इंदौर...

on सोमवार, नोव्हेंबर ०३, २००८

खोबार सारखं इंदौर पण आमच्यामनातला एक कोपरा अडवून बसलं आहे. लहानपणी इंदौरला जायचा / राहायचा खूप योग आला. १९८३ साली एक दिवस बाबा संध्याकाळी घरी आले ते ही बातमी घेऊनच की त्यांची बदली इंदौरला झाली आहे आणि आई बाबा आणि माझी ताई असे इंदौरला जाणार. माझे शिक्षणाचे महत्वाचे वर्ष असल्याने मी काही जाणार नव्हतो. मला फक्त दिवाळीच्या सुट्टीत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत इंदौरला जायला मिळणार होतं.

त्यानिमित्ताने, इंदौरला भरपूर येणंजाणं झालं. तो पर्यंत मुंबई एके मुंबई करणार्‍या आम्हाला इंदौर एक स्वर्गच वाटायला लागला होता. माझ्या (किंबहुना आमच्या सर्वांच्याच) आयुष्यातला तो एक खूपच सुंदर काळ आहे. आजही इंदौरचे नुस्ते नाव काढले तरी त्या सगळ्या जुन्या आठवणी मनात दाटायला लागतात. त्या काळी इंदौर तसं लहान आणि आटोपशीर गाव होतं. आयुष्य संथ आणि आरामशीर होतं. लोक भयंकर मोकळेढाकळे आणि आपल्याच मस्तीत जगणारे होते. पुलंच्या 'काकाजीं'सारखी माणसं पदोपदी सापडत होती. माझ्या साठी तर ते एक अद्भुतच जग होतं.

पहिल्यांदा इंदौरला गेलो ते १९८३च्या दिवाळीत. तेव्हा मुंबई - इंदौर 'अवंतिका एक्सप्रेस' गाडी नव्हती. खाजगी लक्झरी बसेस मधूनच सगळा प्रवास चालायचा. पवन ट्रॅव्हल्स, विजयंत ट्रॅव्हल्स ही नावं अजूनही आठवतात. मी रात्रभराचा / दूरचा एकट्याने केलेला हा पहिलाच प्रवास. बस मुंबई सेंट्रल मधून संध्याकाळी निघाली की सायन वगैरे करत आग्रा-मुंबई महामार्गाने वेग गाठायची. भिवंडीच्या पुढे पडघा नावाचे एक गाव आहे. ते येईपर्यंत साधारण जेवायची वेळ झालेली असायची. बहुतेक सगळ्या बसेस तिथेच थांबायच्या. ढाबा हा प्रकार पहिल्यांदा तिथेच अनुभवला. मस्त खाटा वगैरे टाकून लोक बसलेले असायचे. त्या खाटेच्या मध्यभागी एक लाकडी फळी आडवी टाकून जेवायचं. तिथली चव तर मला अजून आठवते. एका बाजूला तंदूर असायचा. मस्त गरम आणि कुरकुरीत रोट्या एकामागून एक फस्त व्हायच्या. शक्यतो डायवर / किन्नर साहेबांच्या जवळपास राहायचं म्हणजे बस चुकायची भिती नाही. जेवण वगैरे करून बस तिथून निघायची. त्या वेळी व्हीडीओ कोच हा प्रकार नुकताच सुरू झालेला होता. किन्नर साहेब मग एखादा फर्मास लेटेष्ट असा पिक्चर लावायचे. पिक्चर बघता बघता झोप लागायची. रात्री बस धुळे वगैरे मागे टाकत / कुठे तरी ५ मिनिटं थांबत भरधाव जात राहायची.

सकाळ व्हायची ती 'दुधी' मधे. दुधी हे महाराष्ट्र - मध्य प्रदेशाच्या सीमेवरचं एक छोटंसं गाव. माझ्या माळवी खाद्यजीवनाची सुरुवात खरी झाली ती इथे. पहिल्याच प्रवासात, बस पहाटे थांबली आणि जाग आली. अंधार होता, अजून उजाडायचे होते. काहीतरी ओळखीचा वास येत होता. खाली उतरलो. बघतो तर समोरच एका प्रचंड मोठ्या कढईमधे चक्क कांदेपोहे. तो पर्यंत माझी समजूत हीच की कांदेपोहे ही आपली मराठी माणसाची खास मिजास आहे. माझी मिजास मोडून पडली त्या दिवशी. इतके सुंदर कांदेपोहे क्वचितच खाल्ले आहेत मी. कांदेपोह्यांवर बारीक शेव घालून खायची खोड लागली ती तिथूनच. इंदौर मधे जवळ जवळ प्रत्येक टपरीवर एक भली मोठी कढई आणि तिच्यात पिवळ्या धम्मक पोह्यांचा डोंगर ठरलेलाच. बर्‍याच टपर्‍यांसमोर रबडीची पण कढई असायची. दुधीहून बस कुठलातरी एक घाट, महू वगैरे करत १० वाजेपर्यंत इंदौर गाठायची

