माझं खोबार... भाग १

on गुरुवार, नोव्हेंबर ०६, २००८

मंडळी, काही वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात एक अगदीच अनपेक्षित वळण आले. ध्यानी मनी नसताना किंवा कुठल्याही प्रकारचे प्लॅनिंग नसताना मला परदेशात नोकरी करायचा योग आला. आणि तो परदेश पण साधासुधा असातसा नाही, चक्क 'सौदी अरेबिया', ज्या देशाबद्दल आपल्याला नेहमीच एक भीती वाटत असते आणि कुतूहल पण तेवढेच असते. तर माझ्या या सौदी गमन आणि वास्तव्याबद्दल माझे काही अनुभव आहेत ते इथे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.

मी इथे जे काही लिहिणार आहे ते पूर्णपणे सत्य असणार आहे, त्यात कुठल्याही प्रकारची काल्पनिक पात्रं किंवा घटना नसतील. मी आयुष्यात हा पहिलाच लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे. ऑल सजेशन्स आर वेलकम. (एक वाक्य पुलंचं उधार - या लिखाणात साहित्यिक मूल्यं वगैरे शोधू नका, नाही म्हणजे मिळणार नाहीत म्हणुन सांगितलं आपलं, उगाच तुमची निराशा ;) )

*************

१९९८ चा सप्टेंबर - ऑक्टोबर महिना असेल. दसरा जवळ आला होता. तेव्हा मी भारतातिल एका 'चिकट पदार्थ' बनवणार्‍या प्रसिद्ध कंपनीत 'Every Day Problem' म्हणजेच इडिपी डिपार्टमेंट मधे काम करत होतो. तेव्हा आपल्याकडे ERP प्रकारची सॉफ्टवेअर्स नुकतीच आली होती. आमच्या कंपनीतही असेच एक सॉफ्टवेअर बसवायचे काम चालले होते. आमची भरती पण होतीच इंप्लिमेंटेशन टीम मधे. सॉफ्टवेअर व्हेण्डर च्या टीम मधल्या लोकांशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले होते.

अशातच एक दिवस, त्यांच्या पैकी एक वरिष्ठ मला 'विश्रांतिगृहातील' महत्त्वाचे काम करत असताना हळूच म्हणाला "लंच के बाद नीचे मिल मेरेको". मला टेंशन. म्हणलं काल एका डिलिव्हरेबल बद्दल काही वाद झाला त्यात काही कमीजास्त बोलणं झालं काय आपल्याकडून? पण तसा धोकाही नव्हता म्हणा. तो होता गुज्जु आणि प्रकृतिने किरकोळ. काय ४-५ श्या दिल्या असत्या तरी कानाला गोडच वाटलं असतं. ठरल्याप्रमाणे त्याला खाली जाऊन भेटलो लंच नंतर. मला चक्क नोकरीची ऑफर देत होते साहेब. आणि माझ्या कंपनीत कोणाला संशय येऊ नये म्हणून मला खाली बोलवून वगैरे बोलणं चाललं होतं. त्यानंतरच्या दसर्‍याच्या मुहुर्तावर त्याला माझ्या सी.व्ही. ची प्रत दिली आणि अश्या प्रकारे माझ्या आयुष्यातल्या सौदी प्रकरणाला सुरुवात झाली.

**************

आता सगळ्यात पहिले काम काय तर, आमच्या नविन कंपनीच्या दुबईस्थित बड्या लोकांना टेलिफोनिक इंटरव्ह्यू द्यायचा आणि खुंटा बळकट करायचा. दिवस ठरला, वेळ ठरली. आता मात्र मनात एक धाकधूक व्हायला लागली होती. इतके दिवस परदेशगमनाचे काहीच प्लॅन्स नव्हते पण अशी एक संधी समोर दिसायला लागली आणि मनात एक अपेक्षा निर्माण झाली. बरं माझी जरी रास कन्या नसली तरी माझ्या आई-वडिलांची रास कन्या आहे ना... त्या मुळे वाण नाही पण गुण लागलाच थोडासा. खूपच नर्व्हस झालो होतो. ठरल्या दिवशी काही कॉल झालाच नाही. असं अजून १-२ वेळा झालं, आता मात्र माझी खात्री झाली की हे काम काय पुढे जात नाही. मग मी परत निश्चिंत, होतच नाहिये तर कशाला काळजीने मरा? एक दिवस अचानक फोन आला की तो इंटरव्ह्यू घेणारा भाऊ उद्या मुंबईतच येतोय आणि त्याला तुला प्रत्यक्ष भेटायचं आहे. मी परत नर्व्हस. तसाच गेलो त्याला भेटायला त्याच्या हॉटेलवर. बघतो तर साहेब टी.व्ही. वर चक्क क्रिकेट ची मॅच बघत होते. पुढचा अर्धा तास मग नुसत्या गप्पा आणि क्रिकेट बद्दल बोलणं. मला खरंच खूप टेंशन आलं की हा कामाचं का नाही बोलत आहे. थोड्या वेळाने त्याने मला अचानक विचारलं, "तुला तर फायनान्स डोमेन चा काहीच अनुभव नाही". मी गप्पच, काय बोलणार, तो म्हणत होता ते खरंच होतं. मग त्याने विचारलं, "तुला बॅलन्स शीट बद्दल काय माहिती आहे?" आता मी थोडं विचार करून उत्तर देणार तेवढ्यात माझ्यातला प्रामणिक बंडू लगेच उत्तरला, "डेबिट शुड बी इक्वल टू क्रेडिट" आता वाचा जायची पाळी त्याची होती. तरी तोच पुढे म्हणाला, "पाण्यात फेकला तुला तर पोहशील की बुडशील?". मला त्याचा रोख कळला, मी पण त्याला उलटा प्रश्न केला, "मला पाण्यात फेकताना पाठीला डबा बांधणार की तसंच फेकणार?" मी बोललो खरा पण बोलल्यानंतर लक्षात आलं की आपण काय बोलून बसलो. पण तो खूप हसला आणि म्हणाला "तुझा हजरजबाबी पणा आवडला, पण ऑफकोर्स डब्याशिवाय फेकणार". तो पर्यंत माझाही धीर चेपला, मलाही अंदाज आला होता की हा खरंच इंटरव्ह्यूच चालू आहे आणि मला ही पध्दत आवडली होती. मी त्याला उत्तर दिले, "ऑफ कोर्स, आय विल स्विम. हाऊ टू अचिव्ह दॅट इज माय प्रॉब्लेम, बट आय ऍम कॉन्फिडंट" हे सगळं आज लिहिताना एवढा वेळ लागतो आहे पण तेव्हा हे सगळं अक्षरशः क्षणार्धात घडलं. नंतर माझ्या लक्षात आलं की मला काय येतंय किंवा येत नाहिये याच्या मधे फारसा रस त्याला नव्हताच. ते सगळं त्याने आधीच मला ओळखणार्‍या निरनिराळ्या टीम मेंबर्सना गाठून काढून घेतलं होतं. त्याला फक्त माझी पर्सनॅलिटी टेस्ट घ्यायची होती. आणि त्या क्रिकेटच्या गप्पा वगैरे सगळं त्याच एका हेतूने चाललं होतं. त्याने पुढचा प्रश्न विचारला "सौदी अरेबियात काम करशील, की दुबईच पाहिजे?" मला कुठं काय कळत होतं तेव्हा दुबई काय आणि सौदी अरेबिया काय. मी म्हणलं, "माझा असा काही प्रेफरंस नाहिये."

आणि मंडळी अश्या रितीने माझी पहिली परदेशातील नोकरी पक्की झाली.

क्रमशः