्षेची अंमलबजावणी अगदी पुरेपूर होते. अजिबात हयगय होत नाही. या प्रकारामुळे तस्करी करणारे नविन नविन युक्त्या वापरतात. असाच एक प्रकार आदल्या दिवशी घडला होता. अफगाणिस्तानात अंमली पदार्थांचं उत्पन्न खूप होतं आणि तो देश संपूर्ण जगात या बाबतीत पहिल्या तीन क्रमांकात आहे हे तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. तिथे गरिबी पण खूप आहे. त्याचाच फायदा हे तस्कर घेतात. ज्या माणसाला आयुष्यात कधीही पोटभर खायला नाही मिळालं त्याला जर काही रकमेची लालूच दाखवली तर तो कितीही धोकादायक कामं करायला सहजी तयार होतो. जिवंत सहीसलामत आलाच परत तर पैसा मिळतो. पकडला गेला आणि मेला तर कमीत कमी आई बाप / बायकापोरं तरी सुखात जगतील असा हा साधा सोपा पण भयानक हिशेब असतो.

तर झालं होतं असं. सौदी अधिकार्‍यांचं पाकिस्तान / अफगाणिस्तान कडून येणार्‍या प्रवाश्यांकडे तसं विशेष लक्ष असतंच. तसंच या वेळीही होतं. एक मोठं कुटुंब उतरलं होतं विमानातून. बरीच विमानं थोडीफार आगेममागेच आल्यानं विमानतळावर झुंबड उडाली होती. तशातच विमानतळावरच्या एका भागातलं वातानुकूलन बंद पडलं होतं. या कुटुंबातल्या सगळ्या बायका प्रथेप्रमाणे नखशिखांत काळ्या बुरख्यामधे झाकलेल्या होत्या. त्यातल्या एकीकडे एक अगदी छोटं असं लहान मूल होतं आणि तिने त्याला हातात आडवं धरलं होतं. इमिग्रेशन वगैरे चालू होतं. वातानुकूलन बंद पडल्यामुळे थंडी असून सुद्धा आत मधे बर्याधपैकी उकडत होतं. मुलं रडत होती. पण एका अधिकार्यानच्या लक्षात आलं की त्या बाईच्या हातातलं मूल अजिबात रडत नाहिये आणि काही हालचालपण करत नाहिये. तो मुद्दाम तिच्यावर पाळत ठेवून राहिला. बराच वेळ तसाच गेला मुलाची काहीच हालचाल नाही आणि त्या बाईने पण त्याला दूध पाजणे वगैरे काही नाही. त्याला काहितरी संशयास्पद वाटले. अजून बराच वेळ गेल्यावर त्या पूर्ण कुटुंबाला एका बाजूला नेण्यात आलं आणि पूर्ण झडती घेण्यात आली. तेव्हा कळलं की ते मूल मेलेलं होतं आणि त्याच्या शरिरात आत मधे अंमली पदार्थ भरण्यात आले होते. (पेपर मधे असे आले होते की तो इतका निर्ढावलेला अधिकारी सुद्धा टॉयलेट मधे जाऊन ओकला होता!!!) त्या पूर्ण कुटुंबाला अटक करण्यात आली. (पुढे असे कळले की त्या बायका आणि इतर मुले यांना काही काळ तुरुंगात टाकून मग डीपोर्ट करण्यात आले. पण त्या सगळ्या पुरूषांना मात्र देहदंड झाला. मारून टाकलं.) पहिल्याच दिवशी सकाळी असलं काही वाचून खरं तर थोडी खिन्नता आली मनाला. पण हळू हळू सवय झाली पुढे असलं काही तरी वाचायची. मी पण निर्ढावलो. :(

नंतर सगळे बाहेर पडलो. पोटभर न्याहारी झाल्यावर ऑफिसकडे निघालो. पहिलाच दिवस असल्याने ऑफिस मधे काही सोपस्कार पार पाडायचे होते. क्लायंट कडे दुसर्‍या दिवसापासून जायचे होते. गाडी ऑफिसच्या दिशेने निघाली. सगळ्यात पहिल्यांदा मनात काय भरलं असेल तर मोठे रस्ते, एक प्रकारचा 'मोकळेपणा' आणि रस्त्याच्या मधोमध दुभाजकावर असलेली हिरवळ आणि फुलझाडं. पूर्ण रस्ताभर जांभळ्या, निळ्या, पिवळ्या फुलांचे ताटवेच्या ताटवे पसरले होते. जेवढी हिरवळ मी भारतात नाही बघितली तेवढी सौदी अरेबिया सारख्या वाळवंटात बघितली. छान प्रसन्न वाटत होतं. मला प्रश्न पडला की या वैराण भागात अशी हिरवळ आणि ताटवे बनवायचे आणि त्यांची निगा राखायची म्हणजे किती पाणी लागत असेल. थोडं पुढे गेलं तर एक भला मोठा पाण्याचा टँकर दुभाजकाच्या बाजू बाजूने अगदी हळू हळू जाताना बघितला. त्याच्या मागोमाग एक माणूस हातात पाईप घेऊन त्या टँकर मधलं पाणी त्या झाडांना आणि हिरवळीला घालत होता. आपल्या कडे लाखो लोकांना साधे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नाही. आणि इथे वाळवंटात या लोकांनी अक्षरशः नंदनवन फुलवले होते. मी आमच्या ड्रायव्हरला विचारले की हे पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर येतं कुठून? उत्तर ऐकून मी अजूनच चाटच पडलो. सौदी अरेबियाला खूप मोठा समुद्र किनारा लाभला आहे. इथे बर्‍याच ठिकाणी 'वॉटर डीसॅलिनेशन प्लँट्स' आहेत. तेल आणि नॅचरल गॅस मुबलक आणि अतिशय स्वस्त प्रमाणात उपलब्ध असल्याने असे प्लँट्स चालवणे खूपच सोपं आणि किफायतशीर पडतं. तर अश्या प्रकारे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं. एका क्षणात पेट्रोडॉलर्सची ताकद समजली. शिवाय हेही लक्षात आलं की भले तिथे लोकशाही नसेल पण येणार्‍या पैश्यामुळे सरकारने प्राथमिक सुविधा म्हणजे रस्ते, पिण्याचे पाणी वगैरे खूपच उत्तम रितीने पुरवले आहे. त्या बाबतीत तरी कोणाला नावं ठेवायचा काहीच चान्स नाही लोकांना.



आमचं ऑफिस 'पेट्रोलियम सेंटर' नावाच्या कमर्शियल सेंटर मधे होतं. बर्यारच मोठ्या मोठ्या तेल धंद्याशी निगडीत कंपन्यांची कार्यालयं या इमारतीत आहेत. ऑफिस अगदी प्रशस्त होतं पण तिथे भयानक शांतता असायची. क्वचित कधी एखादा माणूस दिसायचा. ऑफिसातले बहुतेक लोक बाहेरच असायचे. दर गुरूवारी मात्र सगळे ऑफिसमधे असायचे. त्या दिवशी नुसतं गजबजून जायचं. सगळे सोपस्कार पूर्ण करे पर्यंत दुपार उलटून गेली. पहिलाच दिवस असल्यामुळे काम काहीच नव्हतं. मस्त आरामच चालला होता. कुठल्या प्रोजेक्टवर मला काम करायचं हेही ठरलं होतं त्या मुळे त्या बद्दल थोडी माहिती वाचत होतो. निवांत गेला दिवस. एक गंमतीची गोष्ट घडली. तिथला एक सहकारी खूपच चांगला होता. छान गप्पा वगैरे मारत होता. त्याने खूप गंमतिदार चित्र दाखवलं. म्हणाला "मला अजून दोनच वर्षं झाली आहेत. तू किती दिवस रहायचं ते, हे चित्रं पाहून ठरव." :)



संध्याकाळी लवकरच हॉटेलवर परत आलो. एक एक जण येत होता परत. जेवायला एका जवळच्याच ठिकाणी गेलो. खरं तर नॉन व्हेज खात नसल्यामुळे मला इथे आपल्या जेवणाची कशी सोय होईल अशी एक शंका होतीच मनात. पण जिथे जेवायला गेलो होतो त्या भागात बरीच भारतिय रेस्टॉरंट्स दिसली. आणि बहुतेक ठिकाणी थाळी आणि शाकाहारी पदार्थ मिळतात हे ऐकून बरे वाटले. मस्त जेवून वगैरे हॉटेलवर आलो परत. आत्ताशी कुठे ८.३० / ९ च वाजले होते. हॉटेलच्या लॉबीत जरावेळ गप्पा मारत बसलो. रिसेप्शनवर पण कालचा इजिप्शियन नव्हता. एक कोणीतरी हैद्राबादीच दिसत होता. आमच्याच वयाचा पोरगा होता. तो पण आमच्यात येऊन गप्प मारयला लागला. बोलता बोलता तो आमच्या बॉसला म्हणाला, 'क्या मियां, इत्ते दिनो से बोल रहा हूं, कुछ अच्छासा जॉब दिलाओ. आप कुछ नाही कर रे.' आमचा बॉस म्हणाला त्याला, 'अरे हमारा सॉफ्टवेअर डेवलपमेंट इधर नही है, वो सब इंडिया मे है. फिर भी ट्राय करता हूं.' मी विचार करत होतो की हा रिसेप्शनिस्ट पोरगा, सॉफ्टवेअर डेवलपमेंट मधे काय करणार?" त्यालाच विचारले. त्याची हकिकत ऐकल्यावर मात्र नसते विचारले तर बरे झाले असते असे वाटले. कमीतकमी पहिल्या दिवशी तरी नको.

त्याची कहाणी अशी. तो राहणारा हैद्राबादचा. घरची गरिबी. ६-७ भावंडं. घरी कमावणारे वडिल एकटे. हा शिकला. पदवीधर झाला. ओरॅकलचे वगैरे कोर्स केले आणि एका छोट्या कंपनीत नोकरी पण मिळाली. पण डोक्यात गल्फ मधे जायचे वेड घुसले. पैसा कमवायचा, बस्स्स. एक एजंट भेटला. म्हणाला १ लाख रुपये लागतील, तुला सौदी अरेबियाचा व्हिसा आणि नोकरी देतो. याच्या डोक्यात तर पक्कंच घुसलं. पण एक लाख रुपये आणायचे कुठून? याची तळमळ बघून त्याच्या बापालाही वाटलं, पोरगं जाईल तिकडे तर कमवेल व्यवस्थित आणि पैसा दिसेल आपल्याला पण. बापने घर गहाण टाकलं आणि उभे केले पैसे. त्या एजंटने व्हिसा मिळवला. आणि नोकरी पण. एका मोठ्या हॉटेलमधे काँप्यूटरशी संबंधित काम करायचे. हा खूष झाला. त्याच धुंदीत आला इथे. पहिल्याच दिवशी दणका बसला. इथल्या पध्दतीप्रमाणे त्याचा पासपोर्ट काधून घेतला त्याच्या मालकाने आणि सरळ एक बांधकाम चालले होते (तेच ते मोठे हॉटेल जिथे हा काँप्यूटरचे काम करणार होता :) ) तिथे नेऊन लाद्या बसवायच्या कामावर लावला. हा पोरगा अक्षरशः कोलमडला. खूप रडला भेकला. २-३ दिवस अन्नपाणी सोडलं त्याने. काही उपयोग झाला नाही. शेवटी चूपचाप तेच काम केलं २-३ महिने. नंतर अजून असंच काही. हळूहळू त्या मालकाशी नीट वागून संबंध नीट बनवले आणि मग या हॉटेलला रिसेप्शनिस्ट म्हणून ठेवला त्याला. त्याच दिवशी माझा पण पासपोर्ट काढून घेतला होता कंपनीत. आज ते सगळं आठवून हसायला येतंय. तेव्हा हादरलो होतो. तरी बरं आमचे सगळे सहकारी भारतिय होते आणि तशी काही भिती नव्हती. पण त्या दिवशी अस्वस्थ झालो होतो हे नक्की.

*************

दुसर्‍या दिवसांपासून काम नियमित सुरू झालं. हळू हळू मी पण रूळलो. काही दिवसांनी हॉटेल सोडलं आणि एका भारतिय कुटुंबात पेइंग गेस्ट म्हणून राहू लागलो. तेवढंच जरा घरच्या सारखं वाटायचं. रुटिन आयुष्य सुरू झालं. एक प्रकारचा सरावलेपणा आला माझ्यात. जी काही अलिखित बंधनं असतात ती सगळी अक्षरशः 'सेकंड नेचर' सारखी अंगात भिनली हळूहळू. सौदी अरेबिया बद्दल जी एक भिती वाटत होती ती गेली.

बंधनं म्हणाल तरी तशी ती फारशी जाचक नव्हती. पण अडचण मात्र नक्कीच व्हायची. दिवसातून पाच वेळा प्रार्थना होते. आपल्या कडे याला नमाज़ म्हणतात, पण खरा अरबी शब्द आहे 'सलाह'. तर ही सलाह ५ वेळा असते आणि प्रत्येक वेळी आधी 'अझान' (मूळ अरबी शब्द 'अधान') होते. ही अधान झाली की पटापट दुकानं बंद होतात, माणसं रस्त्यावरून गायब होतात. सगळीकडे सुनसान शांतता पसरते. प्रार्थना संपली की सगळं पूर्ववत्. सुरूवातीला सवय नसल्याने जरा विचित्र वाटायचं पण नंतर सवय इतकी झाली की प्रार्थनेच्या वेळा सहज लक्षात राहू लागल्या. प्रार्थनेच्या वेळा लक्षात ठेवाव्या लागत कारण, त्या सतत बदलत असतात. नमाजाची वेळ ही आकाशातल्या सूर्याच्या स्थानावर अवलंबून असते. म्हणजे सूर्योदयाच्या आधी केली जाते ती 'फजर', सूर्य बरोबर डोक्यावर आला की 'धुहर', सूर्य कलायला लागला की 'असर', सूर्य मावळला की 'मघरिब' आणि सूर्यास्तानंतर १-१.५ तासांनी 'इशा'... अश्या त्या पाच प्रार्थना. पूर्ण वर्षात दिवस लहान मोठा होत जातो. त्यामुळे या प्रार्थनांच्या वेळा पण बदलत जातात. उन्हाळ्यात खोबारला खूप लवकर म्हणजे सकाळी ४ वगैरे वाजताच उजाडायचे. साहजिकच त्या वेळी सकाळ्ची प्रार्थना ३.३० ला वगैरे व्हायची. आणि संध्याकाळी ७-७.३० ला सूर्यास्त व्हायचा तर त्या वेळी 'मघरिब' आणि मग 'इशा' रात्री ९ वाजता वगैरे. हिवाळ्यात सूर्योदय ६.३० च्या सुमारास आणि सूर्यास्त मात्र संध्याकाळी ४.३० वाजताच. साहजिकच प्रार्थनेच्या वेळा पण पुढे मागे होत, आणि तेवढ्या वेळात बाहेर काहिही करता येत नाही म्हणून त्या वेळा लक्षात ठेवून त्या प्रमाणे सगळे आखावे लागायचे. बरं या वेळी तिथले संस्कृतिरक्षक (मुतव्वा) सगळीकडे फिरत असतात. एखादा मुसलमान प्रार्थनेला न जाता नुसताच उभा असलेला आढळला तर त्याला पायावर वेताच्या छडीचे २-४ फटके मारून जवळच्या मशिदीत पिटाळत. :) (मुसलमान नसलेल्यांना काय करत ते सांगेनच पुढे ;) )

अर्थात ही बंधनं पण स्थळाप्रमाणे कमी अधिक जाचक व्हायची. सौदी अरेबिया हा एक अतिप्रचंड देश आहे. त्यामुळे स्थानिक चालींमधे फरक असणारच. त्यामानाने खोबारला फारसं कर्मठ वातावरण नव्हतं. पण १५ किमी वरील दम्मामला त्या मानाने वातावरण जास्त कडक होतं. रियाध मधे तर खूपच कर्मठपणा आहे आणि अगदी अंतर्भागात काही ठिकाणी कल्पनातीत कर्मठ लोक आहेत.

अर्थात एक प्रकारचा दबले पणा असायचा सतत पण मित्र वगैरे झाले आणि तेवढ्या वर्तुळात आयुष्य सिमीत पण एकंदरीत मजेत जाऊ लागलं. पण तेवढ्यात एक अशी घटना घडली की त्या मुळे मी परत 'सौदी अरेबिया काय चीज आहे' या वास्तवात परत आलो.