माळव्यातली थंडी / गरमी दोन्ही बघितली. थंडीच्या दिवसात संध्याकाळी ६-६.३० च्या सुमारास लोकमान्य नगरातून गावात जायला बाहेर पडायचं, मस्त भटकायचं. जेल रोड, छप्पन दुकान, रेल्वे स्टेशन जवळचा बाँबे पावभाजी वाला (त्या वेळी आख्ख्या इंदौर मधे हा एकमेव पावभाजी वाला होता) अशी सगळी ठरलेली ठिकाणं होती. राजवाड्यावर मस्त 'पानीपतासे' (पाणीपुरी) मिळायचे. कचौरी तर इंदौरचीच. तळहाताएवढी मोठी. त्यात व्यवस्थित अनमान न करता भरलेलं सारण. त्याच्यावर हिरवीगार मिरचीची चटणी किंवा 'खटाई'... स्वर्गिय. त्यावेळी राजवाड्यावर जी.एफ. कचौरीवाला म्हणून एक प्रकार होता. हे साहेब संध्याकाळी ७-७.३० ला एका गाडीवर कचौरीचे दुकान थाटत असत. बरं त्यांचा माज आपल्या चितळ्यांपेक्षाही मोठा. त्यांचा ठेला ठराविक वेळच तिथे असे. ही कचौरी कशाकरता प्रसिध्द तर, तिखटपणासाठी. दोन कचोर्‍या खाऊन दाखव म्हणून पोरांच्या पैजा लागत. (जी.एफ. म्हणजे काय ते कळले नसेल तर गरजूंनी व्य. नि. करावा ;) ) उनाडक्या करत / खादाडी करत मनसोक्त भटकायचं आणि मग शेवटी सराफ्यात जायचं. घट्टंऽऽऽ रबडी (बरेच वेळा ती रबडी घरी वगैरे हाताने खाल्ली आहे आणि प्रत्येक वेळी साबण लावून हात धुवावे लागले आहेत तेव्हा कुठे हाताचा ओशट पणा कमी व्हायचा, जात नसेच पूर्णपणे) आणि इतर मालमसाला हादडायचा आणि त्या थंडगार हवेत, वार्‍यात कुडकुडत 'टेंपो' मधे बसून परत लोकमान्य नगर.

गरमी (आपल्याकडे उन्हाळा म्हणतात, इंदौरला मात्र गरमीच असते) मधे दुसरीच मजा. 'मधुशाले'ची. जागोजागी, कोपर्‍या कोपर्‍या वर मधुशाला. आधी कळलंच नाही हा काय प्रकार आहे ते. मधुशाला म्हणजे उसाच्या रसाचं दुकान. आणि तो रस सुद्धा एक माणूस तो चरक हाताने फिरवणार आणि दुसरा तो रस गोळा करत करत गिर्‍हाईकांना देत राहणार. आम्ही रात्री जेवण झालं की लोकमान्य नगराच्या गेट पाशी एक मधुशाला होती तिथे तासन् तास बसायचो. फक्त ४० पैशात एक मोठ्ठा बंपर भरून रस मिळायचा. आम्ही १-१ २-२ तास सहज तिथे टवाळक्या करायचो. माझे मित्र, ताईच्या मैत्रिणी कधी कधी मोठे लोक नाहीतर आम्ही सगळे पोरंपोरीच असे १५-२० जण तरी असायचो. माळव्यातली गरमी कडक असली तरी मुंबईसारखं उकडत नाही आणि रात्री हवा खूपच छान असते.

आम्ही मुंबईचे (माझ्या बाबांना शेजारपाजारचे लोक बंबई वाले सेठ म्हणायचे) त्या मुळे भाज्यांच्या किंमती वगैरे मुंबईच्याच सवयीच्या. नविन असताना एकदा दुपारी दारावर भाजी वाला आला. आईला काहितरी हवं होतं म्हणून आईने त्याला हाक मारली. भाव विचारले, टोमॅटॉ ५० पैशे किलो म्हणाला. आई फक्त आनंदाने नाचली नाही एवढंच. तिने चक्क ५-६ किलो टोमॅटो घेतले. मस्त सॉस करू वगैरे. शेजारच्या काकू त्यांच्या घराच्या ओट्यावरून बघतच होत्या. त्यांची लगेच कॉमेंट, 'तुम्ही काय बाई, मुम्बई वाले, परवडतं तुम्हाला.' आईला काही कळेना. तेव्हा काकूंनी खुलासा केला, 'अहो, गावात / मंडईत जा, ३०-३५ पैश्याच्यावर कोणी घेणार नाही. तुम्ही चांगले ५० पैशे देऊन घेतले चक्क.' आमचा सगळा आनंद एका क्षणात वार्‍यावर उडून गेला. इंदौर मधे असे पर्यंत आईने कोथिंबिर / आलं वगैरे कधी विकत घेतलं नसेल, भाजी घेतली की बचकाभर कोथिंबिर न मागता पडायचीच पिशवीमधे.

