देहबोली...

on बुधवार, नोव्हेंबर ०५, २००८

मंडळी, मी जेव्हापासून मराठी आंतरजालावर फिरू लागलो तेव्हापासून बरीचशी संकेतस्थळं आणि ब्लॉग्ज नजरेस पडले. या सगळ्याठिकाणी निरनिराळ्या व्यक्तिंनी हाताळलेले विषय खरोखर खूपच वैविध्यपूर्ण आहेत. काही म्हणता काही बाकी ठेवलं नाहिये पब्लिकने. पण एक विषय मात्र असा आहे की जो खुपदा हाताळला जातो. आणि त्या विषयावरच्या चर्चा खरोखर प्राणपणाने लढवल्या जातात (एक मुंबई-पुणे वादच या वादाला मागे टाकू शकेल :) ) तो विषय म्हणजे.... बरोबर ओळखलंत, भाषा आणि भाषेशी संबंधित शुद्धलेखन वगैरे उपविषय. या सगळ्या चर्चा अतिशय रंगतातच. सध्या मिपावर चालू असलेली 'संस्कृत' बद्दलची चर्चा घ्या किंवा शुध्दलेखनावरच्या विविध चर्चा घ्या. बरीच नविन माहिती कळली आणि विचारांच्या विविध दिशा कळल्या. पण एका गोष्टीची गंमत वाटली... लोकांची मतं सहसा 'इस पार या उस पार' अशीच असतात, बहुतांशी. असो.

सर्व चर्चा या आपण तोंडाने बोलतो त्या भाषेबद्दलच आहेत. पण तात्यांसारख्या काही लोकांनी अजूनही काही भाषांचा उल्लेख केला आहे. जसे की, संगित ही एक भाषा आहे आणि ती युनिव्हर्सल आहे. खरंच आहे ते. बर्‍याचदा संगित हे शब्दांच्या आधाराने सुरू होतं पण पार पलिकडे पोचवतं.

तशीच अजून एक भाषा आहे आणि ती सुध्दा वैश्विकच आहे. तिचे प्राथमिक रुप जरी सगळीकडे सारखेच असले तरी व्यक्त स्वरुप स्थळकाळाप्रमाणे बदलते. ती आहे देहबोली... इंग्लिश मधे तिला 'बॉडी लँग्वेज' म्हणतात. माणूस कितीही अशिक्षित (रुढार्थाने) असला तरी ही भाषा त्याला येतेच येते आणि दुसर्‍याने या भाषेत बोललेलं कळतंच कळतं. ही भाषा इतकी परिणामकारक आहे की बर्‍याचवेळा संबंध वाढवायला किंवा बिघडवायला ती एकटी कारणीभूत ठरू शकते. या जगात वावरताना ती एक अतिशय उपयुक्त आणि म्हणूनच दुधारी असं शस्त्र आहे.

देहबोलीची ढोबळ व्याख्या करायची झाली तर अशी करता येईल... शरिराच्या साहाय्याने आपलं म्हणणं पोचवायचा प्रयत्न. या मधे मुख्य प्रकार म्हणजे हाताच्या हालचाली ज्याला आपण हातवारे म्हणतो, चेहर्‍याच्या हालचाली, शब्दांच्या उच्चारांवरील आघात, आवाजाची पातळी वर-खाली करणे वगैरे. आपली भाषा जशी आपल्या विचारांचा मागोवा घेत जाते तशीच आपली देहबोली सुध्दा आपल्या विचारांशी / भावनांशी घट्ट निगडित असते, किंबहुना आपल्या शाब्दिक भाषेपेक्षा कांकणभर जास्तच लगटून असते विचारांना.

माझ्या बाबतीत घडलेला एक किस्सा सांगतो की ज्यामुळे मला ही गोष्ट खूपच प्रकर्षाने जाणवली. मी एकदा सकाळी गोरेगावला लोकलमधे चढलो आणि मला अंधेरीला उतरायचे होते. गोरेगाव एका बाजूला येते आणि अंधेरी दुसर्‍या बाजूला. म्हणजे काय प्रकार ते मुंबईत राहणार्‍या लोकांना सांगायला नकोच. मी गाडीत चढल्यावर लोकांना विनंति करत करत दुसर्‍या बाजूच्या दरवाजाकडे मुसंडी मारत होतो. लोक शिव्या घालत होते. साहजिकच मी खूपच वैतागलो होतो. पण चिडून सांगतो कुणाला? (आज हा लेख वाचायचे भाग्य तुम्हाला मिळाले नसते ;) ). अंधेरी यायच्या आधी थोडावेळ एका दाराजवळ उभ्या असलेल्या आडमुठ्या माणसाबरोबर थोडा लडिवाळपणा झाला पण मी प्रसंग पाहून थोडा मवाळपणा पत्करला पण उतरताना मात्र थोडी धक्काधक्की झालीच. मी बोललो काहिच नाही पण माझा चेहराच सगळं काही बोलला असणार. आमचा एक सहकारी नेमका त्याच गाडीच्या मागच्या डब्यातून उतरला आणि मी उतरल्या उतरल्या माझ्या समोरच आला. त्याने पहिला प्रश्न केला मला, 'क्या हुवा? उसको मारेगा क्या?' मी थक्कच झालो. मी त्याला विचारलं 'तेरे को कैसे पता?' तो फक्त एवढंच म्हणाला, 'तेरा चेहरा सब कुछ बोल रहा था. तू उसको इतना गुस्सेसे देख रहा था की मालूम पड रहा था.' मतितार्थ असा की आपण कितीही उत्तेजित झालो तरी आपले संस्कार बर्‍याच वेळा आपल्याला आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवायला लावतात. पण आपला देह काय बोलत असतो ते आपल्याला कळत सुध्दा नसते. आणि म्हणूनच ही भाषा लै डेंजरस.

