आमचे गोंय - प्रास्ताविक (२)

on मंगळवार, एप्रिल १२, २०११






***



आमचे गोंय - प्रास्ताविक (१) , प्रास्ताविक - (२) , प्राचीन इतिहास



***



गोवा म्हणलं, की सगळ्याना आठवतो तो निळाशार समुद्र, चंदेरी वाळू, मासळीचा स्वाद दुणा... आणि बरोबरची झिंग आणणारी पेयं.



सगळेच जण यांचा आस्वाद घेण्यासाठी कधी ना कधी तरी गोव्याला भेट देतातच. पण गेली १८ वर्षं गोव्यात राहून मला एक गोष्ट कळलीय ती म्हणजे, खरा गोवा या सगळ्यात आहेच, पण या सगळ्यापलीकडे एक गंभीर पुराणपुरुष गोवा आहे, जो तुम्हा आम्हाला २ दिवसांच्या बस टूरमध्ये अजिबात दिसत नाही. त्याला भेटण्यासाठी गोव्यातल्या सांदीकोपर्‍यातल्या गावांमधे जायला हवं. जंगलं धुंडाळायला हवीत आणि गांवकार लोकांच्या पुराण्या कथा ऐकायला हव्यात. म्हणून चला तर, मी, पैसा, आणि प्रीतमोहर तुम्हाला या एका वेगळ्याच गोव्याच्या सफरीवर घेऊन जातोय.



काही दिवसांपूर्वी प्रीतमोहरने गोव्याच्या पोर्तुगीजकालीन इतिहासाबद्दल एक लेखमालिका लिहायला सुरुवात केली. अत्यंत मनोरंजक भाषेत तिने महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांना अपरिचित असलेला गोव्याचा इतिहास सांगायला सुरुवात केली होती. पहिला भाग प्रसिद्ध झाल्यानंतर बिपिनला एक छान कल्पना सुचली.



ती म्हणजे गोव्याचा संपूर्ण इतिहास मिपाकरांच्या समोर आणण्याची. त्याच्या सूचनेवरून आम्ही हे शिवधनुष्य उचलायचा प्रयत्न करतोय. मी ६ डिसेंबर १९९२ पासून गोव्यात राहते आहे. माझी मुलं तर आता गोंयकारच झाली आहेत. प्रीतमोहर गोव्यातलीच "अस्सल गोंयकार". अशा आम्ही दोघीजणी वेगवेगळ्या तर्‍हांनी गोव्याशी संबंधित. आम्ही या संपूर्ण लेखमालिकेतले लेख लिहिणार आहोत.



आमच्यात कोणीच तसा इतिहासाचा शास्त्रशुद्ध, पद्धतशीर अभ्यास केलेला नाही, पण शक्य तेवढी अधिकृत माहिती जमा करून आणि शक्य तेवढ्या ठिकाणाना भेटी देऊन, लोकांशी बोलून, काही ऐकिवातल्या गोष्टींची मदत घेऊन लेखमाला आपल्यापुढे आणत आहोत. कोणाला आणखी काही माहिती असेल तर ती या निमित्ताने सगळ्यांपुढे आणावी ही विनंती. तसंच, लेखमालिकेत जर काही चुका झाल्या, काही उणीव राहिली तर जरूर दाखवून द्या. कारण गोव्याचा इतिहास अभ्यासायचा तर मोठी अडचण म्हणजे, पोर्तुगीजांच्या पूर्वीचा फारसा इतिहास स्थानिक लोकांच्या स्मरणात नाही. देवळांशी संबंधित कथा लोकमानसात आहेत खर्‍या, पण त्या ऐकिव अशाच आहेत, आणि त्यावरून अचूक काळनिश्चिती करणं खूपच कठीण आहे.



दुसरा एक अनुभव मी प्रीतमोहरच्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून लिहिला होता, की छत्रपती शिवाजी आणि संभाजी यांचा गोव्याशी खूप जवळून संबंध आला होता पण लोक त्याबद्दल फारसं बोलत नाहीत, किंवा जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाहीत. पोर्तुगीजानी त्याना सोयिस्कर तेवढाच इतिहास लोकांच्या कानी पडेल याची व्यवस्था केली होती. त्यामुळे, "शिवाजी महाराज आणि संभाजी यांच्या मोहिमांमुळे अर्ध्याहून जास्त गोव्यातले लोक धर्मांतरे होण्यापासून बचावले होते." किंवा "मुघलांनी आणि आदिलशहाने शिवाजी आणि संभाजीच्या विरोधात ऐन वेळेला पोर्तुगीजाना मदत केली नसती तर गोवा आणखी साधारण ३०० वर्षे पारतंत्र्यात राहिला नसता" यासारख्या गोष्टी शोधूनच कुठेतरी वाचायला मिळतात. पोर्तुगीजानी जुने किल्ले पूर्ण उध्वस्त करून टाकले आणि सगळीकडे फक्त आपलाच ठसा राहील याची पुरेपूर काळजी घेतली होती. किंबहुना, जुना वैभवशाली इतिहास लोकांनी विसरून जावा अशीच त्यांची इच्छा असावी. त्यामुळे गोव्यातले बहुतेक ख्रिश्चन लोक हे धर्मांतरित स्थानिकच असले, तरी पोर्तुगीज राजवटीचे गोडवे ते अजूनही गातात आणि त्यांच्या दृष्टीने शिवाजी आणि संभाजी हे "भायले" लोक होते हे क्लेशकारक आहेच, पण सत्य आहे.



गोव्यात एकूणच सुशेगाद वृत्तीमुळे असेल किंवा सध्याच्या बदलत्या परिस्थितीनुसार असेल. पण इतिहासाबद्दल खूप अनास्था आहे. माहितीच्या शोधात भटकताना अगदी अर्ध्या कि.मी.च्या अंतरावर असलेल्या गोष्टींबद्दलही "माहिती नाही" हे उत्तर अनेकदा मिळालं. ऐतिहासिक स्थळांजवळ योग्य दिशादर्शक पाट्या नाहीत, माहिती विचारायला आसपास कोणी नाही असे अनुभव अनेकदा आले. पाषाणयुगीन गुहांना सरसकट "पांडवांच्या गुहा" म्हणलं जातं, असे कित्येक प्रकार अनुभवले!



या लेखमालिकेच्या निमित्ताने महाराष्ट्राचा धाकटा भाऊ असलेला जो गोवा, त्याच्या इतिहासाबद्दल, तिथल्या लोकांबद्दल, गोव्याच्या भाषेबद्दल आणि एकूणच सामाजिक / सांस्कृतिक अंगांबद्दल, तुमच्या मनात काही कुतुहल जागं झालं तरी आमचे प्रयत्न सफल झाले असं मी म्हणेन.



- पैसा



क्रमशः



**



विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.



- टीम गोवा (पैसा, प्रीत-मोहर, बिपिन कार्यकर्ते)