एका शुक्रवारी, सुट्टीचा दिवस असल्याने, आमच्या कंपनीच्या ड्रायव्हरला पटवून एका मित्राकडे जायचा बेत बनवला होता. तो जरा लांब राहायचा म्हणून लवकरच निघालो. शुक्रवारी संपूर्ण सौदी अरेबिया पूर्ण पणे बंद असतं. तो अतिशय महत्वाचा प्रार्थनेचा दिवस. इतर दिवशी नमाज न पढणारे (सौदी अरेबियात असा मुसलमान विरळाच) लोक सुद्धा त्या दिवशी न चुकता नियमाने नमाज पढत. दुपारचा नमाज हा अत्यंत महत्वाचा असतो. त्या नमाजाच्या आधी एखादे लांबलचक प्रवचन (अरेबिक शब्द - खुत्बा) असतं. तर आम्ही निघालो सकाळचे लवकरच आणि थोड्या वेळात नमाजाची वेळ झाली. आमचा ड्रायव्हर एके ठिकाणी गाडी उभी करून गेला नमाज पढायला. मी शांतपणे गाडीत एसी लावून बसून राहिलो. नमाज वगैरे झाला तब्येतीत, मी म्हणलं आता येतील चालकसाहेब. तेवढ्यात त्या मशिदी समोरच्या मोकळ्या मैदानात सायर्न वाजवत ५-६ पोलिस व्हॅन्स आल्या. त्यांच्या मागोमाग एक ऍम्ब्युलन्स. मला प्रचंड टेंशन आलं. काय भानगड झाली आहे काही कळेना. सलाह संपवून बाहेर येणारे लोक मात्र त्या व्हॅन्स पाशी जमा होत होते. थोड्या वेळाने एका व्हॅन मधून एका माणसाला बाहेर काढले. तो अर्धवट बेशुद्ध होता, म्हणजे त्याला गुंगीचे औषध देण्यात आले असावे असे वाटत होते. माझी ट्यूब पेटली एकदम. हा काहीतरी फटके वगैरे देण्याची शिक्षा अंमलात आणण्याचा कार्यक्रम असावा. मी गाडीतून उतरलो आणि तिथे थोडा मागे जाऊन उभा राहिलो. माझी उत्सुकता पार ताणली गेली होती. हे असं काही होतं इथे असं खूप ऐकलं होतं पण अचानक बघण्याचा योग आला होता. थोडा वेळ तसाच गेला. गर्दी पण वाढली. त्या गुन्हेगाराला खाली गुडघे टेकून बसायला लावले. त्या पोलिसांपैकी एकाने एक लांबलचक फर्मान उघडले आणि वाचले. (नंतर कळले की ते त्याच्यावरचे आरोप आणि शिक्षेबद्दलचे न्यायपत्र होते). त्या नंतर जवळ जवळ ५-१० मिनिटे परत काहीच नाही. सगळे शांत उभे होते. पोलिस सुद्धा. कोणीच काही बोलत नव्हते. (हे पण नंतर कळलं की न्यायपत्र वाचनाच्या शेवटी असं म्हणलेलं असतं की या गुन्ह्याचा जो कोणी बळी असेल तो / ती किंवा त्यांचे वारस या माणसाला माफ करून किंवा काही पैश्याच्या मोबदल्यात मरणापासून वाचवू शकतात. त्या साठी तो ५ मिनिटांचा वेळ. आणि असे बरेच वेळा घडते की गुन्ह्यात बळी ठरलेले त्या गुन्हेगाराला काही पैसे घेऊन किंवा तसेच माफ करतात. अश्या पैशाला 'दिया' म्हणतात, इंग्लिश मधे 'ब्लड मनी' असा शब्द प्रचलित आहे.) आणि एकदम एका दुसर्‍या व्हॅन मधून एक माणूस बाहेर आला त्याच्या हातात होती एक तलवार. एका क्षणात मी समजलो. हा फटके बिटके मारण्याचा कार्यक्रम नव्हता. मी चक्क एक देहांत शासन अंमलात आणण्याचा कार्यक्रम बघत होतो. मला घाम फुटला. या प्रकाराबद्दल बोलणं सोपं असतं, कल्पना करणं सोपं असतं.... अवचितपणे असं समोर दृश्य उभं ठाकलं तेव्हा मात्र मी हादरलो. डोळे मिटून घेतले. हे सगळं लवकर आटपावं म्हणून देवाची प्रार्थना करत होतो. एक मोठा 'सप्प्प' असा आवाज आला... एक सेकंद सगळेच शांत होते. तेवढ्यात टाळ्या वाजवल्याचा आवाज आला. डोळे उघडले. समोर रक्ताचं थारोळं, एक धड आणि एक मुंडकं. पोलिस आणि काही मुतव्वा टाळ्या वाजवत होते. जगातला एक पापी नष्ट केल्याचा आनंद व्यक्त करत होते. मी काहिही विचार न करता मागे वळलो, धावत धावत गाडीपाशी आलो. ड्रायव्हर आत बसला होता. गाडी चालू होती. तो म्हणाला, "कशाला गेलास तिथे? मी पहिल्यांदा हे बघितलं तेव्हा १५ दिवस जेवलो नव्हतो. काही खाल्लं की उलटी व्हायची. मी तुला जाताना बघितलं, हाका मारल्या तुला पण तुझं लक्षच नव्हतं." मी कसाबसा एवढंच बोललो, "आधी गाडी सुरू कर. इथनं नीघ." आम्ही तिथून निघायच्या आत सगळं मैदान रिकामं झालं होतं आणि दोन माणसं एका मोठ्या टँकर मधलं पाणी टाकून ती जागा साफ करत होते. दुसर्‍या दिवशी तिथनं गेलो तर काल इथे असं काही घडलं असेल अशी शंका सुद्धा येत नव्हती.




http://lh6.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/SRX69ehf-cI/AAAAAAAAAX8/Rf4PBORuZR8/s400/saudi_law.jpg

(संपादक - इथे दिलेले चित्र हे बघणार्‍याचे मन विचलित करणारे भयावह असे असल्याकारणाने संपादित करुन काढून टाकले आहे. सत्य असले तरी सर्वसामान्य वाचकाला इतक्या भयावह पद्धतीने ते बघणे नकोसे वाटते. लेखकाने संपादनामागच्या भावना लक्षात घ्याव्यात!)

मूळात मला वेगवेगळ्या धर्मांबद्दल, संस्कृतिंबद्दल, लोकांबद्दल कुतूहल फार आहे. पण त्या दिवशी हा प्रकार बघितल्यावर मनात आलं, "नक्की कसे आहेत हे लोक? काय म्हणतो यांचा धर्म? खरंच का असं काही आहे त्याच्यात? जाणून घेतलंच पाहिजे." आणि हळूहळू मी त्याबद्दल वाचायला लागलो. लोकांना प्रश्न विचारायला लागलो.

क्रमशः

(संपादक मंडळासाठी सूचना: या लेखातील काही छायचित्रे आंतरजालावरून घेतली आहेत. धन्यवाद.)

माझं खोबार... भाग ४

on रविवार, नोव्हेंबर ०९, २००८

माझं खोबार... भाग १ , ... भाग २ , ... भाग ३

मला घ्यायला माझे दोन सहकारी येणार होते. सगळं नीट ठरलं होतं. त्यांनी कधी मला बघितलं नव्हतं पण ते हातात पाटी घेऊन उभे राहणार म्हणाले होते. त्यामुळे ती काही चिंता नव्हती. ते प्रवासाचे दिव्य पार पडले होते. आता सरळ गाडीत बसायचं आणि तडक मुक्कामी जाऊन आडवं व्हायचं. त्या मुख्य दरवाज्याची सरकती दारं उघडली आणि...

*************

मला बाहेर यायला इतका जास्त वेळ लागल्यामुळे मी बाहेर येईपर्यंत बरेचसे प्रवासी निघून गेले होते. तेव्हा खोबारच्या विमानतळावर फारशी रहदारी नसल्यामुळे बराच शुकशुकाट पसरला होता. तुरळक गर्दी होती. मी शोधत होतो माझ्या सहकार्‍यांना. माझी अपेक्षा नव्हती की हारतुरे घेऊन उभे असतिल पण गेला बाजार हातात माझ्या नावाची पाटी घेऊन तरी असतिलच असतिल. बघतो तर बाहेर तसा काहीच प्रकार दिसेना. मला वाटलं की असतिल इथेच कुठे तरी, इथेच थांबू थोडा वेळ म्हणजे ते आपल्याला शोधत असतिल तर आपण सापडू त्यांना चटकन. बराच वेळ थांबलो तिथे. १० मिनिटं झाली - १५ मिनिटं झाली... २०-२५ मिनिटं झाली तसा माझा धीर सुटला. काहितरी गडबड नक्कीच होती. काय करावं? मी जरा इकडे तिकडे फिरून नजर टाकायला सुरूवात केली. काहीच उपयोग नाही झाला. आधीच सौदी अरेबिया बद्दल एक भिती असते आपल्या मनात त्यात परत आल्या आल्या एवढा मोठा दणका बसला होता की मी पार ढेपाळलो होतो. मनात विचार येत होता, 'मरू दे साला... पुढचं फ्लाईट बुक करूया आणि जाऊ परत.' पण तिकिट तरी कसं काढणार? खिशात पैसे कुठे होते तेवढे. कंपनीतून सांगितलं होतं की फक्त थोडेसे हातखर्चापुरते घेऊन ये बरोबर, आल्या आल्या तिथल्या चलनात ऍडव्हांस देऊ तुला. त्यामुळे खिशात फक्त १०० सौदी रियाल होते.

बरं त्या वेळी मोबाईल फोन्स पण नव्हते आजच्यासारखे. ज्या हॉटेल (फर्निश्ड अपार्टमेंट) मधे माझे सहकारी रहायचे आणि मी पण राहणार होतो तिथला नंबर मात्र होता माझ्याजवळ. म्हणलं बघू फोन करून. चला आता पब्लिक फोन बूथ शोधा. आपल्याकडे पब्लिक फोन बूथ पिवळ्या पाट्यांमुळे लगेच ओळखू येतात. इथे कसे ओळखायचे? फिरता फिरता एका जागी २-३ दुकानांवर 'इंटरनॅशनल कॉल केबिन' अश्या पाट्या दिसल्या. आणि त्यावरची अक्षरं फिक्कट जांभळ्या रंगात होती. चला, इथे 'कॉल केबिन्स' म्हणतात तर. आणि रंग पण कळला. नविन जगातल्या नविन खुणा शिकायाला सुरुवात केली. पॅरलिसिस मधून बरा होणारा माणूस जसा लहानपणापासून वापरलेल्या अवयवांचा उपयोग करायला परत पहिल्यापासून शिकतो तसं माझं जुन्या सगळ्या धारणा, खुणा पुसून त्या जागी नविन माल भरायचे काम सुरू झाले.

चला एकदाचा फोन बूथ सापडला. तिथे आत शिरलो. लाईनीने १०-१२ काचेच्या बंद खोल्या होत्या. काही ठिकाणी लोक आत मधे जाऊन बोलत होते. एक रिकामी केबिन पाहून मीपण घुसलो. नंबर फिरवला. एंगेज. हरकत नाही. २ मिनिटे थांबलो, परत फिरवला तर परत एंगेज टोन. असं ४-५ वेळा झालं. मला शंका आली की बहुतेक मी नंबर चुकीचा तर नाही ना लिहून घेतला? पण मग निराळा टोन येईल ना? एंगेज टोन का येईल? बाहेर आलो आणि तिथे काउंटरवरल्या भाऊला नंबर दाखवला. त्याला इंग्रजीचा गंध नसणार हे माहित होतेच, तितपत सौदी अरेबियाची ओळख तो पर्यंत झालीच होती. खाणाखुणा करून त्याला समजवलं की बाबा रे हा नंबर का लागत नाहिये ते सांग. त्याने नंबर डायल केला. परत एंगेज टोन. पण तो पठ्ठ्या काय लाईन कट करेना. ६-७ वेळा तो टोन वाजल्यानंतर अचानक समोरून कोणीतरी फोन उचलला आणि 'हॅलो' म्हणालं. मी चाट. तो कॉल केबिनवाल्याने माझ्या कडे 'चले आते है मुंह उठाके, कहा कहासे' असा एक कटाक्ष टाकला आणि फोन एका केबिन मधे ट्रांसफर केला. (भानगड अशी होती की आपल्या कडे भारतात आपण फोन करतो तेव्हा समोरून आपल्याला 'ट्रिंग ट्रिंग' अशी रिंग ऐकायला येते. गल्फ मधल्या सर्व देशांत 'बीप बीप' असा एंगेज टोन सारखाच पण जरा लांब आणि वेगळा आवाज येतो. मला वाटत होते की एंगेज टोन आहे पण ती खरी रिंगच होती.... धडा नंबर २ :) )

मी फोन उचलला आणि बोलायला लागलो. समोरचा माणूस अरबी होता हे त्याच्या उच्चारावरून लगेच कळलं. मी माझ्या सहकार्‍यांची नावं घेऊन ते आहेत का वगैरे विचारायला सुरूवात केली. माझ्या सगळ्या प्रश्नांवर त्याचे एकच उत्तर. 'इंग्लिझी माफी, खुल्लु माफी मौगूद' मला कळेना हा माफी कसली मागतो आहे. (अरबी भाषेत फी म्हणजे होकारार्थी आणि माफी म्हणजे नकारार्थी. आणि तो होता इजिप्शियन. इजिप्शियन अरबी भाषेत 'ज' ला 'ग' म्हणतात. म्हणजे मौगूद चा खरा उच्चार मौजूद असा आहे जो मला कळला असता कारण अरबी मौजूद आणि हिंदी मधला मौजूद एकच. खुल्लु म्हणजे 'सगळे / सर्व'. म्हणजे तो माझे सर्व सहकारी तिथे असण्या / नसण्या बद्दल काहीतरी म्हणतो आहे हे माझ्या लक्षात आले असते पण अरबीचे ज्ञान काहीच नव्हते तेव्हा.)

४-५ वेळाझटापट केल्यानंतर मी हार पत्करली, फोन आपटला आणि सरळ पैसे चुकते करून बाहेर पडलो. आता मात्र मला खूप शांत वाटायला लागलं होतं. इतका दमलो होतो (शारिरीक / मानसिक दोन्ही) की काही वाटायच्या पलिकडे गेलो होतो. अति झालं आणि हसू आलं अशी गत झाली माझी. एका कोपर्‍यात ट्रॉली लावली आणि शांत पणे बसलो. म्हणलं कंपनीला पण आपली गरज / काळजी असेलच ना? येतील झक् मारत शोधत आपल्याला. आपण तरी किती कष्ट करायचे? बसू निवांत. मस्त पैकी पाय वगैरे लांब करून बसून राहिलो. तेवढ्यात कानावर २-४ हिंदी वाक्यं पडली. बघितलं तर २ तरूण मुलं आपापसात बोलत होती. दिसत होते भारतिय पण बोलीचा लहेजा मात्र वेगळाच होता. त्यांचं बोलणं जरावेळ ऐकलं, आणि कळलं की ते पाकिस्तानी आहेत. तो पर्यंत पाकिस्तानी माणुस कशाला मला भेटायला. टीव्हीवर बघितलेले तेवढेच. पण कुतूहल खूप होतं. ऐकत बसलो त्यांचं बोलणं. एकदम मनात विचार आला की या पोरांना विचारून बघुया. धीर करून त्यांच्या जवळ गेलो आणि माझी अवस्था त्यांना सांगितली. मी त्यांना म्हणालो की 'माझ्या कडे फक्त हॉटेलचं नाव आणि नंबर आहे. तुम्ही मला तिथे पोचायला मदत कराल का?' दोघंही भले होते बिचारे. ते आले होते त्यांच्या बहिणीला घ्यायला. मला म्हणाले की तू थांब इथेच, आमची बहिण बाहेर आली की करू आपण काहितरी. त्या दोघांनी खरंच खूप धीर दिला मला. नाही म्हणलं तरी पाकिस्तानी म्हणजे आपल्या मनात थोडी तरी साशंकता असतेच. पण त्या दोघांनी माझ्याशी गप्पा मारून खरंच माझा ताण हलका केला. थोड्या वेळाने अजून एक विचार आला मनात. त्या दोघांना म्हणलं की मी ट्रॉली इथेच ठेवतो तुम्ही जरा लक्ष ठेवा. मी परत एकदा माझ्या मित्रांना शोधून बघतो. निघालो आणि परत एक चक्कर मारली. अपेक्षेप्रमाणे कोणी नव्हतंच. तेवढ्यात एक कॉफी शॉप दिसलं. काहितरी गरम प्यायची इच्छा झाली. आत घुसलो. विचार करत होतो की काय घ्यावं आणि सहज इकडे तिकडे बघत असताना एका कोपर्‍यात दोन गॅरंटीड सौधिंडियन वाटणारे महाभाग मस्त पै़की कॉफी पीत आणि वर्तमानपत्र वाचत बसले होते. त्यांच्यापैकी एकजण माझ्याकडेच बघत होता. अचानक तो उठला आणि माझ्या रोखाने आला. जवळ येऊन म्हणाला, 'बिपिन?' ...मी फक्त त्याची पप्पीच काय ती नाही घेतली. बाकी काय नाही केलं? हीच ती दोन पात्रं मला घ्यायला आलेली. मला बाहेर यायला भयंकर उशिर झाल्याने दोघेही ताटकळले होते. आणि श्रमपरिहारार्थ कॉफी पीत बसले होते. त्यांचा आडाखा पण बरोब्बर माझ्या उलट... जातोय कुठे येईल शोधत शोधत. :) काहीही का असेना, भेटले तर खरे एकदाचे.सगळे गुन्हे माफ त्यांना. मग आमच्या पाकिस्तानी नवदोस्तांना नीट 'शुक्रिया' वगैरे करून मी निघालो तिथून. जाता जाता त्या दोघां पाकिस्तान्यांनी माझ्या सहकार्‍यांची थोडी शाळा केलीच. :) त्यांचे शब्द होते, 'यार हमारे लोगोकी मदद और हिफाज़त हमेही करनी है. यह सौदी तो xxx होते है.' त्यांनी इतक्या सहजपणे आम्हाला त्यांच्या 'हम' मधे सामावून घेतलेलं बघून मला आश्चर्यच वाटलं. ही तर माझ्या पाकिस्तान्यांशी आलेल्या संबंधांची सुरुवातच होती. नंतर खूप जवळून बघायला मिळाले. काही माझे खूपच छान मित्रपण झाले.

