माझं खोबार... भाग ३

on शनिवार, नोव्हेंबर ०८, २००८

माझं खोबार... भाग १ , ... भाग २

७.३० वाजले, ७.४५ वाजले, ८ वाजले तरी काही काउंटर उघडेना आणि कसली घोषणा पण होईना. एयरलाईन्सचे कर्मचारी पण कुठे दिसत नव्हते. माझ्या मनात खरं सांगायचं तर एकच भावना होती ..... प्रच्चंड कंटाळा. काय व्हायचं ते होऊन जाऊ दे पण सोडवा बाबा या धावपळीतून. आम्ही ताटकळून बसलो होतो. आणि तेवढ्यात अनाउन्समेंट झाली,

*************

"सौदी अरेबियन एयरलाईन्स च्या SVxxx ने दम्माम ला जाणार्‍या प्रवाशांनी लक्ष द्या. काही तांत्रिक बिघाडामुळे, दम्मामवरुन आलेले विमान उड्डाण करू शकत नाहिये. विमान दुपारी १२.३० ला उड्डाण करेल. चेक-इन काउंटर्स ९.३० वाजता उघडतील. प्रवाश्यांना होणार्‍या त्रासाबद्दल आम्ही क्षमा मागतो."

घ्या. आत्ताशी कुठे ८ वाजले आहेत सकाळचे. अजून कमीत कमी ४.३० तास? आणि ती बया तर क्षमा वगैरे मागून (आम्ही क्षमा केली आहे की नाही याची फिकिर न करता) निघून गेली. आणि आता पकडायचं तरी कुणाला? तसेच बसलो वाट बघत. तेवढ्यात मी आणि पत्नी, एक लांब चक्कर मारून आलो. जास्त काही बोलायच्या स्थितीत नव्हतो तरी तेवढेच बरे वाटेल (तिला) हा उद्देश. परत आलो तरी ९ च वाजले होते. वाट बघत होतो पण अजूनही पुढची घोषणा काही होत नव्हती. शेवटी १० वाजता घोषणा झाली की विमानाची दुरूस्ती चालूच आहे आणि विमान अजून थोड्या उशिराने निघेल. आणि ११ वाजता घोषणा झाली की विमान काही दुरूस्त होत नाहिये, दम्मामहून दुसरे विमान मागवले आहे आणि विमान दुपारी ४.३० ला सुटेल. पण एकच चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी चेक-इन काउंटर चालू केला. मी सामान चेक-इन केलं. घर जवळच असल्याने सरळ निर्णय घेतला, घरी परत जायचं, दुपारी ३.३० पर्यंत विमानतळावर परत यायचं. त्या प्रमाणे आमची वरात निघाली परत. एका वेगळ्याच वातावरणात सकाळी घर सोडलं होतं, कधी परत येऊ त्याची निश्चिती नव्हती. तेच घर ५ तासात परत दिसणार याची कल्पनाच नव्हती. :) जसे आम्ही घरी आलो परत तसे सगळे शेजार पाजारचे बघत होते. मला पण एकदम काहितरी विचित्र वाटत होतं. घरी येऊन आराम करायचा विचार होता पण इतका दमलो होतो की झोपही येत नव्हती. सकाळच्या अनुभवामुळे ३ वाजता सौदियाच्या विमानतळ कार्यालयात खात्री करण्यासाठी फोन केला. फोन केला ते बरंच झालं. त्यानी सांगितलं की विमान संध्याकाळी ७.३० वाजता सुटेल. आता मात्र मी पूर्ण वैतागलो, पण करतो काय. शेवटी एकदाचे ६.३० वाजता पोचलो. या वेळी मात्र सगळे सुरळीत पार पडले. आत्ता पर्यंत इतकं काही झालं होतं सकाळपासून की मी 'प्रथमग्रासे मक्षिकापातः' या विचाराने बर्‍यापैकी धास्तावलो होतो. पण अजून एक धक्का बाकी होता.

