सेंडॉफ नंतरची शाळा...

on शनिवार, जानेवारी ३१, २००९

डिसक्लेमरः या लेखातली सगळी पात्रं खरीखुरी आहेत आणि सगळ्यांनी जरी चाळिशी ओलांडली असली तरी त्यांचा उल्लेख मुलं अथवा मुली असाच होईल. कोणाला आक्षेप असतिल तर ते आपल्या स्वतःकडेच ठेवावेत. आम्हाला त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. :)

***

साधारण ३-४ वर्षं झाली असतिल. रविवारचा दिवस होता. सकाळी साडेदहाचा सुमार असेल. दारावरची बेल वाजली. मीच दार उघडलं. एक वयस्क गृहस्थ दारात उभे होते. माझ्या वडिलांचे कागदोपत्री लावायचे नाव घेऊन ते घरात आहेत का अशी विचारणा झाली. मी साहजिकच त्यांना आत घेतले. तेवढ्यात बाबा पण बाहेर आले. पाहुणे म्हणाले, "काय रे? ओळखलंस का?". बाबांची बिकट अवस्था त्यांच्या चेहर्‍यावरूनच कळत होती. त्यांनी सपशेल शरणागती पत्करत, "नाही बुवा" अशी कबुली दिली. त्यावर ते म्हणाले, "अरे मी ***. आपण शाळेत एका वर्गात होतो."

त्यानंतर मात्र १-२ तास आमच्याकडे जो आठवणींचा कार्यक्रम रंगलाय म्हणता, काही विचारू नका. ते आलेले काका आणि बाबा शाळेत मॅट्रिकपर्यंत एकाच वर्गात होते. मॅट्रिकनंतर तब्बल ५० पेक्षा जास्त वर्षांनी भेटत होते. दोघेही सत्तरीला टेकलेले. पण त्यांच्या बोलण्यातून ते त्यांची 'गोल्डन इयर्स' परत जगत होते हे स्पष्ट दिसत होते. त्यांच्या बॅचचा एक पुनर्मिलन सोहळा होणार होता आणि त्यासाठी हे काका खूप लांबून मुद्दाम पत्ता शोधत शोधत आमंत्रण करायला घरी आले होते. त्या नंतर तो सोहळा झाला पण. एकंदरित हा प्रकार बघूनच मला वाटायला लागलं होतं की आपल्याला पण शाळेतून बाहेर पडून बरीच वर्षं झाली आपण का नाही असं काही करत? पण हे सगळं तसंच मनात राहिलं. नेहमीच्या धावपळीत विसरूनही गेलो.

बरीच वर्षं मुंबईबाहेर राहिल्याने शाळेतले मित्रही तसे दुरावलेच होते. एक दोघांशी मधून मधून बोलणं व्हायचं. अशातच जुलै २००८ मधे आपल्या स्वातीताईने आमच्या १० वी ची पंचविशी.. हा लेख लिहिला. तो वाचल्या नंतर मात्र अक्षरशः मनाची तडफड झाली. वाटलं की लोक इतकं एंजॉय करतात आपण पण करावं. त्याच सुमारास मिलिंद बोकिलची 'शाळा' कादंबरी वाचली. (मी ही कादंबरी, शेवटचे पान वाचून झाले की परत पहिले पान उघडायचे असं करत सलग ५ वेळा वाचली). 'शाळा' वाचल्यानंतर नॉस्टॅल्जिक झाला नाही असा माणूस बहुतेक शाळेतच गेला नसावा किंवा त्याला स्मृतिभ्रंश तरी झाला असावा. इतकी ती कादंबरी 'युनिव्हर्सल' आहे. (मला तर अजूनही वाटतंय की हा मिलिंद बोकिल माझ्याच वर्गातला एखादा असणार आणि आता फक्त नाव बदलून लिहितोय. नक्कीच, नाही तर आमच्या वर्गात घडलेल्या काही घटना त्याला तंतोतंत कश्या माहीत झाल्या?) याच सुमारास संगिता अचानक ऑर्कुटवर भेटली. तिच्याकडे तर आमचा ९वी मधे असताना काढलेला ग्रुप फोटोच होता. तिने तो स्कॅन करून पाठवला आणि १ आठवड्याच्या आत तो फोटो जवळ जवळ १०-१२ जणांकडे पोचला असेल.