एकंदरीत प्रवास संपत आला होता. खूप काही भोगलं होतं मागच्या बारा तासात. स्थानिक वेळे प्रमाणे पण ९-९.३० वाजलेच होते. टॅक्सी उभीच होती समोर. बसलो आणि निघालो. विमानतळाच्या बाहेर पडता पडताच सौदी अरेबियाचा झेंडा दिमाखात फडकत होता. 'वेलकम टू सौदी अरेबिया' अशी भलीमोठ्ठी पाटी पण होती चक्क. चला म्हणजे नविन येणार्‍या माणसांचे खरंच स्वागत करत नसले तरी स्वागत करायची इच्छा तरी आहे म्हणायची. 'कथनी' आणि 'करनी' मधला विरोधाभास बघून त्या परिस्थितीतही हसू आलं.


सौदी अरेबियाचा झेंडा............................................................ सौदी अरेबियामधली टॅक्सी

हवा चांगलीच बोचरी होती. अर्थात टॅक्सीत हिटर चालू असल्यामुळे बाहेरचे वातावरण काय आहे ते कळत नव्हते म्हणा. रात्रीची वेळ होती. त्यामुळे शहर नीट लक्षात येत नव्हते. आख्खं आयुष्य मुंबईत काढलेलं असूनही तिथली चमक-दमक डोळ्यांत भरत होती. रात्रीच्या अंधारातूनही एक गोष्ट ठळकपणे नजरेत भरत होती, रस्त्याच्या दोन्ही बाजूला ओळीने नारळाच्या झाडांसारखी दिसणारी झाडं (नंतर कळलं की ती खजूराची झाडं आहेत) आणि रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर पूर्ण हिरवळ आणि सुंदर फूलझाडं. कोणाला वाटेल आपण वाळवंटात आहोत म्हणून? पण एकंदरीत मला गाव आवडत होतं. लव्ह ऍट फर्स्ट साईट असं वाटत होतं. रस्त्यावर गाड्या भरपूर होत्या. रस्ते रूंद आणि आश्चर्यकारक गुळगुळित होते. टॅक्सी एका संथ लयीत एका वेगात पळत होती. मला गुंगायला होत होतं.


माझं पहिलं खोबार दर्शन असंच काहिसं होतं.

जवळ जवळ २०-२५ मिनिटांनी आमचं हॉटेल आलं सामान वगैरे खोलीत टाकलं. आंघोळ केल्याशिवाय बरं वाटणार नव्हतं. जरावेळानं बॅग उघडली, तर वरच ठेवलेला चिवडा आणि इतर खाऊ असलेला डबा समस्त उपस्थितांच्या नजरेस पडला. जवळ जवळ सगळेच घरापासून बरेच दिवस लांब रहिलेले होते. बाहेरचं खाऊन खाऊन कंटाळले होते. त्यामुळे फारशी औपचारिकता ना पाळता आणि माझ्या परवानगीची वाट न बघता तो डबा उघडला गेला आणि बघता बघता सगळं फस्त झालं. 'नविन' घरात आल्या आल्या 'जुन्या' घराचा संबंध संपला. आता नवी विटी नवं राज्य.

मस्त पैकी आंघोळ केली आणि बेडवर येऊन पडलो. मनात विचार चालू होते, कसं असेल ऑफिस? कसे लोक भेटतील? बाजूलाच खिडकी होती. सहज लक्ष गेलं, आकाश निरभ्र होतं. छान चांदणं होतं. चंद्राची सुंदर कोर दिसत होती. खूपच प्रसन्न वाटलं... मी त्या उबदार अंथरूणात सुखावत होतो, सगळा शीण जात होता. डोळे कधी मिटले ते कळलंच नाही.



क्रमशः

माझं खोबार... भाग ३

on शनिवार, नोव्हेंबर ०८, २००८

माझं खोबार... भाग १ , ... भाग २

७.३० वाजले, ७.४५ वाजले, ८ वाजले तरी काही काउंटर उघडेना आणि कसली घोषणा पण होईना. एयरलाईन्सचे कर्मचारी पण कुठे दिसत नव्हते. माझ्या मनात खरं सांगायचं तर एकच भावना होती ..... प्रच्चंड कंटाळा. काय व्हायचं ते होऊन जाऊ दे पण सोडवा बाबा या धावपळीतून. आम्ही ताटकळून बसलो होतो. आणि तेवढ्यात अनाउन्समेंट झाली,

*************

"सौदी अरेबियन एयरलाईन्स च्या SVxxx ने दम्माम ला जाणार्‍या प्रवाशांनी लक्ष द्या. काही तांत्रिक बिघाडामुळे, दम्मामवरुन आलेले विमान उड्डाण करू शकत नाहिये. विमान दुपारी १२.३० ला उड्डाण करेल. चेक-इन काउंटर्स ९.३० वाजता उघडतील. प्रवाश्यांना होणार्‍या त्रासाबद्दल आम्ही क्षमा मागतो."

घ्या. आत्ताशी कुठे ८ वाजले आहेत सकाळचे. अजून कमीत कमी ४.३० तास? आणि ती बया तर क्षमा वगैरे मागून (आम्ही क्षमा केली आहे की नाही याची फिकिर न करता) निघून गेली. आणि आता पकडायचं तरी कुणाला? तसेच बसलो वाट बघत. तेवढ्यात मी आणि पत्नी, एक लांब चक्कर मारून आलो. जास्त काही बोलायच्या स्थितीत नव्हतो तरी तेवढेच बरे वाटेल (तिला) हा उद्देश. परत आलो तरी ९ च वाजले होते. वाट बघत होतो पण अजूनही पुढची घोषणा काही होत नव्हती. शेवटी १० वाजता घोषणा झाली की विमानाची दुरूस्ती चालूच आहे आणि विमान अजून थोड्या उशिराने निघेल. आणि ११ वाजता घोषणा झाली की विमान काही दुरूस्त होत नाहिये, दम्मामहून दुसरे विमान मागवले आहे आणि विमान दुपारी ४.३० ला सुटेल. पण एकच चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी चेक-इन काउंटर चालू केला. मी सामान चेक-इन केलं. घर जवळच असल्याने सरळ निर्णय घेतला, घरी परत जायचं, दुपारी ३.३० पर्यंत विमानतळावर परत यायचं. त्या प्रमाणे आमची वरात निघाली परत. एका वेगळ्याच वातावरणात सकाळी घर सोडलं होतं, कधी परत येऊ त्याची निश्चिती नव्हती. तेच घर ५ तासात परत दिसणार याची कल्पनाच नव्हती. :) जसे आम्ही घरी आलो परत तसे सगळे शेजार पाजारचे बघत होते. मला पण एकदम काहितरी विचित्र वाटत होतं. घरी येऊन आराम करायचा विचार होता पण इतका दमलो होतो की झोपही येत नव्हती. सकाळच्या अनुभवामुळे ३ वाजता सौदियाच्या विमानतळ कार्यालयात खात्री करण्यासाठी फोन केला. फोन केला ते बरंच झालं. त्यानी सांगितलं की विमान संध्याकाळी ७.३० वाजता सुटेल. आता मात्र मी पूर्ण वैतागलो, पण करतो काय. शेवटी एकदाचे ६.३० वाजता पोचलो. या वेळी मात्र सगळे सुरळीत पार पडले. आत्ता पर्यंत इतकं काही झालं होतं सकाळपासून की मी 'प्रथमग्रासे मक्षिकापातः' या विचाराने बर्‍यापैकी धास्तावलो होतो. पण अजून एक धक्का बाकी होता.

झालं असं होतं की, विमान एवढं लांबलं होतं म्हणून सौदियाने काही प्रवाश्यांना रियाधच्या दुपारच्या विमानात बसवून दिलं होतं. आणि आमचं विमान जवळजवळ मोकळंच होतं. मी बोर्डिंग पास हातात घेऊन उभा होतो तसा एक सौदिया कर्मचारी आला आणि म्हणाला की 'तुम्हाला अपग्रेड हवे आहे का?' मला काहिच कळेना, तेवढ्यात तो म्हणाला, 'तुम्हाला फर्स्टक्लास मधून जायला आवडेल का?'.... मी गार. नेकी और पूछ पूछ? कोणाला नाही आवडणार हो? मी होकार दिला. फर्स्टक्लास बर्‍यापैकी रिकामा असल्यामुळे, त्यांनी काही एकट्या प्रवाशांना असे अपग्रेड केले होते. ७ वाजता मी त्या बोगद्यातून सौदियाच्या त्या मोठ्ठ्या बोईंग-७४७ मधे प्रवेश केला. जीना चढून ऐटीत वरच्या मजल्यावर फर्स्टक्लास मधे गेलो.



त्या फाइव्हस्टार वातावरणात एक हवाईसुंदरी आणि एक हवाईसुंदर्‍या (पर्सरला काय प्रतिशब्द आहे हो मराठीत?) उभे होते. त्यांनी दात दाखवून स्वागत केले, 'अहलान मरहबा' .... 'या, आपलं स्वागत आहे'. अजून ४-५ लोक आले. थोड्या वेळाने ती ताई एक सुंदर सुरई आणि छोटे छोटे कप घेऊन आली. ते इतके छोटे कप बघून मला वाटलं "ही काय आता इथे भातुकली मांडते की काय?" पण नाही, सुटलो, तिने एक छोटा कप नाजूकपणे माझ्या समोर ठेवला आणि त्या सुरईमधून त्या कपात एक गरम वाफाळणारं काहितरी ओतलं आणि परत एकदा दात दाखवून निघून पण गेली. मी हळूच त्या कपात डोकावून बघितलं तर त्यात हलक्या गढूळ रंगाचं पाणी होतं. कपभर पाण्यात ४-५ चिमट्या माती घातली तर कसा रंग येईल, अगदी तस्सा. मला पटकन कळेना की हे आता प्यायचं की अजून काही येतंय त्यात घालायला. एवढ्या गढूळ पाण्यात फिरवायला तुरटी नको? बरं विचारणार तरी कसं? शेवटी हळूच आजूबाजूला बघितलं. एक अरब नवरा बायको होते पुढच्या रांगेत. त्या गाउनवाल्याने (सगळेच सौदी पुरूष हे पांढरे पायघोळ झगे घालतात आणि डोक्यावर ती काळी रिंग... एक लोकप्रिय जोकः त्यांच्या डोक्यात फारसं काही नसतं म्हणून ती रिंग ते घट्ट दाबून बसवतात, म्हणजे आत जे काही आहे ते कापरासारखं उडून जाऊ नये :) ), तर त्या माणसाने ते पाणी गटकन् पिऊन टाकले. मग मी पण त्या तुरटीचा नाद सोडला आणि लावला कप तोंडाला.

काय आश्चर्य... त्या पाण्याची चव थोडी तुरट, पण खूपशी ओळखीची होती पण नक्की काय आहे ते कळत नव्हतं. त्यातला केशर - वेलदोड्याचा स्वाद मात्र लगेच ओळखू येत होता. पण माल कडक होता. थोडा वेळ का होईना तरतरी आली. पुढे कळले की ते पेय म्हणजे 'काहवा'. कॉफी बियांपासून बनवतात. थोड्या वेळाने त्या ताईचा साथीदार एका सुंदर नाजूक काचेच्या बशीत छान रसरशीत खजूर घेऊन आला. हे तर आपल्या ओळखीचं होतं. पूर्ण लक्ष मी तिकडे वळवलं. अरब, उंट आणि खजूराची झाडं हे समीकरण आपल्या डोक्यात एकदम फिट्टं असतं. त्या पैकी अरब भेटला (तो पुढच्या रांगेतला), खजूर मिळाले आता उंट कधी दिसतात त्याची उत्सुकता लागली होती.



त्या खजूरांच्या नादात विमान कधी रिव्हर्स मधे मागे आलं, हळूहळू धावपट्टीवर गेलं ते कळलंच नाही. धावपट्टीवर मात्र त्या विमानाने वेग घेतला आणि भानावर आलो. खिडकीतून बाहेर बघितलं, त्या विमानाचे प्रचंड पंख खेळण्यातल्यासारखे पण एका मंद लयीत वर खाली होत होते आणि एका क्षणात विमानाने आकाशात झेप घेतली. ज्या मुंबईत आत्तापर्यंतचे आयुष्य घालवले ती मुंबई हळूहळू लहान होत गेली. मुंबईची चमक दमक एका मोठ्या अंधार्‍या खाईने गिळून टाकली, उरला फक्त अंधार आणि खाली समुद्रात लुकलुकणारे बोटींचे अंधुक होत जाणारे दिवे... मला एकदम जाणीव झाली... आता मी एकटा. मोठा झालो, लग्न झालं तरी मी कायम आप्त-मित्रांच्या मधे होतो. गरज लागली तर पटकन धावून येणारे भाऊ होते, आधाराला आई-वडिल आणि इतर लोक होते, मित्र होते. एका क्षणात हे सगळं नाहीसं झालं, उरलो मी एकटा. मग विचार आला की, काय होईल? नविन ठिकाणी परत उभे राहू, तिथे गोतावळा जमवू. एक उमेद होती मनात. मला जाणवत होतं, आज पर्यंत नुसताच वयाने मोठा झालो, त्या ३ तासाच्या प्रवासात मात्र मी 'मी' म्हणून मोठा होत होतो. मनात विचारांचा नुसता गुंता झाला होता, विमान खोबारच्या, माझ्या खोबारच्या दिशेने उडत होतं, मी मात्र इतका थकलो होतो की परत सणसणून ताप चढला. गोळी घेतली आणि डोळे बंद केले.

*************

पुढच्या दोन-अडिच तासात काय चाललंय काही कळत नव्हतं, जेवण बहुतेक मी नाहीच घेतलं. थेट पुढची आठवण म्हणजे त्या खजूर देणार्‍या साहेबांनी मला हलवून जागं केलं आणि (परत) दात दाखवत म्हणाला, "वी हॅव अराइव्ड सर... आपण पोचलो आहोत." विमान कधी उतरलं काही कळलं नाही. थोडं चुकल्या सारखं झालं. एखादं शहर आकाशातून बघायला छान वाटतं. आणि विमान उडताना पेक्षा विमान उतरताना तो नजारा जरा जास्त वेळ बघायला मिळतो. कोई बात नही. फिर कभी. अभी तो आना जाना लगा रहेगा.

आमच्या खोबारचा विमानतळ त्या वेळी खूपच लहान होता. खोबारला लागूनच 'धाहरान' नावाचं एक गाव आहे. तिथे सौदी हवाईदलाचा एक भला मोठा तळ आहे. तोच तळ नागरी हवाई वाहतुकीसाठी पण वापरला जात असे. (आपल्या कडे पुण्याला पण सध्या अशीच व्यवस्था आहे.) विमानाच्या बाहेर आलो. शिडी वरून खाली उतरलो. सगळ्यात पहिलं काय जाणवलं असेल तर अतिशय बोचरी आणि कडक थंडी. मला सांगण्यात आले होते की थंडी असेल चांगली, गरम कपडे वगैरे घेऊन ये. पण इतकी थंडी असेल असं नव्हतं वाटलं. वाळवंटाची ही एक खासियत आहे. तिथे दोनच ऋतू. उन्हाळा आणि हिवाळा. आणि दोन्ही महाभयंकर.


