डूड...

on गुरुवार, सप्टेंबर ३०, २०१०

"लेडिज अँड जंटलमन, वी हॅव रिच्ड छॅट्रपॅटी शिवॅजी इंट'नॅशनल एअ'पोऽट मुंबाय. वी विल कमेन्स आऽर डिसेंट शॉर्टली. यु आऽ रिक्वेस्टेड..."

समोरच्या छोट्या स्क्रीनवर चाललेल्या टायटॅनिकमधे पार बुडालेला समीर एकदम भानावर आला. मान उंचावून दोन सीट सोडून डावीकडे असलेल्या खिडकीतून त्याने बाहेर नजर टाकली. विमान डावीकडे वळत होते. त्याबाजूला झुकल्यामुळे खाली चमचमणारा दिव्यांचा समुद्र अगदी लख्ख दिसत होता. सोळा सतरा तासाच्या प्रवासाने त्याचे अंग अगदी आंबून गेले होते. मस्त हात उंच करून त्याने आळस दिला. खिडकीच्या बाजूला शाय, आय मीन, शलाका काचेला नाक लावून खाली बघत होती. तिच्या बाजूला आई अगदी सराईतपणे घोरत होती. तिचे तोंड उघडे होते. आत्ता जर का आईचा हा अवतार मोबाईलवर शूट केला आणि नंतर तिला दाखवला तर स्वतःला अतिशय टापटीप ठेवणार्‍या आईची काय अवस्था होईल ते घोरणे आणि तोंड उघडे वगैरे, ते ही चार लोकांत, हे बघून या विचाराने समरला एकदम हसायला आलं आणि त्याच्या बाजूला बसलेले बाबा एकदम दचकून जागे झाले. चार पाच पेग तब्येतीत लावलेले असल्यामुळे ते दोन सेकंदात परत झोपले. थकवा, कंटाळा, जाग्रण सगळं एकदम धावून आलं आणि कधी एकदा या कैदेतून सुटतोय याची वाट बघत समीर स्वस्थ बसून राहिला. प्रथेप्रमाणे हवाईसुंदर्‍या आणि सुंदरे फेर्‍या मारून सगळ्यांच्या आसनांचे पट्टे वगैरे तपासत होते. खुर्च्या सरळ करत होते. तेवढ्यात चाकं बाहेर आल्याचा धप्प आवाज झाला आणि पाचच सेकंदात एक जोरदार हादरा बसून विमान लँड झाले. अगदी मागे बसलेल्या साताठ पोरांच्या टोळक्याने टाळ्या शिट्ट्या वाजवल्या आणि विमानात एकच गलका झाला.

एखाद्या गोष्टीसाठी वर्षानुवर्षे अगदी शांतपणे धीराने वाट बघावी, पण ती गोष्ट अगदी हाताशी आली की मात्र भयानक अधीरता यावी तसे झाले होते त्याला. आजी आजोबांना बघून जवळजवळ पाचेक वर्षं झाली होती. काका मामा आत्या मावश्या तर त्याहून जुन्या झाल्या होत्या. कधी एकदा घरी जातोय आणि आजीला घट्ट मिठी मारतोय असं झालं होतं त्याला. आजोबांची रिअ‍ॅक्शन मात्र माहिती होती त्याला. हळूच हसतील, डोक्यावरून हात फिरवतील आणि मग दुसरीकडे तोंड करून थोडे पुढे जाऊन चटकन डोळे पुसतील. आणि मग थेट गाडीत जाऊन बसतील. पाच वर्षांपूर्वी अमेरिकेत आले होते तेव्हा असंच केलं होतं त्यांनी.

