माती - १

on रविवार, जून २८, २००९

"अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्ला..."

घराशेजारच्या मशिदीच्या खरखरत्या लाऊडस्पीकरमधून काझीसाहेबांचा आवाज आला आणि गाढ झोपलेला उस्मान एकदम गडबडून जागा झाला. अर्धवट झोपेतच त्याने बाहेर नजर टाकली, त्याला पटकन आपण कुठे आहोत हेच समजेना. बाहेर अजून अंधार होता, रात्र सरल्यासारखी वाटत नव्हती. काझीसाहेबांचं दुसरं आवर्तन सुरू झालं आणि मात्र त्याला हळूहळू भान यायला लागलं. आपण तर आपल्याच घरात आहोत की चक्क...

तो पर्यंत काझीसाहेबांची अझान संपली होती आणि लाऊडस्पीकर नुसताच जोरात खरखरत होता. उस्मानला म्हातार्‍याच्या युक्तीचं नेहमीच हसू यायचं. हा काझीसाहेब मोठा वस्ताद आहे. अझान झाली तरी तो जुनाट खरखर करणारा लाऊडस्पीकर चांगली पाचएक मिनिटे चालूच ठेवतात ते. सहसा अझान संपली की परत पांघरूणात गुडुप्प होतात लोक. इतक्या थंडीचं सकाळी सकाळी फजरेच्या नमाजाला उठायचा बरेच लोक कंटाळा करायचे. फारतर घरातच नमाज अदा करायचे. पण लाऊडस्पीकरच्या खरखरीने त्यातल्या बहुतेकांची झोप पार मोडायची आणि आता उठलोच आहोत तर जाऊन येऊ म्हणून ते मशिदीत दाखल व्हायचे.

इतक्या वर्षांच्या सवयीने उस्मान बरोब्बर अझान व्हायच्या आधीच जागा झालेला असायचा. पहाटेच्या शांत वातावरणात अझान ऐकताना तो अगदी तल्लीन व्हायचा. काझीसाहेबांचा आवजही गोड आणि सुरेल अगदी. रात्री इशाची शेवटची नमाज झाली की घरी भाकरतुकडा खाऊन म्हातारा मारूतिच्या देवळात भजनपार्टीला साथ करायला हजर. अझान झाली की मग उस्मान सावकाश उठून वझू करून निवांत चालत गल्लीच्या टोकाला असलेल्या मशिदीत दाखल व्हायचा. पण आज अझान होऊन गेली आणि आता काझीसाहेब नमाज सुरू करतील हे समजत असून सुध्दा त्याच्याने अगदी उठवत नव्हतं. रात्री उशिरा पर्यंत खूप वर्षांनी गावात परत आलेल्या नईमबरोबर आणि जुन्या दोसदारांबरोबर गप्पांचा फड जमवून तो घरी आला होता, जमिनीला पाठ लावून कुठे दोन तीन घंटे होतात न होतात तर अझान झाली. उठायचं जीवावर आलं होतं पण काझीसाहेबांचा आवाज आला परत आणि तो सवयीने उठलाच एकदम. त्याच्या हालचालीने रशिदाही जागी झालीच होती जवळजवळ. रात्री त्याच्या पोटावर येऊन झोपलेल्या चांदसाहेबला त्याने हळूच बाजूला केले आणि गडबडीने वझू करून तो पळतच मशिदीत गेला. नमाज सुरू झालीच होती. काझीसाहेबांनी निवांतपणे आटोपलं. नमाज झाल्यावर अजून दोन-चार जणांशी दुवा सलाम करून उस्मान घरी परत आला.

जवळ जवळ उजाडलंच होतं. नदीवरल्या देवळातली घंटा वाजायला लागली होती. उस्मानने त्या दिशेने हात जोडले आणि तो घरात शिरला. अंगणातल्या मोरीवर त्याने परत हातपाय धुतले, पावडरने दात घासले आणि मागच्या अंगणात गेला.

"मै बोली आज नमाजकू जात नै जाते, क्या की. कित्ती देर तक सोये..." रशिदा अंगण झाडता झाडता म्हणाली.

"हाव ना बेगम. नींद खुली मगर उठने का मनच नै करा."

"फिर!!! कैसे करेगा? रातकू कितना लेट आये तुम. चार दोस्ता मिले तो दुनिया भूलते तुम. चांदसाहेब भोत देर तक बैठा था खिडकीमे... अब्बू, अब्बी आते, कब्बी आते. उदरीच सोया बैठे बैठे."

उस्मान तिथेच पायरीवर टेकला. पहाटेचं मस्त वारं सुटलं होतं. ना धड अंधार ना धड उजेड. उस्मानला एकदम मस्त वाटायला लागलं.