धाहरान आंतरराष्ट्रिय विमानतळ

कुडकुडतच बस मधे चढलो. बरीच वळणं घेत घेत ती बस टर्मिनलच्या दारापाशी आली. लष्करी तळ असल्याने खूपच कडक सुरक्षा होती. आता कुठे खरं सौदी अरेबिया दिसायला लागलं होतं. इमारती मधे शिरून इमिग्रेशनच्या हॉल पाशी आलो. तिथे प्रचंड मोठ्या रांगा लागल्या होत्या. जवळजवळ वीसेक मिनिटांनी माझा नंबर आला. काउंटर वर एक दाढीवाला बुवाजी बसला होता. (गाउन आणि रिंग सकट). मी पासपोर्ट दिला त्याच्या हातात. त्याने उलटसुलट करून बघत असतानाच एकदम मला विचारलं, "हिंदी?" मला वाटलं की तो मला भाषेबद्दल विचारतो आहे की तुला हिंदी येते का? मी पण त्याला ऐटीत म्हणलं, 'ऑफ कोर्स'. (पुढे मला कळलं की अरबी भाषेत 'हिंद' म्हणजे 'भारत / इंडिया' आणि हिंदी म्हणजे आपण भारतिय. नशीब दोन्हीही अर्थाने माझे उत्तर बरोबर होते, नाही तर काही उलट अर्थ झाला असता तर? पण अज्ञानात सुख आणि हिंमत दोन्ही असतात. तो ठप्पा उठवून मी पुढच्या पडावाकडे निघालो.

आता कस्टम्स हॉल मधे जायचं. सगळीकडे अरबी आणि इंग्लिश मधे पाट्या होत्या. पण लोंढ्याबरोबर ढकलले जाण्याची मुंबईतली सवय इथे कामाला आली. पाट्या बघायचं कामच नाही. सगळेच प्रवासी एका दिशेने जात होते. मीही निघालो. तो कस्टम्सचा हॉल म्हणजे एक भलं मोठं मंगल कार्यालय वाटत होतं. भयानक गर्दी, त्या बरोबर येणारा तो प्रचंड गोंगाट. केवळ अरबी लोकांचा येतो तसला सुवास. कधी तिथून बाहेर पडतोय असं झालं होतं

जसं माझं सौदीला जायचं नक्की झालं तसं सामान काय न्यायचं, काय न्यायचं नाही या बाबत बर्‍याच लोकांनी माझं प्रबोधन केलं. थोडीफार चौकशी केल्यावर असं लक्षात आलं की अजिबात न्यायचे नाहीत असे दोनच प्रकार. एक, कुठल्याही प्रकारचं धार्मिक साहित्य (फोटो, मूर्ती, पुस्तकं, काही पण) आणि दुसरं कुठल्याही प्रकारची पिठं (अंमली पदार्थांच्या भितीमुळे). पुढे माझ्या एका मित्राची बायको तिथे येताना कसलं तरी पीठ घेऊन आली होती तर तिला २-३ तास बसवून ठेवलं आणि दर १५ मिनिटांनी ते पीठ तिला थोडं थोडं खायला घालत होते आणि तिच्या वर काय परिणाम होतोय ते बघत होते. ;) तर मूळ मुद्दा असा की मी सगळं नीट विचार करूनच आणलं होतं सामान. त्या मुळे नि:शंक होतो. पण २-३ मराठी पुस्तकं होती माझ्या कडे. एका रांगेत निमूटपणे उभा राहिलो. आजूबाजूला बहुतेक चेहरे भारतिय / पाकिस्तानी दिसत होते. एक ते अरबी भाषेतल्या पाट्या सोडल्या तर परदेशात आल्याचं काहीच फिलींग येत नव्हतं. आणि त्या विमानतळा पेक्षा आमच्या कुर्डूवाडीचा यश्टीटँड बरा म्हणायची पाळी होती. रांग भलति म्हणजे भलतिच हळू हळू पुढे सरकत होती, पुढे काउंटरवर प्रत्येक सामानाची कसून चौकशी होत होती. आजूबाजूच्या काही अनुभवी लोकांच्या बोलण्यावरून कारण लक्षात आले. आमच्या विमानाच्या थोडे पुढे मागेच पाकिस्तान इंटरनॅशनल एयरलाईन्सचे विमान पण आले होते. पाकिस्तानी लोकांची सौदी मधे जरा विशेषच तपासणी होते म्हणे. कारण तेच आपले नेहमीचे सुप्रसिद्ध... अंमली पदार्थांची तस्करी. या बाबतीत काही लोक भलतेच तरबेज असतात. असो.

माझा नंबर आला एकदाचा. माझी ती महाकाय बॅग चढवली त्या टेबलावर. पुढे जे काही घडले त्याला मी अजिबात तयार नव्हतो. तो कष्टम साहेब एवढे कष्ट देईल असे वाटलेच नव्हते. त्याने माझी बॅग अक्षरशः चेव आल्या सारखी उघडली आणि उपसली. उपसली म्हणजे दोन्ही हात बाजूने आत घुसवून सगळं सामान लहान मुलांच्या बोरन्हाणात बोरं, गोळ्या, चॉकलेटं उधळतात तसं उधळलं. माझा संताप अनावर झाला. मी काही बोलणार तेवढ्यात कोणीतरी हळूच माझा हात दाबला. मी वळून बघतो तर एक पोर्टर माझ्या बाजूला उभा होता. मला हळूच म्हणाला "उ जो करता है करने दो... आप चूप रहो. हाम सांभाल लेगा". त्याच्या बोलण्या वरून तो बंगाली वाटत होता. आणि त्या अनोळखी वातावरणात मला तो एकदम आधार वाटला. बांग्लादेशी होता तो. माझ्या सामानाची यथेच्छ उडवाउडव केल्या वर त्याला ती २-३ पुस्तकं दिसली. अतिशय आनंदी मुद्रेने माझ्या कडे बघत ती पुस्तकं त्याने हवेत नाचवली आणि अरबी भाषेत काहितरी विचारलं. पोर्टरसाहेब हरहुन्नरी होते. ते लगेच दुभाष्याच्या भूमिकेत शिरले. मला म्हणाले, "उ पूचता है की ये क्या है? ये किताब मे क्या लिखा है? तुम्हारा मजहब का कुछ है?" मी म्हणलं, "ये तो कहानी का किताब है." लगेच भाषांतर झाले. पण तेवढ्याने काही त्या साहेबाचे समाधान झाले नाही. त्याने माझा पासपोर्ट काढून घेतला आणि त्या पुस्तकांबरोबर त्याच्या टेबलाच्या एका खणात ठेवून दिला. आणि मला तिथनं फुटायचा इशारा केला. काही बोलणं नाही, सांगणं नाही, नुस्तं जा. माझं डोकं फुटायची वेळ आली. पण पोर्टर साहेबांवर पूर्ण निष्ठा ठेवून मी कशी बशी ती बॅग आणि सामान उचललं आणि एका कोपर्‍यात जाऊन ते सगळं नीट लावायला गेलो. (त्या शिवाय ती बॅग बंदच झाली नसती. ;) ) तिथे माझ्या सारखे बरेच कमनशिबी लोक त्याच कार्यात गुंतले होते. मी पण गतानुगतिक होऊन तिथे शांतपणे जमिनीवर फतकल मारली आणि बॅग नीट लावली. मला तिथे सोडून तो पोर्टर आत्ता येतो म्हणून गायब झाला होता. अर्धा तास होऊन गेला तरी त्याचा काही पत्ता नाही. खरं सांगतो आयुष्यात एवढं असहाय्य कधीच वाटलं नव्हतं. माझं शिक्षण, माझा अनुभव त्या क्षणी सगळं झूट होतं. तो पोर्टर माझा देव / मालक काय म्हणाल ते झाला होता.

तेवढ्यात मी एक भारी दृष्य बघितलं. एक भलीमोठी पाकिस्तानी फॅमिली (२-३ पुरूष, ४-५ बायका आणि २-३ लहान पोरं, एका बाईच्या हातात एक तान्हं मूल) पोलिसांच्या कडक पहार्‍यात घेऊन चालले होते. माझं टेन्शन अजूनच वाढलं. (या घटनेची पूर्ण माहिती मला दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रात वाचायला मिळाली. पण, ते नंतर)

बर्‍याच वेळाने स्वारी आली आणि मला खूण करून त्याच्या मागे यायला सांगितले. मी निघालो. त्याने एका ऑफिस सारख्या खोली समोर मला आणले आणि आत जायची खूण केली. मी घुसलो. तर आत मधे भली मोठ्ठी दाढी असलेला एक गाउन बसला होता पण डोक्याला रिंग नव्हती. त्याच्या टेबलावर मला माझी पुस्तकं आणि पासपोर्ट दिसला. मला अंदाज आला की आता इथे पण चौकशी होणार तर. पोर्टर महाराज हळूच शिरलेच होते आत. त्या दाढीधार्‍याने मला चक्क इंग्लिश मधे विचारलं, "हे काय आहे?" मी म्हणलं, "नॉव्हेल".

पुढचा प्रश्न, "मुस्लिम?"
मी "नो"
"ख्रिश्चन"
"नो"
"देन?" त्याच्या लेखी धर्म संपले होते. (ज्यूंना व्हिसाच देत नाहीत त्या मुळे तो ऑप्शन बाद होता).
"हिंदू"

त्याने अतिव करूणेने / तिरस्काराने माझ्या कडे बघितले आणि ती पुस्तकं चाळून बघितली. परत प्रश्न,

"लँग्वेज?"
"मराठी"

त्याने हे नाव कधीच ऐकले नसावे, त्याला मल्याळम माहिती असणार पण नक्की.... खूप लांब आंबट चेहरा करत माझा सगळा माल मला परत केला आणि जायची आज्ञा केली. मी पण एक सुटकेचा नि:श्वास टाकत तिथून सटकलो. पोर्टर साहेबांनी त्यांच्या मैत्रीची वाजवी किंमत वसूल केली आणि मी मुख्य दरवाज्याच्या दिशेला सरकलो. मला घ्यायला माझे दोन सहकारी येणार होते. सगळं नीट ठरलं होतं. त्यांनी कधी मला बघितलं नव्हतं पण ते हातात पाटी घेऊन उभे राहणार म्हणाले होते. त्यामुळे ती काही चिंता नव्हती. ते प्रवासाचे दिव्य पार पडले होते. आता सरळ गाडीत बसायचं आणि तडक मुक्कामी जाऊन आडवं व्हायचं. त्या मुख्या दरवाज्याची सरकती दारं उघडली आणि...

क्रमशः

माझं खोबार... भाग २

on शुक्रवार, नोव्हेंबर ०७, २००८

माझं खोबार... भाग १

अजून इतर काही गप्पा होऊन, मी तिथून परत निघालो. मात्र परत निघायच्या आधी मी काही गोष्टी स्पष्ट केल्या. त्यात मुख्य म्हणजे की मी कुठेही जायला तयार आहे पण माझी बायको माझ्या बरोबर असेल आणि कंपनीने ती सगळी जबाबदारी घेतली पाहिजे.

मी थोडा खुशीतच घरी आलो. घरी येऊन ही बातमी सांगितली. कुणाच्या ध्यानी मनी पण नव्हतं की असं काही होईल. घरात एकदम शांतता पसरली. त्यात परत मी जेव्हा 'सौदी अरेबिया' हा शब्द उच्चारला तेव्हा तर वातावरण अजूनच नाजूक झालं. आपल्या मनात सौदी अरेबिया म्हणलं की एक वेगळंच चित्र असतं. विशेषतः आई-वडिल जरा काळजी करत होते. पण त्यांनी पण अगदी दिलखुलास पणे तुझ्या करिअरच्या आड आम्ही येणार नाही असे सांगून मला हलकं केलं. पत्नीने पण पूर्ण पाठिंबा दिला. चला, एक किल्ला सर झाला. पण जसजशी ही बातमी माझ्या इतर नातेवाईकांत पसरली तसतसे मला अथ पासून इति पर्यंत काहिही सल्ले यायला लागले. त्यातली काही मतं तर पूर्णपणे अतर्क्य अशी होती. मग मी ठरवलं, आता आपण जायचंच जायचं, पण जितकी जमेल तितकी माहिती गोळा करू सौदी अरेबिया बद्दल. त्या वेळी आंतरजाल आजच्या इतकं सहज उपलब्ध नव्हतं. एका मित्राच्या घरी सोय होती. तिथे जाऊन काही माहिती काढायचा प्रयत्न केला.



तसं बघितलं तर सौदी अरेबिया हा सगळ्यात मोठा आखाती देश. पण जवळजवळ १०० वर्षांपूर्वी पर्यंत हा देश अस्तित्वातच नव्हता. संपूर्ण अरबस्तान हे छोट्या छोट्या टोळ्या, त्यांच्या अधिपत्याखालील प्रदेश, ओटोमान साम्राज्याच्या प्रभावाखालचे प्रदेश असं विभागलं गेलं होतं. आपल्या महाराष्ट्राचे जसे कोकण, देश, खानदेश, मराठवाडा, विदर्भ असे विभाग आहेत तसे, अरबस्तानाचे पण नज्द, जिझान, हेजाझ (मक्का आणि मदिना या भागात आहेत), नजरान, तबुक, अल्-हासा / कतिफ असे पूर्वापार चालत आलेले भाग आहेत. हे सगळे भाग वेगवेगळ्या राजांच्या अंमलाखाली होते. त्यांच्या आपापसात मारामार्‍या / लढाया चालत. हा सगळा गोंधळ अव्याहत पणे शतकानुशतकं चालत आला होता. अश्या अनागोंदीच्या वातावरणात दोन सामाजिक शक्तींचा उदय झाला. एक होती धार्मिक तर दुसरी होती राजकिय.

धार्मिक शक्ती.

इस्लामच्या ४ पारंपारिक विचारधारा आहेत. जशी आपल्या कडे सांख्य वगैरे वेगवेगळी तत्वज्ञान आहेत तशी. त्या आहेत, हनबाली, हनाफी, मलिकी, शाफी. इ.स. १७०३ मधे हनबाली परंपरेच्या एका इमामाच्या घरी मुहम्मद इब्ने (इबने) अब्द्'अल वहाब अत्-तमिमी चा (तमिमी टोळीतल्या अब्द्'अल्-वहाब चा मुलगा मुहम्मद) जन्म झाला. अगदी लहान वयातच त्याने धार्मिक शिक्षण घेतले आणि इतर शहरातल्या विद्वानांना भेटून त्यांच्या कडून ज्ञान मिळवले. इ.स. १७४० मधे तो परत आपल्या गावी आला. त्याच्या फिरस्ती मधे त्याला अश्या बर्‍याच गोष्टी आढळल्या ज्या मुळे लोक इस्लाम च्या मूळ शिकवणी पासून ढळले होते. त्याने इस्लामचा अतिशुध्द (त्याच्या मते) असा एक प्रकार आचरायला सुरुवात केली. हळूहळू त्याला बरीच लोकप्रियता मिळत गेली. त्याच्या शिकवणूकीप्रमाणे 'अल्ला' ची बरोबरी कोणीच करु शकत नाही. स्वतः पैगंबर मुहम्मद सुध्दा एक सामान्य माणूसच होते. कुराण मानवापर्यंत पोचवायला अल्ला ने त्यांची निवड केली इतकेच. थडगी किंवा दर्गे इ. ठिकाणी प्रार्थना करणे हे पाप आहे. किंबहुना ती नष्ट केली पाहिजेत. व्याभिचाराला एकच शिक्षा, दगडांनी ठेचून मारणे. खुनाबद्दल एकच शिक्षा, मुंडकं उडवणे. इ.इ. (मंडळी काही ओळखीचं वाटतंय का? बरोबर, ही वहाबी (जिला सलाफी असेही म्हणतात) विचारसरणी म्हणजेच आजचे तालिबान. तालिबान हे पूर्णपणे वहाबीस्ट आहेत.) तो लोकप्रिय होत गेला तसतसे स्थानिक सत्ताकेंद्रं डळमळीत व्हायला लागली (आपल्या इंद्राच्या सिंहासनासारखं हो). त्याच्या विरुध्द कारस्थानं झाली, हल्ले झाले. त्याला पळूनही जावं लागलं. आणि तिथेच त्याला भेटला मुहम्मद इब्ने सा'उद (सौद हा सोपा उच्चार झाला).

राजकिय शक्ती

मुहम्मद इब्ने सा'उद (सा'उद चा मुलगा मुहम्मद) हा एक स्थानिक शेख (मुखिया / पाटिल) होता. मुहम्मद इब्ने अब्द्'अल वहाब त्याच्या आश्रयाला गेला. दोघांची मैत्री जुळली. इब्ने सा'उद हा इब्ने अब्द्'अल्-वहाब च्या विचारांनी प्रभावित झाला आणि त्या दोघांनी शपथ घेतली की पूर्ण अरबस्तान हा शुध्द इस्लामच्या प्रभावाखाली आणायचा. राज्य इब्ने सा'उद आणि त्याचे वारस करतिल (हेच ते सा'उदी राजघराणं). धर्माचा गाडा इब्ने अब्द्'अल्-वहाबच्या विचारांप्रमाणे चालेल. इब्ने सा'उदच्या मुलाशी इब्ने अब्द्'अल्-वहाबच्या मुलीचे लग्न लावून दिले गेले. अरबस्तानाच्या पवित्र भूमी वर मुस्लिमेतर शक्ती कधीही प्रबळ होता कामा नयेत अशी शपथ घेतली गेली. (हीच घटना नेमकी बिन लादेन च्या उदयाला कारणीभूत ठरली. अमेरिकेने इराक विरुध्द सैन्य सौदी अरेबियात पाठवले तेव्हा बिन लादेन बिथरला आणि बंड करुन उठला. त्या मागे हीच प्रेरणा होती.)



