माझं खोबार... भाग ७

on शुक्रवार, फेब्रुवारी १३, २००९

माझं खोबार... भाग १ , ... भाग २ , ... भाग ३ , ... भाग ४ , ... भाग ५ , ... भाग ६

*************

मला माझ्या वास्तव्यात खूप वेगवेगळे अनुभव आले ह्या धर्माचरणाचे, अतिरेकी तसेच समजूतदारही. कधीही 'स्टिरिओटाईप' / 'पूर्वग्रहदूषित' विचार करू नये हे मी शिकलो. पण त्याबद्दल पुढे...

*************

जसं जसं माझं क्षितिज विस्तारत गेलं तसं तसं मला विविध देशातले लोक भेटत गेले. ज्या राष्ट्रांबद्दल आजपर्यंत नुसतं ऐकलं होतं तिथले लोक भेटायला लागले, नुसतेच भेटले नाहीत तर काही माझे चांगले मित्र बनले. इजिप्त, पॅलेस्टाइन, लेबनॉन, जॉर्डन, सिरियन, बांग्लादेशी... अनेक. पण ज्या लोकांबद्दल सर्वसामान्य भारतिय माणसाला अपार द्वेष मिश्रित कुतूहल असतं ते.... आपले सख्खे शेजारी, पाकिस्तानी. हे तर बरेच भेटले. पहिल्या काही भागात जसं मी लिहिलं होतं, खोबार विमानतळावर जी काही माझी वाईट अवस्था झाली होती तेव्हा मला पाकिस्तानीच भेटले होते आणि मला त्यांचा काय आधार वाटला होता!!! आणि पुढे बरेच पाकिस्तानी भेटले, सगळ्याच प्रकारचे, त्यातून त्यांची मानसिकता कळत गेली. प्रत्येक समाजात सगळ्या प्रकारची माणसे असतात हे सत्य माझ्या मनावर ठासलं गेलं. असे बरेच भेटले तरी लक्षात राहिलेले काही प्रसंग.

आमचा अजून एक क्लायंट होता. हा क्लायंट म्हणजे, सौदी अरेबियाच्या लष्कराचं एक भलं मोठ्ठं हॉस्पिटल होतं. त्याचं नाव "किंग फाहद मिलिटरी मेडिकल हॉस्पिटल". हे एक भलं मोठं संस्थानच होतं. खूप मोठा परिसर, जागोजागी दिसणारे लष्करी गणवेशातले लोक, गंभीर वातावरण यामुळे मनावर नेहमीच एक दडपण असायचं. पण ज्या विभागात माझं काम असायचं तिथे मला एक अगदी तरूण पाकिस्तानी पोरगा भेटला, अफझल. असेल फारतर २२-२३ वर्षांचा. दिसायला एकदम रुबाबदार आणि त्याला एकदम छानछोकीत रहायची आवड. त्याच्या बरोबर अजून दोघे... एक श्रीलंकन आणि दुसरा फिलिपिनो. त्या सगळ्यांचा बॉस एक ब्रिटिश नेव्ही मधला निवृत्त ज्युनियर कमिशंड ऑफिसर. (हा काय बोलायचा ते मला शेवट पर्यंत कळले नाही. अतिशय बेकार ऍक्सेंट आणि 'सालंकृत' इंग्रजी भाषा. कधी कळलंच नाही. तो श्रीलंकन मला नंतर नीट समजवून सांगायचा. आणि गंमत म्हणजे त्या श्रीलंकन पोराचं ड्राफ्टिंग त्या ब्रिटिश माणसापेक्षा खूपच चांगलं होतं. :) )

भाषिक आणि भौगोलिक जवळीकीमुळे अफझलची आणि माझी पटकन गट्टी जमली. तोही गप्पिष्ट, त्यामुळे हळूहळू विषय सापडत गेले आणि आमच्या मनमोकळ्या गप्पा व्हायला लागल्या. त्याचे वडिल पण तिथेच काम करत आणि तो त्यांच्याच बरोबर एकाच क्वार्टर मधे राहायचा. त्याची आई आणि बहिण पाकिस्तान पंजाब मधे एक गुजरात म्हणून शहर आहे तिथे असायचे.