मनाची अशीच घालमेल चालू असताना नितिन बरोबर एक दिवस जीटॉक वर गप्पा मारत होतो. मनातली आयडीया त्याला बोलून दाखवली. गंमत म्हणजे त्यालाही तसंच वाटत होतं. पण हे सगळं कसं जमणार, कसं करणार, कोणाला इंटरेस्ट असेल का? वगैरे शंकासुर पण आमच्या मनात कॉमनच होते. म्हणून मग परत ते सगळं तसंच राहिलं. उगाच मधून मधून आम्ही दोघं एकमेकांना आठवण करायचो आणि 'खो' दिल्या सारखा, जो आठवण द्यायचा तो आपण दुसर्‍याला आठवण करून दिली या सामाधानात स्वतः विसरून जायचा अर्थात् तो खो परत मिळे पर्यंत!!! हळू हळू आमच्या या खोखोच्या खेळात अजून एक दोघे सामिल झाले पण गाडं काही पुढे सरकेना.

पण म्हणतात ना, ज्या गोष्टीची वेळ आली आहे ती होतेच होते. अगदी असंच झालं. एकदा बोलता बोलता नितिन म्हणाला, "अरे मी वैभवला विचारून बघतो." म्हणलं ठीक आहे, विचार. तेव्हा वैभव नेमका परदेशात. पण त्याला जसं समजलं की असा काही विचार चालू आहे तेव्हा पासून तो अक्षरशः पिसाटलाच. त्याने लगेच स्वप्नाला फोन करून तिला यात खेचलं. वैभव आणि त्याची बायको स्वप्ना, दोघेही आमच्याच वर्गातले. त्यामुळे मुलं मुली असे दोघेही बरेच जण त्या दोघांच्या संपर्कात होतेच. पण त्या दिवसा नंतर प्रत्यक्ष कार्यक्रम होईपर्यंत या दोघांनी जी काही मेहनत घेतली त्याला तोडच नाही.

हळू हळू या लोकांची एक 'ऑर्गनायझिंग टीम'च तयार झाली. वैभव, स्वप्ना, राधा, जयु, नितिन, तनुजा, मिलिंद, गिरिश... आपापले कामधंदे सांभाळून आठवड्यातून २-३ वेळा रात्री संध्याकाळी भेटायला लागले. कार्यक्रमाची रुपरेषा आकार घेऊ लागली. पहिली गोष्ट ही ठरली की जरी हा कार्यक्रम आपल्या बॅचच्या मुलामुलींना एकत्र आणायचा असला तरी आपल्या शिक्षकांशिवाय मात्र मजा नाही. जसे ते आमच्या शाळेच्या दिवसांचे अविभाज्य अंग होते तसेच ते या कार्यक्रमाचे पण असायालाच पाहिजेत. बरीच मुलं एकमेकांच्या संपर्कात होतीच. पण मुलींचं तसं नसतं. त्यांची लग्नानंतर नावं बदलतात. त्या दूर दूर सासरी वगैरे जातात. संपर्क हळू हळू कमी होत जातो. त्यांना कसं शोधायचं? सोयिस्कररित्या हे कारण पुढे करून सगळ्यांना ट्रेस करणं टाळता आलं असतं खरं तर. पण ऑर्गनायझर मंडळ लै भारी होतं आमचं. कार्यक्रम करायचा तर सगळ्यांनाच बरोबर घेऊन करायचा. कमीत कमी आमंत्रण तरी सगळ्यांना मिळालंच पाहिजे हा पक्का निर्णय होता.