"बेगम, आव ना. बैठो इदर." तो लाडात येत रशिदाला म्हणाला.

"तर क्या. बस इतनाच बाकी है अब. पूरी रात दोस्तोके साथ उडाओ और दिनमे बेगम को गोद मे बिठाओ." रशिदा लटक्या रागाने म्हणाली. पण तिलाही उस्मानचा प्रसन्न चेहरा बघून बरं वाटलं. ती बसलीच येऊन त्याच्या जवळ.

"अरे बेगम, तो काल नईम आला ना, दुबईवरून. किती दिवसांनी आला तो. जवळजवळ चार वर्षांनी. मग बसलो गप्पा मारत. सांगत होता तिकडच्या गंमती."

"दिसला होता मला तो काल गल्लीत. सलाम करून गेला. किती बदललाय तो. कपडे काय, सेंट काय, काळा चष्मा... एकदम सामने आके क्या भाभीजान बोला. मै तो पैचानीच नै उसकू. फिर बोला मै नईम."

"अरे हे तर काहीच नाही. त्याच्या अब्बासाठी, अम्मीसाठी काय काय आणलंय त्याने. आणि काजू बदाम खजूर तर विचारूच नको. पूरी गल्लीमे बाटेगा करके बोल रहा था."

बराच वेळ दोघं बोलत बसले होते. रशिदाला मात्र राहून राहून मियाचं लक्षण ठीक वाटत नव्हतं. ती उस्मानला चांगलं ओळखत होती. त्याच्या चेहर्‍यावर त्याचं मन तिला स्वच्छ वाचता येत असे. आजपण त्याचं काहीतरी बिनसलं आहे हे तिला कळत होतं. पण शक्यतो तो स्वत:हून बोलेपर्यंत ती त्याला छेडत नसे. आजही तसंच काहीसं तिला जाणवत होतं. तेवढ्यात उस्मानचं लक्ष घड्याळाकडे गेलं. तालमीला जायला उशीर झाला होता गप्पांच्या नादात. घाईघाईत तो परसदारी जाऊन आला आणि तालमीकडे निघाला.

उस्मान मुकादम हे पंचक्रोशीतल्या पैलवान मंडळीत फार मोठं नाव होतं. वयाच्या दहाव्या वर्षी कल्लाप्पा वस्तादाचा गंडा बांधला होता त्याच्या बापाने त्याला. पंधराव्या वर्षी वस्तादाने त्याला धायगावच्या जत्रेत पहिल्यांदा मैदानात उतरवला होता. तेव्हा पासून खुब्याचं हाड निखळल्यामुळे कुस्ती सोडे पर्यंत आस्मान कसे दिसते हे उस्मानला माहित नव्हते. कायम तालमीत पडलेला असायचा. खरंतर जेमतेम पाच सहा हजार वस्तीचं गाव त्याचं. त्यात परत मुसलमानाची दहा वीसच घरं. एवढ्याश्या गावातून आलेला उस्मान पार जिल्ह्यापर्यंत मजल मारून आला. महाराष्ट्र केसरीची तयारी करताना त्याचा तोल जाऊन तो नेमका पडला आणि पडता पडता उजवा हात आधाराला म्हणून खांबाला धरला तर पूर्ण वजन येऊन खुबाच निखळला. तेव्हापासून कुस्ती बंद झाली. उस्मान खूप हळहळला. पण अल्लाची मर्जी म्हणून गप्प बसला. पण लायकी असूनही आपण शोहरत मिळवू शकलो नाही याचे दु:ख त्याच्या मनातून कधीच गेले नाही. बापाबरोबर धंद्याला लागला. बापाने हळूहळू दुकान त्याच्यावर टाकायला सुरूवात केली. एके दिवशी शेजारच्या गावातल्या रशिदाचा रिश्ता सांगून आला. बापाने रिश्ता पसंत केला म्हणून निमूटपणे लग्न केले. पण त्याच्या नशिबाने रशिदा खूपच चांगली निघाली. उस्मान तसा थोडा गरम डोक्याचा, पण रशिदा मात्र प्रत्येक गोष्ट नीट विचार करणारी. सासू सासर्‍याला खूष केलं तिने. वर्षाच्या आत पाळणा हलला आणि चांदसाहेब घरात आला. एक दिवस अचानक अम्मी हार्ट अ‍ॅटॅकने गेली आणि तिच्या दु:खात अब्बाही निघून गेले. आता उस्मान, रशिदाबेगम आणि चांदसाहेब एवढेच राहिले. धंदा असला तरी मिळकत फार नव्हती. दोन वेळचं खाऊन सुखी होते.

