माझं खोबार... भाग २

on शुक्रवार, नोव्हेंबर ०७, २००८

माझं खोबार... भाग १

अजून इतर काही गप्पा होऊन, मी तिथून परत निघालो. मात्र परत निघायच्या आधी मी काही गोष्टी स्पष्ट केल्या. त्यात मुख्य म्हणजे की मी कुठेही जायला तयार आहे पण माझी बायको माझ्या बरोबर असेल आणि कंपनीने ती सगळी जबाबदारी घेतली पाहिजे.

मी थोडा खुशीतच घरी आलो. घरी येऊन ही बातमी सांगितली. कुणाच्या ध्यानी मनी पण नव्हतं की असं काही होईल. घरात एकदम शांतता पसरली. त्यात परत मी जेव्हा 'सौदी अरेबिया' हा शब्द उच्चारला तेव्हा तर वातावरण अजूनच नाजूक झालं. आपल्या मनात सौदी अरेबिया म्हणलं की एक वेगळंच चित्र असतं. विशेषतः आई-वडिल जरा काळजी करत होते. पण त्यांनी पण अगदी दिलखुलास पणे तुझ्या करिअरच्या आड आम्ही येणार नाही असे सांगून मला हलकं केलं. पत्नीने पण पूर्ण पाठिंबा दिला. चला, एक किल्ला सर झाला. पण जसजशी ही बातमी माझ्या इतर नातेवाईकांत पसरली तसतसे मला अथ पासून इति पर्यंत काहिही सल्ले यायला लागले. त्यातली काही मतं तर पूर्णपणे अतर्क्य अशी होती. मग मी ठरवलं, आता आपण जायचंच जायचं, पण जितकी जमेल तितकी माहिती गोळा करू सौदी अरेबिया बद्दल. त्या वेळी आंतरजाल आजच्या इतकं सहज उपलब्ध नव्हतं. एका मित्राच्या घरी सोय होती. तिथे जाऊन काही माहिती काढायचा प्रयत्न केला.



तसं बघितलं तर सौदी अरेबिया हा सगळ्यात मोठा आखाती देश. पण जवळजवळ १०० वर्षांपूर्वी पर्यंत हा देश अस्तित्वातच नव्हता. संपूर्ण अरबस्तान हे छोट्या छोट्या टोळ्या, त्यांच्या अधिपत्याखालील प्रदेश, ओटोमान साम्राज्याच्या प्रभावाखालचे प्रदेश असं विभागलं गेलं होतं. आपल्या महाराष्ट्राचे जसे कोकण, देश, खानदेश, मराठवाडा, विदर्भ असे विभाग आहेत तसे, अरबस्तानाचे पण नज्द, जिझान, हेजाझ (मक्का आणि मदिना या भागात आहेत), नजरान, तबुक, अल्-हासा / कतिफ असे पूर्वापार चालत आलेले भाग आहेत. हे सगळे भाग वेगवेगळ्या राजांच्या अंमलाखाली होते. त्यांच्या आपापसात मारामार्‍या / लढाया चालत. हा सगळा गोंधळ अव्याहत पणे शतकानुशतकं चालत आला होता. अश्या अनागोंदीच्या वातावरणात दोन सामाजिक शक्तींचा उदय झाला. एक होती धार्मिक तर दुसरी होती राजकिय.

धार्मिक शक्ती.