अफझल कोणत्याही त्या वयातल्या साधारण भारतिय मुलांसारखाच होता. त्याला चित्रपटांचं भयंकर वेड. अर्थात भारतिय चित्रपट. (तो म्हणायचा की ज्याला पाकिस्तानी चित्रपट आवडतात तो माणूस पाकिस्तानीच नाही. ;) ) मी मुंबईचा आहे असे कळल्यावर त्याचा जो काही चेहरा झाला होता तो मी कधीच विसरणार नाही. अक्षरशः भारावून वगैरे बघत होता माझ्याकडे. त्याला खरंच असं वाटत होतं की मुंबईत फिल्मस्टार वगैरे असे गल्लोगल्ली हिंडत असतात. आपण सहज त्यांना भेटू शकतो. (अगदी असेच प्रश्न मला १९८४ साली इंदौर मधे पण विचारले गेले होते.) खरंतर त्याने पहिल्याच संभाषणात माझी विकेट घेतली होती.

मला म्हणाला "आपके मुंबई मे मुझे एक बार आना है." मी म्हणलं, "जरूर ये. तुला मुंबईची काय माहिती आहे?" पठ्ठ्याने मला जुहू बीच, गेटवे ऑफ इंडिया, फिल्मसिटी वगैरे नावं तिर्थक्षेत्राच्या नावासारखी म्हणून दाखवली. पुढे लगेच तर त्याने बाँब टाकला. मला म्हणतो, "यार, आप मुझे थोडी हेल्प कर सकते है? मुझे ना रानी मुखर्जी बडी अच्छी लगती है. मुझे एक बार उसके साथ डिनर पे जाना है. कुछ कर सकते है? मै कितना भी पैसा खर्च करने के लिए तैयार हूं." मी अक्षरशः ४ फूट उडालो. त्याला विदारक (नाही तर काय) सत्य परिस्थितीची कल्पना देता देता माझी हालत खराब झाली. :)

मग हळूहळू आमचे विषय वाढत गेले. मला इतक्या जवळून भेटलेला हा पहिलाच पाकिस्तानी. मला पहिल्यापासूनच पाकिस्तानी लोकांबद्दल कुतूहल आहे. कसे आहेत तरी कसे हे लोक? त्यांचे विचार कसे असतात? भारताबद्दल नक्की काय वाटतं त्यांना? द्वेष, मत्सर, असुया, भिती, साम्यत्वाची जाणिव? काय नक्की? अफझल बरोबर बोलताना, त्याच्याकडून पाकिस्तानातल्या त्याच्या पूर्वायुष्याबद्दल ऐकताना काही पदर उलगडत होते. मग एकदोनदा त्याच्या क्वार्टरवर त्याने जेवायला बोलावलं. मला काय प्रकारचं जेवण आवडतं असं त्याने विचारल्यावर, "शाकाहारी काहीही" हे माझं उत्तर ऐकून तो फारच चिंताक्रांत झाला. मी कोणत्याही प्रकारचं 'गोश्त' खात नाही हे त्याच्या दृष्टीने फारच अगम्य होतं. माणूस मांसाहाराशिवाय जगतो ही कन्सेप्टच त्याला पटत नव्हती. मोठ्या मुष्किलीने त्याला समजवलं. मग नंतर कित्येक दिवस तो मला शाकाहार वगैरे बद्दल निरनिराळे प्रश्न विचारून भंडावून सोडायचा. मग तो कधी कधी धर्माबद्दल वगैरे बोलायला लागला. हिंदू धर्माबद्दल वगैरे मी काही सांगावं असं तो सूचित करायचा पण मी या बाबतीत अगदी स्पष्ट होतो. सौदी अरेबिया सारख्या देशात धार्मिक किंवा राजकारण वगैरे बाबतीत तोंड उघडायचं नाही. मी काहीतरी बोलून विषय बदलून टाकायचो. तर असा हा अफझल.