कुस्ती संपली पण पैलवानकी संपली नाही. रोज नियमाने मेहनत केल्याशिवाय उस्मानला चैनच पडत नसे. आणि तालमीतल्या नवीन पोरांना मातीत घोळवायचा जिम्मा त्याच्याकडेच दिला होता वस्तादानं. उस्मान तालमीत शिरला. कापडं काढली, मारूतीच्या समोर जाऊन नमस्कार केला आणि जय बजरंग म्हणून आखाड्यात उतरला. पण आज काय त्याचं मनच लागंना. तेवढ्यात एक दोन पोरांनी त्याला विचारलं पण, "काय झालं वस्ताद? आज आंगात जोर नाही जनू." भानावर येत तो परत समोरच्या पोराला भिडला. पण जरा वेळानं त्याचं त्यालाच गोड वाटेना. तो हौद्यातून बाहेर आला आणि कापडं करून निघाला. नदीवर जाऊन आंघोळ आटपून घरी आला. येऊन निवांत बसला तो अंगणातल्या खुर्चीवर. रोजच्यासारखं रशिदा दूधाचा लोटा त्याच्यासमोर ठेवून घरात गेली. जरा वेळानं बाहेर येऊन बघते तर लोटा तसाच आणि उस्मान शून्यात नजर लावून बसलेला. मग मात्र तिला राहवलं नाही.

"क्या सोचते जी? फजरसे देखी मै. क्या तो बी सोच रहे तुम."

"नाही, काही नाही." उस्मान भानावर येत म्हणाला.

"नाही कसं? मेरेसे नै छुपा सकते तुम जी. बोला ना... काय झालं?"

उस्मान घुटमळला. उगाच एक दोन वेळा त्यानं घसा खाकरल्यासारखं केलं, बोलू की नको, कसं बोलावं... रशिदाला कळेचना. असं काय आहे याच्या मनात?

"रहेनदो, मेरेकू कामा है... आप सोचते बैठो." तिने अर्धवट उठल्यासारखे केले. तिची युक्ती बरोब्बर लागू पडली आणि एकदम पूर्ण धीर एकवटून उस्मान तटकन बोलला...

"मी काय म्हणतोय बेगम... नईमशी बोलून कुठे दुबईत नोकरी मिळते आहे का बघू का?"

"हाय अल्ला!!! तर सकाळपासून हे चाललंय वाटतं हुजूरच्या डोक्यात. काही गरज नाही. खाऊन पिऊन सुखी आहोत आपण. आप कमा रहे ना? दो वखत का खाना नसीब हो रहा ना? मै पूछती क्या करना दुबई हमको?" रशिदा उसळून म्हणाली.

उस्मानला अंदाज होताच, रशिदा काय बोलणार याचा. तिला कसे पटवावे याचा विचार खरंतर तो करत होता. नईमशी बोलायचे त्याने मनात पक्के केलेच होते.

"ऐसा देखो बेगम, तुम ठीक बोली." तो तिच्या कलाकलाने घेत म्हणाला. "दो वखत की रोटी तो हो रही नसीब, पण जरा पुढचा विचार कर. दुकान कसे चालले आहे ते तुला माहितच आहे. काही खास नाही. अल्लाने एवढा सोन्यासारखा पोरगा आपल्याला दिला आहे. त्याच्या परवरिशची काही सोय नको का? मी २-३ वर्षांसाठी जाऊन येतो. बक्कळ पैसा मिळेल. मग आहोतच आपण इथे. चांदसाहेब खूप हुशार आहे. परवाच मास्तर आले होते दुकानात ते सांगत होते. क्या पता? कल को अच्छा पढेगा डाक्टर बनेगा तो पैसा तो लगेगा ना? मग काय करणार आपण?"

उस्मानला माहित होते, चांदसाहेब हा रशिदाचा अगदी सगळ्यात नाजूक कोपरा मनातला. एरवी कोणत्याही गोष्टीचा नीट विचार करणारी रशिदा याबाबतीत मात्र कमजोर पडते. त्याने बरोब्बर तिथेच नेम धरला. पण हा विषयच एवढा विचित्र होता की रशिदाच्या मनाची थोडी चलबिचल झाली तरी ती काही बधली नाही. तिचा हेका चालूच होता.

"हे बघ बेगम, आपण काही पैसेवाले नाही. एका पोराची परवरिश करायची आहे आपल्याला. पण मी तिकडे गेलो तर पैसाही मिळेल आणि आयुष्यात एकदा तरी मक्का मदिना बघायची इच्छा आहे माझी ती पण मला पूर्ण करता येईल. पैगंबरसाहब जहाँ चले सो वो मिट्टी कितनी पाक होगी? मेरेकू एक बार जरूर होना. तुम सबकू भी एक बार घुमाउंगा. बेगम ऐसा मौका बारबार नही आता."