शाळेत जाऊन काही माहिती मिळते का ते बघायचं ठरलं. पण २५ वर्षांपूर्वीची माहिती मिळणं तर सोडा पण असेल तरी की नाही हीच मोठी शंका होती. पण शळेत गेल्यावर वाडेकर प्यूनच्या कानावर हे गेलं आणि त्याने कागदाचे मिळतिल ते गठ्ठे तपासून बरोब्बर २५ वर्षांपूर्वीचे आमच्या बॅचचे सगळे रेकॉर्डस शोधून काढले. त्यामुळे काम खूपच सोप्पं झालं. फोनाफोनी सुरू झाली. हळू हळू एक एक जण भेटत गेले. इतकी वर्षं हरवलेली मुलं मुली भेटत गेली. प्रत्येक जण हे सगळं ऐकल्यानंतर वेडा / वेडी झाले होते. ही कल्पनाच जबरदस्त होती.



मग तारिख ठरली, रविवार, २५ जानेवारी २००९. सोमवारी २६ जानेवारीची सुट्टी असल्याने मस्त 'लाँग विकेंड' मिळत होता त्यामुळे मुंबईबाहेरून येणार्‍यांची सोय झाली. एक छोटासा हॉल बुक केला. पूर्ण दिवसभराचा बेत ठरला. जेवण पण ठेवलं होतं. अनिता आणि तिचा नवरा दोघे कॅटरिंगचाच व्यवसाय करतात त्यामुळे तो प्रश्नच नव्हता. घरचाच मामला झाला. शिक्षकांना बोलवायचे ठरलेच होते. पण एक कृतज्ञता म्हणून त्यांना काहीतरी द्यावे असं सगळ्यांनाच वाटत होतं. मग एक छोटीशी ट्रॉफी द्यावी असं ठरलं. एका अतिशय मोठ्या प्रोफेशनल ट्रॉफीमेकर कडे जाऊन सुंदर ट्रॉफी डिझाईन करून घेतली. कार्यक्रम करायचा तर नीट आणि सुंदरच करायचा हा एकच विचार प्रत्येकाच्या मनात.



हे सगळं होत असताना मला नितिन कडून नियमित अपडेट्स मिळतच होते. प्रत्यक्ष सहभागी होता येत नाही ही सल मनात खूपच होती. पण माझ्या डोक्यात आलेली कल्पना सगळे जण मिळून इतकी मस्त प्रत्यक्षात आणत आहेत हे बघून मला बरंच वाटत होतं. नेहमी प्रमाणे माझी भ्रमंति चालूच होती. मनात धाकधूक होतीच की आयत्या वेळेला काही तरी अर्जंट काम उपटेल आणि आपल्याला जाता येणार नाही. बुकिंग मात्र करून ठेवलं होतं. आणि शेवटी शेवटी तर असंच ठरवलं की दुनिया इकडची तिकडे झाली तरी कार्यक्रम अटेंड करायचाच. नोकरी गेली... कुठे ते सगळ्यांना माहित आहेच. ;) मधेच २-३ वेळा सहज गंमत म्हणून नितिनला म्हणलं की "बघू रे, जमलं तर येतो" वगैरे. त्या वर त्याची प्रतिक्रिया बघून, शारिरीक दुखापतीचा १००% धोका आहे असे जाणवल्याने कार्यक्रम चुकवताच येणार नव्हता.