इस्लामच्या ४ पारंपारिक विचारधारा आहेत. जशी आपल्या कडे सांख्य वगैरे वेगवेगळी तत्वज्ञान आहेत तशी. त्या आहेत, हनबाली, हनाफी, मलिकी, शाफी. इ.स. १७०३ मधे हनबाली परंपरेच्या एका इमामाच्या घरी मुहम्मद इब्ने (इबने) अब्द्'अल वहाब अत्-तमिमी चा (तमिमी टोळीतल्या अब्द्'अल्-वहाब चा मुलगा मुहम्मद) जन्म झाला. अगदी लहान वयातच त्याने धार्मिक शिक्षण घेतले आणि इतर शहरातल्या विद्वानांना भेटून त्यांच्या कडून ज्ञान मिळवले. इ.स. १७४० मधे तो परत आपल्या गावी आला. त्याच्या फिरस्ती मधे त्याला अश्या बर्‍याच गोष्टी आढळल्या ज्या मुळे लोक इस्लाम च्या मूळ शिकवणी पासून ढळले होते. त्याने इस्लामचा अतिशुध्द (त्याच्या मते) असा एक प्रकार आचरायला सुरुवात केली. हळूहळू त्याला बरीच लोकप्रियता मिळत गेली. त्याच्या शिकवणूकीप्रमाणे 'अल्ला' ची बरोबरी कोणीच करु शकत नाही. स्वतः पैगंबर मुहम्मद सुध्दा एक सामान्य माणूसच होते. कुराण मानवापर्यंत पोचवायला अल्ला ने त्यांची निवड केली इतकेच. थडगी किंवा दर्गे इ. ठिकाणी प्रार्थना करणे हे पाप आहे. किंबहुना ती नष्ट केली पाहिजेत. व्याभिचाराला एकच शिक्षा, दगडांनी ठेचून मारणे. खुनाबद्दल एकच शिक्षा, मुंडकं उडवणे. इ.इ. (मंडळी काही ओळखीचं वाटतंय का? बरोबर, ही वहाबी (जिला सलाफी असेही म्हणतात) विचारसरणी म्हणजेच आजचे तालिबान. तालिबान हे पूर्णपणे वहाबीस्ट आहेत.) तो लोकप्रिय होत गेला तसतसे स्थानिक सत्ताकेंद्रं डळमळीत व्हायला लागली (आपल्या इंद्राच्या सिंहासनासारखं हो). त्याच्या विरुध्द कारस्थानं झाली, हल्ले झाले. त्याला पळूनही जावं लागलं. आणि तिथेच त्याला भेटला मुहम्मद इब्ने सा'उद (सौद हा सोपा उच्चार झाला).

राजकिय शक्ती

मुहम्मद इब्ने सा'उद (सा'उद चा मुलगा मुहम्मद) हा एक स्थानिक शेख (मुखिया / पाटिल) होता. मुहम्मद इब्ने अब्द्'अल वहाब त्याच्या आश्रयाला गेला. दोघांची मैत्री जुळली. इब्ने सा'उद हा इब्ने अब्द्'अल्-वहाब च्या विचारांनी प्रभावित झाला आणि त्या दोघांनी शपथ घेतली की पूर्ण अरबस्तान हा शुध्द इस्लामच्या प्रभावाखाली आणायचा. राज्य इब्ने सा'उद आणि त्याचे वारस करतिल (हेच ते सा'उदी राजघराणं). धर्माचा गाडा इब्ने अब्द्'अल्-वहाबच्या विचारांप्रमाणे चालेल. इब्ने सा'उदच्या मुलाशी इब्ने अब्द्'अल्-वहाबच्या मुलीचे लग्न लावून दिले गेले. अरबस्तानाच्या पवित्र भूमी वर मुस्लिमेतर शक्ती कधीही प्रबळ होता कामा नयेत अशी शपथ घेतली गेली. (हीच घटना नेमकी बिन लादेन च्या उदयाला कारणीभूत ठरली. अमेरिकेने इराक विरुध्द सैन्य सौदी अरेबियात पाठवले तेव्हा बिन लादेन बिथरला आणि बंड करुन उठला. त्या मागे हीच प्रेरणा होती.)



