कांदा टोमॅटोची 'बॅचलर' भाजी... उर्फ सुगरण्याचा सल्ला

on रविवार, डिसेंबर २८, २००८

आधी नमू स्वाती अन्नपूर्णा | जीने तृप्त केले बहुतांना |
आणि दुसरी ती मेघना | आयडियादाती ||

या दोघींबरोबरच ही पाकृ आमच्या अजून एका मित्राला अर्पण... कुंदन . हा भला माणूस निष्णात स्वैपाक करतो, सध्या दुबईत असतो आणि रोज मला फोन करून 'काल पनीर मटर केलं होतं', 'आज आलू पराठे करणार आहे' असं सांगून कसला सूड उगवत असतो कोण जाणे.

***

मिपावर बर्‍याच नविन नविन पाककृति नेहमीच येत असतात. आणि या विभागात आमच्या स्वातीताईचा नंबर पहिला आहे. तिच्या पाकृ माझ्यासाठी तरी नेहमीच फक्त एक बघायचा / ऐकायचा विषय आहे. खाणार कसं? ते आधी बनवायला लागेल ना? ती भानगड कोण करणार? तर हे असं.

आणि दुसरी मेघना. तिने एकामागोमाग दणक्यात ३-४ खत्तर्नाक पाकृ अतिशय मस्त लिहिल्या होत्या. त्यातल्या साबुदाण्याच्या खिचडीच्या पाकृ नंतर तर ३-४ दिवस लाळेरं लावून फिरायची पाळी आली होती. हो ना राव... तर मेघनाच्या ष्टाईलने प्रभावित होऊन आम्ही पण एक पाकृ लिहायचीच असं ठरवलं.

तर या दोघींच्या प्रभावाखालीच असताना आम्हाला एक गुरू भेटला आणि त्याने आम्हाला एक झटपट आणि सर्वोपयोगी अशी पाकृ शिकवली.

तो मेहेरबान, कदरदान पेश है... १० मिनट मे तैयार होने वाली और संकट समय मे काम आने वाली 'कांदा टोमॅटोची बॅचलर भाजी'. बॅचलर भाजी यासाठी की, एकटं असताना, रात्री दमून घरी आलं आणि फारसं चवीढवीकडे लक्ष न देता काही तरी पटकन करायचं असेल तर बरेच 'बॅचलर' जे पाकशास्त्रात फारसे पारंगत नाही आहेत (माझ्यासारखे) ते अश्याच काहितरी पाकृचा आधार घेतात. :)

***
खरं म्हणजे, लहानपणापासूनच मला पाकशास्त्रात आज्जिब्बात गति नाहिये. स्वैपाक हा खाण्याचा प्रकार आहे, करण्याचा नव्हे, असं वाटायचं. अजूनही वाटतं. लहानपणी आईने आणि लग्नानंतर बायकोने मला या बाबतीत बिघडवायचा खूप प्रयत्न केला. मी काही माझ्या मतांपासून ढळलो नाही. बरं माझ्यावर कधी हॉस्टेलवर रहायची पाळी नाही आली त्यामुळे एकंदरित निभावलं होतं. पण गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर एक मोठी आफत आली आहे. झालंय असं की सध्या एकटं रहायची पाळी आली आहे. स्वैपाकाबाबतचा माझा दृष्टिकोण असा असल्याने जेवणखाण सहजिकच बाहेर हॉटेल मधे सुरू झाले.

तशी काही ही माझी एकटं राहायची पहिलीच वेळ नाही. आधीही राहिलो आहे. आणि प्रत्येकवेळी सुखेनैव निरनिराळ्या उपाहारगृहांना उदार आश्रय दिला आहे. या वेळी पण तसेच निभेल याची खात्रीच होती. पण नाही, तसे होणे नव्हते. सुरूवातीला काही दिवस हॉटेल मधे जेवलो. पण मग तेच तेच खाऊन कंटाळा आला. एक दिवस तर मी जाऊन बसलो माझ्या नेहमीच्या हॉटेलात तर त्या वेटरने ऑर्डर न घेताच पदार्थ आणून ठेवले समोर. मी म्हणलं 'हे काय रे भाऊ?' तर म्हणाला, 'साहेब, तुमच्या आवडत्या डिशेस माहीत झाल्या आता.' मग मी हॉटेल्स बदलून जेवायला लागलो. पण लक्षात आलं की हॉटेल मधलं जेवण काही झेपत नाहिये आपल्याला. (कोण रे तो वय झालं म्हणतोय माझं? आधीच च्यायला मिपावर काही तथाकथित मित्र 'काका' म्हणताहेत. येडे लेकाचे.) पण मग आता करायचं काय? कैतरी कराच्चं म्हणजे कराच्चंच. मग हळू हळू एकदम प्राथमिक स्वैपाकाला सुरूवात केली. म्हणजे ब्रेड-बटर खाणे आणि वरती थोडा फलाहार. किंवा नुसताच भात करणे. आणि तो दह्यात कालवून खाणे. मग पुढची पायरी, टिन मधले 'सरसों का साग' नाहीतर 'पालकपनीर' गरम करून ब्रेड बरोबर खाणे वगैरे. मग माझी भीड चेपली आणि मी खिचडी वगैरेचा प्रयत्न केला. ते पण जमलं. मग माझा एक माझ्या सारखाच बॅचलर मित्र, प्रशांत, धावून आला आणि माझा गुरू बनला. माग आम्ही काय काय बनवून खायला लागलो. म्हणजे बनवायचा तो, खायचो आम्ही दोघं आणि साफसफाई करायचो मी. पण परत माझं नशिब फुटलं आणि प्रशांत गेला परत भारतात. आता आली का पंचाईत? परत एक्सपरीमेंट सुरू झाले. आणि माझ्या एका मल्याळी मित्राने मला ही झटपट पाकृ शिकवली. आता एवढं सगळं वाचून तुम्हाला वाटेल काय जबरी असेल पदार्थ वगैरे. पण तसे काही नाही. पदार्थ आहे साधाच, पण पटकन तयार होणारा आणि म्हणूनच अडीअडचणीला उपयोगी पडणारा, ही खरी महती त्याची. आणि तो सर्वोपयोगी पण आहे. म्हणजे भात, पोळी, ब्रेड, खुबूस कशाही बरोबर खा. (खुबूस म्हणजे अरब देशात मिळणारा एक भाकरी सारखा प्रकार. सगळ्या दुकानात मिळतो. त्याचे २ प्रकार असतात, मैद्याचा आणि गव्हाच्या पीठाचा. सगळ्या बॅचलर्सचा तारणहार.)