झालं असं होतं की, विमान एवढं लांबलं होतं म्हणून सौदियाने काही प्रवाश्यांना रियाधच्या दुपारच्या विमानात बसवून दिलं होतं. आणि आमचं विमान जवळजवळ मोकळंच होतं. मी बोर्डिंग पास हातात घेऊन उभा होतो तसा एक सौदिया कर्मचारी आला आणि म्हणाला की 'तुम्हाला अपग्रेड हवे आहे का?' मला काहिच कळेना, तेवढ्यात तो म्हणाला, 'तुम्हाला फर्स्टक्लास मधून जायला आवडेल का?'.... मी गार. नेकी और पूछ पूछ? कोणाला नाही आवडणार हो? मी होकार दिला. फर्स्टक्लास बर्‍यापैकी रिकामा असल्यामुळे, त्यांनी काही एकट्या प्रवाशांना असे अपग्रेड केले होते. ७ वाजता मी त्या बोगद्यातून सौदियाच्या त्या मोठ्ठ्या बोईंग-७४७ मधे प्रवेश केला. जीना चढून ऐटीत वरच्या मजल्यावर फर्स्टक्लास मधे गेलो.त्या फाइव्हस्टार वातावरणात एक हवाईसुंदरी आणि एक हवाईसुंदर्‍या (पर्सरला काय प्रतिशब्द आहे हो मराठीत?) उभे होते. त्यांनी दात दाखवून स्वागत केले, 'अहलान मरहबा' .... 'या, आपलं स्वागत आहे'. अजून ४-५ लोक आले. थोड्या वेळाने ती ताई एक सुंदर सुरई आणि छोटे छोटे कप घेऊन आली. ते इतके छोटे कप बघून मला वाटलं "ही काय आता इथे भातुकली मांडते की काय?" पण नाही, सुटलो, तिने एक छोटा कप नाजूकपणे माझ्या समोर ठेवला आणि त्या सुरईमधून त्या कपात एक गरम वाफाळणारं काहितरी ओतलं आणि परत एकदा दात दाखवून निघून पण गेली. मी हळूच त्या कपात डोकावून बघितलं तर त्यात हलक्या गढूळ रंगाचं पाणी होतं. कपभर पाण्यात ४-५ चिमट्या माती घातली तर कसा रंग येईल, अगदी तस्सा. मला पटकन कळेना की हे आता प्यायचं की अजून काही येतंय त्यात घालायला. एवढ्या गढूळ पाण्यात फिरवायला तुरटी नको? बरं विचारणार तरी कसं? शेवटी हळूच आजूबाजूला बघितलं. एक अरब नवरा बायको होते पुढच्या रांगेत. त्या गाउनवाल्याने (सगळेच सौदी पुरूष हे पांढरे पायघोळ झगे घालतात आणि डोक्यावर ती काळी रिंग... एक लोकप्रिय जोकः त्यांच्या डोक्यात फारसं काही नसतं म्हणून ती रिंग ते घट्ट दाबून बसवतात, म्हणजे आत जे काही आहे ते कापरासारखं उडून जाऊ नये :) ), तर त्या माणसाने ते पाणी गटकन् पिऊन टाकले. मग मी पण त्या तुरटीचा नाद सोडला आणि लावला कप तोंडाला.

काय आश्चर्य... त्या पाण्याची चव थोडी तुरट, पण खूपशी ओळखीची होती पण नक्की काय आहे ते कळत नव्हतं. त्यातला केशर - वेलदोड्याचा स्वाद मात्र लगेच ओळखू येत होता. पण माल कडक होता. थोडा वेळ का होईना तरतरी आली. पुढे कळले की ते पेय म्हणजे 'काहवा'. कॉफी बियांपासून बनवतात. थोड्या वेळाने त्या ताईचा साथीदार एका सुंदर नाजूक काचेच्या बशीत छान रसरशीत खजूर घेऊन आला. हे तर आपल्या ओळखीचं होतं. पूर्ण लक्ष मी तिकडे वळवलं. अरब, उंट आणि खजूराची झाडं हे समीकरण आपल्या डोक्यात एकदम फिट्टं असतं. त्या पैकी अरब भेटला (तो पुढच्या रांगेतला), खजूर मिळाले आता उंट कधी दिसतात त्याची उत्सुकता लागली होती.त्या खजूरांच्या नादात विमान कधी रिव्हर्स मधे मागे आलं, हळूहळू धावपट्टीवर गेलं ते कळलंच नाही. धावपट्टीवर मात्र त्या विमानाने वेग घेतला आणि भानावर आलो. खिडकीतून बाहेर बघितलं, त्या विमानाचे प्रचंड पंख खेळण्यातल्यासारखे पण एका मंद लयीत वर खाली होत होते आणि एका क्षणात विमानाने आकाशात झेप घेतली. ज्या मुंबईत आत्तापर्यंतचे आयुष्य घालवले ती मुंबई हळूहळू लहान होत गेली. मुंबईची चमक दमक एका मोठ्या अंधार्‍या खाईने गिळून टाकली, उरला फक्त अंधार आणि खाली समुद्रात लुकलुकणारे बोटींचे अंधुक होत जाणारे दिवे... मला एकदम जाणीव झाली... आता मी एकटा. मोठा झालो, लग्न झालं तरी मी कायम आप्त-मित्रांच्या मधे होतो. गरज लागली तर पटकन धावून येणारे भाऊ होते, आधाराला आई-वडिल आणि इतर लोक होते, मित्र होते. एका क्षणात हे सगळं नाहीसं झालं, उरलो मी एकटा. मग विचार आला की, काय होईल? नविन ठिकाणी परत उभे राहू, तिथे गोतावळा जमवू. एक उमेद होती मनात. मला जाणवत होतं, आज पर्यंत नुसताच वयाने मोठा झालो, त्या ३ तासाच्या प्रवासात मात्र मी 'मी' म्हणून मोठा होत होतो. मनात विचारांचा नुसता गुंता झाला होता, विमान खोबारच्या, माझ्या खोबारच्या दिशेने उडत होतं, मी मात्र इतका थकलो होतो की परत सणसणून ताप चढला. गोळी घेतली आणि डोळे बंद केले.