जोरात धावणारे विमान वेग कमी करत करत मग एका ठराविक वेगाने बराच वेळ हळूहळू चालत राहिले. बाहेर नुकताच पाऊस पडून गेला होता बहुतेक. टर्मिनल बिल्डिंगचे दिवे लखाखत होते. विमान धक्क्याला लागलं. इतके तास शहाण्या मुलांसारखे बसलेलं पब्लिक एकच झुंबड करून उठलं आणि वरच्या कप्प्यातलं सामानसुमान बाहेर काढू लागलं. यथावकाश दारं उघडली आणि विमान रिकामं व्हायला लागलं. इमिग्रेशन वगैरे सोपस्कार आटोपून बाहेर येईपर्यंत बराच वेळ लागला. समीर शलाका अगदी भिरभिर सगळीकडे बघत होते. त्यांच्यासाठी हे एक काहीतरी वेगळंच जग होतं. काहीतरी ओळखीचं पण बरंचसं अनोळखी. आजूबाजूचे लोक काय बोलतायत ते कळल्यासारखं वाटत होतं पण कळतही नव्हतं धड. एखाद्या ठार अडाणी माणसाला रस्त्यावर पाट्या बघत पत्ता शोधायला लागला तर कसं होईल, तसं वाटत होतं त्यांना. प्रत्येक गोष्ट अगदी नीट व्यवस्थित विचार करून करणारे बाबा तर अक्षरशः एखाद्या लहान मुलाच्या वरताण वागत होते. त्यांची आणि आईची एक्साईटमेंट आणि त्यापायी होणारी धांदल गडबड बघून समीरला खूपच गंमत वाटत होती.

"मॉम, व्हाय आ' यु गाइज गेटिंग सो एक्सायटेड? आय मीन, आय नो तुम्ही लोक जवळजवळ सेवन एट इयर्सनंतर येताय इंड्याला. बट यु बोथ आ' सिंपली लॉस्ट".

"शट अप सन, यु वोंट नो... द एन्टायर फॅमिली मस्ट बी वेटिंग आउट देअ' टू ग्रीट अस... गॉश... दादा, वहिनी, प्रभा... किती वर्षांनी भेटणारे मी सगळ्यांना."

आईला बोलू न देताच बाबा समीरला उत्तर देता देता स्वतःशीच बडबडायला लागले. आई तर त्याही पलिकडे गेली होती. तिला लांबूनच सगळे दिसायला लागले होते. त्यांची अवस्था बघून शलाका पण हसत होती. ती काहीतरी बोलणार तेवढ्यात समीरने तिला कोपराने ढोसली...

"शाय, डोन्ट डिस्टर्ब देम. ईट्स देअर मोमेंट, लेट देम एन्जॉय इट."

एकदाच्या बॅग्ज आल्या आणि लटांबर बाहेर पडलं. बाहेर काका आणि चिन्मय उभे होतेच. साग्रसंगीत स्वागत झालं. बॅगा गाडीत गेल्या आणि गाडी निघाली. आई, बाबा काकांशी अखंड बोलत होते. समीर चूपचाप गाडीच्या खिडकीतून बाहेर बघत होता. इतकी रात्र झाली होती तरीही रस्ते कसे माणसांनी भरलेले होते. मूळात रस्त्यावर इतकी माणसं का? आणि ती माणसं नीट रस्त्याच्या कडेकडेने चालायचं सोडून अशी मधेच एकदम गाडीच्या बरोब्बर समोर का येतात? हा ड्रायव्हर अजून वेडा कसा झाला नाही? एका मागून एक प्रश्न समीरच्या मनात धुडगूस घालायला लागले.

एकदम त्याला आठवलं, इंड्या हॅज अ बिलियन पीपल. गॉश, इट मीन्स दॅट आयॅम अ‍ॅक्चुअली इन द मिडल ऑफ अ बिलियन पीपल. रिअली? एकदम त्याला वाटलं, पंचवीस तीस वर्षांपूर्वी रत्नाकर कुलकर्णी नावाचा एक हुशार विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला गेला नसता तर कदाचित आज आपण पण आज त्या रस्त्यावर चालणार्‍या लोकांमधलेच एक असतो. आपणही असेच आपल्या बापाची बाग असल्यासारखे भर रस्त्यावर बागडलो असतो. पण रत्नाकर कुलकर्णी अमेरिकेला गेला, खूप शिकला आणि यथावकाश नंदिताशी लग्न वगैरे करून तिथेच स्थायिक झाला. सॅम आणि शाय जगात प्रवेश करते झाले. रत्नाकर कामात गुरफटला आणि दोन भारतभेटींमधली गॅप वाढत गेली. पूर्ण वीस वर्षात फारतर तीन चार वेळा समीरने भारत बघितला होता. शलाकाने तर त्याहून कमी. आणि मागची ट्रिप तर खूपच जुनी. तरी बरं, मधे एकदा काका, मग मावशी, मग अजून कोणी कोणी... आणि दोन तीन वेळा आजी आजोबा, अशा नातेवाईकांच्या अमेरिकेच्या चकरा चालू होत्या.

आई, बाबा, काका यांच्या बडबडीने गाडीत नुसता गलका झाला होता. त्या सामुहिक समाधानाच्या उबेने समीर जडावत गेला आणि त्याने मस्त डोळे मिटून घेतले.