"पण लोक तिथे जातात, तिथे फसवतात, वाट्टेल ते घडतं. माझ्या मयक्याला एक बाई आहे, तिचा शोहर तर १० वर्षं झाली अजून एकदाही आला नाही. पत्र येतं, पैसे येतात पण ते काय खाक खुषी देतात? मला भिती वाटते. आणि मिट्टी वगैरे सगळं ठीक आहे, पण त्या मिट्टीच्या नादाला लागून आपली मिट्टी नको व्हायला."

"काय बोलते तू बेगम? नईम माझा चांगला मित्र आहे. तो मला असं फसवणार नाही. मै अपनी जानकाभी भरोसा उसपे कर सकता हूं. मी एक काम करतो. आधी त्याच्याशी बोलून तर बघतो. आणि मग आपण ठरवू. आधीच कशाला नाही म्हणतेस." तो अगदी निकराने म्हणाला. रशिदालाही थोडी लालूच, थोडी उस्मानच्या हट्टीपणाची भिती वाटायला लागली होती. त्याने अगदी डोक्यात घट्ट धरलंच आहे हे जाणवलं तिला. त्याला जास्त विरोध केला तर तो अजून अडून बसेल हे तिला माहित होतं. परत चांदसाहेबच्या परवरिशची फिकीर होतीच तिलाही. अगदी काही घराला सोन्याची कौलं लागलेली नव्हती. तिचा विरोध लटका पडत गेला. उस्मानच्या चेहर्‍यावर तजेला आला. तो नाश्ता करायला बसला.

"अब्बा..." चांदसाहेबाची सकाळ झाली होती. स्वारी उठून धावत धावत उस्मानपाशी येऊन घट्ट बिलगली. "अब्बा, कुठे गेला होता? मी कित्ती कित्ती वाट बघितली रात्री?"

"मियाँ, मी काय पळून गेलो होतो का? इथेच तर होतो गल्लीमधे. तो नईमचाचा आलाय ना? त्याच्या बरोबर गप्पा मारत होतो. त्याच्या घरी." उस्मान चांदसाहेबला जवळ घेत म्हणाला. बापलेक बराच वेळ गप्पा मारत मस्ती करत बसले. रशिदा काम करता करता तृप्त होऊन त्यांच्या खेळाकडे बघत होती. मधेच तिचे डोळे भरून आले. तिने मनोमन दुवा मागितली, "या अल्लाह, या नबी, आमच्यावर लक्ष ठेव. नेकी असू दे, हरामाचा पैसा नको, बरकत दे."

उस्मान दुकानात जायला निघाला. जाताजाता तो नईमच्या घरी डोकावला. आज बोलून टाकायचंच. चांगल्या कामात देरी नको. बघू नशिब कसं आहे. नईम बाहेरच बसला होता. नुकताच उठलेला दिसत होता. आळसावून बसला होता.

"सलाम आलेकुम, नईममियाँ"

"आव आव, उस्मानसेठ. अम्मी दो कप चाय भेजना. उस्मानमियाँ आये है."

"क्या नईंम? सुब्बे सुब्बे मजाक नक्को करू भाई. कसला उस्मानसेठ आणि कसलं काय?"

"काय झालं उस्मान? कुछ गडबड? कल तक तो सब ठीक था ना भाई!!! "

"गडबड नाही नईम. पण तुझ्याशी एक बोलायचं होतं."

"अरे बोल ना मग. इतना हिचक क्यूं रहा तू?" तेवढ्यात चहा आला.

"नईम एक बात बोल, मला दुबईत काही काम मिळेल का?" चहाचा घोट घेत घेत उस्मानने कसेबसे विषयाला तोंड फोडले.

"अब्बे साले... ये बात है क्या? तो उसमे इतना शरमा क्यू रहा है पूछनेमे? मला वाटलं तुला काही पैसा वगैरे पाहिजे. नोकरी पाहिजे काय? ठीक आहे. मी एकदम कसं सांगू? पण दुबईमधे मी ज्या शेखकडे काम करतो ना, तो खूप मोठा माणूस आहे. त्याचे नोकर मोजायला एक माणूस ठेवावा लागेल. माझ्यासारखे ड्रायव्हरच दहाबारा आहेत त्याच्याकडे. काहीतरी करुच आपण. मी माझ्या मॅनेजरला विचारून बघतो. आणि तुला सांगतो." नईम अगदी सहजतेने म्हणाला. जणू काही मॅनेजरला विचारायचे ते केवळ उपचार म्हणून, बाकी सगळं पक्कंच झालंय. त्याची सहजता बघून उस्मानही सुखावला.

