आफ्रिका!!! आफ्रिका!!!

on गुरुवार, जानेवारी ०१, २००९

माझ्या लहानपणी आमच्या घरी एक थोडा गंज लागलेला, पोचे पडलेला, पत्र्याचा पृथ्वीचा गोल होता. अजून एक, माझा सगळ्यात धाकटा काका मॅट्रिकला असताना त्याने घेतलेला 'ऍटलस' होता. मला आठवतंय तेव्हापासून ह्या दोन्ही वस्तू माझ्या अवतिभोवती असायच्याच. मला त्या दोन्ही गोष्टी खूपच आवडायच्या. मी कायम त्यात जगातले निरनिराळे देश, त्यातली गावं वगैरे बघत बसायचो. मी चौथीत असे पर्यंत मला इंग्लिश येत नव्हतं. पण पाचवी मधे ती पण अडचण दूर झाली. पाचवी संपेपर्यंत मला सगळ्या देशांची नावं आणि त्यांच्या राजधान्या वगैरे पाठच होऊन गेल्या. माझी आई पण कधी कधी माझ्या बरोबर बसायची. आम्ही (ती आणि मी) एक खेळ पण खेळायचो. पृथ्वीच्या गोलावर एखादं गावाचं नाव घ्यायचं आणि ते कुठे आहे ते दुसर्‍याने शोधून काढायचं. हाच खेळ त्या ऍटलस मधे बघून खेळायला जास्त मजा यायची. तिथे तर जामच कळायचं नाही. पण हे सगळं चालू असताना 'आफ्रिका' हा शब्द मात्र कुठे तरी घट्ट जाऊन बसला होता मनात. तो शब्दच काहीतरी वेगळा वाटायचा. काहीतरी अनामिक, गूढ असं वाटायचं.

माझा आफ्रिकेशी पहिला संबंध आला तो अगदी लहानपणी, ५-६ वर्षांचा असताना, आमच्या कडे नुकताच टीव्ही आला होता, तेव्हा. एका शनिवारी संध्याकाळी (तेव्हा मराठी सिनेमे शनिवारी आणि हिंदी सिनेमे रविवारी संध्याकाळी अशी विभागणी असायची) टीव्हीवर 'जगाच्या पाठीवर' हा सिनेमा चालू होता. त्यात राजा परांजपे एका आफ्रिकेमधून आलेल्या माणसाची भूमिका करतात. हा माणूस 'झांझिबार'ला स्थायिक झालेला असतो. आणि त्या सिनेमात एक वेड्यांचे गाणे आहे, त्यात एक वेडा 'झांझिबार, झांझिबार' असं म्हणत असतो. मला त्या झांझिबार शब्दाने अक्षरशः वेड लावले होते. पुढे कितीतरी दिवस तो शब्द माझ्या डोक्यात अक्षरशः धुमाकूळ घालत होता. साला, गावाचं नाव काय? तर झांझिबार!!! गंमतच आहे. कसं असेल ते झांझिबार? तिथल्या लोकांना आपल्या गावाचं नाव सांगताना थोडं विचित्र नाही वाटत? असले विचार यायचे माझ्या मनात. :)

हळू हळू ते थोडं ओसरलं. तेवढ्यात आमच्या बिल्डिंगमधले एक जण नोकरी निमित्त 'नायजेरिया'ला गेले. तिथे लागोस मधे होते ते. त्यांची धाकटी मुलगी आमच्या बरोबरीचीच एकदम. रोजच्या खेळण्यातली. ती एकदम विमानात बसून कुठे गेली? तर आफ्रिकेला!!! कसली जळली होती आमची. पण चला आपण नाही तर कमीत कमी आपली मैत्रिण तर जातेय हाच आनंद होता. ती जेव्हा सुट्टीवर यायची तेव्हा तिच्या तोंडून तिथले उल्लेख, चमत्कारिक नावं, तिचं इंग्लिश (आम्ही मराठी माध्यमवाले, ती तिथे जाऊन एकदम इंग्लिश मिडियमवाली झालेली) वगैरे ऐकून आम्हाला फारच सुरस आणि चमत्कारिक असं वाटायचं. माझे आजोबा रेल्वेत मोठे अधिकारी होते. आणि मागे एकदा नायजेरियामधले काही अधिकारी तिथे रेल्वे सुरू करायच्या प्रयत्नात भारतात आले होते. त्यांचे काढलेले स्वागत समारंभाचे फोटो मला बाबांनी दाखवले. त्यात ते लोक एकदम धिप्पाड आणि काहीतरी वेगळेच झगे (गाऊन) आणि लांब टोप्या घातलेले पाहून गंमतच वाटली.

