&%^$@# !!!

on गुरुवार, फेब्रुवारी २५, २०१०

दचकायला काय झालं? .... ते शीर्षक तसंच आहे.... &%^$@# !!!

चाणाक्ष लोकांच्या लक्षात आलंच असेल... &%^$@# !!! म्हणजे काय ते. ज्यांच्या आलं नसेल त्यांच्या लवकरच येईल. :)

तर झालं काय... नुकताच सौदी अरेबियामधे जाण्याचा योग आला होता. दिवसभर कस्टमरकडे राबराबून मी माझ्या एक दोन सहकार्‍यांबरोबर गेस्टहाउसकडे परत चाललो होतो. ऑफिसमधून बाहेर आलो आणि टॅक्सीला हात केला. टॅक्सी थांबली. आखाती देशात सहसा टॅक्सीवाले पाकिस्तानी किंवा भारतियच असतात. तसे असले तर गप्पा मारत प्रवास होतो. पण त्या दिवशीचा टॅक्सीवाला नेमका येमेनी होता... टॅक्सी सुरू झाली. गडी भलताच गप्पिष्ट होता. त्याची अखंड बडबड सुरू झाली. त्याचं अस्खलित आणि माझं मोडकं अरबी... पण बोलणे भाग होते. रियाधमधला अगाध ट्रॅफिक... प्रचंड मोठ्या हायवे वरून ताशी १००+ किमीच्या वेगाने खेळलेल्या आट्यापाट्या, खोखो, हुतूतू वगैरे प्रकारांमुळे हार्ट अ‍ॅटॅक येऊ न द्यायचा असेल तर मन असं गुंतवणं भागच असतं.

माझ्या बरोबर माझा आयुष्यात पहिल्यांदाच भारताबाहेर, ते सुद्धा थेट सौदी अरेबियामधे आलेला एक सहकारी होता. तिथल्या एकंदरीत कडक नियम / शिक्षा वगैरे बद्दल त्याचं इंडक्शन भारतातच झालं होतं. तो अगदी गप्प गप्प असायचा... न जाणो आपण हिंदीत का होईना पण काही चुकीचं बोललो तर लफडं व्हायचं उगाच... म्हणून तो कायम गप्प. पण आमच्या गप्पा चालू झाल्यावर त्याला पण मूड आला.

ड्रायव्हरसाहेब अगदी दिलखुलास माणूस निघाले. त्यांचं बोलणं अगदी धबाधबा. रस्त्यावरील इतर ड्रायव्हरांबद्दलचा त्यांचा आदर आणि प्रेमभाव अगदी ओसंडून वाहत होता. तेवढ्यात एका गाडीने आमच्या गाडीला अगदी सराईत कट मारत ओव्हरटेक केले. झाले... पुढची पाच मिनिटे आमच्या टॅक्सीत नुसता कल्ला झाला... मला अरबी फारसे येत नाही पण त्या पाच मिनिटात त्या दुसर्‍या चालकाच्या कोणकोणत्या नातेवाईकांची आणि अवयवांची आठवण निघाली होती हे कळण्याइतपत नक्कीच कळते.

गडबड शांत झाल्यावर माझा सहकारी हळूच विचारता झाला.

'काय झालं?'

'काही नाही रे... घाबरू नकोस. तो अगदी नॉर्मल आहे.'

'पण तो असा अचानक चिडला का?'

'अरे, त्या दुसर्‍या गाडीने आपल्याला ओव्हरटेक केले ना... म्हणून हा जरा स्वतःला मोकळा करत होता.'

'काय बोलला तो?'

'*&^%$@# !!! असं म्हणाला तो'

'म्हणजे? शिव्या दिल्या त्याने? त्या पण असल्या? आणि इतकं चिडून?'

'हो. सहसा शिव्या अशाच देतात. आणि असल्याच देतात.'

माझा मित्र दोन मिनिटं विचारात पडला आणि मग हळूच मला म्हणाला...

'सर, इथे शिव्या देणं अलाऊड आहे?'

'!.!.!.!.!' ... मी स्पीचलेस. अगदी नि:शब्द वगैरे.

शक्य असतं तर मी त्याला 'अलाऊड आहे' हे डेमो देऊन सांगितलं असतं इतका वैतागलो मी. अरे सौदी अरेबिया झालं म्हणून काय झालं? मानवाच्या जन्मसिद्ध अधिकारात मोडणार्‍या 'शिव्या देणे' या प्रकाराबद्दल एवढं अज्ञान? मी त्याला नीट समजवलं... अर्थात शिव्या न देता. खूप कंट्रोल केलं तेव्हा मी स्वतःला.

खरं म्हणजे शिव्या हा मानवतेला लाभलेला आणि पुढे नेणारा एक अनमोल ठेवा आहे. जरा विचार करा...