ज्याला या भाषेची जाण आली आणि नीट वापरायची अक्कल आली त्याने जगात वावरायची अर्ध्याहून अधिक लढाई जिंकली असं म्हणायला हरकत नाही.

शब्दांची भाषा आपण जसजसे मोठे होत जातो तसतशी शिकत जातो, पण देहबोली मात्र माणूस उपजतच घेऊन येतो. जन्म झाल्यावर रडून, 'मी जिवंत आहे होऽऽऽ!!! माझ्या कडे लक्ष द्या' अशी भावना ते नवजात पिल्लू कोणत्या अनाम प्रेरणेने देत असतं? भूक लागली की रडायचं हे कसं कळतं? थोडं मोठं झालं की पाळण्यावर टांगलेला खुळखुळा गोल फिरला की जिवणी आपोआप रूंदावते ती कशी? आपण जन्माला येतानाच हे देहबोलीचं ज्ञान घेऊन येत असतो. पण जसजसे आपण मोठे होते तसतसे या देहबोलीवर निरनिराळे संस्कार व्हायला लागतात. आपले आई-वडिल आणि इतर 'मोठे' लोक आपल्याला 'डूज' आणि 'डोन्ट्ज' शिकवायला लागतात. आणि यातून जन्माला येते ती 'संस्कारित' देहबोली.

आपली उपजत देहबोली मात्र खर्‍या अर्थाने वैश्विक आहे. रडण्याचा अथवा हसण्याचा सगळीकडे बहुधा सारखाच अर्थ लावला जाईल. पण हाताच्या एखाद्या हालचालीचा मात्र बरेच वेळा स्थळकाळसापेक्ष अर्थ लावला जाईल. म्हणजे आपल्याकडे एखाद्या माणसाकडे 'बोट' दाखवणं अतिशय असभ्य समजतात पण काही ठिकाणी लोकांना त्याचे काहीच वाटत नसेल. संस्कारित देहबोली ही एखाद्या वांशिक अथवा भाषिक गटापुरती बर्‍यापैकी सिमित असते. उदाहरणार्थ, आपण एखाद्याचे बोलणे ऐकताना 'मला तुमचे बोलणे कळते आहे' या अर्थी मान उभी (वर-खाली) हलवतो. पण दक्षिण भारतात बर्‍याच ठिकाणी विशेषतः केरळ मधे त्याच अर्थाने मान आडवी (डावी-उजवी) हलवतात. आपल्याकडे त्याचा अर्थ नेमका उलटा होतो.

देहबोलीची अजून एक गंमत आहे. जरी ती शब्दांवाचून भाषा असली तरी भाषेतले बरेच वाक्प्रचार देहबोलीशी खूपच जवळून निगडित असतात. बर्‍याच अरब देशांमधे 'मला काही देणं घेणं नाही' या अर्थी हाताची एक विशिष्ट हालचाल करतात. आपण जेवल्यावर नळाखाली हात धुतो ना तशी काहिशी ती हालचाल असते. मंडळी, लक्षात येतंय का? इंग्लिश मधे 'वॉश युवर हँड्स ऑफ समथिंग' हा वाक्प्रचार वापरतोच ना? पुरातन काळापासून विविध संस्कृतिचे लोक व्यापारानिमित्त एकमेकांच्या संपर्कात येत होते आणि भाषेची, संकल्पनांची, ज्ञानाची देवाणघेवाण होत होती, त्याचंच हे एक उदाहरण असू शकेल का? असेलही. शक्यता नाकारता येत नाही.