आफ्रिका डोळ्याना पहिल्यांदा दिसायचा योग आला तो अजून पुढे, साधारण ७५-७६ साली. मुंबईत, कुलाब्याला रीगलला 'हतारी' (http://en.wikipedia.org/wiki/Hatari!) हा सिनेमा आला होता. तो पूर्णपणे आफ्रिकेतच आहे. बाबांनी मला आणि ताईला मुद्दाम तो बघायला नेला होता. त्यातले एक एक प्राणी आणि ते निसर्ग सौंदर्य बघून केवळ वेडच लागायचं बाकी राहिलं होतं. सिनेमा संपल्यावर बाबांनी जवळ जवळ ओढतच बाहेर काढलं होतं. पुढे शाळेत भूगोलाच्या तासाला आफ्रिकेतले प्राणी, तिथले मौसमी वारे, हवामान, पिकं, तुआरेग जमातीच्या लोकांची घरं कशी असतात आणि त्याला काय म्हणतात वगैरे अतिशय नीरस गोष्टी पण माझ्या मनातली आफ्रिका अधिकाधिक संपन्न करत गेल्या. इतिहासाच्या तासाला बाई मध्ययुगातील गुलामांच्या व्यापाराबद्दल शिकवायच्या. ती वर्णनं ऐकून खूपच वाईट वाटायचं.

असं होता होता, नववी दहावी मधे असताना, माझ्या हातात प्रसिध्द संशोधक, भटक्या (एक्स्प्लोरर) सर रिचर्ड बर्टनवर बाळ सामंतांनी लिहिलेलं पुस्तक पडलं. त्यात त्याने आफ्रिकेत अतिशय दुर्गम आणि भयानक टोळ्या वास्तव्य करत असलेल्या प्रदेशात केलेली भटकंती छान वर्णन केली आहे. आफ्रिकेतले विविध लोक, त्यांचे जीवन, नरभक्षक टोळ्या, त्याने नाईल नदीच्या उगमाचा लावलेला शोध आणि त्या प्रवासातले अनुभव जबरदस्तच आहेत. त्याच्या स्वतःच्या लिखाणातले उतारेच्या उतारे आहेत. ह्या माणसाचा माझ्यावर अजूनही विलक्षण प्रभाव आहे. कॉलेज मधे परत आफ्रिका भेटली, तेव्हा इदी अमिनवर एक सिनेमा आला होता. तो बघितला, त्यातल्या काही गोष्टी बघून धक्का बसला होता. त्याच वेळी द. आफ्रिकेत वर्णद्वेषाविरोधात लढा चालला होता. नेल्सन मंडेला हे नाव पूर्ण जगात अतिशय प्रसिद्ध झालं होतं. इथियोपियातला दुष्काळपण खूपच गाजला होता. त्या साठी पैसे वगैरे पण गोळा केले होते.

अशी अगदी लहानपणापासूनच माझ्या मनात आफ्रिका घुसत गेली आणि कधी जायला मिळेल असं वाटत नसल्यामुळे मी माझ्याच मनात एक चित्र उभं करत गेलो.

