चित्रपट ओळख - लेटर्स फ्रॉम इवो जिमा

on रविवार, जून २८, २००९

युध्दस्य कथा रम्या: असं एक संस्कृत सुभाषित आहे. माझ्यापुरतं तरी ते १००% खरं आहे. लहानपणापासून युद्धकथा वगैरे वाचायची आवड होतीच. पुढे शाळकरी वयात दुसर्‍या महायुद्धाने आणि त्यातल्या त्यात जपान नावाच्या काहीतरी गूढ प्रकाराने तर अजूनच. युध्दाआधीचा जपान, तिथले प्रचंड लष्करीकरण, औद्योगिक प्रगति पण जुन्या रितीरिवाजांना / परंपरांना कवटाळून बसायची प्रवृत्ति... असे बरेच परस्पर विरोधाभास असल्याने एकंदरीतच जपान बद्दल गूढ वाटायचे / वाटते. तर, दुसर्‍या महायुद्धात झालेल्या काही अतिशय महत्वाच्या आणि ज्यामुळे युध्दाला अतिशय महत्वाची कलाटणी मिळाली अशा युध्दांबद्दल वाचत असताना, एक थोडेसे चमत्कारिक नाव कानावर पडले. "इवो जिमा". नाव कायमचे लक्षात राहिले.

"इवो जिमा" हे जपानी बेटसमूहापैकी एक बेट. जपानच्या मुख्यभूमी पासून खूपच दूर. युध्दात जेव्हा जपानची पीछेहाट सुरू झाली तेव्हा मुख्यभूमीच्या बचावासाठी जपानी सैन्याने इथे घट्ट पाय रोवून ठाण मांडले होते. या बेटाचे महत्व असे की, हे जर अमेरिकेच्या हाती पडले तर तिथे अमेरिकेला तळ बनवून सैन्य, आरमार आणि विमानं वगैरे ठेवता आले असते. आणि मग या तळाचा उपयोग मुख्यभूमीवर बाँबवर्षाव आणि हल्ले करण्यासाठी झाला असता. तेव्हा हे बेट वाचवणे हे अतिशय आवश्यक होते. पुढे अतिशय घनघोर लढाई झाली आणि शेवटी हे बेट अमेरिकेच्या हाती पडले. आजही अमेरिकेच्या मरिन कोअर साठी हे बेट एक तीर्थक्षेत्र आहे. नवीन भरती झालेले इथे श्रध्दांजली वाहण्यासाठी येतातच. तर जपानी सरकारनेही या बेटावर बराचसा भाग प्रतिबंधित केला आहे कारण जवळजवळ १० हजार जपानी सैनिकांची प्रेतं (अवशेष) तिथे विखुरलेली आहेत.

तर अशा या ऐतिहासिक घटनेवर आपल्या क्लिंट इस्टवुड आजोबांनी एक चित्रपट काढला आणि स्वतः दिग्दर्शित केला. खूप दिवसांपासून बघायची इच्छा होतीच. आज योग आला. अक्षरशः एकदाही जागचे न उठता बघितला हा चित्रपट. चित्रपट सत्य घटनांवर बेतलेला आहे. या लढाईत ज्याने जपानी सैन्याचे नेतृत्व केले होते, त्याने वेळोवेळी आपल्या बायको आणि मुलांना लिहिलेल्या पत्रात लढाईच्या आधीच्या तयारीचे आणि प्रत्यक्ष लढाईचे वर्णन केले होते. त्यावर आधारित एक पुस्तक निघाले आणि त्यावर आधारित हा चित्रपट. चित्रपट पूर्णपणे जपानी भाषेत आहे. इंग्लिश सबटायटल्स आहेत. काही काही प्रसंगात सबटायटल्स नसले तरी भाषा आड आली नसती एवढे सुंदर काम केले आहे अभिनेत्यांनी. साधारण कथानक असे.

