कारी...

on मंगळवार, नोव्हेंबर ०४, २००८

परवाचा लक्ष्मीपूजनाचा दिवस. एरवी एकटाच असतो. दिवाळीनिमित्त 'फ्यामिली' आली आहे इथे. ज्या दिवशी ते आले नेमकं त्या दिवसापासून रोज घरी जायला उशिर होत होता. दिवसभरात बायकोचा २-३ वेळा फोन येऊन गेला होता, आज लक्ष्मीपूजन आहे, आज तरी वेळेत ये घरी. त्या प्रमाणे थोडा लवकरच निघालो होतो. टॅक्सी पण मिळाली पटकन. म्हणलं आज खरंच चांगला दिवस दिसतोय. मस्त मूड होता. घरी जाऊन काय काय करायचं त्याचा विचार चालू होता. मस्त मुलींबरोबर मस्ती करायची, दाबून जेवायचं असले सुखासीन विचार चालले होते.

एकीकडे टॅक्सी ड्रायव्हर साहेबांनी पण बोलायला सुरुवात केली. इथले बव्हंशी टॅक्सीचालक पाकिस्तानी आणि त्यातल्या त्यात पठाण आहेत. पठाण लोकांची काही वैशिष्ट्य आहेत. कमालीचा गप्पिष्टपणा हे त्यापैकीच एक. बोलता बोलता त्याने बीबीसी वर 'उर्दू नशरियात' हा प्रोग्राम लावला. ही अजून एक सवय या टॅक्सीवाल्यांची. संध्याकाळी बीबीसी वर आधी उर्दू आणि मग हिंदी सर्व्हिस असते. हटकून न चुकता हे लोक हे प्रोग्राम ऐकतातच ऐकतात. उर्दू प्रोग्राम चालू होता. यामधे प्रामुख्याने पाकिस्तानकेंद्रित बातम्या आणि राजकिय / सामाजिक विषयांवर चर्चा / भाष्य वगैरे असे असते. पाकिस्तान सरकार सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे त्याबद्दल चर्चा चालू होती. त्यावर ड्रायव्हर साहेबांची 'लाईव्ह' कॉमेंटरी, 'आतषबाजी' सकट. मग प्रोग्राम आर्थिक / राजकिय मुद्यांकडून सामाजिक मुद्यांच्या दिशेने वळला. त्यानंतर जे काही ऐकले त्या प्रोग्राम मधे, खरं सांगतो, अजूनही मी त्या धक्क्यातून बाहेर येऊ नाही शकलो आहे पूर्णपणे. माणूस सैतानाचं रूप किती सहजतेने घेऊ शकतो हे पाहून भयंकर हादरलो आहे मी. असं काय होतं त्या कार्यक्रमात?

मी पहिल्यापासून सांगायला सुरुवात करतो.

पाकिस्तानातला सिंध प्रांत. तिथल्या खैरपूर जिल्ह्यातलं हजानशाह नावाचं एक छोटंसं खेडं. गुल शेर आणि झाकिरा बीबी ही त्याची बायको आणि त्यांची ६ मुलं, त्या गावातले एक सामान्य रहिवासी. गुल शेर चा गायीगुरं पाळण्याचा / विकण्याचा व्यवसाय. थोडीफार मालमत्ता. सुखवस्तू सधन कुटुंब. तस्लीम ही त्यांची ३ नंबरची मुलगी. दिसायला छान. स्वभावाने धीट. एका कर्मठ वातावरणात वाढत असली तरी काही स्वप्नं बाळगण्या इतपत शिक्षण आणि जगाचं भान असलेली. तिचा मामा डॉक्टर होता, ती एकदा कराचीत त्याच्याकडे गेली होती तेव्हा पासून तिला पण वाटत होतं की आपण पण डॉक्टर व्हायचं. खेड्यापाड्यात लोकांना, विशेषतः बायकांना, वैद्यकिय मदत मिळणं खूपच दुरापास्त असतं. तर आपण हेच काम करायचं. ती मॅट्रीकची परिक्षा नीट पास झाली. आपल्या आईला अक्षरओळख करून दिली, तिला स्वत:च नाव लिहायला शिकवलं.