असं सगळं असताना, २००७ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर मधे एक दिवस माझा बॉस अचानक माझ्याकडे आला. म्हणाला, 'नैरोबीला एक अर्जंट काम आहे. तुला जावं लागेल'. खरं तर माझा तसा काहीच संबंध नव्हता पण माझ्या नावाची निवड झाली होती. मी अक्षरशः थरारलो. ध्यानी मनी नसताना एकदम आफ्रिकासफर घडणार!!! मी तसंही नाही म्हणू शकत नव्हतो, आणि मी नाही म्हणायचा प्रश्न ह्या जन्मात तरी उद्भवणार नव्हता. जनरितीपुरते थोडे आढेवेढे घेऊन मी जायचे मान्य केले. दुबई ते नैरोबी जवळ जवळ ५ तासाचा प्रवास आहे. फ्लाईट रात्रीची होती. पहाटे पोचणार होतो. मला तर अति एक्साईटमेंटमुळे झोप आलीच नाही. चेक इन साठी मुद्दाम पहिला नंबर लागेल इतक्या लवकर जाऊन, खास 'कॅन आय हॅव अ विंडो सीट, अवे फ्रॉम द विंग्ज, प्लीज?' अशी विनंति करून, छान सीट पटकावली. जसजसं नैरोबीजवळ यायला लागलं तसतसं मला काहीतरी वेगळंच वाटायला लागलं होतं. हीच ती आफ्रिका जी लहानपणा पासून डोक्यात आहे. हीच ती आफ्रिका जिथे आपला हीरो 'सर रिचर्ड बर्टन' वणवण करत भटकला. आधुनिक मानवाचा उगम इथलाच. डिस्कव्हरी / नॅशनल जिऑग्राफी मधून दिसणारी, आफ्रिका आज प्रत्यक्ष दिसणार. खिडकी बाहेर अंधार होता. नैरोबी आलं. तो पर्यंत बाहेर पहाटेचा लालसर पिवळा संधिप्रकाश बर्‍यापैकी फुटला होता. त्यामुळे तर अजूनच अद्भुत वगैरे वाटायला लागलं. वैमानिकाची 'पट्टे आवळा, विमान उतरतंय' अशी हाक आली. विमान हळूहळू खाली सरकलं. आणि एका क्षणी मला त्या धूसर, लाल प्रकाशात आफ्रिकेचं पहिलं दर्शन झालं. तो क्षण मी विसरणंच शक्य नाही. एकदम 'कोडॅक मोमेंट'च.त्या जादूभरल्या प्रकाशात उगवत्या सूर्याच्या पार्श्वभूमीवर खास आफ्रिकेत असतात तश्या एका 'फ्लॅट टॉप' झाडाचं दर्शन झालं. नैरोबीच्या बाहेर एका प्रचंड मोठ्या पठारावर एकुलतं एक झाड उभं होतं. वरच्या चित्रात आहे तसा एखादा जिराफ नाहीतर एखादा हत्तींचा कळप वगैरे दिसला असता तर माझं काय झालं असतं कुणास ठाऊक. ते विमान त्याक्षणी उतरताना खाली धपकन् पडलं असतं तरी मला कळलं नसतं. माझा मित्र बाजूला बसला होता. मस्त घोरत होता. एक अतिशय सोनेरी क्षण घालवला त्याने. बिच्चारा.

'प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट' असं साक्षात गदिमाच म्हणून गेले आहेत. पण माझ्या बाबतीत नेमकं उलटं झालं. 'प्रतिमेहून प्रत्यक्ष भन्नाट' अशी माझी अवस्था झाली. पुढे नैरोबी मधे थोडासाच मुक्काम घडला. तिथलं जीवन अगदी थोडं का होईना पण जवळून बघता आलं. आपण प्रत्येक बाबतीत आपल्या मनात एक स्टिरीओटाईप बाळगून असतो. जो पर्यंत आपण वास्तवाला डोळसपणे सामोरे जात नाही तो पर्यंत ते आपण घट्ट पकडून वर कुरवाळतही बसतो. पण डोळे, कान आणि मन उघडं ठेवून वावरलं की ह्या आभासातून सुटका होते. 'लॉ ऑफ फिफ्टी-फिफ्टी' प्रमाणे कधी सत्य धक्का देतं कधी सुखावतं.

आपल्याला वाटतं की आफ्रिकन लोक म्हणजे एकजात सगळे धिप्पाड, काळे कुळकुळीत, कुरळ्या केसांचे वगैरे असतात. माझा पण असाच समज होता. पण तिथे तर मला चित्र थोडं वेगळंच दिसलं. माणसं काळीच पण त्या काळ्या रंगाच्या एवढ्या विविध छटा दिसल्या की बस्स. तेच केसांचं. कधी कुरळे, कधी सरळ आणि लांब (पण जास्तीत जास्त खांद्या पर्यंत, त्या खाली कधीच नाही), आणि कधी.... नाहीतच. :) असं सगळं. काही लोक एकदम धिप्पाड तर काही एकदम पाप्याचं पितर वगैरे. पुढे आफ्रिकेत अजून थोडं फिरलो तसं अजून वैविध्य दिसलं. माणसांचे तोंडावळे पण किती निरनिराळे!!! साधारण चेहर्‍यावरून, रंगावरून ते कुठले असावेत त्याचा अंदाज बांधता येतो. गोलसर चेहर्‍याचे धिप्पाड पश्चिम-आफ्रिकन, तसेच दिसणारे पूर्वेकडचे, टिपिकल उभट चेहर्‍याचे आणि अगदी भारतिय गहूवर्णाचे इथिओपियन, खूपच उंच आणि बर्‍यापैकी उजळ असलेले सुदानी. नाना प्रकार.