"काय काम करावं लागेल रे मला? मला तर ड्रायव्हिंग येत नाही."

नईम जोरात हसला... "सबर करो दोस्त, सबर करो. अरे आत्ताशी कुठे आपण बोलायला लागलोय. आणि तू नोकरी पक्कीच समजून उडायला लागला? वेळ लागतो रे. आणि काम मात्र काय पडेल ते करावं लागेल. हे नाही करणार ते नाही करणार नखरे नाही चालत तिथे. बघ, विचार कर." उस्मान आता सगळ्या विचारांच्या पलिकडे पोचला होता. त्याला आता डोळ्यापुढे दुबई, तिथले शेख, वाळवंट, मक्का, मदिना, उंट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसा दिसायला लागला होता. त्यासाठी तो काय वाट्टेल ते करायला तयार होता.

तो नईमला म्हणाला, "हरकत नाही, नईम. बिल्कुल तक्रार नाही करणार. तू बोल तुझ्या साहेबाशी." नईमने परत एकदा त्याला आश्वासन दिले की तो पत्र लिहिल लवकरच. उस्मान हवेत तरंगतच दुकानात गेला. पुढचे काही दिवस तो केवळ शरीराने गावात होता. बाकी दुबईला तर तो कधीच पोचला. त्याला आता स्वप्नातही दुबई दिसत होती.

पाच सहा दिवसांनी एका संध्याकाळी नईम उस्मानच्या घरी आला. "उस्मान, एक खबर है. मी ज्या एजंटकडून दुबईला गेलो होतो ना त्याच्याशी मी बोललो. त्याला मी सगळी कल्पना दिली. माझ्या चांगल्या ओळखीचा आहे तो. त्याला म्हणलं की, उस्मान माझा दोस्त आहे आणि तो आपल्या पोराच्या भल्यासाठी दोन तीन वर्षं दुबईला जायचं म्हणतोय. काही असेल तर सांग. काल त्याने फोन केला होता. तो म्हणतोय की दुबईला एक ऑफर आहे. पण त्यात जरा प्रॉब्लेम आहे."

"काय?"

"हे बघ तो शेख खूप मोठा माणूस आहे. त्याच्याकडे खूप पैसा आहे. तो गरीब देशातल्या हुशार मुलांना घेऊन जातो आणि त्यांना खूप शिकवतो, पैसा देतो. एजंट म्हणतोय तुझ्याबरोबर चांदसाहेबाला घेऊन जायला तयार असशील तर आत्ता नोकरी देतो."

"काय? नईम तू काय बोलतोय तुला तरी कळतंय का?", उस्मान अक्षरशः हादरला. हे काहीतरी भलतंच समोर येत होतं.

"हे बघ उस्मान. मला कळतंय. आणि पटतंय पण. अरे असं बघ, तू पण त्याच शेखकडे नोकरी करणार, आणि चांदसाहेबपण तिथेच राहणार. मग काय हरकत आहे?"

"अरे पण, त्या ६ वर्षांच्या पोराला घेऊन इतक्या लांब कसा जाणार मी? आणि तो त्याच्या अम्मीशिवाय कसा राहिल? शक्य नाही ते."

"बघ बाबा, चांगला चान्स सोडतो आहेस तू. अरे अशी बरीच मुलं आहेत तिथे म्हणे. चांदसाहेबसाठीच करतो आहेस ना तू हे सगळं? मग, अशी संधी स्वप्नात तरी मिळाली असती का तुला? माझं ऐक आणि हो म्हण."

"नईम, बेगमको पूछेबिना मै कुछ बोल नही सकता."

"ठीक है, उस्मान, बराबर है. लेकिन बेगमको मनाओ. बायका प्यार मोहब्बत मधे अडकतात. दुनिया काय चीज आहे हे त्यांना माहित नसते. तू बेगमला पटव कसेही करून. आपल्याकडे अजून दोन दिवस टाइम आहे. याद रख. चलता हूं. खुदा हाफिझ."

नईम गेला. उस्मानच्या डोक्यात एक भुंगा सोडून गेला. दिवसभर तो भुंगा त्याचा मेंदू पोखरत राहिला, पण त्याची रशिदासमोर हा विषय काढायची हिंमतच नाही झाली. पण वेळ हातची जात होती. कसेही करून रशिदाला पटवायलाच पाहिजे. त्याने दुसर्‍या दिवशी हळूच तिला सांगितले.