इवो जिमा वर जपानी सैन्य ठाण मांडून बसले आहे. त्या सैन्याचा प्रमुख म्हणून ले. जनरल तदामिची कुरिबायाशी याची नेमणुक झाली आहे आणि तो अधिकार सूत्र हातात घ्यायला येतो. त्याच्या स्वागताला काही अधिकारी उपस्थित असतात. तिथपासूनच त्याच्या आधुनिक आणि कल्पक विचारांची आणि त्या जुन्या अधिकार्‍यांच्या जुनाट / पारंपारिक विचारांची लढाई सुरू होते. बेटाची पाहणी करता करता त्याला असे आढळते की जरी अमेरिकेचे सैन्य बोटींमधून किनार्‍यावर उतरेल तरी तिथेच (म्हणजे किनार्‍यांवर) त्यांच्याशी लढणे कठिण जाईल. बेटाच्या एका भागात त्या बेटावरचा सगळ्यात उंच डोंगर असतो. बेत असा ठरतो की सगळे किनारे मोकळे सोडायचे आणि त्या डोंगरावर तळ बनवायचा. जपानी सैन्यात 'साइगो' नावाचा एक सामान्य शिपाई दाखवला आहे. तो पेशाने बेकर असतो पण जबरदस्तीने सैन्यात भरती केले असते त्याला. हा या चित्रपटाचा दुसरा नायक. (रूढार्थाने या चित्रपटाला नायक नसला तरी कुरिबायाशी आणि साइगो ही मुख्या पात्रं आहेत. त्यांच्या नजरेतून, आठवणींमधून चित्रपट पुढे जातो.) तर हा साइगो युध्दाला कंटाळलेला असतो, त्याला युध्द वगैरे प्रकारातला फोलपणा कळून चुकलेला असतो. लढाई सुरू होते आणि नेहमीच्याच मार्गाने जात राहते. बरेचसे जपानी सैनिक मरतात. शेवटी अगदी मोजके सैनिक राहतात. कुरिबायाशी स्वत: जातीने त्यांना घेऊन हल्ला करायला निघतो. तुंबळ लढाई होते, आणि..... पुढचे बघायचे असेल तर चित्रपटच बघा.

या संपूर्ण प्रवासात, जपानी संस्कृती मधले जे काही कट्टर प्रकार आहेत ते अगदी छान टिपले आहेत. शत्रूच्या हाती जिवंतपणे न पडणे हे अतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी मग हाराकिरी आलीच. लढाईच्या सुरूवातीला एका भागात जपानी सैन्याचे अगदी पानपत होते. काही मोजके सैनिक आणि २-३ अधिकारी उरतात. कुरिबायाशी त्यांना कसंही करून तिथून जीव वाचवून पळून येऊन दुसर्‍या एका भागातल्या तुकडीला मदत करायला सांगतो, पण या तुकडीच्या मुख्य अधिकार्‍याला ते पटत नाही आणि तो स्वत: हाराकिरी तर करतोच पण बाकीच्या सैनिकांना पण भाग पाडतो. साइगो तिथेच असतो, पण तो जीव वाचवून अळतो तिथून. दुसरीकडे जाऊन मदत करण्याऐवजी, 'दिलेली जबाबदारी मला पार पाडता आली नाही म्हणून जीव देणे अधिक योग्य' अशा प्रकारच्या आत्मघातकी विचारांमुळे जपानी सैन्य अजून कमजोर आणि संख्येने घटत जाते. समोर मृत्यू अटळ दिसत असताना सैनिक सगळी सामानाची आवराआवरी करतात वगैरे दृश्ये छान घेतली आहेत.

अजून एक छान दृश्य / संवाद म्हणजे.... एक जखमी अमेरिकन सैनिक जपान्यांच्या हाती लागतो. त्याच्या जवळ त्याच्या आईने लिहिलेले पत्र असते. त्या पत्राचे जाहिर वाचन तिथला इंग्लिश बोलणारा अधिकारी जपानी मधून करतो तेव्हा साइगोचा एक साथी त्याला म्हणतो, "माझ्या आईने पण मला अगदी हेच सांगितले आहे".

युध्दासारखा तीव्र भावनिक विषय असला तरी पूर्ण चित्रपट अतिशय संयतपणे पण त्यामुळेच परिणामकारी पद्धतीने मांडलेला आहे. (आपल्याकडचे काही 'बॉर्डर' वगैरे युद्धपट आठवले, तुलना करवतच नाही.) कुठेही आरडाओरडा नाही, डायलॉगबाजी नाही. उपदेश वगैरे नाही. सगळं कसं अगदी 'रिअल लाईफ'. बरंचसं चित्रण स्टुडिओ / सेट वर झालेल असले तरी कृत्रिमता कुठेही जाणवत नाही. छायाचित्रण पण आवडले. एकंदरीत एक छान चित्रपट बघायची इच्छा असल्यास जरूर बघा.

जाताजाता... या चित्रपटाची अजून एक गंमत म्हणजे, बहुतेक लोकप्रिय चित्रपटांचे सिक्वेल्स / प्रिक्वेल्स निघतात. पण या चित्रपटाच्या बाबतीत तसे नाहीये. या चित्रपटाला आहे एक साथी चित्रपट. म्हणजे क्लिंट इस्टवुडनेच दिग्दर्शित केलेला 'फ्लॅग्ज ऑफ अवर फादर्स'. हा चित्रपटही इवो जिमाच्या लढाईवरच आहे पण त्यात अमेरिकेच्या दृष्टिकोनातून लढाई दाखवलेली आहे!!! दोन्हीही चित्रपट फक्त २ महिन्यांच्याच फरकाने प्रदर्शित झाले होते.

1 comments:

padmavati म्हणाले...

अतिशय सुंदर ओळख. हा चित्रपट नक्कीच पाहाणार.