तुम्ही अश्याच एखाद्या प्रसंगात सापडला आहात. कॉलेज लाईफ मधला पहिलाच रोझ डे... (आपापल्या प्रेफरंसप्रमाणे) आवडती व्यक्ती समोरून येत आहे. तुमच्या हातात गुलाब. ती व्यक्ती जवळ यायची वाट बघत तुम्ही अगदी उत्कंठेच्या टोकावर उभे. ती व्यक्ती जवळ येते... तुम्ही गुलाब पुढे करणार एवढ्यात..... दुसराच कोणी तरी येतो... आख्खा रेडरोझचा गुच्छच्यागुच्छ त्या व्यक्तीला देतो... ती व्यक्तीपण तो गुच्छ अगदी हसून आणि लाजून वगैरे स्वीकारते... तुमचा पत्ता कट झालाय तुमच्या लक्षात येतं... आणि... आता जस्ट विचार करा हं... शिव्या हा प्रकार अस्तित्वातच नसता समजा, तर तुम्ही नक्कीच त्या नको तिथे नको तेव्हा कडमडणार्‍याचा खून केला असता. पण तसं होत नाही (बहुतेक वेळा तरी... टार्‍याची ग्यारंटी नाही... ). तुम्ही चरफडता, हात (एकमेकांवर) चोळता... एक शंभरेक शिव्यांची लड लावता आणि गुलाबासाठी दुसरं एखादं डेस्टिनेशन शोधायला चालू पडता... थोडक्यात काय तर... यु मूव्ह ऑन. खलास. सिंपल. विषय संपला.

हेच नेमकं शिव्यांचं महत्व आहे.

माणसाच्या मनातल्या भावनांचा निचरा न होणं हे मनोविकाराचं एक प्रमुख कारण आहे. प्रत्येक वेळी तो निचरा आपल्याला पाहिजे तसा नाही होऊ शकत. आपण समाजात राहतो. समाजाची काही एक चौकट असते. त्या चौकटी बाहेर पडणं कधी कधी खरंच हितावह नसतं आणि कधी कधी आपल्यात तेवढा दम नसतो. तिथे शिव्या कामी येतात. व्यक्त किंवा अव्यक्त म्हणजेच उघड नाहीतर मनातल्या मनात तरी आपण चार शिव्या हासडतो (हासडलेल्या शिव्या दिलेल्या शिव्यांपेक्षा अधिक फायदेशीर आणि गुणकारी असतात) आणि भावना तुंबू देत नाही. शिव्या अनादी आहेत. शिव्या अनंत आहेत. प्राण्यांना स्वत्वाची भावना नसते असं म्हणतात. पण जेव्हा पासून मानवाला उत्क्रांतीच्या एका विशिष्ट टप्प्यावर स्वतःच्या अस्तित्वाची जाणिव झाली तेव्हा पासून 'व्यक्त होणे' ही एक फार मोठी, किंबहुना सगळ्यात मोठी भावनिक गरज बनली. भाषा वगैरे नंतर बनल्या पण शिव्या मात्र त्या आधीही असणारच. शिव्या भाषेवर अवलंबून नाहीत. शिव्यांची एक स्वतंत्र भाषा आहे. मौखिक भाषा त्यात दुय्यम आहे, नसली तरी चालावी अशी. नाही तर एखाद्या मुक्या माणसाची पंचाईत. पण असे असले तरी, शिव्या या कोणत्याही भाषेच्या अगदी मूळ वैशिष्ट्यांपैकी असतात. सर रिचर्ड बर्टनला बर्‍याच भाषा यायच्या. तो जिथे जाईल तिथली भाषा शिकायचा. अगदी पारंगत होत असे तो. तो म्हणतो, "कोणतीही भाषा शिकायची युक्ती म्हणजे सर्वप्रथम त्या भाषेतल्या शिव्या शिकायच्या. बाकीची भाषा आपोआप येईल."

शिव्या मुख्यत्वे जरी त्या देणार्‍याच्या मानसिक समाधानासाठी असल्या तरी बरेच वेळा त्या ज्याला दिल्या जातात त्याच्यापर्यंत पोचल्या तर त्यातले समाधान द्विगुणित होते. म्हणजे, एखाद्या बाईने लाखो रूपयाचे दागिने घालायचे आणि घरात दारं खिडक्या बंद करून अंधार्‍या खोलीत कोंडून घ्यायचे. मग कशाला घालायचे ते दागिने? तसेच जर का शिव्या दिलेल्या पोचल्या नाहीत तर मजा किरकिरा व्हायचा संभव असतो. यासाठी देहबोली अतिशय आवश्यक असते. शिव्या देतानाचा आवेश / मुद्रा / हातवारे बरोब्बर जमले पाहिजे. शब्दांवरचे आघात जमले पाहिजेत. त्यामुळे, कधी कधी अगदी साध्या साध्या शिव्या पण खूप इफेक्टिव्ह बनतात. अन्यथा अगदी घणाघाती शिवी पण मिळमिळीत होऊ शकते. तो इफेक्टच महत्वाचा असतो. अशी एक नीट दिलेली शिवी कमीतकमी हजारवेळा तरी कानफटवण्याच्या बरोबरीची असते.

शिव्यांचेही बरेच प्रकार असतात. काही शिव्या शारिरीक संदर्भात असतात. यामधे अवयवांचे संदर्भ अथवा एखाद्या शारिरीक व्यंगाचा संदर्भ इत्यादी येते. काही शिव्या नातेसंबंधांवर आधारलेल्या असतात. तर काही शिव्या प्राणीजगताशी संबंधित असतात. धार्मिकतेच्या संदर्भाने पण शिव्या दिल्या जाऊ शकतात. या प्रकारच्या शिव्या जरा जास्तच खोल जखम करतात. कित्येक वेळा शिव्या या केवळ 'दूषण' न राहता 'शाप' या सबकॅटेगरी मधे पोचतात. अशा शिव्या, शिव्या दिल्याजाणार्‍या व्यक्तीच्या भविष्याकाळातील अवस्थेबद्दल अघोरी भाष्य करतात. काहीही असले तरी समोरच्याला व्यथित करणे हा उद्देश सफल करण्याच्या दृष्टीनेच सगळ्या कृती होत असतात.

भारताच्या संदर्भात बोलायचे तर जातीवरून दिलेल्या शिव्या अतिशय तीव्र असतात. इतक्या की केवळ या प्रकारच्या शिव्यांबद्दल एक कायदाच अस्तित्वात आला. भारतातील जातिय व्यवस्थेचा नृशंस इतिहास याला कारणीभूत आहे. एखाद्या माणसाला जातिवाचक शिवी देताना ती शिवी ज्याला दिली जात आहे त्याला त्या शब्दामागे हजारो वर्षांचा अन्याय एकवटल्याची जाणिव होत असते आणि म्हणून तो एखादा शब्द खोल जखम करून जातो. त्या माणसाच्या आत्मसन्मानालाच धक्का देऊन जातो.

सुरूवातीला म्हणलं तसं शिव्या मुख्यत्वेकरून मनातील भावनांना वाट करून देणे याकरिता असतात. सहसा राग आल्यावर जरी शिव्या वापरल्या जात असल्या तरी बरेच वेळा आनंदाच्या वेळीही पटकन आपल्या तोंडात शिव्या येतात. तुमचा एखादा शाळेतला जीवलग मित्र शाळा सुटल्यावर दुरावतो... वर्षानुवर्षे भेट होत नाही. एखाद दिवशी अचानक भेटतो... पूर्वीचे प्रेम, दोस्ती उफाळून येते... दोघेही अगदी मनापासून आनंदित होतात तेव्हा ते म्हणतात.... "भो***... अरे आहेस कुठे? साल्या, किती वर्षांनी भेटतो आहोत आपण!!!" .... आता इथे त्या शिव्यांचा शब्दार्थ पूर्णपणे लुप्त होऊन केवळ भावार्थ तेवढा उरतो. आणि तो एकमेकांना बरोब्बर कळतो. सांगावा लागत नाही. जिथे सांगायची गरज पडावी तिथे असे शब्द येतच नाहीत तोंडातून.

महाराष्ट्र संतभूमी आहे असे म्हणतात. मराठी भाषेच्या जोरदार शिवीवैभवाच्या प्रभावातून इथले संतही सुटले नाहीत. अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थांबद्दल कित्येक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. त्यांच्या दर्शनाला गेल्यावर त्यांनी शिव्या घातल्या तर तो विशेष कृपाप्रसाद आहे असे समजले जायचे म्हणे. गाडगेबाबा पण रोखठोक आणि शिव्या वापरून बोलण्याबद्दल प्रसिद्ध होते असे कुठे तरी वाचल्याचे आठवते आहे. यादी फार मोठी आहे.

पण मला खरं विचाराल तर सगळ्यात मोठी शिवी कोणती म्हणाल तर मी एकच सांगेन... दुर्लक्ष. होय... दुर्लक्ष करण्यासारखा दुसरा अपमान नाही कोणाचा. शिवीचे उद्दिष्ट्य जे आहे ते समोरच्याचा अपमान करणे हे होय. आणि समोरच्या माणसाची दखलच न घेणे या सारखा अपमान सगळ्यात जास्त झोंबणारा असतो. शिवाय ही शिवी निर्विवादपणे १००% सगळ्या सभ्यतेच्या आणि कायद्याच्या नियमात बसते. ही शिवी दिली म्हणून कोणावर गुन्हा नोंदवला गेला आहे असे ऐकिवात नाही. बिन्धास्त देऊ शकतो. किमान (म्हणजे अगदी शून्य) शब्दात, कमाल अपमान करणारी अशी ही शिवी आहे.