एक दिवस तो जरा खूपच मूड मधे होता आणि त्याच्या कॉलेज मधील भानगडी वगैरे बद्दल बोलायला लागला. गडी बराच रंगेल होता. बरीच प्रकरणं करून चुकला होता. किंबहुना अभ्यास वगैरे सोडून उनाडक्या, मारामार्‍या, पोरी फिरवणं वगैरे हेच त्याचं मुख्य जिवितकार्य होतं असं म्हणलं तरी चालेल. अश्याच एका प्रकरणात, प्रकरण 'फारच पुढे' गेलं आणि त्या मुलीचे भाऊ याच्या मागे लागले. हा १०-१५ दिवस दुसर्‍या गावी लपून बसला. मग मात्र त्याच्या आईने त्याच्या बापाला सांगितलं की "बेऔलाद" मरायचं नसेल तर अफझलला तुमच्या कडे बोलवून घ्या. मगा बापाने खटपटी करून त्याला नोकरी लावली आणि खोबारला आणलं. या सगळ्या गोष्टी तो अतिशय अभिमानाने सांगत होता. मी पण सगळं शांतपणे ऐकत होतो. त्याचं बोलून झाल्यावर मी त्याला विचारलं, "तू मुसलमान आहेस ना?" तो हो म्हणाला. मग मी म्हणलं, "आत्ता ज्या ज्या गोष्टी तू करत होतास म्हणून सांगितलंस, त्या तुझ्या धर्माप्रमाणे योग्य होत्या का?" हे ऐकल्यावर तो एकदम तोंडात मारल्यासारखा गप्प बसला. मी त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बघतच होतो. मी पण तो विषय जास्त न वाढवता सोडून दिला. तो दिवस तसाच गेला. दुसर्‍या दिवशी मी तिथे गेल्यावर थोड्या वेळाने तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला,

तो: "आपसे एक बात पूछनी है."
मी: "हां, हां, पूछो."
तो: "नही, जाने दिजिये. शायद आप बुरा मान जायेंगे."
मी: "ठीक है. जाने दो."

तो गेला. थोड्या वेळाने परत आला आणि हाच संवाद रिपिट करून गेला. असं ३-४ वेळा झालं. मग मात्र मी त्याला नीट बसवलं आणि मनात काय आहे ते स्पष्ट बोल असं सांगितलं. मी मनावर घेणार नाही असंही आश्वासन दिलं.

तो: "कल मैने आपको जो भी कुछ बताया, उसके बाद आपने मुझसे एकही सवाल पूछा और मै चूप हो गया."
मी: "तो फिर?"
तो: "बुरा ना मानियेगा... आप प्रॉमिस करें."
मी: "यार, हम दोस्त है और तू फिक्र ना कर."
तो: "आप हिंदू है ना?"
मी: "हां, बिल्कुल."
तो: "तो फिर आपके इतने अच्छे और नेक खयालात कैसे है?"

आता मला हसावं की रडावं तेच कळेना. काय सांगू या बाबाला? बरं याला असं का वाटतंय की मी हिंदू असूनही चांगले विचार बाळगतो!!! मी त्याला थोडंफार समजवलं. तेव्हा तो पुढे म्हणाला की "हमे तो स्कूल मे बचपनसे जो भी सिखाया जाता है हिंदूओ और भारत के बारे मे, आप तो बहुतही अलग है." मग मी त्याच्या कडून थोडंफार त्यांना काय शिकवतात ते ऐकलं. फक्त वेडच लागायचं शिल्लक होतं मला. वाईटच. पाकिस्तानात भारतद्वेषाचं बाळकडू इतकं पद्धतशीर पणे दिलं जातं हे आपल्याला माहितच नसतं. पुढे मी पाकिस्तानी अभ्यासक्रमातली एक दोन इतिहासाची पुस्तकं मुद्दाम मिळवून चाळली. त्यांच्या आणि आपल्या इतिहासात बराच फरक होता. प्राचीन सिंधू संस्कृती नंतर एकदम बौद्ध धर्मच आणि मग एकदम अरब आले आणि लोकांना चांगलं जगायला शिकवलं. मधला सगळा काळ हा "जाहिलियत". म्हणजे अधर्म, अनाचार वगैरे. स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पण असाच. एकदम १८० डिग्री टर्न नसला तरी चांगला १२० डिग्री पर्यंत तर नक्कीच टर्न होता. सामान्य पाकिस्तानी माणूस हे शिकत मोठा होतो. पण मोठा होताना त्याला भारताबद्दल सारखं कळत असतं. हिंदी सिनेमे बघत असतात ते. त्यात दाखवलेलं काही शाळेत शिकवल्या बरोबर १००% जुळत नसतं. पण ते मान्य करायची तयारी तर नसते. आणि मग यातूनच भारताबद्दल असुया, द्वेष वाटते. समाजमन तसं असतंच आणि आजूबा़जूचं. बरं भारत हा कितीतरी मोठा देश, पाकिस्तान त्या मानाने लहान, ७१ मधे भारताच्या मदतीने झालेलं पाकिस्तानचं विभाजन या सगळ्याचा सल सर्वसामान्य पाकिस्तानी माणसाच्या मनात ठसठसत असतो. प्रत्येक बाबतीत त्यांची स्पर्धा भारताशीच. पाकिस्तानी बर्‍याच अंशी भारतकेंद्रितच असतात.