त्याला जाग आली तेव्हा गाडी पुण्यात शिरत होती. पहाट व्हायला आली होती. अजून उजाडायचे होते. रस्ते रिकामे होते. गाडी सोसायटीत शिरली. काकाचा फ्लॅट कोणता ते खालूनच कळत होते. घरातले लाईट चालूच होते. बाल्कनीत आजी आजोबा दिसले, समीर लिफ्टची वाट न बघता थेट जिन्यावरूनच पळत सुटला. मागे शलाका. घरात गोकुळच होतं. झाडून सगळे जमले होते. आजी आजोबा, अ‍ॅज एक्स्पेक्टेड, नुसते डोळ्यांनीच बोलत होते, डोळ्यांनीच हसत होते. समीर शलाकाने त्यांना मिठी मारली. गाडीतली इतर मंडळी, सामानसुमानासहित व्यवस्थित वर आले. सुरूवातीच्या गप्पाटप्पा झाल्या आणि हळू हळू दिवस सुरू झाला. पाहुणे मंडळी झोपली, घरातले इतर लोक कामाला लागले.

दुपारची जेवणं झाली आणि परत एकदा गप्पाष्टक सुरू झालं. पोरांना जवळ घेऊन आजोबा शांतपणे त्यांच्या खुर्चीत बसून सुखासमाधानाने भरल्या घराकडे बघत होते. आता महिन्याभरात साताठ वर्षांचे आयुष्य जगून कसे घेता येईल याचे प्लॅनिंग सुरू झाले होते.

"आता निवांत आराम करा बरं... काय लोळायचं ते लोळून घ्या महिनाभर, परत गेलात की आहेच परत रगाडा." आजी म्हणाली.

"कसला आराम हो आई. भेटीगाठीतच वेळ आणि जीव जाईल सगळा." नंदिताला महिनाभराचं भविष्य लख्ख दिसत होतं.

"काही नाही, मी सांगेन सगळ्यांना, ज्याला कोणाला भेटायचं त्यांनी इथे या. उगाच तुम्हाला दगदग नको आणि वेळ जातोच इकडून तिकडे जाण्यात."

"ते सगळं ठीक आहे हो, आई. पण देवदर्शनाला तर जावंच लागेल ना? तो काय येणार आहे स्वतः आपल्याकडे चालत 'घे माझं दर्शन' म्हणत?"

"व्हाय नॉट?", समीर उगाच आईला चिडवायचं म्हणून म्हणाला. अपेक्षेप्रमाणे रिअ‍ॅक्शन आलीच.

"तू गप्प बस हं समीर. तुम्हा मुलांना यातलं अजून काही कळत नाही. माहिती तर काहीच नाही. ते काही नाही. बाबा, आता महिनाभरात तुम्हीच शिकवा जरा चार गोष्टी पोरांना देवाधर्माबद्दल. आमच्यामागे घरात कमीत कमी देवापुढे दिवा तरी लागावा. बाकी सगळं स्वीकारलंच आहे मी, एवढं तरी होऊ दे." नंदिताने आजोबांना साकडं घातलं.

आजोबा गंमतीने हे सगळं बघत ऐकत होते. त्यांनी हळूच पोरांच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांना वाटलं, हिलाच काहीतरी शिकवावं. अशा गोष्टी सांगून शिकवून कळत नसतात. त्या आतूनच याव्या लागतात. समीर शलाकालाही कळेल त्यांचं त्यांनाच. आपण फक्त त्यांना योग्य काय आणि अयोग्य काय याची जाणिव देत रहायची.

पण ते बोलले मात्र काहीच नाहीत, नुसतेच मंद हसत राहिले. त्या आश्वासक मुद्रेनेच नंदिताचं समाधान झालं. तिचे पुढचे बेत भराभर ठरायला लागले. फारसे कुठे जायचे नाही, पण देवदर्शनाला मात्र गावी जाऊन यायचे नक्की झाले.

"मॉम, तिथे जायलाच पाहिजे का? आय मीन, यु गाय्ज कॅन गो... मी राहतो इथेच. मला कंटाळा येईल तिथे."

"अजिब्बात नाही. आपण सगळे जायचं. आणि हे फायनल. नो आर्ग्युमेंट्स. एकदा तिथे आलास की कसं शांत वाटेल बघ." समीरला आईसमोर कधी गप्प बसायचं हे कळत होतं. तिचा चेहरा बघून, आता काही उपयोग नाही हे त्याला कळले.