आपण आपल्या सांस्कृतिक परिघाच्या बाहेरच्या लोकांच्या संपर्कात येतो तेव्हा शब्दांपेक्षा देहबोलीचंच भान जास्त ठेवावं लागतं. तसेही शब्द आपल्याला कळत नाहीत, देहबोली मात्र त्या मानाने जास्त उपयोगी ठरते. मी भारताबाहेर आलो तेव्हां मला सुरुवातीलाच या गोष्टीचं भान आलं. मी अरबस्तानात नविनच होतो. एके दिवशी संध्याकाळी आमच्या कंपनीच्या गाडीत ड्रायव्हरच्या बाजूला बसून घरी चाललो होतो. उजवा पाय डाव्या पायावर ठेवला होता, पायाचा तळवा ड्रायव्हरच्या दिशेने झाला होता. ड्रायव्हर पण भारतियच होता आमचा. त्याला काहीच वाटले नसावे. पण गाडी एका सिग्नलला थांबली आणि ड्रायव्हर साईडला एक भलं मोठं जिएमसीचं (एक अति प्रचंड गाडी) धूड उभं राहिलं. काच खाली झाली आणि आम्हाला काच खाली करायची खूण झाली. आम्ही तसे करताच तो दुसरा माणूस, स्थानिक होता तो, अरबी भाषेत खूप चिडल्यासारखा बोलला. मला कुठं काय कळायला. पण आमचा ड्रायव्हर मात्र विंचू चावल्यासारखा पटकन् माझ्या कडे वळला आणि म्हणाला, 'आधी पाय खाली कर'. मी पण जरा घाबरलोच होतो. चूपचाप हुकमाची अंमलबजावणी केली. पण देहबोलीचा एक महत्वाचा धडा शिकलो. अरबी संस्कृतित पायाचा तळवा दाखवणे म्हणजे समोरच्याचा घोर अपमान समजला जातो. समोरच्याची देहबोली शिकून तिचा आपल्यासाठी कसा उपयोग करायचा हे भान आले.

प्रत्येकाचा एक वैयक्तिक परिघ (पर्सनल स्पेस) असतो. जसा आपला परिघ आपल्याला प्यारा असतो तसेच व्यक्त होताना समोरच्याचा परिघ आपण उल्लंघत तर नाही ना याचेही भान आपल्याला असले पाहिजे. या परिघाची आपली जाणिव आपल्या जडणघडणीवर अवलंबून असते. पण आपण समोरच्या व्यक्तिची या बाबत काय जाणिव आहे याचे भान ठेवले पाहिजे. बर्‍याच पाश्चात्य संस्कृतिंमधे स्त्री -पुरूष हे खूप सहजतेने शारिरीकदृष्ट्या निकटतेने वावरतात. पण एखादा पुरूष जर भारतात येऊन तितक्याच जवळ येऊन बोलायला लागला तर तो मार खाईल याचीच शक्यता जास्त आणि गंमत म्हणजे आपण का मार खातोय हे त्या बिचार्‍याला कळणार पण नाही. आम्ही खोबारला असताना, एक शुध्द महाराष्ट्रिय कुटुंब आमच्या ओळखीचे होते. साहेब जरा उच्चविद्याविभूषित आणि आंग्लाळलेले होते. त्यांच्या घरी पार्टीला जायचे असले तर बहुतेक सगळ्या बायकांना घाम फुटायचा. एकतर त्या नवराबायकोतला लडिवाळपणा बघावा लागायचा आणि निरोप घेताना साहेब त्यांच्या सवयी प्रमाणे सगळ्यांच्या गालाला गाल लावून निरोप घ्यायचे. (वहिनी मात्र जरा त्यामाने चतुर होत्या. त्या आपल्या भारतिय बाणा त्यामानाने बराच जपून होत्या :( ) तर मुद्दा हा की 'डिफरंट स्ट्रोक्स फॉर डिफरंट फोक्स' हे व्यवधान ठेवलंच पाहिजे.

देहबोली, त्याच व्यक्तिची, पण वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या रितीने वापरली जाते. आपण जेव्हा समोरसमोर एकाच व्यक्तिशी बोलतो तेव्हा साधारणपणे हातवारे कमी करतो. चेहर्‍याच्या हालचाली जास्त होतात. पण जर का आपण एखाद्या समूहाशी बोलत असू तर हाताच्याच नव्हे तर संपूर्ण देहाच्याच हालचाली जास्त होतात. मला माझ्या करिअर मधे विविध लोकांशी बोलण्याचा आणि एखादी गोष्ट त्यांच्यासमोर प्रभावीपणे मांडून ती पटवण्याचे प्रसंग खूपच येतात. मला या देहबोलीच्या जाणिवेचा खूपच फायदा झाला. जर का समोरच्या व्यक्तिची अथवा समूहाची देहबोली अगदी आत्मसात नाही पण नुसती समजून घेता आली आणी थोडीशी वापरता आली तरी एक प्रकारची आपुलकी प्रस्थापित करता येते आणि संवादचं सुसंवादात रुपांतर आपोआप होतं. आणि सुसंवाद स्थापित करणं हेच भाषेचं मुख्य काम नाही का?

तर मंडळी देहबोली बद्दल जागरूक व्हा, निरीक्षण शक्ति वाढवा आणि प्रभावी संवादक (इफेक्टिव कम्युनिकेटर ला हाच प्रतिशब्द आहे का हो?) व्हा.

1 comments:

अनामित म्हणाले...

dear Sir,
I am Impress for Your won Thinking, now we want differe types of bodylanguage thinking.

Regards.
Vikas.