पाकिस्तानातले सिंधी, पंजाबी, पठाण, मुहाजिर वगैरे मधले अंतर्गत वाद कळले. पंजाबी माणूस सिंध्यांबद्दल कधीच चांगलं बोलणार नाही आणि पंजाबी दिसला की सिंधी माणसाने शिवी घातलीच समजा. मुहाजिर आणि सिंधी म्हणजे विळ्याभोपळ्याची मोट बांधलेली. फाळणी नंतर युपी बिहार मधून बहुसंख्य मुस्लिम पाकिस्तानात स्थलांतरित झाले. ते बहुतेक सगळे कराची मधे स्थायिक झाले. त्यामुळे कराचीत सिंधी एकदम अल्पसंख्य झाले. (बघा 'भय्या' प्रॉब्लेम तिथे पण आहेच. ;) ) मग त्यांच्यात मारामार्‍या झाल्या. पाकिस्तानच्या चळवळीत बहुतेक हे युपी बिहार वालेच म्होरके होते. पण पाकिस्तान झाल्यावर आधी बंगाली आणि मग पंजाबी बहुसंख्य झाले आणि हा मुहाजिर वर्ग एकदम पोरका झाला. एका मुहाजिराने (त्याचे आजोबा बुलंदशहरचे, अजूनही नातेवाईक चिक्कार आहे त्या भागात) माझ्यापाशी काढलेले उद्गार, "पाकिस्तानके लिये कुर्बानीया दी हमारे बापदादाओंने, और ये *** मक्खन खाके बैठ गये."

पण एवढं सगळं असलं तरी भारताचा विषय निघाला की बहुतेक पाकिस्तानी एकदम पाकिस्तानीच असतात. अजून एका बाबतीत एकजात सगळे पाकिस्तानी एकदम सेंटी असतात, काश्मिर. बलुची, पठाण वगैरे स्वतः पाकिस्तानला शिव्या घालतात पण काश्मिर मधे भारताने खूप अत्याचार केले आहेत आणि सर्वसामान्य काश्मिरी कसा बरबाद होतो आहे या बाबतीत मात्र एकदम पाकिस्तानी विचार. मी पण कधी कधी मुद्दाम वाद घालायचो. मजा यायची खेचायला.

***

जवळून भेटलेलं अजून एक पाकिस्तानी कुटुंब म्हणजे आमच्या बिल्डिंग मधले अख्तरसाब, त्यांची बायको सीमाभाभी, मुलगा बिलाल आणि दोन मुली. अख्तरसाब म्हणजे अतिशय सज्जन माणूस. तितकाच उत्साही. खूऽऽप वर्षं सौदी अरेबियामधे राहिलेला माणूस. त्या वेळी एका खूप मोठ्या आर्थिक अडचणीतून जात होते ते. पण आमच्या बिल्डिंग मधलं सगळ्यात जास्त उत्साही जोडपं. (आमच्या बिल्डिंग मधे ४८ फ्लॅट्स पैकी जवळ जवळ ४०-४२ मधे भारतिय. पाकिस्तानी २ च. एक कोरियन सडाफटिंग. बाकीचे इजिप्शियन वगैरे. त्यामुळे सगळे आम्हाला दबून असायचे. आम्ही सुद्धा फार डोळ्यात येणार नाही या बेताने सगळा दंगा करायचो. दिवाळीत पूर्ण आठ मजल्यांवर जिन्यांमधून आणि दारांसमोर पणत्या लावल्या होत्या. होळी मधे बर्‍यापैकी रंग वगैरे पण खेळली होती पोरं.) आणि गंमत म्हणजे आमच्यात एकमेव पाकिस्तानी म्हणजे हे अख्तरसाब आणि कुटुंब. दिवाळी वगैरेंच्या तारखा यांना पाठ असायच्या. सगळ्या आयोजनात हे एकदम पुढे.