इंदौरची भाषा हाही काही एक औरच प्रकार आहे. ना धड हिंदी ना धड मराठी. एकदा आमच्या शेजारचा मुलगा संध्याकाळी आला आणि माझ्या आईला म्हणाला 'काकू, आई है क्या? बाबा आये है ऑफिसमेसे.' :) भाषिक ठेचा तर पदोपदी लागत होत्या. एखादा अत्रे / करमरकर नावाचा पोरगा अतिभयंकर आणि अतिशय कष्टाने मराठीत बोलत असेल हे माझ्या साठी काहितरी विचित्रच होतं. सवय झाली हळूहळू पण सुरुवातीला मात्र भयंकर वाटायचं. बरं त्या बोलीवर खास माळवी संस्कार आहेत. कोणताही इंदौरी माणूस 'हो' म्हणणार नाही. त्यांच्या भाषेत 'हाव' म्हणतात. (हा शब्द उच्चारात 'हाव' आणि 'हाउ' या मधे कुठेतरी येतो). 'मे आ रिया था / जा रिया था' असे सूरमा भोपाली छाप उच्चार.

अशा या इंदौरने एक खूप मोठा ओरखडा पण दिला आहे मनाला. १९८४ साली इंदिरा गांधींची हत्या झाली. पूर्ण देशात हिंसाचार भडकला. असं म्हणतात दिल्लीच्या खालोखाल इंदौर मधे शीखांचं शिरकाण झालं. इंदौर मधे शीखांची वस्ती खूपच आहे. एक खूप मोठा आणि सुंदर गुरुद्वारापण आहे तिथे. त्या दिवशी आई आणि ताई गावात गेल्या होत्या. अचानक गडबड सुरू झाली. लवकर घरी जाऊया म्हणून त्या गुरूद्वारापाशी टेंपो पकडायला म्हणून आल्या. त्याना हे शीखांचं वगैरे माहितच नव्हतं. त्या तिथे पोचेपर्यंत एक मोठा जमाव पण तिथे जाळपोळ करत आला. त्या भागात बरीच दुकानं शीखांची असावित. तो जमाव ती दुकानं जाळत होता. अचानक त्यांच्या ताब्यात एक शीख सापडला. त्या जमावाने त्याला खूप मारलं आणि शेवटी त्याच्या गळ्यात टायर टाकून अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळला. तो पळायला लागला तर त्याला काठ्यानी ढकलून ढकलून पाडलं. मी नंतर नुसतं ऐकलं तर खूप त्रास झाला. प्रत्यक्ष बघणार्‍यांची अवस्था तर कल्पनेपलिकडे झाली होती.

पण हा प्रसंग एक सोडला तर माझ्या मनावरचं इंदौर नावाचं गारूड कायम राहिल शेवटपर्यंत. आता इंदौरला जाणं होतं क्वचित. ओळखूसुध्दा येणार नाही इतकं बदललं आहे. ते आता एक शहर झालं आहे. सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत. जिथे आम्ही रहात होतो तो भाग तर आपला वाटतच नाही आता. १०-१५ मिनिटं गल्ल्यागल्ल्यातून फिरलो तेव्हा घर सापडलं. दुसरेच कोणीतरी रहात होते तिथे. एकदा वाटलं दार वाजवावं, घर आत जाऊन बघावं पण पाऊल पुढे नाही पडलं. जे माझ्या मनात कायम घर करून राहिलेलं घर आहे ते मला तिथे दिसणार नाही याची खात्रीच होती. माझ्यापुरतं माझं इंदौर माझ्याजवळ आहेच की. लोकांसमोर काय हात पसरायचे.

जी. एं.च्या 'कवठे' मधली कमळी दामूला म्हणते, 'अरे बाग छान नव्हती. आम्ही छान होतो'. थोर माणूस, माझ्या मनातल्या भावना त्यांनी कितीतरी आधीच लिहून ठेवल्या आहेत.

*****

आज अचानक हे सगळे आठवायचे कारण म्हणजे भोचक भाऊंचा माझ्या हिंदीचा बोलु कवतिके हा एक मस्त लेख.

आणि एक कारण म्हणजे आमच्या मधुशाला गँग पैकी एका मुलीचा नुकताच कँसरमुळे झालेला मृत्यू. खूप चटका लागला होता. भोचकभाऊंचा लेख वाचला आणि....