&%^$@# !!!

on गुरुवार, फेब्रुवारी २५, २०१०

दचकायला काय झालं? .... ते शीर्षक तसंच आहे.... &%^$@# !!!

चाणाक्ष लोकांच्या लक्षात आलंच असेल... &%^$@# !!! म्हणजे काय ते. ज्यांच्या आलं नसेल त्यांच्या लवकरच येईल. :)

तर झालं काय... नुकताच सौदी अरेबियामधे जाण्याचा योग आला होता. दिवसभर कस्टमरकडे राबराबून मी माझ्या एक दोन सहकार्‍यांबरोबर गेस्टहाउसकडे परत चाललो होतो. ऑफिसमधून बाहेर आलो आणि टॅक्सीला हात केला. टॅक्सी थांबली. आखाती देशात सहसा टॅक्सीवाले पाकिस्तानी किंवा भारतियच असतात. तसे असले तर गप्पा मारत प्रवास होतो. पण त्या दिवशीचा टॅक्सीवाला नेमका येमेनी होता... टॅक्सी सुरू झाली. गडी भलताच गप्पिष्ट होता. त्याची अखंड बडबड सुरू झाली. त्याचं अस्खलित आणि माझं मोडकं अरबी... पण बोलणे भाग होते. रियाधमधला अगाध ट्रॅफिक... प्रचंड मोठ्या हायवे वरून ताशी १००+ किमीच्या वेगाने खेळलेल्या आट्यापाट्या, खोखो, हुतूतू वगैरे प्रकारांमुळे हार्ट अ‍ॅटॅक येऊ न द्यायचा असेल तर मन असं गुंतवणं भागच असतं.

माझ्या बरोबर माझा आयुष्यात पहिल्यांदाच भारताबाहेर, ते सुद्धा थेट सौदी अरेबियामधे आलेला एक सहकारी होता. तिथल्या एकंदरीत कडक नियम / शिक्षा वगैरे बद्दल त्याचं इंडक्शन भारतातच झालं होतं. तो अगदी गप्प गप्प असायचा... न जाणो आपण हिंदीत का होईना पण काही चुकीचं बोललो तर लफडं व्हायचं उगाच... म्हणून तो कायम गप्प. पण आमच्या गप्पा चालू झाल्यावर त्याला पण मूड आला.

ड्रायव्हरसाहेब अगदी दिलखुलास माणूस निघाले. त्यांचं बोलणं अगदी धबाधबा. रस्त्यावरील इतर ड्रायव्हरांबद्दलचा त्यांचा आदर आणि प्रेमभाव अगदी ओसंडून वाहत होता. तेवढ्यात एका गाडीने आमच्या गाडीला अगदी सराईत कट मारत ओव्हरटेक केले. झाले... पुढची पाच मिनिटे आमच्या टॅक्सीत नुसता कल्ला झाला... मला अरबी फारसे येत नाही पण त्या पाच मिनिटात त्या दुसर्‍या चालकाच्या कोणकोणत्या नातेवाईकांची आणि अवयवांची आठवण निघाली होती हे कळण्याइतपत नक्कीच कळते.

गडबड शांत झाल्यावर माझा सहकारी हळूच विचारता झाला.

'काय झालं?'

'काही नाही रे... घाबरू नकोस. तो अगदी नॉर्मल आहे.'

'पण तो असा अचानक चिडला का?'

'अरे, त्या दुसर्‍या गाडीने आपल्याला ओव्हरटेक केले ना... म्हणून हा जरा स्वतःला मोकळा करत होता.'

'काय बोलला तो?'

'*&^%$@# !!! असं म्हणाला तो'

'म्हणजे? शिव्या दिल्या त्याने? त्या पण असल्या? आणि इतकं चिडून?'

'हो. सहसा शिव्या अशाच देतात. आणि असल्याच देतात.'

माझा मित्र दोन मिनिटं विचारात पडला आणि मग हळूच मला म्हणाला...

'सर, इथे शिव्या देणं अलाऊड आहे?'

'!.!.!.!.!' ... मी स्पीचलेस. अगदी नि:शब्द वगैरे.

शक्य असतं तर मी त्याला 'अलाऊड आहे' हे डेमो देऊन सांगितलं असतं इतका वैतागलो मी. अरे सौदी अरेबिया झालं म्हणून काय झालं? मानवाच्या जन्मसिद्ध अधिकारात मोडणार्‍या 'शिव्या देणे' या प्रकाराबद्दल एवढं अज्ञान? मी त्याला नीट समजवलं... अर्थात शिव्या न देता. खूप कंट्रोल केलं तेव्हा मी स्वतःला.

खरं म्हणजे शिव्या हा मानवतेला लाभलेला आणि पुढे नेणारा एक अनमोल ठेवा आहे. जरा विचार करा...