तर या दोन माणसांनी मिळून हळू हळू हातपाय पसरायला सुरुवात केली. हा प्रकार पिढ्यानपिढ्या म्हणजे १८१८ पर्यंत चालला. १८१८ मधे तुर्की सुलतानाला या प्रकाराची भिती वाटायला लागली आणि त्याने सैन्य पाठवून परत स्वतःचे राज्य मजबूत केले. थोडी वर्षं गेली आणि परत सा'उदी घराणं परत वरचढ झालं. इ.स. १८९१ मधे अल्-राशिद नावाच्या एका प्रतिस्पर्धी शेखने सा'उदी घराण्यावर हल्ल करुन त्यांना पळवून लावले. त्या वेळी सा'उदी घराण्याच्या मुख्याचा १४ वर्षांचा मुलगा अब्दुल अझिझ हा पण पळाला. या कुटुंबाने आश्रय घेतला कुवेत मधे. (या उपकाराची परतफेड सौदी कुटुंबाने जेव्हा सद्दाम ने कुवेत गिळंकृत केलं तेव्हा कुवेती राजघराण्याला आश्रय देऊन केली. कुवेतचा 'अमिर' आणि त्याचं कुटुंब रियाध मधे सुखात नांदत होतं.) इ.स. १९०२ मधे याच अब्दुल अझिझ ने अल्-राशिद चा निर्णायक पराभव करुन स्वतःचे राज्य स्थापित केले, नाव दिले 'सौदी अरेबिया'. स्वतःला 'मलिक' म्हणजे राजा घोषित केले. परत आपल्याला पळावे लागू नये म्हणून त्याने हळू हळू अरबस्तानातले इतर भूभाग जिंकून घ्यायला सुरुवात केली. त्या करता साम-दाम-दंड-भेद सगळे उपाय वापरले. त्याची २२ अधिकृत लग्नं झाली (एका वेळेला ३ किंवा ४ च बायका असायच्या). त्याचं सगळ्यात पहिलं अपत्य इ.स. १९०० साली तर सगळ्यात धाकटं अपत्य इ.स. १९५२ मधे जन्मलं. त्याच्या ६व्या आणि सगळ्यात आवडत्या पत्नीला २१ मुलं झाली. हे सगळं इथे लिहायचं कारण की आपल्याला अरबस्तानातल्या सामान्य माणसाच्या विचारसरणी ची थोडी कल्पना यावी. (माझ्या ओळखीच्या एका मध्यमवयीन गृहस्थानी त्यांच्या कुटुंबाच्या व्हिसा साठी अर्ज केला त्यात 'बायकांची संख्या - १' आणि 'मुलांची संख्या - २' असे लिहिले होते. त्यांच्या कंपनीतला 'मंदूप' - सरकारी कामे करणारा स्थानिक मनुष्य त्या नंतर किती तरी दिवस त्यांच्या कडे बघून हसत असे. :) )

असा हा देश. अवाढव्य. जवळ जवळ भारता इतका. पण लोकसंख्या भारताच्या अडिच टक्के असेल. नैसर्गिक विविधतेने नटलेला - जगातल्या भयाण वाळवंटातील एक 'रब-अल-खाली' - एम्प्टी क्वार्टर - रब = क्वार्टर / खाली = रिकामं - सौदी अरेबिया मधे आहे. पण सौदी अरेबिया मधे 'आभा' नावाचं एक शहर आहे जिथे बारा महिने पाऊस असतो. तापमान १८-२० डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास घुटमळत असतं. तबुक नावाचं एक शहर आहे जिथे नजर जाईल तिथपर्यंत फळबागा आहेत. आमची एक कस्टमर कंपनी होती. त्यांच्या कडे ३५००० हेक्टर ची जमिन लागवडीखाली होती. अल्-हासा हे जगातलं सगळ्यात मोठं 'ओऍसिस' सौदी अरेबिया मधे आहे. (अवांतर - अल्-हासा चे लोक जळू म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांची 'दृष्ट' लागते अशी त्यांची ख्याती आहे ;) ) इस्लामच्या ३ पवित्र ठिकाणांपैकी २ या देशात आहेत, मक्का-अल्-मुकर्रमाह (मुकर्रमाह = कृपाळू) आणि मदिना-अल्-मुनव्वराह (मुनव्वराह = प्रकाशमान, दिव्य).


मक्का - का'बा


मदिना - पैगंबरांचे विश्रांतिस्थान

तर एकूण अश्या या 'दिव्य' देशात मी जात होतो तर. मी जितकं वाचत गेलो तितकी माझी भिती कमी होत गेली, कुतूहल वाढत गेलं. आब्बी तो जानाच मांगताय, इथपर्यंत तयारी झाली मनाची. आता चालू नोकरीचा राजीनामा देण्या आधी नविन कंपनीचे अपॉइंटमेंट लेटर मिळणे आवश्यक होते. ती वाट बघणे चालू झाले. एकदाचे ते आले. त्या कागदावरची ती नाजूक आणि सुरेख अरबी भाषेची वळणदार अक्षरं मनाला एका नविन दुनियेची चाहूल देत होती. नक्की काय ते कळत नव्हतं. मनाने तर मी कधीच सुलतान शहरयार आणि राजकन्या शहराझाद च्या अरेबियन नाईट्स १००१ (अल्फ लायला-व-लायला = १००० आणि १ - अल्फ = १००० - व = आणि, लायला = रात्र) गोष्टींच्या सुरस आणि चमत्कारिक जगात पोचलो होतो.

दुसर्‍या दिवशी सकाळी तडक जाऊन राजीनामा दिला. बर्‍याच वाटाघाटींनंतर तो मंजूर पण झाला. परतीचा दोर कापला. आता फक्त विसाचे काम झालं की चाललं आमचं बुंऽऽग सौदीला. आत्तापर्यंत मी सौदी अरेबिया मधे अल्-खोबार या गावात राहणार हे नक्की झालं होतं. हे गाव म्हणजे सौदी अरेबियाच्या तेल व्यापारचे केंद्र. मुंबई आणि नवी मुंबई सारखी खोबार आणि दम्माम ही जुळी शहरं, दम्माम मोठं, जुनं आणि स्थानिक प्रांताची राजधानी. तर खोबार हे नविन, आधुनिक, आखिव रेखिव (सगळे रस्ते काटकोनात) असं पाश्चात्य छाप असलेलं शहर. कोणीतरी सांगितलं की खोबार हे सौदी अरेबिया मधलं सगळ्यात लिबरल ठिकाण आहे. तेवढंच बरं वाटलं. व्हिसाचे काम दिल्लीला होणार होतं. तिथे जेव्हा मेडिकल टेस्ट करायला गेलो तेव्हा मजूरांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या. म्हणलं आपणही मजूरच. पोटासाठी, चार पैसे जास्त मिळतील म्हणूनच तर चाललो आहोत ना? तर व्हा तयार, काढले कपडे आणि राहिलो उभा रांगेत. यथावकाश सगळे सोपस्कार पार पडले आणि तो व्हिसा पडला हातात.



यथावकाश तारीख ठरली, तिकिट पण आलं हातात. ७ फेब्रुवारी १९९९ ला सकाळी १०.३० ला सौदी अरेबियन एयरवेजचं विमान सुटणार. तयारी झाली. पहिलाच परदेश प्रवास. ती परदेशप्रवासाची खास ३२ साईझ ची बॅग आली घरात. कपडे, रोजचं सामान नुसता गदारोळ झाला होता घरात. कसं बसं ते सामान त्या खास बॅगेत भरलं आणि ६ तारखेला रात्री शांतपणे गप्पा मारत बसलो. या सगळ्या मानसिक आणि शारिरीक ताणाने मला सणसणून ताप चढला होता. त्यातच घरवाली पोटूशी होती. आता परत कधी भेटणार, कसं होणार हेही विचार मनात होतेच. कशीबशी रात्र गेली. आमच्या घरच्या पद्धतीप्रमाणे आम्ही गाडी सुटायच्या जितकं आधी जाता येईल तितकं आधी स्टेशनवर जाऊन बसतो. विमानतळ झाला म्हणून काय झालं. शिस्त ही शिस्त. ;) १०.३० च्या विमानासाठी वडिलांनी सकाळी ६.३० लाच घराबाहेर काढलं. घरापासून विमानतळ......... फक्त १५ (अक्षरी पं ध रा) मिनिटे दूर. पण आता काहिही सहन करायची तयारी ठेवली होती. विमानतळावर पोचलो. तिथे काही अपेक्षेप्रमाणेच काही हालचाल दिसत नव्हती आमच्या फ्लाईटची. काउंटर ७.३० ला उघडणार होते. बसलो निवांत गप्पा मारत. आईचा चेहरा सगळं काही सांगत होता तिला बोलायची गरजच नव्हती. वडिलांच्या चेहर्‍यावर काळजी आणि दु़:ख यांचं मिश्रण. बायको तर थोडी दूरच जाऊन उभी होती. एकंदरीत दृश्य टिपिकल होतं. :)

७.३० वाजले, ७.४५ वाजले, ८ वाजले तरी काही काउंटर उघडेना आणि कसली घोषणा पण होईना. एयरलाईन्सचे कर्मचारी पण कुठे दिसत नव्हते. माझ्या मनात खरं सांगायचं तर एकच भावना होती ..... प्रच्चंड कंटाळा. काय व्हायचं ते होऊन जाऊ दे पण सोडवा बाबा या धावपळीतून. आम्ही ताटकळून बसलो होतो. आणि तेवढ्यात अनाउन्समेंट झाली, "सौदी अरेबियन एयरलाईन्स च्या SVxxx ने दम्माम ला जाणार्‍या प्रवाशांनी लक्ष द्या..."

क्रमशः

माझं खोबार... भाग १

on गुरुवार, नोव्हेंबर ०६, २००८

मंडळी, काही वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात एक अगदीच अनपेक्षित वळण आले. ध्यानी मनी नसताना किंवा कुठल्याही प्रकारचे प्लॅनिंग नसताना मला परदेशात नोकरी करायचा योग आला. आणि तो परदेश पण साधासुधा असातसा नाही, चक्क 'सौदी अरेबिया', ज्या देशाबद्दल आपल्याला नेहमीच एक भीती वाटत असते आणि कुतूहल पण तेवढेच असते. तर माझ्या या सौदी गमन आणि वास्तव्याबद्दल माझे काही अनुभव आहेत ते इथे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.

मी इथे जे काही लिहिणार आहे ते पूर्णपणे सत्य असणार आहे, त्यात कुठल्याही प्रकारची काल्पनिक पात्रं किंवा घटना नसतील. मी आयुष्यात हा पहिलाच लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे. ऑल सजेशन्स आर वेलकम. (एक वाक्य पुलंचं उधार - या लिखाणात साहित्यिक मूल्यं वगैरे शोधू नका, नाही म्हणजे मिळणार नाहीत म्हणुन सांगितलं आपलं, उगाच तुमची निराशा ;) )

*************

१९९८ चा सप्टेंबर - ऑक्टोबर महिना असेल. दसरा जवळ आला होता. तेव्हा मी भारतातिल एका 'चिकट पदार्थ' बनवणार्‍या प्रसिद्ध कंपनीत 'Every Day Problem' म्हणजेच इडिपी डिपार्टमेंट मधे काम करत होतो. तेव्हा आपल्याकडे ERP प्रकारची सॉफ्टवेअर्स नुकतीच आली होती. आमच्या कंपनीतही असेच एक सॉफ्टवेअर बसवायचे काम चालले होते. आमची भरती पण होतीच इंप्लिमेंटेशन टीम मधे. सॉफ्टवेअर व्हेण्डर च्या टीम मधल्या लोकांशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले होते.

अशातच एक दिवस, त्यांच्या पैकी एक वरिष्ठ मला 'विश्रांतिगृहातील' महत्त्वाचे काम करत असताना हळूच म्हणाला "लंच के बाद नीचे मिल मेरेको". मला टेंशन. म्हणलं काल एका डिलिव्हरेबल बद्दल काही वाद झाला त्यात काही कमीजास्त बोलणं झालं काय आपल्याकडून? पण तसा धोकाही नव्हता म्हणा. तो होता गुज्जु आणि प्रकृतिने किरकोळ. काय ४-५ श्या दिल्या असत्या तरी कानाला गोडच वाटलं असतं. ठरल्याप्रमाणे त्याला खाली जाऊन भेटलो लंच नंतर. मला चक्क नोकरीची ऑफर देत होते साहेब. आणि माझ्या कंपनीत कोणाला संशय येऊ नये म्हणून मला खाली बोलवून वगैरे बोलणं चाललं होतं. त्यानंतरच्या दसर्‍याच्या मुहुर्तावर त्याला माझ्या सी.व्ही. ची प्रत दिली आणि अश्या प्रकारे माझ्या आयुष्यातल्या सौदी प्रकरणाला सुरुवात झाली.

**************

आता सगळ्यात पहिले काम काय तर, आमच्या नविन कंपनीच्या दुबईस्थित बड्या लोकांना टेलिफोनिक इंटरव्ह्यू द्यायचा आणि खुंटा बळकट करायचा. दिवस ठरला, वेळ ठरली. आता मात्र मनात एक धाकधूक व्हायला लागली होती. इतके दिवस परदेशगमनाचे काहीच प्लॅन्स नव्हते पण अशी एक संधी समोर दिसायला लागली आणि मनात एक अपेक्षा निर्माण झाली. बरं माझी जरी रास कन्या नसली तरी माझ्या आई-वडिलांची रास कन्या आहे ना... त्या मुळे वाण नाही पण गुण लागलाच थोडासा. खूपच नर्व्हस झालो होतो. ठरल्या दिवशी काही कॉल झालाच नाही. असं अजून १-२ वेळा झालं, आता मात्र माझी खात्री झाली की हे काम काय पुढे जात नाही. मग मी परत निश्चिंत, होतच नाहिये तर कशाला काळजीने मरा? एक दिवस अचानक फोन आला की तो इंटरव्ह्यू घेणारा भाऊ उद्या मुंबईतच येतोय आणि त्याला तुला प्रत्यक्ष भेटायचं आहे. मी परत नर्व्हस. तसाच गेलो त्याला भेटायला त्याच्या हॉटेलवर. बघतो तर साहेब टी.व्ही. वर चक्क क्रिकेट ची मॅच बघत होते. पुढचा अर्धा तास मग नुसत्या गप्पा आणि क्रिकेट बद्दल बोलणं. मला खरंच खूप टेंशन आलं की हा कामाचं का नाही बोलत आहे. थोड्या वेळाने त्याने मला अचानक विचारलं, "तुला तर फायनान्स डोमेन चा काहीच अनुभव नाही". मी गप्पच, काय बोलणार, तो म्हणत होता ते खरंच होतं. मग त्याने विचारलं, "तुला बॅलन्स शीट बद्दल काय माहिती आहे?" आता मी थोडं विचार करून उत्तर देणार तेवढ्यात माझ्यातला प्रामणिक बंडू लगेच उत्तरला, "डेबिट शुड बी इक्वल टू क्रेडिट" आता वाचा जायची पाळी त्याची होती. तरी तोच पुढे म्हणाला, "पाण्यात फेकला तुला तर पोहशील की बुडशील?". मला त्याचा रोख कळला, मी पण त्याला उलटा प्रश्न केला, "मला पाण्यात फेकताना पाठीला डबा बांधणार की तसंच फेकणार?" मी बोललो खरा पण बोलल्यानंतर लक्षात आलं की आपण काय बोलून बसलो. पण तो खूप हसला आणि म्हणाला "तुझा हजरजबाबी पणा आवडला, पण ऑफकोर्स डब्याशिवाय फेकणार". तो पर्यंत माझाही धीर चेपला, मलाही अंदाज आला होता की हा खरंच इंटरव्ह्यूच चालू आहे आणि मला ही पध्दत आवडली होती. मी त्याला उत्तर दिले, "ऑफ कोर्स, आय विल स्विम. हाऊ टू अचिव्ह दॅट इज माय प्रॉब्लेम, बट आय ऍम कॉन्फिडंट" हे सगळं आज लिहिताना एवढा वेळ लागतो आहे पण तेव्हा हे सगळं अक्षरशः क्षणार्धात घडलं. नंतर माझ्या लक्षात आलं की मला काय येतंय किंवा येत नाहिये याच्या मधे फारसा रस त्याला नव्हताच. ते सगळं त्याने आधीच मला ओळखणार्‍या निरनिराळ्या टीम मेंबर्सना गाठून काढून घेतलं होतं. त्याला फक्त माझी पर्सनॅलिटी टेस्ट घ्यायची होती. आणि त्या क्रिकेटच्या गप्पा वगैरे सगळं त्याच एका हेतूने चाललं होतं. त्याने पुढचा प्रश्न विचारला "सौदी अरेबियात काम करशील, की दुबईच पाहिजे?" मला कुठं काय कळत होतं तेव्हा दुबई काय आणि सौदी अरेबिया काय. मी म्हणलं, "माझा असा काही प्रेफरंस नाहिये."