पण त्याच वेळी घरात काही कुरबुरी चालू होत्या. कारण नेहमीचंच. संपत्ति / जमिनजुमला वगैरे. शेर गुल आणि त्याच्या भावांमधे काही वाद चालू होते. गावातल्या काही बड्या-बुढ्यांनी शेर गुलला सल्ल दिला की तस्लीमचे लग्न तिच्या चुलतभावांपैकी एकाशी लावून दे म्हणजे वाद मिटतील. त्यालाही ते पटले. झाकिराबीबी मात्र या प्रस्तावाच्या पूर्ण विरुद्ध होती. ती पण प्रचलित समाजव्यवस्थेमुळे दबलेली एक स्त्री होती. तिला आपल्या मुलीला शिकलेलं पाहायचं होतं. डॉक्टरणीची आई म्हणून मिरवायचं होतं. पण स्वतः तस्लीमने मात्र हा प्रस्ताव स्विकारायचं ठरवलं. तिला वाटलं की खरोखर या लग्नामुळे जर का काही चांगलं होणार असेल तर देऊ आपण ही कुर्बानी. आणि चुलतभावाशीच तर करायचं आहे ना लग्न? हरकत नाही. समजवू त्याला हळू हळू आणि शिकू की अजून पुढे. झाकिराबीबीने परोपरी समजवूनही हे लग्न झालं. पण तस्लीमचे दुर्दैव असे की, एक मुलगा होऊनही परिस्थिती काही सुधारली नाही.

वाद टोकाला गेला आणि तिच्या सासरच्यांनी तिला 'कारी' म्हणून घोषित केलं. 'कारी' म्हणजे काय तर, ज्या स्त्री किंवा पुरूषावर बदफैलीपणाचा आरोप असतो ती किंवा तो. तर तस्लीमला कारी ठरवून लगेच शिक्षा पण दिली गेली. आधी गुलशेर आणि बाकी परिवाराला एका खोलीत कोंडून घातलं गेलं आणि बाहेर अंगणात सैतानी खेळ खेळला गेला. उपासमारीने पिसाळलेले कुत्रे आणले गेले आणि तिच्या आणि तिच्या जेमतेम २ महिन्यांच्या निष्पाप बाळावर सोडले गेले. आधी त्या कुत्र्यांनी त्या बाळाचे लचके तोडले आणि मग तिच्याकडे मोर्चा वळवला. ती घरभर सैरावैरा धावत सुटली. मदतीसाठी हाका मारत राहिली. कोण करणार मदत? शेवटी ती धडपडून खाली पडली, कुत्र्यांनी झडप घातली. पण तेवढ्यात तिच्या सासर्‍याला (जो तिचा सख्खा काका होता), नवर्‍याला आणि इतर लोकांना तिची थोडी दया आली आणि तिचा अजून लचके तोडून छळ होऊ न देता तिला छातीत ३ गोळ्या घालून ठार मारण्यात आले. तिचे आईबाप आणि इतर भावंडं हे सगळं हताशपणे खिडकीतून बघत होते, आक्रोश करत होते.

आता गुलशेर आणि त्याचं कुटुंब कराचीत लपूनछपून रहात आहेत. या घटनेचा जाहिर बोभाटा झालाय. तिथल्या मानवाधिकार संघटनांनी खूप गदारोळ केला आहे. त्या मुळे आता गुलशेर आणि झाकिराबीच्या जीवाला पण धोका निर्माण झाला आहे. सहसा कोणतंही सरकार असं प्रकरण दाबून टाकायला बघतं पण इथे आता ही घटना आंतरराष्ट्रिय पातळीवर गेली आहे. कर्जबाजारीच्या संकटामुळे पाकिस्तान सरकार परदेशांपुढे वाकले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी पाकिस्तानचे राष्ट्रपति आसिफ आली झरदारी स्वतः जातीने लक्ष घालून करणार आहेत म्हणे.