***

जायचा दिवस ठरला. तयारी झाली. सगळेच जाणार होते. मोठी गाडी बुक झाली. आईला यावेळी सगळे पेंडिंग राहिलेले सोपस्कार, कुळाचार वगैरे उरकायचे होते. तिची तयारी चालू होती आणि सगळं काही नीट होईल का या टेन्शनमधे ती बुडून गेली. तिची ही धावपळ आणि टेन्शन बघून समीरला खरंच कळत नव्हतं की जिथे शांत वाटतं म्हणून जायचं तिथे जायला एवढी अशांती का? हे म्हणजे उलटंच की.

"आजोबा, टेल मी समथिंग. आपण गेलो नाही तर तो देव रागावेल का?" समीरने त्यातल्यात्यात जिथे उत्तर मिळायची अपेक्षा होती तिथे प्रश्न टाकला. बाकी लोकांनी नुसतीच दटावणी केली असती भलतेच प्रश्न विचारतो म्हणून.

"अजिबात नाही, समीर. अरे त्याला खरंतर काहीच गरज नाही या सगळ्या सोपस्कारांची. तो जिथे कुठे आहे तिथे निवांत आहे. आपली गंमत बघून स्वतःची करमणूक करून घेत असेल." आजोबा डोळे मिचकावत बोलले.

समीरला आजोबांचे फर कौतुक, ते एवढ्यासाठीच. त्यांना रागावलेले कधी बघितले नव्हतेच. आणि काहीही विचारले तरी त्यांचे उत्तर अगदी नेमके आणि गंमतीशीर असायचे. सकाळी आंघोळ करून ते पूजेला बसले की ते ज्या तल्लिनतेने पूजा करत, ते बघायलाच समीरला आवडत होते. अगदी देवाशी गप्पा मारत मारत पूजा चालायची.

"काय पांडोबा? काय म्हणताय? काल रखुमाईने पाय चेपले की नाही? की अजून रूसवा चालूच आहे? आणि तुम्ही हो मारुतराय, जरा शांत बसत जा हो."

असं चालायचं. सकाळी सकाळी मित्र गप्पा मारत बसले आहेत असं. समीरला तर वाटायचं की ते देव पण त्यांच्याशी बोलत असावेत. पण ते फक्त आजोबांनाच ऐकू येत असावं बहुतेक. त्याने एकदा त्यांना तसं विचारलंही. आजोबा काहीच बोलले नाहीत. फक्त त्यांचं ते ठराविक मिश्किल हसू आलं चेहर्‍यावर.

"पण आजोबा, मग हे आईचं जे काही चाललं आहे ते का? मला काहीतरी राँग वाटते आहे ते."

"समीर, माणसाला निराकार देव जवळच वाटत नाही म्हणून त्याने देवाला आपल्यासारखं रूप दिलं, तो जवळचा वाटावा, सखा वाटावा म्हणून. आणि मग एकदा देवाला माणसाचं रूप दिलं की बाकीचे सोपस्कार आले. आणि हळूहळू मूळ हेतू बाजूला राहून भिती मात्र वाटायला लागली. पण जर का तो कृपाळू आहे, आपला मित्र आहे, आपल्याला सुबुद्धी देतो तर घाबरायचं कशाला? पण लोकांना कळत नाही. आणि या गोष्टी सांगूनही काही उपयोग नसतो. ज्याचं त्यालाच कळतं आणि वेळ यावी लागते. आपण स्वतःपुरतं नीट वागावं."

बहुतेक सगळं समीरच्या डोक्यावरून गेलं, पण आजोबांच्या आश्वासक आणि कधी नव्हे ते गंभीर झालेल्या चेहर्‍यामुळे त्याला खूप काहीतरी वाटलं. त्याला कळलं ते एवढंच की देव हा आपला फ्रेंड असतो. आणि त्याला घाबरून रहायची अजिबात गरज नसते. त्याच्या मनात आईबरोबर देवदर्शनाला जायचा तो काही विरोध होता तो कमी झाला आणि थोडीशी उत्सुकताही लागून राहिली.