तर या दोन माणसांनी मिळून हळू हळू हातपाय पसरायला सुरुवात केली. हा प्रकार पिढ्यानपिढ्या म्हणजे १८१८ पर्यंत चालला. १८१८ मधे तुर्की सुलतानाला या प्रकाराची भिती वाटायला लागली आणि त्याने सैन्य पाठवून परत स्वतःचे राज्य मजबूत केले. थोडी वर्षं गेली आणि परत सा'उदी घराणं परत वरचढ झालं. इ.स. १८९१ मधे अल्-राशिद नावाच्या एका प्रतिस्पर्धी शेखने सा'उदी घराण्यावर हल्ल करुन त्यांना पळवून लावले. त्या वेळी सा'उदी घराण्याच्या मुख्याचा १४ वर्षांचा मुलगा अब्दुल अझिझ हा पण पळाला. या कुटुंबाने आश्रय घेतला कुवेत मधे. (या उपकाराची परतफेड सौदी कुटुंबाने जेव्हा सद्दाम ने कुवेत गिळंकृत केलं तेव्हा कुवेती राजघराण्याला आश्रय देऊन केली. कुवेतचा 'अमिर' आणि त्याचं कुटुंब रियाध मधे सुखात नांदत होतं.) इ.स. १९०२ मधे याच अब्दुल अझिझ ने अल्-राशिद चा निर्णायक पराभव करुन स्वतःचे राज्य स्थापित केले, नाव दिले 'सौदी अरेबिया'. स्वतःला 'मलिक' म्हणजे राजा घोषित केले. परत आपल्याला पळावे लागू नये म्हणून त्याने हळू हळू अरबस्तानातले इतर भूभाग जिंकून घ्यायला सुरुवात केली. त्या करता साम-दाम-दंड-भेद सगळे उपाय वापरले. त्याची २२ अधिकृत लग्नं झाली (एका वेळेला ३ किंवा ४ च बायका असायच्या). त्याचं सगळ्यात पहिलं अपत्य इ.स. १९०० साली तर सगळ्यात धाकटं अपत्य इ.स. १९५२ मधे जन्मलं. त्याच्या ६व्या आणि सगळ्यात आवडत्या पत्नीला २१ मुलं झाली. हे सगळं इथे लिहायचं कारण की आपल्याला अरबस्तानातल्या सामान्य माणसाच्या विचारसरणी ची थोडी कल्पना यावी. (माझ्या ओळखीच्या एका मध्यमवयीन गृहस्थानी त्यांच्या कुटुंबाच्या व्हिसा साठी अर्ज केला त्यात 'बायकांची संख्या - १' आणि 'मुलांची संख्या - २' असे लिहिले होते. त्यांच्या कंपनीतला 'मंदूप' - सरकारी कामे करणारा स्थानिक मनुष्य त्या नंतर किती तरी दिवस त्यांच्या कडे बघून हसत असे. :) )

असा हा देश. अवाढव्य. जवळ जवळ भारता इतका. पण लोकसंख्या भारताच्या अडिच टक्के असेल. नैसर्गिक विविधतेने नटलेला - जगातल्या भयाण वाळवंटातील एक 'रब-अल-खाली' - एम्प्टी क्वार्टर - रब = क्वार्टर / खाली = रिकामं - सौदी अरेबिया मधे आहे. पण सौदी अरेबिया मधे 'आभा' नावाचं एक शहर आहे जिथे बारा महिने पाऊस असतो. तापमान १८-२० डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास घुटमळत असतं. तबुक नावाचं एक शहर आहे जिथे नजर जाईल तिथपर्यंत फळबागा आहेत. आमची एक कस्टमर कंपनी होती. त्यांच्या कडे ३५००० हेक्टर ची जमिन लागवडीखाली होती. अल्-हासा हे जगातलं सगळ्यात मोठं 'ओऍसिस' सौदी अरेबिया मधे आहे. (अवांतर - अल्-हासा चे लोक जळू म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांची 'दृष्ट' लागते अशी त्यांची ख्याती आहे ;) ) इस्लामच्या ३ पवित्र ठिकाणांपैकी २ या देशात आहेत, मक्का-अल्-मुकर्रमाह (मुकर्रमाह = कृपाळू) आणि मदिना-अल्-मुनव्वराह (मुनव्वराह = प्रकाशमान, दिव्य).


मक्का - का'बा


मदिना - पैगंबरांचे विश्रांतिस्थान

तर एकूण अश्या या 'दिव्य' देशात मी जात होतो तर. मी जितकं वाचत गेलो तितकी माझी भिती कमी होत गेली, कुतूहल वाढत गेलं. आब्बी तो जानाच मांगताय, इथपर्यंत तयारी झाली मनाची. आता चालू नोकरीचा राजीनामा देण्या आधी नविन कंपनीचे अपॉइंटमेंट लेटर मिळणे आवश्यक होते. ती वाट बघणे चालू झाले. एकदाचे ते आले. त्या कागदावरची ती नाजूक आणि सुरेख अरबी भाषेची वळणदार अक्षरं मनाला एका नविन दुनियेची चाहूल देत होती. नक्की काय ते कळत नव्हतं. मनाने तर मी कधीच सुलतान शहरयार आणि राजकन्या शहराझाद च्या अरेबियन नाईट्स १००१ (अल्फ लायला-व-लायला = १००० आणि १ - अल्फ = १००० - व = आणि, लायला = रात्र) गोष्टींच्या सुरस आणि चमत्कारिक जगात पोचलो होतो.