"अल्ला रहम करे, मियाँ, आप होशमे तो है ना?" रशिदाचा अवतार केवळ बघण्यासारखा होता. "आपको बोल्तेभी खराब नै लगा? आज बोले सो बोले. परत बोललात तर माझ्यासारखी वाईट नाही कुणी, सांगून ठेवते." दिवसभर उस्मान तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता. तिथे गेल्यावर चांदसाहेब कसा सुखात लोळेल, शिकेल, मोठा माणूस होईल. सग्गळं सग्गळं सांगून झालं. पण ती अज्जिबात बधली नाही. शेवटी नाईलाज होऊन त्याने नईमला नकार कळवला.

"देख उस्मान, तू मेरा दोस्त है. मी बघतो काही मार्ग आहे का ते." उस्मानपुढे मान डोलावण्याशिवाय उपाय नव्हता. नईम एवढ्या आपुलकीने सगळं करत होता, त्या ओझ्याखाली तो अजून दबत होता.

मधे एक दोन दिवस गेले आणि परत एकदा नईम उस्मानला भेटायला त्याच्या दुकानावर आला. "देख उस्मान, भाभी काय म्हणते की ती चांदसाहेबला एकटं सोडणार नाही ना? मग भाभीलापण नोकरी मिळाली तर? शेखच्या घरी नोकरी. त्याच्याकडे कुक किंवा मेड वगैरे म्हणून भाभीला नोकरी मिळवून दिली तर? आधी तुम्ही दोघं जा आणि तू सेट झालास, तुला तिथे पटलं तर मग पाच सहा महिन्यात भाभीपण येईल. मग तर झालं?"

"अरे नईम, म्हणजे आम्ही सगळेच तिथे? मला तर तू आजकाल काय बोलतो आहेस ते कळेनासंच झालंय. मी नुसती एक साधी नोकरी मागितली आणि इथे तू आणि तुझा तो एजंट आख्खं कुटुंबच्या कुटुंब पाठवायला निघाले!!!"

"उस्मान, प्रश्न नंतर सोडवत बस. आधी संधी साधून घे. तो शेख खूप मोठा आणि दयाळू आहे." बराच वेळ तो बोलत होता. उस्मान हळूहळू परत त्याच्या खुशहालीच्या स्वप्नात जायला लागला. शेवटी त्याच्याकडून हा नवीन प्रस्ताव रशिदाबरोबर चर्चा करेन या आश्वासनानंतरच नईम गेला.

उस्मानने अक्षरशः आपली सगळी बुद्धी पणाला लावून रशिदाला पटवले. नईमने जो आकडा सांगितला होता तो तर तीला मोजता पण येत नव्हता. एवढी संधी समोरून चालत येत आहे म्हणल्यावर तीपण हळूहळू डळमळली. पुढच्या गोष्टी पटापट घडल्या. तिघांचे पासपोर्ट एजंटनेच बनवून दिले. सगळे फॉर्म्स भरून घेतले. सह्या घेतल्या. एव्हाना नईम परत गेला होता. आता व्हिसाची वाट बघणे. रशिदाला तर हे सगळे शब्द कळतही नव्हते. ती सतत दुवा करत होती. सगळं काही नीट होऊ दे, देवा परमेश्वरा!!! चांदसाहेब तर पार बावरून गेला होता. त्याला फक्त एवढेच कळले होते की अब्बू आपल्याला घेऊन कुठे तरी लांब चालले आहेत. आणि अम्मी येणार पण नंतर. भिती वाटत होतीच त्याला. पण उस्मान त्याला रोज आपण विमानात बसणार, मग ते विमान कसे आकाशात जाणार वगैरे सांगून रमवायचा. त्यामुळे त्याला पण उत्सुकता लागत चालली होती. एकदाचा व्हिसा आला आणि आता लोकांना सांगायला हरकत नाही असा विचार करून तो सगळ्यात आधी काझीसाहेबांना सांगायला गेला.

"बेटा उस्मान, जो भी कर रहे हो सोच समझके करो. अल्लाह को याद करके करो. लक्षात ठेव, सुख पैशावर अवलंबून नसतं. त्याही पलिकडे असतं. सांभाळून रहा." काझीसाहेब म्हणत होते.

"हो काझीसाहेब. मी लक्षात ठेवेन. मला तिथे गेल्यावर अरबस्तानातल्या पवित्र मातीत रहायला मिळेल. जिथे पैगंबरसाहेब राहिले ती माती पवित्र आहे."

"उस्मान, मिट्टी मिट्टी होती है. उसमे पाक क्या नापाक क्या? माणूस पाक तर माती पण पाक. हा नजरेचा फरक आहे. मातीच्या मागे लागून माती करून घेऊ नकोस. कल्पनेतल्या सुखसमृध्दीसाठी तू वास्तवातल्या सुखाचा सौदा करतो आहेस. तू निर्णय घेतलाच आहेस. कृपाळू परमेश्वर तुझं रक्षण करो."