पण दुर्लक्षाच्या बाबतीत एक गंमतीदार विरोधाभास आहे. मूळात शिव्या या मनातील भावनांचा निचरा करण्यासाठी दिल्या जात असल्या तरी, त्याच भावनांवर पूर्णपणे नाही तरी खूपसा ताबा मिळवल्याशिवाय ही शिवी देता येत नाही. याबाबतीत लहानपणी शाळेत शिकलेली महात्मा गांधींची गोष्ट अजूनही लक्षात आहे...

एकदा एका माणसाने गांधीजींना खूप निंदा करणारे पत्र लिहिले. त्यात त्यांना शिव्याही भरपूर घातल्या होत्या. ते पत्र मिळाल्यावर गांधीजींनी त्याला लावलेल्या टाचण्या काढून घेऊन ते पत्र परत पाठवले... त्यासोबत एका कागदावर हे ही लिहिले... "तुमचे पत्र मिळाले. वाचले. त्यातले मला हवे असलेले, उपयोगी असेलेले ठेवून घेतले. नको असलेले तुम्हाला परत करतो आहे."

मला सांगा, त्या पत्रलेखकाला सणसणीत कानाखाली बसल्यासारखं नसेल वाटलं? नक्कीच वाटलं असणार.

तर, अशा या शिव्या. आता या लेखाकडे दुर्लक्ष करून तुम्ही मला शिव्या घलणार नाही अशी अपेक्षा करतो. ;)

ती

on शनिवार, फेब्रुवारी १३, २०१०

अजून अंधार पडायला खूपच वेळ होता पण उन्हं कलायला लागली होतीच. तशात थंडीचे दिवस म्हणजे अंधार लवकर आणि हवेतला गारठा वाढत जाणारा... टेकून बसल्यामुळं आणि हवेतल्या गारव्यामुळं तिला हलकीशी डुलकी लागलीच.

तेवढ्यात हळूवार पण अगदी ताकदीने मारलेल्या दोन तीन लाथा तिच्या पोटात बसल्या. दुर्लक्ष करावं असं वाटता वाटता अजून एक लाथ बसली आणि आता हे टाळणे शक्य नाही हे समजून तिने डोळे उघडले. समोरच, तो हसत हसत मस्त पहुडला होता मांडीत. तिला एकदम हसूच आलं. एवढंसं कार्टं पण बरोब्बर सगळं मनासारखं करून घेतं... एकदम लबाड पण गोड आहे. कायम हिच्याच कडेवर. तिने सारखं याच्याशी खेळायचं. मस्ती करायची... तिलाही ते खेळणं आवडलंच होतं.

तो यायच्या आधी तिला एकटीला खूप कंटाळा यायचा.

आत्ता सुद्धा जवळ एक चांदी पडली होती... तीच पकडायचा प्रयत्न चालला होता त्याचा. ते जमत नव्हतं... म्हणूनच मग त्या लाथा आणि ढुशा. मस्त वार्‍याच्या झुळकीमुळे छान वाटत होतं. तिने त्याला थोडं घट्ट जवळ ओढून घेतलं. टोपडं नीट केलं. पण सराईतासारखी तिची नजर आजूबाजूला भिरभिरतच होती. वेळ चुकवून चालत नाही हे तिला माहित होतं... शिवाय आत्ताशी कुठे चालू होत होता तिचा दिवस. अजून आख्खी संध्याकाळ जायची आहे.

तशात, एकदम बाजूला वेगाने पळणार्‍या गाड्या मंदावल्या... त्यासरशी ती उठलीच... सिग्नल पिवळा... ती भक्ष्यावर झडप घालताना शेवटच्या क्षणी संपूर्ण अंग ताठ करणार्‍या वाघासारखी पूर्ण फोकस्ड... पुढच्या सगळ्या अ‍ॅक्शन्स ठरलेल्या... किती वेळात सिग्नल लाल होणार... गाड्या थांबे थांबे पर्यंत किती सेकंद लागणार... सगळं सरावाचं...

सिग्नल लाल... तिने पूर्ण ताकदीने त्याच्या ढुंगणावर चिमटा काढला... तो कळवळला... आकांत सुरू...

त्याला काखेला मारून ती पहिल्याच गाडीसमोर तोंड वेंगाडून हात पसरून उभी राहिली...