आणि मंडळी अश्या रितीने माझी पहिली परदेशातील नोकरी पक्की झाली.

क्रमशः

देहबोली...

on बुधवार, नोव्हेंबर ०५, २००८

मंडळी, मी जेव्हापासून मराठी आंतरजालावर फिरू लागलो तेव्हापासून बरीचशी संकेतस्थळं आणि ब्लॉग्ज नजरेस पडले. या सगळ्याठिकाणी निरनिराळ्या व्यक्तिंनी हाताळलेले विषय खरोखर खूपच वैविध्यपूर्ण आहेत. काही म्हणता काही बाकी ठेवलं नाहिये पब्लिकने. पण एक विषय मात्र असा आहे की जो खुपदा हाताळला जातो. आणि त्या विषयावरच्या चर्चा खरोखर प्राणपणाने लढवल्या जातात (एक मुंबई-पुणे वादच या वादाला मागे टाकू शकेल :) ) तो विषय म्हणजे.... बरोबर ओळखलंत, भाषा आणि भाषेशी संबंधित शुद्धलेखन वगैरे उपविषय. या सगळ्या चर्चा अतिशय रंगतातच. सध्या मिपावर चालू असलेली 'संस्कृत' बद्दलची चर्चा घ्या किंवा शुध्दलेखनावरच्या विविध चर्चा घ्या. बरीच नविन माहिती कळली आणि विचारांच्या विविध दिशा कळल्या. पण एका गोष्टीची गंमत वाटली... लोकांची मतं सहसा 'इस पार या उस पार' अशीच असतात, बहुतांशी. असो.

सर्व चर्चा या आपण तोंडाने बोलतो त्या भाषेबद्दलच आहेत. पण तात्यांसारख्या काही लोकांनी अजूनही काही भाषांचा उल्लेख केला आहे. जसे की, संगित ही एक भाषा आहे आणि ती युनिव्हर्सल आहे. खरंच आहे ते. बर्‍याचदा संगित हे शब्दांच्या आधाराने सुरू होतं पण पार पलिकडे पोचवतं.

तशीच अजून एक भाषा आहे आणि ती सुध्दा वैश्विकच आहे. तिचे प्राथमिक रुप जरी सगळीकडे सारखेच असले तरी व्यक्त स्वरुप स्थळकाळाप्रमाणे बदलते. ती आहे देहबोली... इंग्लिश मधे तिला 'बॉडी लँग्वेज' म्हणतात. माणूस कितीही अशिक्षित (रुढार्थाने) असला तरी ही भाषा त्याला येतेच येते आणि दुसर्‍याने या भाषेत बोललेलं कळतंच कळतं. ही भाषा इतकी परिणामकारक आहे की बर्‍याचवेळा संबंध वाढवायला किंवा बिघडवायला ती एकटी कारणीभूत ठरू शकते. या जगात वावरताना ती एक अतिशय उपयुक्त आणि म्हणूनच दुधारी असं शस्त्र आहे.

देहबोलीची ढोबळ व्याख्या करायची झाली तर अशी करता येईल... शरिराच्या साहाय्याने आपलं म्हणणं पोचवायचा प्रयत्न. या मधे मुख्य प्रकार म्हणजे हाताच्या हालचाली ज्याला आपण हातवारे म्हणतो, चेहर्‍याच्या हालचाली, शब्दांच्या उच्चारांवरील आघात, आवाजाची पातळी वर-खाली करणे वगैरे. आपली भाषा जशी आपल्या विचारांचा मागोवा घेत जाते तशीच आपली देहबोली सुध्दा आपल्या विचारांशी / भावनांशी घट्ट निगडित असते, किंबहुना आपल्या शाब्दिक भाषेपेक्षा कांकणभर जास्तच लगटून असते विचारांना.

माझ्या बाबतीत घडलेला एक किस्सा सांगतो की ज्यामुळे मला ही गोष्ट खूपच प्रकर्षाने जाणवली. मी एकदा सकाळी गोरेगावला लोकलमधे चढलो आणि मला अंधेरीला उतरायचे होते. गोरेगाव एका बाजूला येते आणि अंधेरी दुसर्‍या बाजूला. म्हणजे काय प्रकार ते मुंबईत राहणार्‍या लोकांना सांगायला नकोच. मी गाडीत चढल्यावर लोकांना विनंति करत करत दुसर्‍या बाजूच्या दरवाजाकडे मुसंडी मारत होतो. लोक शिव्या घालत होते. साहजिकच मी खूपच वैतागलो होतो. पण चिडून सांगतो कुणाला? (आज हा लेख वाचायचे भाग्य तुम्हाला मिळाले नसते ;) ). अंधेरी यायच्या आधी थोडावेळ एका दाराजवळ उभ्या असलेल्या आडमुठ्या माणसाबरोबर थोडा लडिवाळपणा झाला पण मी प्रसंग पाहून थोडा मवाळपणा पत्करला पण उतरताना मात्र थोडी धक्काधक्की झालीच. मी बोललो काहिच नाही पण माझा चेहराच सगळं काही बोलला असणार. आमचा एक सहकारी नेमका त्याच गाडीच्या मागच्या डब्यातून उतरला आणि मी उतरल्या उतरल्या माझ्या समोरच आला. त्याने पहिला प्रश्न केला मला, 'क्या हुवा? उसको मारेगा क्या?' मी थक्कच झालो. मी त्याला विचारलं 'तेरे को कैसे पता?' तो फक्त एवढंच म्हणाला, 'तेरा चेहरा सब कुछ बोल रहा था. तू उसको इतना गुस्सेसे देख रहा था की मालूम पड रहा था.' मतितार्थ असा की आपण कितीही उत्तेजित झालो तरी आपले संस्कार बर्‍याच वेळा आपल्याला आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवायला लावतात. पण आपला देह काय बोलत असतो ते आपल्याला कळत सुध्दा नसते. आणि म्हणूनच ही भाषा लै डेंजरस.

ज्याला या भाषेची जाण आली आणि नीट वापरायची अक्कल आली त्याने जगात वावरायची अर्ध्याहून अधिक लढाई जिंकली असं म्हणायला हरकत नाही.

शब्दांची भाषा आपण जसजसे मोठे होत जातो तसतशी शिकत जातो, पण देहबोली मात्र माणूस उपजतच घेऊन येतो. जन्म झाल्यावर रडून, 'मी जिवंत आहे होऽऽऽ!!! माझ्या कडे लक्ष द्या' अशी भावना ते नवजात पिल्लू कोणत्या अनाम प्रेरणेने देत असतं? भूक लागली की रडायचं हे कसं कळतं? थोडं मोठं झालं की पाळण्यावर टांगलेला खुळखुळा गोल फिरला की जिवणी आपोआप रूंदावते ती कशी? आपण जन्माला येतानाच हे देहबोलीचं ज्ञान घेऊन येत असतो. पण जसजसे आपण मोठे होते तसतसे या देहबोलीवर निरनिराळे संस्कार व्हायला लागतात. आपले आई-वडिल आणि इतर 'मोठे' लोक आपल्याला 'डूज' आणि 'डोन्ट्ज' शिकवायला लागतात. आणि यातून जन्माला येते ती 'संस्कारित' देहबोली.

आपली उपजत देहबोली मात्र खर्‍या अर्थाने वैश्विक आहे. रडण्याचा अथवा हसण्याचा सगळीकडे बहुधा सारखाच अर्थ लावला जाईल. पण हाताच्या एखाद्या हालचालीचा मात्र बरेच वेळा स्थळकाळसापेक्ष अर्थ लावला जाईल. म्हणजे आपल्याकडे एखाद्या माणसाकडे 'बोट' दाखवणं अतिशय असभ्य समजतात पण काही ठिकाणी लोकांना त्याचे काहीच वाटत नसेल. संस्कारित देहबोली ही एखाद्या वांशिक अथवा भाषिक गटापुरती बर्‍यापैकी सिमित असते. उदाहरणार्थ, आपण एखाद्याचे बोलणे ऐकताना 'मला तुमचे बोलणे कळते आहे' या अर्थी मान उभी (वर-खाली) हलवतो. पण दक्षिण भारतात बर्‍याच ठिकाणी विशेषतः केरळ मधे त्याच अर्थाने मान आडवी (डावी-उजवी) हलवतात. आपल्याकडे त्याचा अर्थ नेमका उलटा होतो.

देहबोलीची अजून एक गंमत आहे. जरी ती शब्दांवाचून भाषा असली तरी भाषेतले बरेच वाक्प्रचार देहबोलीशी खूपच जवळून निगडित असतात. बर्‍याच अरब देशांमधे 'मला काही देणं घेणं नाही' या अर्थी हाताची एक विशिष्ट हालचाल करतात. आपण जेवल्यावर नळाखाली हात धुतो ना तशी काहिशी ती हालचाल असते. मंडळी, लक्षात येतंय का? इंग्लिश मधे 'वॉश युवर हँड्स ऑफ समथिंग' हा वाक्प्रचार वापरतोच ना? पुरातन काळापासून विविध संस्कृतिचे लोक व्यापारानिमित्त एकमेकांच्या संपर्कात येत होते आणि भाषेची, संकल्पनांची, ज्ञानाची देवाणघेवाण होत होती, त्याचंच हे एक उदाहरण असू शकेल का? असेलही. शक्यता नाकारता येत नाही.

आपण आपल्या सांस्कृतिक परिघाच्या बाहेरच्या लोकांच्या संपर्कात येतो तेव्हा शब्दांपेक्षा देहबोलीचंच भान जास्त ठेवावं लागतं. तसेही शब्द आपल्याला कळत नाहीत, देहबोली मात्र त्या मानाने जास्त उपयोगी ठरते. मी भारताबाहेर आलो तेव्हां मला सुरुवातीलाच या गोष्टीचं भान आलं. मी अरबस्तानात नविनच होतो. एके दिवशी संध्याकाळी आमच्या कंपनीच्या गाडीत ड्रायव्हरच्या बाजूला बसून घरी चाललो होतो. उजवा पाय डाव्या पायावर ठेवला होता, पायाचा तळवा ड्रायव्हरच्या दिशेने झाला होता. ड्रायव्हर पण भारतियच होता आमचा. त्याला काहीच वाटले नसावे. पण गाडी एका सिग्नलला थांबली आणि ड्रायव्हर साईडला एक भलं मोठं जिएमसीचं (एक अति प्रचंड गाडी) धूड उभं राहिलं. काच खाली झाली आणि आम्हाला काच खाली करायची खूण झाली. आम्ही तसे करताच तो दुसरा माणूस, स्थानिक होता तो, अरबी भाषेत खूप चिडल्यासारखा बोलला. मला कुठं काय कळायला. पण आमचा ड्रायव्हर मात्र विंचू चावल्यासारखा पटकन् माझ्या कडे वळला आणि म्हणाला, 'आधी पाय खाली कर'. मी पण जरा घाबरलोच होतो. चूपचाप हुकमाची अंमलबजावणी केली. पण देहबोलीचा एक महत्वाचा धडा शिकलो. अरबी संस्कृतित पायाचा तळवा दाखवणे म्हणजे समोरच्याचा घोर अपमान समजला जातो. समोरच्याची देहबोली शिकून तिचा आपल्यासाठी कसा उपयोग करायचा हे भान आले.

प्रत्येकाचा एक वैयक्तिक परिघ (पर्सनल स्पेस) असतो. जसा आपला परिघ आपल्याला प्यारा असतो तसेच व्यक्त होताना समोरच्याचा परिघ आपण उल्लंघत तर नाही ना याचेही भान आपल्याला असले पाहिजे. या परिघाची आपली जाणिव आपल्या जडणघडणीवर अवलंबून असते. पण आपण समोरच्या व्यक्तिची या बाबत काय जाणिव आहे याचे भान ठेवले पाहिजे. बर्‍याच पाश्चात्य संस्कृतिंमधे स्त्री -पुरूष हे खूप सहजतेने शारिरीकदृष्ट्या निकटतेने वावरतात. पण एखादा पुरूष जर भारतात येऊन तितक्याच जवळ येऊन बोलायला लागला तर तो मार खाईल याचीच शक्यता जास्त आणि गंमत म्हणजे आपण का मार खातोय हे त्या बिचार्‍याला कळणार पण नाही. आम्ही खोबारला असताना, एक शुध्द महाराष्ट्रिय कुटुंब आमच्या ओळखीचे होते. साहेब जरा उच्चविद्याविभूषित आणि आंग्लाळलेले होते. त्यांच्या घरी पार्टीला जायचे असले तर बहुतेक सगळ्या बायकांना घाम फुटायचा. एकतर त्या नवराबायकोतला लडिवाळपणा बघावा लागायचा आणि निरोप घेताना साहेब त्यांच्या सवयी प्रमाणे सगळ्यांच्या गालाला गाल लावून निरोप घ्यायचे. (वहिनी मात्र जरा त्यामाने चतुर होत्या. त्या आपल्या भारतिय बाणा त्यामानाने बराच जपून होत्या :( ) तर मुद्दा हा की 'डिफरंट स्ट्रोक्स फॉर डिफरंट फोक्स' हे व्यवधान ठेवलंच पाहिजे.

देहबोली, त्याच व्यक्तिची, पण वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या रितीने वापरली जाते. आपण जेव्हा समोरसमोर एकाच व्यक्तिशी बोलतो तेव्हा साधारणपणे हातवारे कमी करतो. चेहर्‍याच्या हालचाली जास्त होतात. पण जर का आपण एखाद्या समूहाशी बोलत असू तर हाताच्याच नव्हे तर संपूर्ण देहाच्याच हालचाली जास्त होतात. मला माझ्या करिअर मधे विविध लोकांशी बोलण्याचा आणि एखादी गोष्ट त्यांच्यासमोर प्रभावीपणे मांडून ती पटवण्याचे प्रसंग खूपच येतात. मला या देहबोलीच्या जाणिवेचा खूपच फायदा झाला. जर का समोरच्या व्यक्तिची अथवा समूहाची देहबोली अगदी आत्मसात नाही पण नुसती समजून घेता आली आणी थोडीशी वापरता आली तरी एक प्रकारची आपुलकी प्रस्थापित करता येते आणि संवादचं सुसंवादात रुपांतर आपोआप होतं. आणि सुसंवाद स्थापित करणं हेच भाषेचं मुख्य काम नाही का?

तर मंडळी देहबोली बद्दल जागरूक व्हा, निरीक्षण शक्ति वाढवा आणि प्रभावी संवादक (इफेक्टिव कम्युनिकेटर ला हाच प्रतिशब्द आहे का हो?) व्हा.

कारी...

on मंगळवार, नोव्हेंबर ०४, २००८

परवाचा लक्ष्मीपूजनाचा दिवस. एरवी एकटाच असतो. दिवाळीनिमित्त 'फ्यामिली' आली आहे इथे. ज्या दिवशी ते आले नेमकं त्या दिवसापासून रोज घरी जायला उशिर होत होता. दिवसभरात बायकोचा २-३ वेळा फोन येऊन गेला होता, आज लक्ष्मीपूजन आहे, आज तरी वेळेत ये घरी. त्या प्रमाणे थोडा लवकरच निघालो होतो. टॅक्सी पण मिळाली पटकन. म्हणलं आज खरंच चांगला दिवस दिसतोय. मस्त मूड होता. घरी जाऊन काय काय करायचं त्याचा विचार चालू होता. मस्त मुलींबरोबर मस्ती करायची, दाबून जेवायचं असले सुखासीन विचार चालले होते.

एकीकडे टॅक्सी ड्रायव्हर साहेबांनी पण बोलायला सुरुवात केली. इथले बव्हंशी टॅक्सीचालक पाकिस्तानी आणि त्यातल्या त्यात पठाण आहेत. पठाण लोकांची काही वैशिष्ट्य आहेत. कमालीचा गप्पिष्टपणा हे त्यापैकीच एक. बोलता बोलता त्याने बीबीसी वर 'उर्दू नशरियात' हा प्रोग्राम लावला. ही अजून एक सवय या टॅक्सीवाल्यांची. संध्याकाळी बीबीसी वर आधी उर्दू आणि मग हिंदी सर्व्हिस असते. हटकून न चुकता हे लोक हे प्रोग्राम ऐकतातच ऐकतात. उर्दू प्रोग्राम चालू होता. यामधे प्रामुख्याने पाकिस्तानकेंद्रित बातम्या आणि राजकिय / सामाजिक विषयांवर चर्चा / भाष्य वगैरे असे असते. पाकिस्तान सरकार सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे त्याबद्दल चर्चा चालू होती. त्यावर ड्रायव्हर साहेबांची 'लाईव्ह' कॉमेंटरी, 'आतषबाजी' सकट. मग प्रोग्राम आर्थिक / राजकिय मुद्यांकडून सामाजिक मुद्यांच्या दिशेने वळला. त्यानंतर जे काही ऐकले त्या प्रोग्राम मधे, खरं सांगतो, अजूनही मी त्या धक्क्यातून बाहेर येऊ नाही शकलो आहे पूर्णपणे. माणूस सैतानाचं रूप किती सहजतेने घेऊ शकतो हे पाहून भयंकर हादरलो आहे मी. असं काय होतं त्या कार्यक्रमात?