तयारी होत होती. रशिदाचा जीव रोज थोडा थोडा तुटत होता. कितीतरी वेळा हे सगळं एक स्वप्नं ठरावं, आपल्याला एकदम जाग यावी असं तिला वाटायचं. पण स्वप्नं चालूच राहिलं. संपलंच नाही. उस्मानशी काही बोलायला जावं तर तो त्याच्या स्वप्नांमधे एवढा गुरफटला होता की त्याला आता त्यापुढे सगळं जग तुच्छ वाटत होतं. आपला साधा सरळ नवरा अचानक एवढा कसा बदलला याचंच तिला आश्चर्य वाटत होतं. तिच्या सगळ्या गप्पा ऐकून घेणारा, तिला खुष ठेवायला धडपडणारा उस्मान गायबच झाला होता आणि त्याच्या जागी हा अगदी हुबेहूब त्याच्या सारखा दिसणारा पण आतून पूर्णपणे वेगळा असलेला उस्मान तिला दिसत होता. हे बरोबर नाहीये, तिचे मन सारखे तिला सांगत होते. पण आता प्रकरण एवढं पुढे गेलं होतं की ते थांबवणं आता शक्य नाही हे तिला कळत होतं. आणि एकदाचा तो दिवस आला. उस्मान आणि चांदसाहेब नवीन कपडे घालून तयार होऊन बसले होते. रशिदाची आई आणि भाऊ आले होते. त्यांना पण हे सगळे पटले नव्हते पण पोरीच्या संसारात कसं बोलणार म्हणून ते गप्प होते. दारात गाडी आली. तालुक्याला रेल्वे स्टेशनपर्यंत गाडीतून जायचे होते. गल्लीतले लोक जमले. काझी साहेब आले. त्यांनी दुवा-ए-सफर म्हणला. रशिदा आणि उस्मान एवढ्या सगळ्या लोकांसमोर फक्त डोळ्यांनीच एकमेकांशी बोलत होते. त्या क्षणी उस्मानही त्याच्या स्वप्नाच्या दुनियेतून खाली आला होता. दोघं गाडीत बसले, उस्मानने 'बिस्मिल्लाह अर्रहमान अर्रहीम' म्हणले, ड्रायव्हरने गाडी सुरू केली. काही झाले तरी आता मागे वळून बघायचे नाही, उस्मान स्वतःला बजावत होता. पोराच्या भल्याकरता देत असलेली किंमत त्याला चुकती करायचीच होती. त्याने डोळे पुसले आणि चांदासाहेबकडे बघितले. तो बिचारा भेदरून त्याला घट्ट बिलगून बसला होता. त्याला हे सगळं कळत नसलं तरी असह्य होतंय हे स्पष्ट जाणवत होतं त्याच्या चेहर्‍यावरून. उस्मानने त्याला गोष्ट सांगायला सुरूवात केली. थोड्यावेळाने चांदसाहेब झोपून गेला.

जिल्ह्याच्या गावी क्वचितच जाणार्‍या उस्मानला मुंबई आल्यावर भयानक दडपून गेल्यासारखं झालं. तिथले रस्ते, दुकानं, गाड्या, इमारती. त्याने सिनेमात जरी हे सगळे बघितले असले तरी प्रत्यक्षात बघितल्यावर तर तो घाबरूनच गेला होता. एजंटचा माणूस त्याला स्टेशनवर घ्यायला आला होता. तिथून एक दिवसापुरतं त्यांना एका लॉजवर नेलं त्याने. दुबईला जायचे विमान संध्याकाळी होते. दुपारी तो एजंट दोन नवीनच माणसांना घेऊन आला.

"उस्मान, ये दोनो साब डॉक्टर है. चांदसाहेबला तपासणार आहेत. शेखसाहेबांना मुलं त्यांच्यासमोर एकदम नीट आणि धडधाकट दिसायला हवी असतात." त्यांनी चांदसाहेबला तपासले. सगळे काही ठीक होते. उस्मान त्या आत्ता पर्यंत न पाहिलेल्या दयाळू शेखसाहेबांना दुवा देत होता. तो अगदी भारावून गेला होता. कोण कुठला शेखसाहेब. केवळ गरिब मुलांना मदतच नव्हे तर त्या करता त्या मुलांच्या आईवडिलांना पण नोकरी देतो हा शेखसाहेब. वल्लाह... काय पाक आणि नेकदिल आहे माणूस. प्रत्येक नमाजानंतर तो त्या शेखसाहेबांसाठी मुद्दाम दुवा देत असे. बास्स... आता उद्या दुबई. त्या शेखसाहेबांना एकदा भेटायचे आणि आभार मानायचे. बरोबर असलेला एजंटचा माणूसपण सतत शेखसाहेबांबद्दल बोलत होता. शेखसाहेब कसे दानी आहेत, त्यांनी गरीब देशांत किती मशिदी बांधल्या आहेत, दर वर्षी रमझानमधे लाखो रूपये कसे दान देतात... सतत हेच.