मागच्या वर्षी पाकिस्तानी पंजाबात पण मुख्तारन माई नावच्या मुलीचे असेच प्रकरण घडले होते. ती तथाकथित खालच्या जातीची होती. तिच्या लहान भावावर गावतल्या चौधरीच्या मुलीची छेड काढल्याचा आरोप झाला आणि पंचायतीत शिक्षा सुनावली गेली, छेडछाडीचा बदला म्हणून मुख्तारन वर 'अधिकृतरित्या' सामूहिक बलात्कार केला गेला. पण ती जिवंत राहिली. तिने लढा दिला आणि न्याय मिळवायचा प्रयत्न केला. तिला नुकसानभरपाई म्हणून बरेच पैसे मिळाले ते तिने पूर्ण पणे समाजसेवेसाठी दान केले.

पण हे नविन प्रकरण ऐकले आणि सुन्न झालो. खून आणि तोही असा? माणूस खरोखर इतका सैतान बनू शकतो? मन मानत नाहिये पण सत्य परिस्थिती दिसते आहे ना समोर. जगात एकच गोष्ट दबू नाही शकत ना खोटी ठरवली जाऊ शकत... ती म्हणजे सत्य.

***

पण हा 'कारी' प्रकार काय आहे? किती घटना खरोखर घडतात? हे सर्रास होतं की असले प्रकार तुरळक पणे घडतात? सिंध मधे 'कारो कारी' हा एक अतिशय प्रचलित शब्द आहे.

मूळात या प्रकाराला इंग्रजीमधे ऑनर किलिंग (मराठी प्रतिशब्द?) असं म्हणतात. बर्‍याचश्या आफ्रिकी आणि अशियाई समाजांमधे हा प्रकार अगदी सर्रास आणि राजमान्य आहे. तत्वतः जरी हे स्त्री आणि पुरुष दोघांच्या बाबतीत घडू शकते तरी बहुतेक वेळा असे नृशंस प्रकार स्त्रियांच्या बाबतीतच घडतात. पुरूषांच्या बाबतीत मूळात आरोप होणंच नगण्य आहे आणि बहुतेकवेळा मामुली शिक्षा किंवा जबरी दंड करून त्यांना सोडलं जातं. सामन्यतः असे प्रकार मुस्लिम देशांत घडताना दिसतात तरी ही प्रथा खरोखर धर्मातीत आहे. आपल्याकडे पण असे प्रकार सर्रास घडतात. एखाद्या असहाय्य गरीब विधवेला जादू-टोणा करते म्हणून सरळ दगडांनी ठेचून मारायचे, किंवा बदफैली म्हणून आरोप करायचा आणि लगेच शिक्षा द्यायची. फिर्यादी पण आपणच, न्यायाधीश पण आपणच आणि ती शिक्षा अंमलात आणायचं पुण्य पण आपल्याच पदरात घ्यायचं. पण बोभाटा झाला की आपण त्या गावचेच नाही असं दाखवून सरळ शेपूट घालायची हाच यांचा पुरुषार्थ. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बर्‍याच वेळा इतर बायकापण यात सामिल होतात. आपल्या प्रगत महाराष्ट्रातलं खैरलांजी प्रकरण आठवा. सगळं गाव सामिल होतं. सुरेखाबाईचा गुन्हा काय तर तिने मान ताठ ठेवायची हिंमत दाखवली. ठेचलीच तिला, अक्षरशः. याच प्रथेचं अजून एक रूप म्हणजे आरोपी व्यक्तिला आत्महत्या करायला भाग पाडणे. म्हणजे काही भानगडच नाही. पुरावे नाहीत आणि मृत व्यक्ति थोडीच येणार आहे आपली कहाणी सांगायला?