मी पहिल्यापासून सांगायला सुरुवात करतो.

पाकिस्तानातला सिंध प्रांत. तिथल्या खैरपूर जिल्ह्यातलं हजानशाह नावाचं एक छोटंसं खेडं. गुल शेर आणि झाकिरा बीबी ही त्याची बायको आणि त्यांची ६ मुलं, त्या गावातले एक सामान्य रहिवासी. गुल शेर चा गायीगुरं पाळण्याचा / विकण्याचा व्यवसाय. थोडीफार मालमत्ता. सुखवस्तू सधन कुटुंब. तस्लीम ही त्यांची ३ नंबरची मुलगी. दिसायला छान. स्वभावाने धीट. एका कर्मठ वातावरणात वाढत असली तरी काही स्वप्नं बाळगण्या इतपत शिक्षण आणि जगाचं भान असलेली. तिचा मामा डॉक्टर होता, ती एकदा कराचीत त्याच्याकडे गेली होती तेव्हा पासून तिला पण वाटत होतं की आपण पण डॉक्टर व्हायचं. खेड्यापाड्यात लोकांना, विशेषतः बायकांना, वैद्यकिय मदत मिळणं खूपच दुरापास्त असतं. तर आपण हेच काम करायचं. ती मॅट्रीकची परिक्षा नीट पास झाली. आपल्या आईला अक्षरओळख करून दिली, तिला स्वत:च नाव लिहायला शिकवलं.

पण त्याच वेळी घरात काही कुरबुरी चालू होत्या. कारण नेहमीचंच. संपत्ति / जमिनजुमला वगैरे. शेर गुल आणि त्याच्या भावांमधे काही वाद चालू होते. गावातल्या काही बड्या-बुढ्यांनी शेर गुलला सल्ल दिला की तस्लीमचे लग्न तिच्या चुलतभावांपैकी एकाशी लावून दे म्हणजे वाद मिटतील. त्यालाही ते पटले. झाकिराबीबी मात्र या प्रस्तावाच्या पूर्ण विरुद्ध होती. ती पण प्रचलित समाजव्यवस्थेमुळे दबलेली एक स्त्री होती. तिला आपल्या मुलीला शिकलेलं पाहायचं होतं. डॉक्टरणीची आई म्हणून मिरवायचं होतं. पण स्वतः तस्लीमने मात्र हा प्रस्ताव स्विकारायचं ठरवलं. तिला वाटलं की खरोखर या लग्नामुळे जर का काही चांगलं होणार असेल तर देऊ आपण ही कुर्बानी. आणि चुलतभावाशीच तर करायचं आहे ना लग्न? हरकत नाही. समजवू त्याला हळू हळू आणि शिकू की अजून पुढे. झाकिराबीबीने परोपरी समजवूनही हे लग्न झालं. पण तस्लीमचे दुर्दैव असे की, एक मुलगा होऊनही परिस्थिती काही सुधारली नाही.

वाद टोकाला गेला आणि तिच्या सासरच्यांनी तिला 'कारी' म्हणून घोषित केलं. 'कारी' म्हणजे काय तर, ज्या स्त्री किंवा पुरूषावर बदफैलीपणाचा आरोप असतो ती किंवा तो. तर तस्लीमला कारी ठरवून लगेच शिक्षा पण दिली गेली. आधी गुलशेर आणि बाकी परिवाराला एका खोलीत कोंडून घातलं गेलं आणि बाहेर अंगणात सैतानी खेळ खेळला गेला. उपासमारीने पिसाळलेले कुत्रे आणले गेले आणि तिच्या आणि तिच्या जेमतेम २ महिन्यांच्या निष्पाप बाळावर सोडले गेले. आधी त्या कुत्र्यांनी त्या बाळाचे लचके तोडले आणि मग तिच्याकडे मोर्चा वळवला. ती घरभर सैरावैरा धावत सुटली. मदतीसाठी हाका मारत राहिली. कोण करणार मदत? शेवटी ती धडपडून खाली पडली, कुत्र्यांनी झडप घातली. पण तेवढ्यात तिच्या सासर्‍याला (जो तिचा सख्खा काका होता), नवर्‍याला आणि इतर लोकांना तिची थोडी दया आली आणि तिचा अजून लचके तोडून छळ होऊ न देता तिला छातीत ३ गोळ्या घालून ठार मारण्यात आले. तिचे आईबाप आणि इतर भावंडं हे सगळं हताशपणे खिडकीतून बघत होते, आक्रोश करत होते.

आता गुलशेर आणि त्याचं कुटुंब कराचीत लपूनछपून रहात आहेत. या घटनेचा जाहिर बोभाटा झालाय. तिथल्या मानवाधिकार संघटनांनी खूप गदारोळ केला आहे. त्या मुळे आता गुलशेर आणि झाकिराबीच्या जीवाला पण धोका निर्माण झाला आहे. सहसा कोणतंही सरकार असं प्रकरण दाबून टाकायला बघतं पण इथे आता ही घटना आंतरराष्ट्रिय पातळीवर गेली आहे. कर्जबाजारीच्या संकटामुळे पाकिस्तान सरकार परदेशांपुढे वाकले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी पाकिस्तानचे राष्ट्रपति आसिफ आली झरदारी स्वतः जातीने लक्ष घालून करणार आहेत म्हणे.

मागच्या वर्षी पाकिस्तानी पंजाबात पण मुख्तारन माई नावच्या मुलीचे असेच प्रकरण घडले होते. ती तथाकथित खालच्या जातीची होती. तिच्या लहान भावावर गावतल्या चौधरीच्या मुलीची छेड काढल्याचा आरोप झाला आणि पंचायतीत शिक्षा सुनावली गेली, छेडछाडीचा बदला म्हणून मुख्तारन वर 'अधिकृतरित्या' सामूहिक बलात्कार केला गेला. पण ती जिवंत राहिली. तिने लढा दिला आणि न्याय मिळवायचा प्रयत्न केला. तिला नुकसानभरपाई म्हणून बरेच पैसे मिळाले ते तिने पूर्ण पणे समाजसेवेसाठी दान केले.

पण हे नविन प्रकरण ऐकले आणि सुन्न झालो. खून आणि तोही असा? माणूस खरोखर इतका सैतान बनू शकतो? मन मानत नाहिये पण सत्य परिस्थिती दिसते आहे ना समोर. जगात एकच गोष्ट दबू नाही शकत ना खोटी ठरवली जाऊ शकत... ती म्हणजे सत्य.

***

पण हा 'कारी' प्रकार काय आहे? किती घटना खरोखर घडतात? हे सर्रास होतं की असले प्रकार तुरळक पणे घडतात? सिंध मधे 'कारो कारी' हा एक अतिशय प्रचलित शब्द आहे.

मूळात या प्रकाराला इंग्रजीमधे ऑनर किलिंग (मराठी प्रतिशब्द?) असं म्हणतात. बर्‍याचश्या आफ्रिकी आणि अशियाई समाजांमधे हा प्रकार अगदी सर्रास आणि राजमान्य आहे. तत्वतः जरी हे स्त्री आणि पुरुष दोघांच्या बाबतीत घडू शकते तरी बहुतेक वेळा असे नृशंस प्रकार स्त्रियांच्या बाबतीतच घडतात. पुरूषांच्या बाबतीत मूळात आरोप होणंच नगण्य आहे आणि बहुतेकवेळा मामुली शिक्षा किंवा जबरी दंड करून त्यांना सोडलं जातं. सामन्यतः असे प्रकार मुस्लिम देशांत घडताना दिसतात तरी ही प्रथा खरोखर धर्मातीत आहे. आपल्याकडे पण असे प्रकार सर्रास घडतात. एखाद्या असहाय्य गरीब विधवेला जादू-टोणा करते म्हणून सरळ दगडांनी ठेचून मारायचे, किंवा बदफैली म्हणून आरोप करायचा आणि लगेच शिक्षा द्यायची. फिर्यादी पण आपणच, न्यायाधीश पण आपणच आणि ती शिक्षा अंमलात आणायचं पुण्य पण आपल्याच पदरात घ्यायचं. पण बोभाटा झाला की आपण त्या गावचेच नाही असं दाखवून सरळ शेपूट घालायची हाच यांचा पुरुषार्थ. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बर्‍याच वेळा इतर बायकापण यात सामिल होतात. आपल्या प्रगत महाराष्ट्रातलं खैरलांजी प्रकरण आठवा. सगळं गाव सामिल होतं. सुरेखाबाईचा गुन्हा काय तर तिने मान ताठ ठेवायची हिंमत दाखवली. ठेचलीच तिला, अक्षरशः. याच प्रथेचं अजून एक रूप म्हणजे आरोपी व्यक्तिला आत्महत्या करायला भाग पाडणे. म्हणजे काही भानगडच नाही. पुरावे नाहीत आणि मृत व्यक्ति थोडीच येणार आहे आपली कहाणी सांगायला?

आपल्या पोटच्या गोळ्याला किंवा सख्या बहिणीला, जिच्या बरोबर आयुष्य काढलं लहानाचे मोठे झालो, निर्घृणपणे मारून टाकायचं, मुंडकं उडवायचं, गळा दाबायचा म्हणजे पूर्ण सैतानीकरण झाल्याशिवाय शक्यच नाही. खरंतर अश्या सैतानांना क्षमा नाहीच नाही. पण दुर्दैवाने असे अनेक देश अजूनही आहेत, मुख्यतः मध्यपूर्वेत जिथे अश्या गुन्ह्यांना शिक्षाच होत नाही आणि असलीच तर खूप कमी आहे. जगभरात मानवाधिकारांच्या लढाई मधे 'ऑनर किलिंग' विरोधातली लढाई हा एक मुख्य भाग आहे. आजकालच्या आधुनिक जगात प्रसारमाध्यमं बलवान झाली आहेत त्याचा एक चांगला परिणाम म्हणजे अश्या घटना तातडीने अतिशय मोठ्या समूहापुढे स्पष्टपणे आणि सहजपणे मांडता येतात. त्या मुळे जनमताचा रेटा तयार करता येतो. आणि न्यायदानात मदत होऊ शकते.

जीवनमानातला बदल हा अपरिहार्य असतो. तो थांबवू म्हणता थांबवता येत नाही. कुठे पटकन होतो कुठे भरपूर वेळ लागतो. पण जीवनमान बदलतं नक्कीच. या न्यायाने 'ऑनरकिलिंग' ची भीषण परिस्थिती पण नक्कीच बदलेल, प्रश्न इतकाच आहे की अजून किती तस्लीम, मुख्तारन, सुरेखाबाईंचा बळी जाणार आहे? 'सूनर द बेटर' हे या बाबतीत इंग्रजीतलं नुसतंच एक चमकदार वाक्य नाहीये तर प्रत्येक तस्लीमसाठी 'जीवनवरदान' ठरणार आहे.

***
यथावकाश मी घरी पोचलो, दार उघडल्या उघडल्या पोरी येऊन गळ्यात पडल्या, बाबाच्या अंगावर उड्या मारायची शर्यत लागली दोघींची. मी पण थोडा नॉर्मलला आलो. दोघींबरोबर मस्ती झाली. तो पर्यंत बायकोने लक्ष्मीपूजनाची तयारी केली. मी स्वच्छ आंघोळ करून देवासमोर बसलो. यथाशक्ति यथामति पूजा केली देवाची आणि प्रार्थना केली,

"देवा, लक्ष्मी येईल जाईल, तू मात्र माझं बोट सोडू नकोस. माझी सद्सदविवेक बुद्धी बनून माझ्या बरोबर रहा. आज मी जे काही ऐकलं तसं परत कोणाच्याच बाबतीत न घडो. आणि घडलंच तर मी जसा सुन्न झालो तशीच प्रत्येक व्यक्ति होऊ दे म्हणजे हे चित्र पालटायला वेळ लागणार नाही."

शुभं भवतु.

***

टीपः ती न पाहिलेली तस्लीम काही डोळ्यापुढून हलत नाहिये आणि तिच्या न ऐकलेल्या किंचाळ्या अजून कानात घुमताहेत.

इंदौर...

on सोमवार, नोव्हेंबर ०३, २००८

खोबार सारखं इंदौर पण आमच्यामनातला एक कोपरा अडवून बसलं आहे. लहानपणी इंदौरला जायचा / राहायचा खूप योग आला. १९८३ साली एक दिवस बाबा संध्याकाळी घरी आले ते ही बातमी घेऊनच की त्यांची बदली इंदौरला झाली आहे आणि आई बाबा आणि माझी ताई असे इंदौरला जाणार. माझे शिक्षणाचे महत्वाचे वर्ष असल्याने मी काही जाणार नव्हतो. मला फक्त दिवाळीच्या सुट्टीत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत इंदौरला जायला मिळणार होतं.

त्यानिमित्ताने, इंदौरला भरपूर येणंजाणं झालं. तो पर्यंत मुंबई एके मुंबई करणार्‍या आम्हाला इंदौर एक स्वर्गच वाटायला लागला होता. माझ्या (किंबहुना आमच्या सर्वांच्याच) आयुष्यातला तो एक खूपच सुंदर काळ आहे. आजही इंदौरचे नुस्ते नाव काढले तरी त्या सगळ्या जुन्या आठवणी मनात दाटायला लागतात. त्या काळी इंदौर तसं लहान आणि आटोपशीर गाव होतं. आयुष्य संथ आणि आरामशीर होतं. लोक भयंकर मोकळेढाकळे आणि आपल्याच मस्तीत जगणारे होते. पुलंच्या 'काकाजीं'सारखी माणसं पदोपदी सापडत होती. माझ्या साठी तर ते एक अद्भुतच जग होतं.

पहिल्यांदा इंदौरला गेलो ते १९८३च्या दिवाळीत. तेव्हा मुंबई - इंदौर 'अवंतिका एक्सप्रेस' गाडी नव्हती. खाजगी लक्झरी बसेस मधूनच सगळा प्रवास चालायचा. पवन ट्रॅव्हल्स, विजयंत ट्रॅव्हल्स ही नावं अजूनही आठवतात. मी रात्रभराचा / दूरचा एकट्याने केलेला हा पहिलाच प्रवास. बस मुंबई सेंट्रल मधून संध्याकाळी निघाली की सायन वगैरे करत आग्रा-मुंबई महामार्गाने वेग गाठायची. भिवंडीच्या पुढे पडघा नावाचे एक गाव आहे. ते येईपर्यंत साधारण जेवायची वेळ झालेली असायची. बहुतेक सगळ्या बसेस तिथेच थांबायच्या. ढाबा हा प्रकार पहिल्यांदा तिथेच अनुभवला. मस्त खाटा वगैरे टाकून लोक बसलेले असायचे. त्या खाटेच्या मध्यभागी एक लाकडी फळी आडवी टाकून जेवायचं. तिथली चव तर मला अजून आठवते. एका बाजूला तंदूर असायचा. मस्त गरम आणि कुरकुरीत रोट्या एकामागून एक फस्त व्हायच्या. शक्यतो डायवर / किन्नर साहेबांच्या जवळपास राहायचं म्हणजे बस चुकायची भिती नाही. जेवण वगैरे करून बस तिथून निघायची. त्या वेळी व्हीडीओ कोच हा प्रकार नुकताच सुरू झालेला होता. किन्नर साहेब मग एखादा फर्मास लेटेष्ट असा पिक्चर लावायचे. पिक्चर बघता बघता झोप लागायची. रात्री बस धुळे वगैरे मागे टाकत / कुठे तरी ५ मिनिटं थांबत भरधाव जात राहायची.