***

गावाला जायचा दिवस उजाडला आणि भल्या पहाटे मंडळी निघाली. शहराच्या बाहेर गाडी आली आणि समीर शलाका इंड्याची कंट्रीसाईड बघत राहिले. पावसाळ्याचे दिवस असल्याने बर्‍या पैकी हिरवाई होती सगळीकडे. घाट वगैरे बघून तर पोरांनी गाड्या थांबवल्याच. आजूबाजूला उंडारून झालं आणि आईचा चेहरा हळूहळू विशिष्ट मोडमधे जायला लागला म्हणून मग परत गाडीत येऊन बसले.

दुपारी गाव आलं तो पर्यंत ड्रायव्हर सोडून बाकी सगळे घोरत डुलत होते. गाडी गावात शिरली आणि एक दोन ब्रेक कच्चकन लागल्यानंतर मंडळी उठून बसली. गावात स्वतःच घर असं नव्हतंच. आजोबांच्या आजोबांनी गाव सोडलेलं... आडनावात गावाचं नाव असलं तरी गावात लॉजमधे रहायची पाळी होती. काकांनी गाडी बरोब्बर नेहमीच्या ठरलेल्या लॉजपर्यंत नीट आणली. बुकिंगवगैरे आधीच झालं होतं. सगळे आत घुसले. खोल्यांचा ताबा घेतला आणि ताजे तवाने झाले.

सगळे कुळाचार, अभिषेक वगैरे दुसर्‍या दिवशी करायचे. त्यामुळे आजचा दिवस तसा रिकामाच. जेवण वगैरे झाल्यावर, दर्शनाला जायचा बेत ठरला. देवस्थान तसं आजूबाजूच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध. बर्‍याच लांबलांबून लोक यायचे. दर्शनाला बर्‍यापैकी गर्दी होती. रांग बरीच लांब गेली होती. समीरला खरं तर त्या रांगेत उभं रहायचं जीवावर आलं. पण उगाच आईला अजून त्रास नको म्हणून तो निमूटपणे रांगेत उभा राहिला.

"आजोबा, ते टेंपलच्या वर पॉइंटेड असं स्ट्रक्चर आहे ना..."

"त्याला कळस म्हणतात बरं का..."

"हां हां तेच आजोबा, त्याच्यावरची डिझाईन्स किती छान आहेत. आणि कलर पण एकदम ब्राईट आहे. आय लाइक्ड दॅट."

"अरे जेव्हा इथे यात्रा असते ना तेव्हा दर्शनाची रांग इतकी मोठी असते की बर्‍याच लोकांना वेळ नसल्याने दर्शन मिळतच नाही. मग ते लांबूनच कळसाला नमस्कार करतात आणि परत जातात."

"का? कळसाला नमस्कार का? नमस्कार तर देवाला करतात ना?"

"समीर, नमस्कार हा खरा मनापासून असेल ना तर करायची पण गरज नसते. तो आपोआप घडतो. मुद्दाम करावा लागत नाही. ती एक भावना आहे. आपण हात जोडून त्याला मूर्त रूप देतो. पण मूर्त रूप देण्यामुळेच तो पूर्ण होतो असे नाही. ज्या क्षणी तो करायची इच्छा मनात होते त्याच क्षणी तो पोचलेला असतो. पण देवाचं दर्शन नाही तर नाही, त्याचं प्रतिक म्हणून कळसाला नमस्कार करायची पद्धत आहे आपल्याकडे. आणि देव काय फक्त देवळात असतो का? कोणतंही सत्कृत्य करताना ते देवत्व आपल्यातच असतं. फक्त त्याचं अस्तित्व सतत जाणवावं म्हणून हा सगळ खटाटोप, कर्मकांडं वगैरे."

समीर ऐकत होता. हा असा अजिबात फॉर्मॅलिटी नसलेला देव त्याला आवडत होता. आईसारखं घाबरून वगैरे नमस्कार करण्यापेक्षा हे बरं. त्याने एक ठरवलं, आत जाऊन देवासमोर उभं रहायचं आणि त्यावेळी वाटलं तरच नमस्कार करायचा. कोणालाही जुमानायचं नाही. आईलासुद्धा.

बराच वेळ झाला, रांग हळूहळू पुढे सरकत होती. समीरला मनापासून कंटाळा आला होता. प्रवास आणि इतका वेळ उभं राहिल्याने त्याचे पाय सॉलिड दुखायला लागले होते. कधी या पायावर तर कधी त्या पायावर भार देत तो उभा होता. पण एका क्षणी त्याचा पेशंस संपला आणि तो सरळ रांगेच्या बाहेर पडला.