आपल्या पोटच्या गोळ्याला किंवा सख्या बहिणीला, जिच्या बरोबर आयुष्य काढलं लहानाचे मोठे झालो, निर्घृणपणे मारून टाकायचं, मुंडकं उडवायचं, गळा दाबायचा म्हणजे पूर्ण सैतानीकरण झाल्याशिवाय शक्यच नाही. खरंतर अश्या सैतानांना क्षमा नाहीच नाही. पण दुर्दैवाने असे अनेक देश अजूनही आहेत, मुख्यतः मध्यपूर्वेत जिथे अश्या गुन्ह्यांना शिक्षाच होत नाही आणि असलीच तर खूप कमी आहे. जगभरात मानवाधिकारांच्या लढाई मधे 'ऑनर किलिंग' विरोधातली लढाई हा एक मुख्य भाग आहे. आजकालच्या आधुनिक जगात प्रसारमाध्यमं बलवान झाली आहेत त्याचा एक चांगला परिणाम म्हणजे अश्या घटना तातडीने अतिशय मोठ्या समूहापुढे स्पष्टपणे आणि सहजपणे मांडता येतात. त्या मुळे जनमताचा रेटा तयार करता येतो. आणि न्यायदानात मदत होऊ शकते.

जीवनमानातला बदल हा अपरिहार्य असतो. तो थांबवू म्हणता थांबवता येत नाही. कुठे पटकन होतो कुठे भरपूर वेळ लागतो. पण जीवनमान बदलतं नक्कीच. या न्यायाने 'ऑनरकिलिंग' ची भीषण परिस्थिती पण नक्कीच बदलेल, प्रश्न इतकाच आहे की अजून किती तस्लीम, मुख्तारन, सुरेखाबाईंचा बळी जाणार आहे? 'सूनर द बेटर' हे या बाबतीत इंग्रजीतलं नुसतंच एक चमकदार वाक्य नाहीये तर प्रत्येक तस्लीमसाठी 'जीवनवरदान' ठरणार आहे.

***
यथावकाश मी घरी पोचलो, दार उघडल्या उघडल्या पोरी येऊन गळ्यात पडल्या, बाबाच्या अंगावर उड्या मारायची शर्यत लागली दोघींची. मी पण थोडा नॉर्मलला आलो. दोघींबरोबर मस्ती झाली. तो पर्यंत बायकोने लक्ष्मीपूजनाची तयारी केली. मी स्वच्छ आंघोळ करून देवासमोर बसलो. यथाशक्ति यथामति पूजा केली देवाची आणि प्रार्थना केली,

"देवा, लक्ष्मी येईल जाईल, तू मात्र माझं बोट सोडू नकोस. माझी सद्सदविवेक बुद्धी बनून माझ्या बरोबर रहा. आज मी जे काही ऐकलं तसं परत कोणाच्याच बाबतीत न घडो. आणि घडलंच तर मी जसा सुन्न झालो तशीच प्रत्येक व्यक्ति होऊ दे म्हणजे हे चित्र पालटायला वेळ लागणार नाही."

शुभं भवतु.

***

टीपः ती न पाहिलेली तस्लीम काही डोळ्यापुढून हलत नाहिये आणि तिच्या न ऐकलेल्या किंचाळ्या अजून कानात घुमताहेत.

1 comments:

श्रद्धा म्हणाले...

तुमची ही post खूप अस्वस्थ करून गेली. आपल्याकडच्या "सती"च्या परंपरेची आठवण झाली.
निदान माणसातल्या चांगुलपणावर विश्वास ठेवून, काही वर्षानी का होईना पण तुमची प्रार्थना फ़ळास येइल अशी आशा ठेवण्यास काही हरकत नाही.