*************

पुढच्या दोन-अडिच तासात काय चाललंय काही कळत नव्हतं, जेवण बहुतेक मी नाहीच घेतलं. थेट पुढची आठवण म्हणजे त्या खजूर देणार्‍या साहेबांनी मला हलवून जागं केलं आणि (परत) दात दाखवत म्हणाला, "वी हॅव अराइव्ड सर... आपण पोचलो आहोत." विमान कधी उतरलं काही कळलं नाही. थोडं चुकल्या सारखं झालं. एखादं शहर आकाशातून बघायला छान वाटतं. आणि विमान उडताना पेक्षा विमान उतरताना तो नजारा जरा जास्त वेळ बघायला मिळतो. कोई बात नही. फिर कभी. अभी तो आना जाना लगा रहेगा.

आमच्या खोबारचा विमानतळ त्या वेळी खूपच लहान होता. खोबारला लागूनच 'धाहरान' नावाचं एक गाव आहे. तिथे सौदी हवाईदलाचा एक भला मोठा तळ आहे. तोच तळ नागरी हवाई वाहतुकीसाठी पण वापरला जात असे. (आपल्या कडे पुण्याला पण सध्या अशीच व्यवस्था आहे.) विमानाच्या बाहेर आलो. शिडी वरून खाली उतरलो. सगळ्यात पहिलं काय जाणवलं असेल तर अतिशय बोचरी आणि कडक थंडी. मला सांगण्यात आले होते की थंडी असेल चांगली, गरम कपडे वगैरे घेऊन ये. पण इतकी थंडी असेल असं नव्हतं वाटलं. वाळवंटाची ही एक खासियत आहे. तिथे दोनच ऋतू. उन्हाळा आणि हिवाळा. आणि दोन्ही महाभयंकर.


धाहरान आंतरराष्ट्रिय विमानतळ

कुडकुडतच बस मधे चढलो. बरीच वळणं घेत घेत ती बस टर्मिनलच्या दारापाशी आली. लष्करी तळ असल्याने खूपच कडक सुरक्षा होती. आता कुठे खरं सौदी अरेबिया दिसायला लागलं होतं. इमारती मधे शिरून इमिग्रेशनच्या हॉल पाशी आलो. तिथे प्रचंड मोठ्या रांगा लागल्या होत्या. जवळजवळ वीसेक मिनिटांनी माझा नंबर आला. काउंटर वर एक दाढीवाला बुवाजी बसला होता. (गाउन आणि रिंग सकट). मी पासपोर्ट दिला त्याच्या हातात. त्याने उलटसुलट करून बघत असतानाच एकदम मला विचारलं, "हिंदी?" मला वाटलं की तो मला भाषेबद्दल विचारतो आहे की तुला हिंदी येते का? मी पण त्याला ऐटीत म्हणलं, 'ऑफ कोर्स'. (पुढे मला कळलं की अरबी भाषेत 'हिंद' म्हणजे 'भारत / इंडिया' आणि हिंदी म्हणजे आपण भारतिय. नशीब दोन्हीही अर्थाने माझे उत्तर बरोबर होते, नाही तर काही उलट अर्थ झाला असता तर? पण अज्ञानात सुख आणि हिंमत दोन्ही असतात. तो ठप्पा उठवून मी पुढच्या पडावाकडे निघालो.