"अरे काय झालं? आणि कुठे चाललास? जास्त लांब जाऊ नकोस. पटकन ये परत." नंदिता म्हणाली.

"आयॅम बोअर्ड, मॉम. मी जाऊन गाडीत बसतो. यु गाय्ज गो अहेड अँड फिनिश धिस बिझिनेस."

"आणि दर्शन रे?"

"बघू. त्यालाही वाटत असेल तर भेटेल तो मला. काय आजोबा?" ... परत आजोबांचं तेच गंमतीशीर हसू. समीरचा हुरूप वाढला. तो निघालाच.

मागनं आई ओरडत राहिली, पण आजोबांनी जे सांगितलेलं होतं त्याचा विचार करत समीर सरळ तिथून निघून आला. तंद्रीतच तो गाडीजवळ आला. तेवढ्यात त्याला जाणवलं की कोणीतरी त्याला काहीतरी सांगत आहे. त्याने त्या दिशेने नजर फिरवली आणि एकदम दचकलाच तो.

भारतात येऊन आठ दहा दिवस झाले असले तरी त्याचे डोळे, मन अजून इतक्या दैन्याला सरावले नव्हते. गाडीच्या मागच्या बाजूला एका कोपर्‍यात एक म्हातारा बसला होता. अगदी थकलेला, गलित गात्र झालेला. अंगावरचे कपडेही अगदीच साधे, साधे कसले फाटकेच. बाजूला एक म्हातारी. ती पण तशीच. दोघांची नजर अधू. जवळ काठी. त्या काठीला लावलेली भगवी पताका.

"पोरा, कालधरनं चालतोया आम्ही दोगं. आज पोचलो हितं. दर्सन काय हुईना रं... पोटात भुकेचा डोंब उठलाय बग. येवडा येळ लागंल आसं वाटलं न्हवतं... बरूबर काय बी नाय बग खायला. आता दम धरवत नाही म्हणून भीक मागतुया. म्हातारपण वाईट बघ... आमाला भिकारी समजून हाटेलवाला पण काही दीना रं... पोरा, काही तरी दे बाबा पोटाला."

समीरला काहीच कळलं नाही. गावाकडची भाषा त्याला कळलीच नाही. पण त्या म्हातार्‍याच्या नजरेतले भाव त्याला व्याकुळ करून गेले. म्हातार्‍याने पोटावरून हात फिरवलेला त्याला कळला आणि त्याला अंदाज आला की हा खायला मागतो आहे. तो पटकन गाडीत शिरला. आजीने मागच्या बाजूला फराळाचा डबा ठेवलेला होता तो त्याला दिसला. त्याने आख्खा डबा त्या म्हातारा म्हातारीच्या समोर ठेवला. दोघांनी अगदी थोडं खाल्लं आणि ढेकर दिली.

"आजोबा, अजून खा ना. आम्ही खूप स्नॅक्स आणले आहेत बरोबर."

"लेकरा, आजोबा म्हन्लास, बरं वाटलं. हाटेलवाला भिकारी म्हन्ला आन तू आजोबा म्हन्तूस. चांगल्या घरचा दिसतूस. द्येव तुजं भलं करंल रं बाबा. म्हातारा म्हातारी किती खानार आमी? बास झालं. प्वॉट भरलं आन मन बी."

दोघं उठले, समीरने हात दिला. तिथून जायच्या आधी म्हातारीने समीरच्या केसांमधून हात फिरवला. स्पर्शाची भाषा समीरला समजावून सांगावी लागली नाही. आतून अर्थ आला. नकळत समीर वाकला आणि त्याने दोघांना नमस्कार केला. म्हातारा म्हातारी चालू पडली... समीर काही तरी वेगळ्याच तृप्तीच्या तंद्रीत हरवला... तेवढ्यात त्याचं लक्ष एकदम देवळाच्या कळसाकडे गेलं... त्याचा एक हात आपोआप उंचावला. तंद्रीतच तो म्हणाला,

"अ‍ॅट लास्ट वी मेट, डूड, अ‍ॅट लास्ट..."

हे सगळं लांबून बघत असलेल्या आजोबांच्या चेहर्‍यावर मात्र गंमतीशीर हसू नव्हतं... त्यांनी हळूच तोंड दुसरीकडे करून पटकन डोळे टिपले. आणि मग परत तेच गंमतीशीर प्रसन्न हसू त्यांच्या चेहर्‍यावर परत आलं.