सकाळ व्हायची ती 'दुधी' मधे. दुधी हे महाराष्ट्र - मध्य प्रदेशाच्या सीमेवरचं एक छोटंसं गाव. माझ्या माळवी खाद्यजीवनाची सुरुवात खरी झाली ती इथे. पहिल्याच प्रवासात, बस पहाटे थांबली आणि जाग आली. अंधार होता, अजून उजाडायचे होते. काहीतरी ओळखीचा वास येत होता. खाली उतरलो. बघतो तर समोरच एका प्रचंड मोठ्या कढईमधे चक्क कांदेपोहे. तो पर्यंत माझी समजूत हीच की कांदेपोहे ही आपली मराठी माणसाची खास मिजास आहे. माझी मिजास मोडून पडली त्या दिवशी. इतके सुंदर कांदेपोहे क्वचितच खाल्ले आहेत मी. कांदेपोह्यांवर बारीक शेव घालून खायची खोड लागली ती तिथूनच. इंदौर मधे जवळ जवळ प्रत्येक टपरीवर एक भली मोठी कढई आणि तिच्यात पिवळ्या धम्मक पोह्यांचा डोंगर ठरलेलाच. बर्‍याच टपर्‍यांसमोर रबडीची पण कढई असायची. दुधीहून बस कुठलातरी एक घाट, महू वगैरे करत १० वाजेपर्यंत इंदौर गाठायची

माळव्यातली थंडी / गरमी दोन्ही बघितली. थंडीच्या दिवसात संध्याकाळी ६-६.३० च्या सुमारास लोकमान्य नगरातून गावात जायला बाहेर पडायचं, मस्त भटकायचं. जेल रोड, छप्पन दुकान, रेल्वे स्टेशन जवळचा बाँबे पावभाजी वाला (त्या वेळी आख्ख्या इंदौर मधे हा एकमेव पावभाजी वाला होता) अशी सगळी ठरलेली ठिकाणं होती. राजवाड्यावर मस्त 'पानीपतासे' (पाणीपुरी) मिळायचे. कचौरी तर इंदौरचीच. तळहाताएवढी मोठी. त्यात व्यवस्थित अनमान न करता भरलेलं सारण. त्याच्यावर हिरवीगार मिरचीची चटणी किंवा 'खटाई'... स्वर्गिय. त्यावेळी राजवाड्यावर जी.एफ. कचौरीवाला म्हणून एक प्रकार होता. हे साहेब संध्याकाळी ७-७.३० ला एका गाडीवर कचौरीचे दुकान थाटत असत. बरं त्यांचा माज आपल्या चितळ्यांपेक्षाही मोठा. त्यांचा ठेला ठराविक वेळच तिथे असे. ही कचौरी कशाकरता प्रसिध्द तर, तिखटपणासाठी. दोन कचोर्‍या खाऊन दाखव म्हणून पोरांच्या पैजा लागत. (जी.एफ. म्हणजे काय ते कळले नसेल तर गरजूंनी व्य. नि. करावा ;) ) उनाडक्या करत / खादाडी करत मनसोक्त भटकायचं आणि मग शेवटी सराफ्यात जायचं. घट्टंऽऽऽ रबडी (बरेच वेळा ती रबडी घरी वगैरे हाताने खाल्ली आहे आणि प्रत्येक वेळी साबण लावून हात धुवावे लागले आहेत तेव्हा कुठे हाताचा ओशट पणा कमी व्हायचा, जात नसेच पूर्णपणे) आणि इतर मालमसाला हादडायचा आणि त्या थंडगार हवेत, वार्‍यात कुडकुडत 'टेंपो' मधे बसून परत लोकमान्य नगर.

गरमी (आपल्याकडे उन्हाळा म्हणतात, इंदौरला मात्र गरमीच असते) मधे दुसरीच मजा. 'मधुशाले'ची. जागोजागी, कोपर्‍या कोपर्‍या वर मधुशाला. आधी कळलंच नाही हा काय प्रकार आहे ते. मधुशाला म्हणजे उसाच्या रसाचं दुकान. आणि तो रस सुद्धा एक माणूस तो चरक हाताने फिरवणार आणि दुसरा तो रस गोळा करत करत गिर्‍हाईकांना देत राहणार. आम्ही रात्री जेवण झालं की लोकमान्य नगराच्या गेट पाशी एक मधुशाला होती तिथे तासन् तास बसायचो. फक्त ४० पैशात एक मोठ्ठा बंपर भरून रस मिळायचा. आम्ही १-१ २-२ तास सहज तिथे टवाळक्या करायचो. माझे मित्र, ताईच्या मैत्रिणी कधी कधी मोठे लोक नाहीतर आम्ही सगळे पोरंपोरीच असे १५-२० जण तरी असायचो. माळव्यातली गरमी कडक असली तरी मुंबईसारखं उकडत नाही आणि रात्री हवा खूपच छान असते.

आम्ही मुंबईचे (माझ्या बाबांना शेजारपाजारचे लोक बंबई वाले सेठ म्हणायचे) त्या मुळे भाज्यांच्या किंमती वगैरे मुंबईच्याच सवयीच्या. नविन असताना एकदा दुपारी दारावर भाजी वाला आला. आईला काहितरी हवं होतं म्हणून आईने त्याला हाक मारली. भाव विचारले, टोमॅटॉ ५० पैशे किलो म्हणाला. आई फक्त आनंदाने नाचली नाही एवढंच. तिने चक्क ५-६ किलो टोमॅटो घेतले. मस्त सॉस करू वगैरे. शेजारच्या काकू त्यांच्या घराच्या ओट्यावरून बघतच होत्या. त्यांची लगेच कॉमेंट, 'तुम्ही काय बाई, मुम्बई वाले, परवडतं तुम्हाला.' आईला काही कळेना. तेव्हा काकूंनी खुलासा केला, 'अहो, गावात / मंडईत जा, ३०-३५ पैश्याच्यावर कोणी घेणार नाही. तुम्ही चांगले ५० पैशे देऊन घेतले चक्क.' आमचा सगळा आनंद एका क्षणात वार्‍यावर उडून गेला. इंदौर मधे असे पर्यंत आईने कोथिंबिर / आलं वगैरे कधी विकत घेतलं नसेल, भाजी घेतली की बचकाभर कोथिंबिर न मागता पडायचीच पिशवीमधे.

इंदौरची भाषा हाही काही एक औरच प्रकार आहे. ना धड हिंदी ना धड मराठी. एकदा आमच्या शेजारचा मुलगा संध्याकाळी आला आणि माझ्या आईला म्हणाला 'काकू, आई है क्या? बाबा आये है ऑफिसमेसे.' :) भाषिक ठेचा तर पदोपदी लागत होत्या. एखादा अत्रे / करमरकर नावाचा पोरगा अतिभयंकर आणि अतिशय कष्टाने मराठीत बोलत असेल हे माझ्या साठी काहितरी विचित्रच होतं. सवय झाली हळूहळू पण सुरुवातीला मात्र भयंकर वाटायचं. बरं त्या बोलीवर खास माळवी संस्कार आहेत. कोणताही इंदौरी माणूस 'हो' म्हणणार नाही. त्यांच्या भाषेत 'हाव' म्हणतात. (हा शब्द उच्चारात 'हाव' आणि 'हाउ' या मधे कुठेतरी येतो). 'मे आ रिया था / जा रिया था' असे सूरमा भोपाली छाप उच्चार.

अशा या इंदौरने एक खूप मोठा ओरखडा पण दिला आहे मनाला. १९८४ साली इंदिरा गांधींची हत्या झाली. पूर्ण देशात हिंसाचार भडकला. असं म्हणतात दिल्लीच्या खालोखाल इंदौर मधे शीखांचं शिरकाण झालं. इंदौर मधे शीखांची वस्ती खूपच आहे. एक खूप मोठा आणि सुंदर गुरुद्वारापण आहे तिथे. त्या दिवशी आई आणि ताई गावात गेल्या होत्या. अचानक गडबड सुरू झाली. लवकर घरी जाऊया म्हणून त्या गुरूद्वारापाशी टेंपो पकडायला म्हणून आल्या. त्याना हे शीखांचं वगैरे माहितच नव्हतं. त्या तिथे पोचेपर्यंत एक मोठा जमाव पण तिथे जाळपोळ करत आला. त्या भागात बरीच दुकानं शीखांची असावित. तो जमाव ती दुकानं जाळत होता. अचानक त्यांच्या ताब्यात एक शीख सापडला. त्या जमावाने त्याला खूप मारलं आणि शेवटी त्याच्या गळ्यात टायर टाकून अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळला. तो पळायला लागला तर त्याला काठ्यानी ढकलून ढकलून पाडलं. मी नंतर नुसतं ऐकलं तर खूप त्रास झाला. प्रत्यक्ष बघणार्‍यांची अवस्था तर कल्पनेपलिकडे झाली होती.

पण हा प्रसंग एक सोडला तर माझ्या मनावरचं इंदौर नावाचं गारूड कायम राहिल शेवटपर्यंत. आता इंदौरला जाणं होतं क्वचित. ओळखूसुध्दा येणार नाही इतकं बदललं आहे. ते आता एक शहर झालं आहे. सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत. जिथे आम्ही रहात होतो तो भाग तर आपला वाटतच नाही आता. १०-१५ मिनिटं गल्ल्यागल्ल्यातून फिरलो तेव्हा घर सापडलं. दुसरेच कोणीतरी रहात होते तिथे. एकदा वाटलं दार वाजवावं, घर आत जाऊन बघावं पण पाऊल पुढे नाही पडलं. जे माझ्या मनात कायम घर करून राहिलेलं घर आहे ते मला तिथे दिसणार नाही याची खात्रीच होती. माझ्यापुरतं माझं इंदौर माझ्याजवळ आहेच की. लोकांसमोर काय हात पसरायचे.

जी. एं.च्या 'कवठे' मधली कमळी दामूला म्हणते, 'अरे बाग छान नव्हती. आम्ही छान होतो'. थोर माणूस, माझ्या मनातल्या भावना त्यांनी कितीतरी आधीच लिहून ठेवल्या आहेत.

*****

आज अचानक हे सगळे आठवायचे कारण म्हणजे भोचक भाऊंचा माझ्या हिंदीचा बोलु कवतिके हा एक मस्त लेख.

आणि एक कारण म्हणजे आमच्या मधुशाला गँग पैकी एका मुलीचा नुकताच कँसरमुळे झालेला मृत्यू. खूप चटका लागला होता. भोचकभाऊंचा लेख वाचला आणि....

माझाही अनुभव...

on रविवार, नोव्हेंबर ०२, २००८

बरोब्बर १ वर्षा पूर्वी मला आफ्रिकेला जायचा योग आला. तशी ती माझी आफ्रिकेची पहिलीच ट्रिप असल्याने मी एकदम खुशीत होतो. नैरोबीला राहणार होतो ३ च दिवस पण एक पक्कं ठरवलं होतं काहिही झालं तरी तिथलं झू बघाच्चं म्हणजे बघाच्चंच. काम खरं म्हणजे २ च दिवसाचं होतं आणि तिसरा दिवस विमानची वेळ सोयीची नव्हती म्हणून पदरात पडला होता. म्हणजे सगळं व्यवस्थित जुळून येत होतं.
गेल्या गेल्या पहिलं काम काय केलं असेल तर कंपनीच्या ड्रायव्हरला मस्का मारायला सुरुवात केली. नाहीतर आम्हाला टॅक्सी भाड्याने (टारू वाला भाड्या नाही :) ) घेऊन झू वगैरे बघायला जावे लागले असते. ते काही परवडले नसते. आमचा ड्रायव्हर, जॅक त्याचे नाव, म्हणजे एकदम जेंटल जायंट (६ फूट ६ इंच उंची आणि वजन १०० कि. च्या खाली गॅरंटीड नसणार, एक्स केन्यन आर्मी बॉक्सिंग चँप). त्याच्या साठी दुबई ड्यूटी फ्री मधून 'खाऊ' (खरं म्हणजे 'पिऊ') नेलंच होतं. मग काय, प्रोग्राम ठरला आमचा.
ठरल्या प्रमाणे आम्ही तिघं जणं जॅक बरोबर झू मधे गेलो. नैरोबीचे झू खूपच मोठे आहे. तिथे सगळे वन्यप्राणी वेगवेगळ्या ठिकाणी मोकळे सोडले आहेत. पिंजरे वगैरे काही नाहित. आपणही मोकळेच असतो. पिंजरेवाल्या गाडीत नाही. फक्त प्राण्यांच्या आणि आपल्या मधे खूप मोठे खोल खंदक खणलेले असतात आणि त्या खंदकात तारा वगैरे टाकून जाळ्या केलेल्या असतात ज्या मुळे ते प्राणी आपल्या जवळ येऊ शकत नाहीत. तर, आम्ही फिरत फिरत, एका ठिकाणी एक चित्त्याची मादी आणि तिची २ पिल्लं ठेवली होती तिथे आलो. आम्ही अगदी कुतूहलाने शोधत असताना, अचानक तिथला केअरटेकर आला आणि म्हणाला, 'डु यू वाँट टू मीट देम? टच देमच?' ... आम्ही तिघंही तो प्रश्न आमच्या मेंदूंपर्यंत पोचायच्या आधी 'यस्स्स' म्हणून बसलो. मग आम्हाला कळलं की आपण काय बोललो आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात. पण आता माघार कसली? जॅक पण होताच समोर, तो आमची गंमत बघत होता. मग विचार केला 'दे धडक, बेधडक'. जो होयेंगा वो देखा जायेंगा. आणि त्या केअरटेकरची पण काहितरी वट असेलच ना चीत्त्यांवर? मग काय घाबरायचे? 'हर हर महादेव'. तो केअरटेकर आम्हाला एका छोट्याश्या जाळीतून आत घेऊन गेला. तिथे साधारण १२ फूट बाय १२ फूट ची एक जाळीदार खोली होती. म्हणजे पिंजरा हो. त्याने आम्हाला त्या पिंजर्‍यात कोंडले आणि म्हणाला थांबा इथेच, मी आलोच चीत्त्याला घेऊन. आम्ही मस्त पैकी इकडे तिकडे बघत शिट्ट्या वगैरे वाजवत उभे होतो. २-३ मिनिटात केअरटेकर साहेब आले की खरंच त्या चीत्त्याला घेऊन. कल्पना करा १२ बाय १२ च्या बंदिस्त जागेत आम्ही ३ क्षुद्र मानव, एक 'महा'मानव, तो केअरटेकर आणि ती चीत्त्याची मादी.
तेवढ्यात माझा एक मित्र पचकलाच, 'फिडींग टाईम काय असतो हो या प्राण्यांचा?' 'होतच आला आहे आता, साहेब. खरं म्हणजे फिडींग साठीच मी आत चाललो होतो, तुम्ही दिसलात म्हणून विचारलं की येता का आत?' - केअरटेकर. खरं सांगतो मंडळी, परवा पेठकर काकांनी कुठे तरी प्रतिसादात लिहिल्या प्रमाणे काळ्जाचं पाणी पाणी होऊन ते तुंबायला लागलं होतं आणि पटकन जिथून जागा मिळेल तिथून बाहेर पडेल असं वाटायला लागलं होतं.
केअरटेकर साहेबांनी त्या बयेला एका कोपर्‍यात खाली बसवलं आणि म्हणाले, 'या एक एक करुन'. आमची थोडी ढकलाढकली झाली, तर तो केअरटेकर म्हणतो कसा 'प्लीज बी काम, अदरवाईज शी मे गेत एक्सायटेड'. मग कसाबसा धीर करुन आम्ही एक एक करुन जवळ गेलो. त्या खाली बसलेल्या चित्तीणीच्या अंगावरुन छान हात वगैरे फिरवला. काय अनुभव होता म्हणून सांगू.... मिपाच्या भाषेत... ज ह ब ह र्‍या. तिचा तो फरकोट, थोडासा मऊ, थोडासा खरखरित. आणि तो जनावरांच्या जवळ येणारा एक विशिष्ट वास.
मी हात फिरवत असताना, एकदम तीने मान उचलून माझ्याकडे रोखून बघितलं. अथांग हिरवे डोळे म्हणजे काय असते ते मला त्या दिवशी कळलं. एखादे हिंस्त्र जनावर साधारण एखाद फूटावरून तुमच्या डोळ्यात डोळे मिसळून बघतं... आहाहाहा, काय फिलींग असतं, भिती तर वाटतेच पण आपण काहितरी जबरदस्त करतो आहे असेही एक थ्रिल जाणवत होतं. मला जिम कॉर्बेटची आठवण आली. त्याने असं लिहिलं आहे की वाघ कधी कधी सावजाला संमोहित करुन त्याची शिकार करतो असं कुमाउंमधले स्थानिक लोक म्हणतात. आईच्यान् सांगतो मंडळी, खरं असणार ते. असला खोल हिरवा रंग कधीच नाही बघितला मी.
त्या दिवशी आम्ही आत जाताना ढकलल्या सारखे गेलो होतो, पण बाहेर पडायची इच्छा होत नव्हती. बाहेर आलो तेव्हा उगाचच नाचावेसे वाटत होते. बराच वेळ आम्ही चूपचाप होतो. मग एकदम फोन काढला आणि पहिला फोन माझ्या मुलीला केला. तिचा तर विश्वासच बसत नव्हता. मला माहित होतं की तिचाच काय तुमच्या पैकी पण कित्येकांचा विश्वास बसणार नाही. म्हणूनच हे व्हिडिओ शूटींग केलं आहे। :)

http://www.youtube.com/watch?v=CSuW1BTKjP0



बिपिन.