आता कस्टम्स हॉल मधे जायचं. सगळीकडे अरबी आणि इंग्लिश मधे पाट्या होत्या. पण लोंढ्याबरोबर ढकलले जाण्याची मुंबईतली सवय इथे कामाला आली. पाट्या बघायचं कामच नाही. सगळेच प्रवासी एका दिशेने जात होते. मीही निघालो. तो कस्टम्सचा हॉल म्हणजे एक भलं मोठं मंगल कार्यालय वाटत होतं. भयानक गर्दी, त्या बरोबर येणारा तो प्रचंड गोंगाट. केवळ अरबी लोकांचा येतो तसला सुवास. कधी तिथून बाहेर पडतोय असं झालं होतं

जसं माझं सौदीला जायचं नक्की झालं तसं सामान काय न्यायचं, काय न्यायचं नाही या बाबत बर्‍याच लोकांनी माझं प्रबोधन केलं. थोडीफार चौकशी केल्यावर असं लक्षात आलं की अजिबात न्यायचे नाहीत असे दोनच प्रकार. एक, कुठल्याही प्रकारचं धार्मिक साहित्य (फोटो, मूर्ती, पुस्तकं, काही पण) आणि दुसरं कुठल्याही प्रकारची पिठं (अंमली पदार्थांच्या भितीमुळे). पुढे माझ्या एका मित्राची बायको तिथे येताना कसलं तरी पीठ घेऊन आली होती तर तिला २-३ तास बसवून ठेवलं आणि दर १५ मिनिटांनी ते पीठ तिला थोडं थोडं खायला घालत होते आणि तिच्या वर काय परिणाम होतोय ते बघत होते. ;) तर मूळ मुद्दा असा की मी सगळं नीट विचार करूनच आणलं होतं सामान. त्या मुळे नि:शंक होतो. पण २-३ मराठी पुस्तकं होती माझ्या कडे. एका रांगेत निमूटपणे उभा राहिलो. आजूबाजूला बहुतेक चेहरे भारतिय / पाकिस्तानी दिसत होते. एक ते अरबी भाषेतल्या पाट्या सोडल्या तर परदेशात आल्याचं काहीच फिलींग येत नव्हतं. आणि त्या विमानतळा पेक्षा आमच्या कुर्डूवाडीचा यश्टीटँड बरा म्हणायची पाळी होती. रांग भलति म्हणजे भलतिच हळू हळू पुढे सरकत होती, पुढे काउंटरवर प्रत्येक सामानाची कसून चौकशी होत होती. आजूबाजूच्या काही अनुभवी लोकांच्या बोलण्यावरून कारण लक्षात आले. आमच्या विमानाच्या थोडे पुढे मागेच पाकिस्तान इंटरनॅशनल एयरलाईन्सचे विमान पण आले होते. पाकिस्तानी लोकांची सौदी मधे जरा विशेषच तपासणी होते म्हणे. कारण तेच आपले नेहमीचे सुप्रसिद्ध... अंमली पदार्थांची तस्करी. या बाबतीत काही लोक भलतेच तरबेज असतात. असो.