दुसर्‍या दिवशी सकाळी तडक जाऊन राजीनामा दिला. बर्‍याच वाटाघाटींनंतर तो मंजूर पण झाला. परतीचा दोर कापला. आता फक्त विसाचे काम झालं की चाललं आमचं बुंऽऽग सौदीला. आत्तापर्यंत मी सौदी अरेबिया मधे अल्-खोबार या गावात राहणार हे नक्की झालं होतं. हे गाव म्हणजे सौदी अरेबियाच्या तेल व्यापारचे केंद्र. मुंबई आणि नवी मुंबई सारखी खोबार आणि दम्माम ही जुळी शहरं, दम्माम मोठं, जुनं आणि स्थानिक प्रांताची राजधानी. तर खोबार हे नविन, आधुनिक, आखिव रेखिव (सगळे रस्ते काटकोनात) असं पाश्चात्य छाप असलेलं शहर. कोणीतरी सांगितलं की खोबार हे सौदी अरेबिया मधलं सगळ्यात लिबरल ठिकाण आहे. तेवढंच बरं वाटलं. व्हिसाचे काम दिल्लीला होणार होतं. तिथे जेव्हा मेडिकल टेस्ट करायला गेलो तेव्हा मजूरांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या. म्हणलं आपणही मजूरच. पोटासाठी, चार पैसे जास्त मिळतील म्हणूनच तर चाललो आहोत ना? तर व्हा तयार, काढले कपडे आणि राहिलो उभा रांगेत. यथावकाश सगळे सोपस्कार पार पडले आणि तो व्हिसा पडला हातात.



यथावकाश तारीख ठरली, तिकिट पण आलं हातात. ७ फेब्रुवारी १९९९ ला सकाळी १०.३० ला सौदी अरेबियन एयरवेजचं विमान सुटणार. तयारी झाली. पहिलाच परदेश प्रवास. ती परदेशप्रवासाची खास ३२ साईझ ची बॅग आली घरात. कपडे, रोजचं सामान नुसता गदारोळ झाला होता घरात. कसं बसं ते सामान त्या खास बॅगेत भरलं आणि ६ तारखेला रात्री शांतपणे गप्पा मारत बसलो. या सगळ्या मानसिक आणि शारिरीक ताणाने मला सणसणून ताप चढला होता. त्यातच घरवाली पोटूशी होती. आता परत कधी भेटणार, कसं होणार हेही विचार मनात होतेच. कशीबशी रात्र गेली. आमच्या घरच्या पद्धतीप्रमाणे आम्ही गाडी सुटायच्या जितकं आधी जाता येईल तितकं आधी स्टेशनवर जाऊन बसतो. विमानतळ झाला म्हणून काय झालं. शिस्त ही शिस्त. ;) १०.३० च्या विमानासाठी वडिलांनी सकाळी ६.३० लाच घराबाहेर काढलं. घरापासून विमानतळ......... फक्त १५ (अक्षरी पं ध रा) मिनिटे दूर. पण आता काहिही सहन करायची तयारी ठेवली होती. विमानतळावर पोचलो. तिथे काही अपेक्षेप्रमाणेच काही हालचाल दिसत नव्हती आमच्या फ्लाईटची. काउंटर ७.३० ला उघडणार होते. बसलो निवांत गप्पा मारत. आईचा चेहरा सगळं काही सांगत होता तिला बोलायची गरजच नव्हती. वडिलांच्या चेहर्‍यावर काळजी आणि दु़:ख यांचं मिश्रण. बायको तर थोडी दूरच जाऊन उभी होती. एकंदरीत दृश्य टिपिकल होतं. :)

७.३० वाजले, ७.४५ वाजले, ८ वाजले तरी काही काउंटर उघडेना आणि कसली घोषणा पण होईना. एयरलाईन्सचे कर्मचारी पण कुठे दिसत नव्हते. माझ्या मनात खरं सांगायचं तर एकच भावना होती ..... प्रच्चंड कंटाळा. काय व्हायचं ते होऊन जाऊ दे पण सोडवा बाबा या धावपळीतून. आम्ही ताटकळून बसलो होतो. आणि तेवढ्यात अनाउन्समेंट झाली, "सौदी अरेबियन एयरलाईन्स च्या SVxxx ने दम्माम ला जाणार्‍या प्रवाशांनी लक्ष द्या..."

क्रमशः