पाकिस्तान भारताबरोबर शेजारधर्म पाळत नसला तरी अख्तरसाबनी शेजारधर्म पुरेपूर पाळला. एकदा असं झालं की घरातला गॅस सिलिंडर संपला. मी संध्याकाळी घरी आल्यावर गाडी घेऊन जाऊन नविन सिलिंडर आणला. (तिथे सिलिंडर डेपो मधून आपल्यालाच आणावा लागतो.) बिल्डिंगच्या दारासमोर पार्किंग नव्हतं, सिलिंडर जड, म्हणून २ मिनिटं तशीच डबल पार्किंगमधे लावली गाडी. मी उतरून सिलिंडर काढे पर्यंत पोलिस साहेब आलेच तिथे. रंगेहाथ पकडल्यावर काय सोडतात ते मला. योग्य तो आदर सत्कार करून एक ट्रॅफिक व्हायोलेशन तिकिट (अरबी शब्द: मुखालिफा) ठेवला माझ्या हातात. काहीही न बोलता गेले ते. आता अरबी वाचता येत होतं तरी ते छापिल नसलेलं हस्ताक्षरातलं अरबी काही मला वाचता येइना. त्या मुळे खिश्याला किती मोठी चाट बसणार आहे ते कळेना. काय करावं हा विचार करत असताना, एकदम अख्तरसाबना वाचता येईल असं वाटलं. त्यांच्या घरी गेलो तर ते नेमके रात्री उशिरा येणार असं कळलं. म्हणून गप्प बसलो. रात्री १० वाजता बेल वाजली. बिलाल सांगत आला होता की "डॅडी आ गये है, आप को बुलाया है." सीमाभाभीनी इतक्या उशिरा ते आले तरी आवर्जून माझ्या प्रॉब्लेम बद्दल सांगितलं होतं त्यांना. मी लगेच गेलो तर हा माणूस कपडे वगैरे न बदलता माझीच वाट बघत होता. मला बघताच ते उठले आणि म्हणाले, "चलिये मेरे साथ." इतक्या उशिरा त्यांच्या ओळखीचा एक पंजाबी गॅरेजवाला होता त्याच्या घरी घेऊन गेले मला. (हे गॅरेजवाले पोलिसांच्या खाजगी गाड्यांची कामं फुकटात करून देतात त्यामुळे पोलिस पण यांची लहान मोठी कामं करून देतात बिनबोभाटपणे.) त्याला झोपेतून उठवून माझी "माझा शेजारी, भावासारखा आहे" अशी ओळख करून दिली. मला मुखालिफा मिळाला म्हणून सांगितलं. त्याने तो कागद घेतला माझ्याकडून आणि कोणत्या एरियात किती वाजता मुखालिफा मिळाला ते विचारलं. एक फोन केला आणि त्या वेळी त्या भागात कोण पेट्रोलिंगवाले ड्युटीवर होते ते विचारून घेतलं. नशिबाने तो पोलिस याच्या महितीतला निघाला त्यामुळे त्याने तो कागद ठेवून घेतला आणि मला "आप बेफिक्र रहे. कल सुबह आपका काम हो जायेगा. कंप्यूटरपे ये चढेगाही नही." असं सांगितलं. मी जायला उठलो तसं त्याने मला हाताला धरून खाली बसवलं आणि म्हणाला, "आप पहली बार आये है, हमारे अख्तरसाब के छोटे भाई है, ऐसे कैसे जा सकते है. बैठिये." तेवढ्यात आतून हाक आली. हा माणूस आत गेला आणि २ मोठ्या बश्यांमधून काहीतरी खायला आणलं. मला ते नक्की काय आहे ते कळेना. माझा चेहरा पाहून अख्तरसाब म्हणाले, "हलवा है. बेफिक्र खाइये." त्या बशीत शुद्ध तूपात थबथबलेला उत्कृष्ट असा बदामाचा शिरा होता. केशर वगैरे टाकलेला. वरतून अक्रोड वगैरे चुरून घातलेले. पण ते तूप इतकं की घशाखाली उतरेना. खानसाहेबांच्या भितीने कसंबसं घशाखाली उतरवलं.