माझं २२ जानेवारीचं बुकिंग होतं. तो संपूर्ण दिवस ऑफिसमधे कसाबसा ढकलला. रात्री मुंबईला पोचलो. आधीचे महिनोन् महिने सहज निघतात पण शेवटचे २-४ क्षण मात्र जाता जात नाहीत, तसं झालं होतं. २३-२४ कसेतरी ढकलले. २४ला संध्याकाळी आम्ही ४-५ जण एकत्र भेटलो. रात्री घरी आलो, रात्रभर झोप नाही लागली. उद्या कसे सगळे भेटतिल, कसे दिसत असतिल... मनात चक्रं फिरत होती. एकदाची सकाळ झाली. एव्हाना माझ्या मोठ्या मुलीला पण कळलं होतं की बाबा त्याच्या शाळेतल्या मित्रांना (मैत्रिणी नाही, आमच्या शाळेत मुलं मुली जानी दुश्मन असायचे) भेटायला जाणार आहे. तिला बिचारीला हे पटतच नव्हतं की बाबा पण लहान होता, त्याचे पण मित्र होते, तो बेंचवर बसायचा ("अय्या, बाबा तुम्ही एवढ्याश्या बेंचवर कसे मावायचात?"), मस्ती करायचा. तिच्या प्रश्नांना उत्तरं देता देता माझी एक्साईटमेंट वाढत होती. धावत पळत, ठरलेल्या वेळेपेक्षा चांगला अर्धा तास आधी पोचलो. हळू हळू पब्लिक जमत होतं. बहुतेक जण ओळखू आले. काही जण मात्र अक्षरशः 'परकायाप्रवेश' केल्या सारखे वेगळंच शरीर धारण करून आले की काय असं वाटण्या इतके बदलले होते. पण तिथे पोचल्यावर मात्र सगळे परत लहान होऊन गेले आणि ओळखीचे वाटायला लागले. तशीच लहान असताना चालणारी चिडवा चिडवी चालू झाली. जुने सगळे 'संदर्भ' ;) परत आठवायला लागले. नुसते आठवतच नव्हते तर ते 'संदर्भ' साक्षात समोर दिसत असल्याने काही जण (आणि 'जणी' सुध्दा बरं का!!!) अंमळ हरवले होते. आमच्या वेळच्या दहावीच्या सगळ्या वर्गांचे ग्रुप फोटो पैदा करून एका बोर्डावर लावले होते. आपले स्वतःचेच जुने चेहरे बघून दुसर्‍यांपेक्षा स्वतःचंच हसू येत होतं.

मग एक एक शिक्षक यायला सुरूवात झाली. इतक्या वर्षांनी त्यांना बघत होतो. बरेच जण निवृत्त झाले होते. वयं झाली होती. काही जण तर मुंबई सोडून गेले होते. पण केवळ आमच्या प्रेमापोटी दगदग सोसून जिद्दीने मुद्दाम हजर राहिले. २५ वर्षांत बरीच उलथापालथ झाली असली तरी शिक्षकांचा हात पाठीवर आहेच हे जाणवलं. त्यांना वाकून नमस्कार करताना उगाचच भरून येत होतं. गंमत म्हणजे आमच्या सगळ्यांच्यात कितीतरी फरक पडला होता तरी बहुतेकांना त्यांनी बरोबर ओळखलं. काही शिक्षक पुढच्या प्रवासाला निघून गेले आहेत, त्यांना श्रध्दांजली वाहून आमचा कार्यक्रम सुरू झाला.

