सध्या घरच्या डिशटिव्हीच्या कनेक्शनचे काहीतरी लफडे झाले आहे. वृत्त वाहिन्यांमधे फक्त झी२४तास आणि आयबीएन-लोकमत या दोनच वाहिन्या उपलब्ध आहेत. 'समथिंग इज बेटर दॅन अज्जिबात नथिंग' या न्यायाने सध्या आयबीएन-लोकमतच बघत असतो. नाविलाज आहे. पण परवा अचानक एक चांगला कार्यक्रम बघायला मिळाला.
'ग्रेट भेट' नावाचा एक कार्यक्रम असतो. त्यात आयबीएन-लोकमतचे सर्वेसर्वा निखिल वागळे हे प्रसिद्ध आणि महत्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती घेतात. परवाच्या कार्यक्रमात अतिशय जुने आणि वरिष्ठ राजकारणी डॉ. एन. डी. पाटिल यांची मुलाखत घेतली गेली. एनडी (त्यांना सगळे एनडीच म्हणतात) बद्दल मला फक्त एवढीच माहिती होती की ते एक राजकारणी आहेत आणि शे. का. पक्षाचे प्रमुख नेते आहेत. मुलाखत बघताना हा माणूस किती मोठा आहे हे कळले. मुलाखत अर्ध्याच तासाची होती.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला म्हणले गेले तसे, जरी त्यांनी शे.का. पक्षाचे नेतृत्व केले असले तरी आज ते खर्या अर्थाने सर्वपक्षिय झाले आहेत. महाराष्ट्रातील सगळ्याच प्रमुख लोकचळवळींशी ते आजही जातीने निगडीत आहेत. त्यांना बघूनही ते ८० वर्षांचे असतील असे वाटत नाही. महाराष्ट्रात जिथे जिथे सेझ विरोधात म्हणा किंवा तथाकथित आधुनिक विकासामुळे भूमिपुत्र भरडला जात आहे तिथे त्यांचा सक्रिय पाठिंबा आहे. ते स्वतः तिथे जाऊन मार्गदर्शन करतात.
त्यांच्या बोलण्यात खूपच सच्चेपणा वाटला. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता, आपलं मत ते बेधडक मांडतात. आयुष्यभर स्वच्छ राहिलेला माणूसच हे करू शकतो. इतर राजकीय नेत्यांबद्दल त्यांनी मांडलेली मतं खरोखरच जहाल आहेत. देशातील सगळेच राजकारणी हे कोणाला ना कोणाला तरी विकले गेले आहेत हे स्वतः राजकारणात राहून स्पष्टपणे ठणकावून सांगणे हे सोपे नाही. आधुनिक चाणक्य शरद पवार हे त्यांचे मेव्हणे. पवार हे एनडींच्या बायकोचे भाऊ. पण पवारांच्या प्रभावाखाली नसलेला एकमेव नेता असे त्यांचे वर्णन केले जाते असे वागळे म्हणाले. कर्मवीर भाऊराव पाटिलांच्या तालमीत तयार झालेला हा गडी अजूनही रयत शिक्षण संस्थेची गाडी हाकत आहे.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला राजकारणी वाटलेले एनडी मुलाखतीच्या शेवटी मात्र त्यापेक्षा खूप मोठ्ठे समाजकारणी आहेत असेच वाटले.
हा कार्यक्रम आपल्याला http://www.ibnlokmat.tv/gallery.php?id=1&conid=57082 या लिंकवर बघता येईल.
रविवार, २८ जून, २००९
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा