पुस्तक ओळख - पश्चिमप्रभा

on रविवार, मार्च १५, २००९

जवळजवळ दर भारतभेटीत काही ना काही पुस्तकं विकत घ्यायचा प्रयत्न असतो. तिथे गेल्यावर वेळ थोडा असतो, त्यामुळे जायच्या आधीच काही पुस्तकांची यादी तयार करून सुसज्जच जावे लागते. तीन - चार महिन्यांपूर्वी असाच योग आला. काही पुस्तकांची नावं सुचव असं कळवल्यावर मुक्तसुनीतनी महेश एलकुंचवारांच्या 'पश्चिमप्रभा' या पुस्तकाचं नाव अग्रक्रमाने घेतलं. त्यामुळे पुस्तक घेतलेच.

हे पुस्तक, एलकुंचवारांनी 'लोकमत' मधे २००४-०५ साली साधारणपणे वर्षभर पाश्चिमात्य साहित्याची तोंडओळख मराठी सामान्य वाचकाला व्हावी अशा हेतूने चालवला होता. यामधे इंग्रजी बरोबरीनेच इतर युरोपिय भाषामधल्या काही उत्कृष्ट कलाकृतींचाही अतिशय धावती पण नेमकी अशी ओळख करून दिली आहे. वृत्तपत्रिय स्तंभलेखन या स्वरूपातले हे लेख अगदी छोटेखानी आहेत आणि ते त्या कलाकृतीची केवळ ओळख करून देणे एवढ्याच पुरते मर्यादित आहेत. पुस्तकाच्या मलपृष्ठावर एलकुंचवारांची भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. ते म्हणतात,

".... गेली पन्नास वर्षे मी पाश्चात्य वाङ्मय वाचत आहे. त्याबद्दल बोलावे, त्याच्याबद्दल ऐकावे असा योग सहसा येत नाही. त्यामुळे.... मला विशेष आवडलेल्या पुस्तकांची... तोंडओळख वाचकांना करून द्यावी असे मला वाटले.

हे छोटे लेख टिपणवजा आहेत. ते समीक्षा नव्हेत. ते फार विवेचकही नाहीत.

.... ही सर्वच पुस्तके इतकी मोठी व अभिजात आहेत की एकेका छोट्याशा टिपणात त्यांना गवसणी घालणे शक्य नाही. पण ज्यांनी ती वाचलेली नाहीत त्यांना ती वाचावीशी वाटावीत व ज्यांनी ती वाचलेली आहेत त्यांना पुनःप्रत्यय मिळावा एवढाच मर्यादित हेतू हा स्तंभ लिहिताना मी मनाशी वागवला होता."

खरं म्हणजे लिहिणारे एलकुंचवार, विषय त्यांना आवडलेल्या साहित्यकृती आणि त्याही अभिजात वगैरे, तेव्हा इतक्या छोट्या टिपणवजा लेखांतून त्या त्या कलाकृतींचे समग्र दर्शन घडवणे ही एक तारेवरचीच कसरत होती. पण त्यांनी ती यशस्वीपणे निभावून नेली आहे. पुस्तकात जागोजागी प्रत्येक कलाकृतीतलं नेमकेपण टिपण्याचा त्यांचा गुण जाणवतो.
हेन्री मिलर, व्हॅन गॉफ, चेकोव, मॉम, टी. एस. एलियट, ग्रॅहॅम ग्रीन, पिरांदेलो, इब्सेन अशी बरेच वेळा कानावर पडलेली नावं तर त्यात आहेतच. पण रँबो, सोग्याल रिंपोचे, वॉल्ट व्हिटमन, लोर्का, ज्याँ जेने, सिल्विया प्लाथ अशी माझ्या सारख्याला कधीच माहित नसलेली नावं पण आहेतच. यातले काही लेखक तर रूढार्थाने साहित्यिकही नाहीत. उदाहरणार्थ तिबेटन लामा सोग्याल रिंपोचे हे धर्मगुरू. त्यांच्या 'तिबेटन बुक ऑफ लिव्हिंग अँड डायिंग' बद्दल खूप छान ओळख आहे. तसेच दाग हामरस्कोल्ड, हे गृहस्थ तर युनोचे सरचिटणीस. राजनयिक. पण त्यांचे 'मार्किंग्ज' हे काय जबरदस्त ताकदीचे असावे हे त्यांच्यावरचा लेख वाचताना जाणवते. पॉल ब्रंटनचे 'अ सर्च इन सिक्रेट इंडिया' हे एकमेव पुस्तक असे की जे मी आधी वाचले होते, आणि पुनःप्रत्ययाचा आनंद नक्कीच मिळाला.

पुस्तकात जागोजागी एलकुंचवाराच्या चौफेर वाचनाची कल्पना येते. रिंपोचेंच्या पुस्तकाच्या ओळखीत ते लिहितात, "गुरू रिंपोचे सांगतात ते भारतीय माणसाला नवीन नाही. योगसूत्रातला समाधीपाद आणि साधनपाद वाचलेल्या माणसाला तर नाहीच नाही." !!! तर बरेच ठिकाणी पाश्चात्य कलाकृतीशी समांतर अशी भारतीय किंवा मराठी साहित्यातली उदाहरणं ते देतात. ललित, कादंबरी, कविता, नाटक असे सगळेच साहित्यप्रकार हाताळले आहेत. शेवटी, "या माणसाने आयुष्यात फक्त वाचनच केले आहे का?" असे वाटायला लागते.

पण हे साधारण तीसेक लेखांचे पुस्तक वाचल्यावर माझी मात्र गोची झाली आहे. 'एकदा तरी वाचायची आहेत' या यादीत एकदम इतक्या पुस्तकांची भर पडली आहे. म्हणजे, एकंदरीत पुस्तकाचा मूळ उद्देश नक्कीच साध्य झाला आहे.

***

पश्चिमप्रभा
महेश एलकुंचवार

पहिली आवृत्ती (२००६)
चक्षू प्रकाशन, औरंगाबाद.

मूल्य : रू. १४०/-