सगळ्यात आधी घंटा वाजली, शाळा भरली. राधाने प्रास्ताविक केलं आणि माईक माझ्या हातात दिला. मी थोडक्यात हा सगळा कार्यक्रम कसा ठरला, नियोजन कसं झालं वगैरे सांगितलं. मला खरं तर एकच सांगायचं होतं, "आज आपण कोणीही असो, कसेही असो, कुठे असो... आपण आपल्या आयुष्यातली सर्वात अमूल्य चीज शेअर केली आहे... ती म्हणजे आपलं बालपण. गेली २५ वर्षं आपण दूर गेलो होतो पण आता मात्र कमीत कमी संपर्कात मात्र नक्कीच राहू. नियमितपणे जेवढे जमतिल तेवढे भेटत राहू." शाळेतल्या गंमतीदार आठवणी सांगितल्या. मी आणि नितिन कायम मागच्या बाकावर बसायचो. आमचे मुख्याध्यापक वैद्यसर त्यांच्या खोलीतून बाहेर पडले की आम्हाला बरोबर लांबूनच दिसायचे. वैद्यसर म्हणजे एकदम टेरर माणूस. कितीही उनाड, निर्ढावलेला पोरगा असो त्यांच्या समोर अतिशय गरिब बनून उभा रहायचा. त्यांची छडी खाल्ली नाही असा विद्यार्थिच नाही शाळेत. तर ते येताना दिसले की मी आणि नितिन सगळीकडे सावधगिरीचा इशारा द्यायचो. लगेच वर्गातले सगळे अवैध उद्योगधंदे थंड व्हायचे. एकदा कसं माहित नाही पण त्यांना आमचे हे महान कार्य लक्षात आले. (मला वाटतं बर्‍याच दिवसांत आमच्या वर्गात कोणाला छडी मारायला न मिळाल्या मुळे त्यांनी पाळत ठेवली असावी आमच्यावर.) झाऽऽलं. लगेच आम्हाला शिक्षा झाली. काय तर, सगळ्यात पुढे एक बेंच होता जो त्यांच्या केबिन मधून व्यवस्थित दिसायचा. आमची रवानगी त्या बेंचवर. आता यात शिक्षा कसली? तर भानगड अशी की हा बेंच मुलींच्या लायनीत होता. (मुलं मुली वेगळे बसायचे, दुश्मनी एकदम पक्की होती. दोन रांगा मुलांच्या आणि दोन रांगा मुलींच्या असा प्रकार होता.) आख्ख्या वर्गात आम्हाला हसत होते. शाळेतले शेवटचे सहा महिने असे काढले होते. पण आमचे वैद्यसर एकदम मस्तच होते. काही कारणाने येऊ नाही शकले. त्यांची अनुपस्थिती सगळ्यांनाच जाणवली. त्यानंतर ओळख परेड झाली. प्रत्येकाने स्वत:ची ओळख करून दिली. काय व्हरायटी होती... बाप रे. लेकुरवाळ्या गृहिणींपासून ते एका बहुराष्ट्रिय बॅंकेच्या डायरेक्टर पर्यंत रेंज होती मुलींमधे. मुलांमधे कोणी यशस्वी बिझनेसमन तर कोणी राजकारणी, कोणी पत्रकार. खूपच जबरदस्त धक्के बसत होते.

जेवणानंतर मात्र वेळ पूर्णपणे शिक्षकांसाठी होता. मी एक एक शिक्षकांबद्दल थोडं बोलून, त्यांच्या लकबी वगैरे सांगून आठवणी ताज्या केल्या. प्रत्येकाला समोर बोलवून थोडं बोलायची विनंति केली. बहुतेक जण खूपच छान बोलले. पण काही जण मात्र खूपच भावनाविवश झाले होते. जास्त बोलूच नाही शकले. आमची पण तीच अवस्था झाली होती. सातपुते बाईंचा इतिहासाचा तास, त्यांनी शिकवलेली फ्रेंच राज्यक्रांती आणि अमेरिकेचं स्वातंत्र्य युध्द, सामंतबाईंनी (भर दुपारी शाळेच्या ग्राउंडवर) करून घेतलेली आंतरशालेय समूहगीतांची प्रॅक्टिस, त्यांचं आम्हा मुलांना धोपटणं, गोखले बाईंनी रोज पहिल्या तासाला म्हणून घेतलेला गीतेचा १५वा अध्याय, पोतदारसरांचं जीव तोडून चित्रकला शिकवणं आणि आम्ही मारूतिचा गणपती करण्याची किमया दाखवल्यानंतर हताश होणं, पीटीच्या गवळी सरांच्या शिट्टीची दोरी पूर्ण शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या पायावर एकदा तरी सपकन् बसलीच आहे, खेडेकर सरांसारखं अक्षर आज पर्यंत बघितलं नाही, ८वी मधे असताना करमरकरबाईंनी नेहरू प्लॅनेटेरियम आणि सायन्स सेंटर मधे नेलेली शैक्षणिक सहल आणि त्यांचे एक नातेवाईक तिथे होते त्यांनी आमच्या साठी केलेला खास शो..... सगळेच काही ना काही आठवणी जागवत होते. प्रत्येक शिक्षकांनी आमच्या वर काही ना काही छाप सोडली आहे हे एकदम जाणवलं. सामंतबाई म्हणाल्या "तुम्ही २५ वर्षांनी मोठे झालात, मॅच्युअर झालात तसे आम्ही पण झालो. आज मला पश्चात्ताप होतोय की मी तुम्हाला खरंच खूप मारत होते. मी तुमची सगळ्यांची हात जोडून माफी मागते." हे ऐकून सगळेच एकदम सेंटी झाले.

सगळ्यात जास्त मजा तर सुशिताईने केली. ती म्हणाली, "शाळा सुरू झाल्यापासून मी शाळेत आहे. किती तरी बॅचेस माझ्या समोरून गेल्या. आणि शाळेतली सगळी 'गुपितं' मला माहित आहेत. मी बोलायला लागले तर बरेच जण पळून जातील." तिच्या या वाक्यावर पडलेल्या टाळ्याच, ती खरं बोलते आहे हे दाखवून गेल्या. भोगले बाईंनी तर खूपच छान भाषण लिहूनच आणलं होतं. गवळी सरांच्या मेमरीला तर सलाम!!! २४ तारखेला रात्री त्यांना शीतलने आठवण करायला फोन केला होता. ती त्यांना म्हणाली, "सर मी कोण ते ओळखा." सरांनी पटकन सांगितलं, "तू शीतल." जबरदस्त... २५ वर्षांनंतर नुसत्या आवाजावरून व्यक्ति ओळखणं म्हणजे केवळ ग्रेटच.

हे सगळं होई पर्यंत संध्याकाळ होत आली होती. (जेव्हा कार्यक्रम ठरत होता तेव्हा असं वाटलं होतं की आपण दिवसभर काय करणार? म्हणून एक इव्हेंट मॅनेजर बोलावला होता. तो काही गेम वगैरे कंडक्ट करेल असा प्लॅन होता. तो बिचारा २-२.३० पासूनच येऊन बसला होता. पण आम्हीच आमची एवढी धमाल करत होतो की आम्हाला त्याची गरजच वाटेना. शेवटी ३ वाजता त्याला परतच पाठवला. :) ) एक एक जण निरोप घ्यायला लागला. होणार होणार म्हणता म्हणता कार्यक्रम झाला पण... आणि अतिशय मस्त झाला. जेव्हा पहिल्यांदा मी आणि नितिन बोललो होतो तेव्हा आम्ही खूपच साशंक होतो. कार्यक्रम होईल की नाही इथ पासून सुरूवात होती. पण प्रत्यक्षात जबरदस्तच झाला एकंदरित प्रकार. सगळ्यांच्या साठीच एक अविस्मरणिय दिवस होता तो.

माझ्या पुरतं म्हणायचं तर, ज्या खेडेकर सरांनी पहिल्यांदा 'मराठी' भाषा म्हणून शिकवली त्यांनी आवर्जून 'खूप छान बोलतोस तू. भाषा छान आहे तुझी.' असं सांगितलं. त्यांनीच काय पण कोणत्याही शिक्षकांनी कौतुक करायचा प्रसंग शाळेत असताना कधी वाट्याला आला नाही. तो अनुभव शाळा सोडल्यानंतर २५ वर्षांनी मिळाला. म्हणलं, चला, २५ वर्षांत काही तरी तर शिकलो आपण. बरं वाटलं.

***

कालच नितिनचा फोन आला होता. इतके दिवस कार्यक्रमाच्या धावपळीत गेले आणि आता एकदम रिकामपण आलंय म्हणत होता, वैभव आणि स्वप्नाची पण हीच अवस्था आहे. त्यावर उतारा म्हणून अजून एकदा कार्यक्रम करुया असं म्हणतोय तो. ;)