तर घ्या...

***

वाढणी: एका माणसासाठी. (दुसरा असेल आपल्याबरोबर तर आधी त्याला संभाव्य धोक्याची पूर्ण कल्पना द्यावी आणि त्याच्या स्वत:च्या जबाबदारीवर तो सामिल होत आहे असे वदवून घ्यावे.)

साहित्यः २ मध्यम आकाराचे कांदे, २ मध्यम आकाराचे टोमॅटो, २ लहान मिरच्या, ४ लसणाच्या पाकळ्या, एवढंस्सं आलं. १-१|| चमचा चिकन मसाला. (चिकन मसाला का? तर त्याच्यात सगळे इतर मसाले असतात म्हणून. म्हणजे आपल्याला बाकी काही घालत बसावे लागत नाही हो. आणि हो, त्या चिकन मसाल्यात चिकन नसतं त्यामुळे शाकाहारी मंडळींना खायला हरकत नाही अजिबात.)



कृती: मिरचीचे आडवे - तिरके काप करायचे. लसणाच्या पाकळ्या बारीक चिरायच्या. खरं म्हणजे लसूण ठेचायचा. पण आपण बॅचलर आहोत ना... मग आपल्याकडे खलबत्ता किंवा मिक्सर वगैरे नसणार. म्हणून बारीक चिरायचा (जमेल तसा, कारण परत तेच, आपण नवशिके बॅचलर ना? मग इतकं बारीक चिरायची वगैरे सवय नसते ना.) आल्याचं पण तेच. मस्त बारीक चिरायचा.



कांद्याच्या आणि टोमॅटोच्या लांब फोडी (काप) करायच्या. मला वाटतं मसाला डोश्यात जी भाजी असते त्याच्यात असा लांब कापलेला कांदा असतो.



एका कढईत तेल गरम करून मोहरीची फोडणी करायची. मोहरी तडतडली की त्यात आधी मिरची, त्यानंतर लसूण आणि शेवटी आलं घालायचं. ते चांगलं लालसर होईपर्यंत परतायचं त्या फोडणीत.



आता आधी चिरलेला कांदा घालायचा आणि मग थोड्या वेळाने चिरलेला टोमॅटो घालायचा. (किती वेळाने? तसं नक्की सांगता नाही येणार. पण २-३ वेळा भाजी करून खाऊन झाली आणि कांदा कच्चट राहिला की मग आपोआप येतो अंदाज :) )



थोडा वेळ हे सगळं नीट हलवत राहायचं. नाहीतर करपेल एका बाजूने. (तुम्हालाच खायचं आहे हे लक्षात असू द्या.) टोमॅटो आणि कांदा बर्‍या पैकी शिजला की मग त्यात हे सगळं मिश्रण बुडेल इतपत पाणी घालायचं. चवीपुरतं मीठ आणि चिकन मसाला घालायचा. नीट ढवळायचं.



साधारण ५-१० मिनिटं मध्यम आचेवर उकळत ठेवायचं. झाली भाजी तयार.

आहे की नाही झटपट? आणि सोप्पी पण. साहित्य पण फार नाही लागत. या भाजीत अजून एक करता येतं. खाताना त्यात मस्त पैकी तिखट जाडी शेव टाकून खायची. फारच छान लागते मग तर.

तर ही पाककृति इथेच संपली. पण कृति मात्र नाही संपली. पुढची कृति म्हणजे ही भाजी भाताबरोबर आणि खुबूस बरोबर ओ येईपर्यंत हाणायची. जेवायला बसताना जवळ दह्याची वाटी घ्यायला विसरू नका. कारण भाजी एकदम तिखटजाळ होते. आणि त्या बरोबर थोडं दही खाणं दुसर्‍या दिवसाच्या दृष्टीने बरं असतं. ;)


या तर मंडळी खायला. आजच केली होती. आणि खाल्ल्यावर हे लिहू शकलो म्हणजे नक्कीच बरी झाली होती. ;)