माझा नंबर आला एकदाचा. माझी ती महाकाय बॅग चढवली त्या टेबलावर. पुढे जे काही घडले त्याला मी अजिबात तयार नव्हतो. तो कष्टम साहेब एवढे कष्ट देईल असे वाटलेच नव्हते. त्याने माझी बॅग अक्षरशः चेव आल्या सारखी उघडली आणि उपसली. उपसली म्हणजे दोन्ही हात बाजूने आत घुसवून सगळं सामान लहान मुलांच्या बोरन्हाणात बोरं, गोळ्या, चॉकलेटं उधळतात तसं उधळलं. माझा संताप अनावर झाला. मी काही बोलणार तेवढ्यात कोणीतरी हळूच माझा हात दाबला. मी वळून बघतो तर एक पोर्टर माझ्या बाजूला उभा होता. मला हळूच म्हणाला "उ जो करता है करने दो... आप चूप रहो. हाम सांभाल लेगा". त्याच्या बोलण्या वरून तो बंगाली वाटत होता. आणि त्या अनोळखी वातावरणात मला तो एकदम आधार वाटला. बांग्लादेशी होता तो. माझ्या सामानाची यथेच्छ उडवाउडव केल्या वर त्याला ती २-३ पुस्तकं दिसली. अतिशय आनंदी मुद्रेने माझ्या कडे बघत ती पुस्तकं त्याने हवेत नाचवली आणि अरबी भाषेत काहितरी विचारलं. पोर्टरसाहेब हरहुन्नरी होते. ते लगेच दुभाष्याच्या भूमिकेत शिरले. मला म्हणाले, "उ पूचता है की ये क्या है? ये किताब मे क्या लिखा है? तुम्हारा मजहब का कुछ है?" मी म्हणलं, "ये तो कहानी का किताब है." लगेच भाषांतर झाले. पण तेवढ्याने काही त्या साहेबाचे समाधान झाले नाही. त्याने माझा पासपोर्ट काढून घेतला आणि त्या पुस्तकांबरोबर त्याच्या टेबलाच्या एका खणात ठेवून दिला. आणि मला तिथनं फुटायचा इशारा केला. काही बोलणं नाही, सांगणं नाही, नुस्तं जा. माझं डोकं फुटायची वेळ आली. पण पोर्टर साहेबांवर पूर्ण निष्ठा ठेवून मी कशी बशी ती बॅग आणि सामान उचललं आणि एका कोपर्‍यात जाऊन ते सगळं नीट लावायला गेलो. (त्या शिवाय ती बॅग बंदच झाली नसती. ;) ) तिथे माझ्या सारखे बरेच कमनशिबी लोक त्याच कार्यात गुंतले होते. मी पण गतानुगतिक होऊन तिथे शांतपणे जमिनीवर फतकल मारली आणि बॅग नीट लावली. मला तिथे सोडून तो पोर्टर आत्ता येतो म्हणून गायब झाला होता. अर्धा तास होऊन गेला तरी त्याचा काही पत्ता नाही. खरं सांगतो आयुष्यात एवढं असहाय्य कधीच वाटलं नव्हतं. माझं शिक्षण, माझा अनुभव त्या क्षणी सगळं झूट होतं. तो पोर्टर माझा देव / मालक काय म्हणाल ते झाला होता.

तेवढ्यात मी एक भारी दृष्य बघितलं. एक भलीमोठी पाकिस्तानी फॅमिली (२-३ पुरूष, ४-५ बायका आणि २-३ लहान पोरं, एका बाईच्या हातात एक तान्हं मूल) पोलिसांच्या कडक पहार्‍यात घेऊन चालले होते. माझं टेन्शन अजूनच वाढलं. (या घटनेची पूर्ण माहिती मला दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रात वाचायला मिळाली. पण, ते नंतर)

बर्‍याच वेळाने स्वारी आली आणि मला खूण करून त्याच्या मागे यायला सांगितले. मी निघालो. त्याने एका ऑफिस सारख्या खोली समोर मला आणले आणि आत जायची खूण केली. मी घुसलो. तर आत मधे भली मोठ्ठी दाढी असलेला एक गाउन बसला होता पण डोक्याला रिंग नव्हती. त्याच्या टेबलावर मला माझी पुस्तकं आणि पासपोर्ट दिसला. मला अंदाज आला की आता इथे पण चौकशी होणार तर. पोर्टर महाराज हळूच शिरलेच होते आत. त्या दाढीधार्‍याने मला चक्क इंग्लिश मधे विचारलं, "हे काय आहे?" मी म्हणलं, "नॉव्हेल".

पुढचा प्रश्न, "मुस्लिम?"
मी "नो"
"ख्रिश्चन"
"नो"
"देन?" त्याच्या लेखी धर्म संपले होते. (ज्यूंना व्हिसाच देत नाहीत त्या मुळे तो ऑप्शन बाद होता).
"हिंदू"

त्याने अतिव करूणेने / तिरस्काराने माझ्या कडे बघितले आणि ती पुस्तकं चाळून बघितली. परत प्रश्न,

"लँग्वेज?"
"मराठी"

त्याने हे नाव कधीच ऐकले नसावे, त्याला मल्याळम माहिती असणार पण नक्की.... खूप लांब आंबट चेहरा करत माझा सगळा माल मला परत केला आणि जायची आज्ञा केली. मी पण एक सुटकेचा नि:श्वास टाकत तिथून सटकलो. पोर्टर साहेबांनी त्यांच्या मैत्रीची वाजवी किंमत वसूल केली आणि मी मुख्य दरवाज्याच्या दिशेला सरकलो. मला घ्यायला माझे दोन सहकारी येणार होते. सगळं नीट ठरलं होतं. त्यांनी कधी मला बघितलं नव्हतं पण ते हातात पाटी घेऊन उभे राहणार म्हणाले होते. त्यामुळे ती काही चिंता नव्हती. ते प्रवासाचे दिव्य पार पडले होते. आता सरळ गाडीत बसायचं आणि तडक मुक्कामी जाऊन आडवं व्हायचं. त्या मुख्या दरवाज्याची सरकती दारं उघडली आणि...

क्रमशः