संध्याकाळी विमानतळ. उस्मानला आता मात्र खरंच भिती वाटायला लागली होती. चांदसाहेब तर पार गारठूनच गेला होता. एकदाचं सगळं पार पडलं आणि विमान उडलं. चांदसाहेब उस्मानला जो चिकटून बसला होता तो काही केल्या सोडतच नव्हता. मधे एकदा एअर होस्टेस्स त्याच्यासाठी चॉकलेट्स आणि खेळणी घेऊन आली तेव्हा तो जरा खुष झाला होता. पण तेवढंच. अडिच तीन तासात विमान दुबईला पोचलं. उस्मानने जे काही दृष्य खिडकीतून बघितलं ते त्याला जन्नतपेक्षाही जास्त मोहवून गेलं. असंख्य दिव्यांनी जमिन अगदी लगडून गेली होती. अंधार नावालाही दिसत नव्हता. जसजसं विमान खाली आलं तसतसे रस्ते आणि त्यावरून वेगाने धावणार्‍या मोटारी दिसू लागल्या. विमानाचा एक जोराचा आवाज आला आणि हलकासा धक्का बसून विमानाने जमिनीला स्पर्श केला. विमान अल्लाद उतरले. बराच वेळ झाला तरी विमान चालतच होते. शेवटी एकदाचे थांबले. एजंटने उस्मानला सगळे व्यवस्थित समजवले होते. त्याप्रमाणे तो चांदसाहेबला घेऊन विमानाच्या बाहेर आल्यावर तिथे त्याला एक माणूस भेटणार होता. तो पुढचे सगळे सोपस्कार आटोपून त्यांना मुक्कामाला नेणार होता. चांदसाहेब झोपला होता. त्याला तसाच घेऊन उस्मान बाहेर आला. त्याला काही शोधायची गरजच पडली नाही. तिथे पायघोळ अरबी कपडे घातलेले दोघंजण उभे होते. त्यांच्या हातात फोटो होते. त्यांनी उस्मानला लगेच इशारा केला. त्या दोघांचे पासपोर्ट ताब्यात घेऊन त्यांना पुढचे सोपस्कार पार पाडायला घेऊन गेले. उस्मान बिचारा ते जातील तिथे त्यांच्या मागेमागे फिरत होता. ते काहीच बोलत नव्हते. त्याचा खांदा अवघडला होता. एकदाचे सगळे झाले. सामान घेऊन त्यांना विमानतळाच्या बाहेर आणले. एका भल्या मोठ्या व्हॅनमधे बसवले. गाडी निघाली. जवळ जवळ तासभर गेल्यावर एक खूप मोठ्ठं गेट आलं. त्या गेटच्या आजूबाजूला खूप हिरवळ आणि झाडं होती. गाडी आत आली. बरोबरचे ते दोघं आधी खाली उतरले. उस्मान चांदसाहेबला घेऊन उतरला.

तेवढ्यात त्या दोघांतला एक जण त्याच्या जवळ आला आणि हिंदीत म्हणाला.... "बच्चा इधर दे दो. हमारे पास. और तुम ये दुसरा आदमी के साथ जाव."

उस्मान बावचळल्यासारखा बघतच राहिला. त्याला कळेचना हा माणूस काय बोलतोय ते. तसा तो पहिला माणूस परत त्याच्यावर ओरडला. "एय, पागल. क्या देखता है? बच्चा दे दो. और तुम इसके साथ जाव." आणि त्याने जवळ्जवळ चांदसाहेबाला हिसकून घेतले आणि जायला लागला. उस्मान बधिर होऊन उभा होता... जे काही घडलं त्याची त्याला काहीच अपेक्षा नव्हती... आणि इतकं पटकन सगळं घडलं की त्याल अजूनही कळलं नाही काय चाललंय ते... या सगळ्याप्रकारामुळ चांदसाहेब जागा झाला होता पण तो एवढा भेदरला होता की तो रडतही नव्हता.

तो अस्पष्टसं पुटपुटला... "साब, मेरा बेटा... किधर लेके जा रहे हो... हम साथ मे रहने वाले है..."

तेवढ्यात तो दुसरा माणूस त्याच्या जवळ आला आणि म्हणाला...

क्रमशः

http://www.misalpav.com/node/8356