मी नायजेरियात एक गंमत ऐकली. तिथला माझा एक कस्टमर मला तिथल्या पराकोटीच्या विषमतेबद्दल सांगत होता. तो म्हणाला की ९५% संपत्ति ही फक्त ५% लोकांच्या हातात आहे. एखादा नायजेरियन यु.के., अमेरिका वगैरे देशांचा व्हिसा एखाद्या भारतियापेक्षा सहज मिळवतो. कारण काय तर जो नायजेरियन तिकडे जाऊ शकतो तो आर्थिक दृष्ट्या एवढा श्रीमंत असतो की त्याला तिथे सेटल वगैरे व्ह्यायची किंवा नोकरी वगैरे करायची गरजच नसते. तो शिकायला तरी जातो किंवा धंद्याच्या निमित्ताने तरी जातो. त्या उलट आपण भारतिय. काय वाट्टेल ते झाले तरी तिथून परत यायचे नाही असंच बहुतेक लोक करतात.

पण एक मात्र सतत जाणवतं. तरूण मंडळी मात्र अधिकाधिक शिक्षणाकडे ओढली जात आहेत. जग जसं जसं जवळ येत आहे, तसं तसं अगदी सामान्य माणसालाही इतर देशांत कशी प्रगति होत आहे, समृद्धी आहे हे घरबसल्या दिसतं आहे. पूर्वी असं नसावं. पण ह्या मुळे तरूण मंडळी जागरूक होत आहेत असं वाटतंय. अर्थात भायानक गरिबी आणि त्याहून भयानक राज्यकर्ते हा शाप आफ्रिकेच्या कपाळी कधीचाच लागला आहे. पण ही नविन जनता बाहेर नजर ठेवून उ:शापाचा मंत्र शिकायची धडपड करत आहे. इंग्लंड, अमेरिका, भारत इत्यादी ठिकाणी जाऊन शिकणार्‍यांचं प्रमाण वाढतंय. बाहेर शिकून परत मायदेशी येणारे किती तरी लोक मी पाहिले आहेत. अनेक शतकांच्या अंधारातून वर यायला वेळ आणि श्रम लागणारच पण तशी सुचिह्नं मात्र दिसत आहेत. कालचक्राचा नियमच आहे, प्रत्येक समाज वर खाली होत असतो. आज आफ्रिका कालचक्राच्या तळाशी आहे, नक्की शिखरावर जाणारच. इतक्या वर्षांच्या अंधारा नंतर आता समोर उज्ज्वल भविष्य असेलच असेल. (तिथे वावरताना पदोपदी हा विचार मनात येतो की आपल्या थोर इ. इ. राज्यकर्त्यांना ही दूरदृष्टी आहे का? आफ्रिके बरोबर आपले पूर्वापार संबंध आहेत. पण ते अजून वाढवणे, जोपासणे वगैरे होत आहे का? कुठे दिसले तरी नाही. पण ह्याच्या उलट चिनी. आज आफ्रिकेत जिथे पहावे तिथे चिनी दिसतात. एकेकाळी इंजिनियर म्हणला की तो भारतिय असायचा. आज चिनी असण्याची शक्यता ५०% असेल!!! नैरोबी विमानतळ ते शहर ह्या रस्त्याचं काम करणारे मजूर आणि तंत्रज्ञ दोन्ही चिनी होते. अजून काय बोलणार? असो.)

तर अशी ही आफ्रिका. माझ्या 'डोक्यातली' आणि 'खर्‍यातली'. माझ्या सुदैवाने दोन्हीत फारसा फरक नाही निघाला.