तेवढ्यात त्याचे भाऊ वगैरे येऊन बसले आणि गप्पा सुरू झाल्या. तेव्हा नुकताच काश्मिर मधे काहीतरी प्रकार घडला होता. आणि मी भारतिय म्हणल्यावर साहजिकपणे गाडी आलीच काश्मिरवर. मी आपलं नुसतं हसून वेळ मारून नेत होतो. तेवढ्यात त्यातला एक पंजाबी दुसर्‍याला म्हणाला, "ये कश्मिरी बडे *** है. सामने साप और कश्मिरी आये तो मै साप को छोड दूंगा. कश्मिरी को नही." आणि तेवढ्यात माझ्याकडे वळून म्हणाला, "फिरभी हम कश्मिर लेके रहेंगे जनाब. याद रखियेगा." तर असं हे त्यांचं काश्मिरवेड. हा प्रश्न सहजासहजी सुटणार नाही हे यावरून लक्षात येईलच.

एक पाकिस्तानी माजी सैनिक माझ्या पहिल्या क्लायंटकडे ड्रायव्हर म्हणून होता. युसुफ त्याचं नाव. पंजाबी, गोरापान, उंची असेल सव्वासहा फूट. तो काही वर्षं सियाचीनला होता. अर्थात विरूद्ध बाजूने. त्याला दंडावर गोळीपण लागली होती. "दुश्मन की गोली खायी है. फिरभी डरा नही." असं अभिमानाने सांगायचा. पण कधीही मला उशीर झाला आणि टॅक्सी नाही मिळाली तर खूप लांब मला सोडायला यायचा. तिथेच चेल्लप्पन नावाचा मल्याळी माजी भारतिय सैनिक क्लेरिकल कामं करायचा. आणि हे दोघे जानी दोस्त. पण समोर आले की हातात काही तरी पेन किंवा फूटपट्टी घेऊन एकमेकांना गोळी मारायची ऍक्शन करायचे आणि मग मिठी मारून हसायचे. नियति तरी किती विचित्रच. कोण कधी कुठे कसा भेटेल काही भरवसा नाही. काही वर्षांपूर्वी सियाचीनला भेटले असते तर कदाचित खर्‍या गोळ्या घातल्या असत्या एकमेकांना.

असे नाना नमूने बघितले. पण हे सगळं झालं पाकिस्तानी लोकांबद्दल. आपले भारतातलेच मुस्लिम पण खूप जवळून बघितले. भारतात असताना मुस्लिम मित्र होते थोडे पण कधी खूप जवळून संबंध नव्हता आला. तो इथे आला. किती प्रकार. हैद्राबादी, मँगलोरी, तमिळ, मल्याळी (मलबारी), बंगाली, आपले कोकणी मुसलमान (मोहंमदखान देशमुख, नइम माजगावकर अशी टिपिकल नावं). त्यांचे आपापसातले हेवेदावे. ब्राह्मण विरुद्ध इतर, कोब्रा विरूद्ध देशस्थ हे जसे टोकाचे वाद आहेत तसेच हैद्राबादी विरूद्ध कोकणी, मलबारी विरूद्ध तमिळ अशी तेढ असते. (पुढे असे प्रकार किरिस्तांवात पण असतात हे कळले, गोवन, मँगलोरी, वसईचे, मल्याळी असे किती तरी प्रकार. इतकंच काय गोव्यात सारस्वत ख्रिश्चन पण आहेत. साहजिकच स्वतःला उच्चवर्णिय समजतात. :) ) या वरून लक्षात आलं माणूस शेवटी आपल्यासारखाच दुसरा शोधतो. शक्य तेवढे साम्य शोधतो. थोडा समूह झाला की मग ताठरपणा येतो. हळूहळू अवास्तव कल्पना मूळ धरू लागतात. आम्हीच तेवढे खरे बाकीचे मूर्ख ही भावना बळकट होते. आणि मग चढाओढ, कुरघोडी चालू होतात. आणि हे सगळं व्हायला माणूस हिंदू किंवा मुसलमान असावा लागत नाही. माणूस हा माणूस आहे आणि तो असाच वागतो. त्यामुळे पूर्वग्रह बाजूला सारले की माणसातला माणूस दिसतो आणि तो चांगला असेल तर संबंध ठेवा नाहीतर संपवा.

असं सगळं असलं तरी, सौदीतल्या कट्टरपणाबद्दल, विशेषतः अरब मुसलमानांच्या कट्टरपणाबद्दल नुसतं ऐकलंच होतं. एक ते 'देहांत शासन' प्रकरण सोडलं तर तसा धार्मिक कट्टरपणा आणि अतिरेकी वागण्याचा प्रत्यक्ष कधीच त्रास झाला नव्हता.

पण एकदा काय झालं....

क्रमशः