तुम्ही अश्याच एखाद्या प्रसंगात सापडला आहात. कॉलेज लाईफ मधला पहिलाच रोझ डे... (आपापल्या प्रेफरंसप्रमाणे) आवडती व्यक्ती समोरून येत आहे. तुमच्या हातात गुलाब. ती व्यक्ती जवळ यायची वाट बघत तुम्ही अगदी उत्कंठेच्या टोकावर उभे. ती व्यक्ती जवळ येते... तुम्ही गुलाब पुढे करणार एवढ्यात..... दुसराच कोणी तरी येतो... आख्खा रेडरोझचा गुच्छच्यागुच्छ त्या व्यक्तीला देतो... ती व्यक्तीपण तो गुच्छ अगदी हसून आणि लाजून वगैरे स्वीकारते... तुमचा पत्ता कट झालाय तुमच्या लक्षात येतं... आणि... आता जस्ट विचार करा हं... शिव्या हा प्रकार अस्तित्वातच नसता समजा, तर तुम्ही नक्कीच त्या नको तिथे नको तेव्हा कडमडणार्‍याचा खून केला असता. पण तसं होत नाही (बहुतेक वेळा तरी... टार्‍याची ग्यारंटी नाही... ). तुम्ही चरफडता, हात (एकमेकांवर) चोळता... एक शंभरेक शिव्यांची लड लावता आणि गुलाबासाठी दुसरं एखादं डेस्टिनेशन शोधायला चालू पडता... थोडक्यात काय तर... यु मूव्ह ऑन. खलास. सिंपल. विषय संपला.

हेच नेमकं शिव्यांचं महत्व आहे.

माणसाच्या मनातल्या भावनांचा निचरा न होणं हे मनोविकाराचं एक प्रमुख कारण आहे. प्रत्येक वेळी तो निचरा आपल्याला पाहिजे तसा नाही होऊ शकत. आपण समाजात राहतो. समाजाची काही एक चौकट असते. त्या चौकटी बाहेर पडणं कधी कधी खरंच हितावह नसतं आणि कधी कधी आपल्यात तेवढा दम नसतो. तिथे शिव्या कामी येतात. व्यक्त किंवा अव्यक्त म्हणजेच उघड नाहीतर मनातल्या मनात तरी आपण चार शिव्या हासडतो (हासडलेल्या शिव्या दिलेल्या शिव्यांपेक्षा अधिक फायदेशीर आणि गुणकारी असतात) आणि भावना तुंबू देत नाही. शिव्या अनादी आहेत. शिव्या अनंत आहेत. प्राण्यांना स्वत्वाची भावना नसते असं म्हणतात. पण जेव्हा पासून मानवाला उत्क्रांतीच्या एका विशिष्ट टप्प्यावर स्वतःच्या अस्तित्वाची जाणिव झाली तेव्हा पासून 'व्यक्त होणे' ही एक फार मोठी, किंबहुना सगळ्यात मोठी भावनिक गरज बनली. भाषा वगैरे नंतर बनल्या पण शिव्या मात्र त्या आधीही असणारच. शिव्या भाषेवर अवलंबून नाहीत. शिव्यांची एक स्वतंत्र भाषा आहे. मौखिक भाषा त्यात दुय्यम आहे, नसली तरी चालावी अशी. नाही तर एखाद्या मुक्या माणसाची पंचाईत. पण असे असले तरी, शिव्या या कोणत्याही भाषेच्या अगदी मूळ वैशिष्ट्यांपैकी असतात. सर रिचर्ड बर्टनला बर्‍याच भाषा यायच्या. तो जिथे जाईल तिथली भाषा शिकायचा. अगदी पारंगत होत असे तो. तो म्हणतो, "कोणतीही भाषा शिकायची युक्ती म्हणजे सर्वप्रथम त्या भाषेतल्या शिव्या शिकायच्या. बाकीची भाषा आपोआप येईल."

शिव्या मुख्यत्वे जरी त्या देणार्‍याच्या मानसिक समाधानासाठी असल्या तरी बरेच वेळा त्या ज्याला दिल्या जातात त्याच्यापर्यंत पोचल्या तर त्यातले समाधान द्विगुणित होते. म्हणजे, एखाद्या बाईने लाखो रूपयाचे दागिने घालायचे आणि घरात दारं खिडक्या बंद करून अंधार्‍या खोलीत कोंडून घ्यायचे. मग कशाला घालायचे ते दागिने? तसेच जर का शिव्या दिलेल्या पोचल्या नाहीत तर मजा किरकिरा व्हायचा संभव असतो. यासाठी देहबोली अतिशय आवश्यक असते. शिव्या देतानाचा आवेश / मुद्रा / हातवारे बरोब्बर जमले पाहिजे. शब्दांवरचे आघात जमले पाहिजेत. त्यामुळे, कधी कधी अगदी साध्या साध्या शिव्या पण खूप इफेक्टिव्ह बनतात. अन्यथा अगदी घणाघाती शिवी पण मिळमिळीत होऊ शकते. तो इफेक्टच महत्वाचा असतो. अशी एक नीट दिलेली शिवी कमीतकमी हजारवेळा तरी कानफटवण्याच्या बरोबरीची असते.

शिव्यांचेही बरेच प्रकार असतात. काही शिव्या शारिरीक संदर्भात असतात. यामधे अवयवांचे संदर्भ अथवा एखाद्या शारिरीक व्यंगाचा संदर्भ इत्यादी येते. काही शिव्या नातेसंबंधांवर आधारलेल्या असतात. तर काही शिव्या प्राणीजगताशी संबंधित असतात. धार्मिकतेच्या संदर्भाने पण शिव्या दिल्या जाऊ शकतात. या प्रकारच्या शिव्या जरा जास्तच खोल जखम करतात. कित्येक वेळा शिव्या या केवळ 'दूषण' न राहता 'शाप' या सबकॅटेगरी मधे पोचतात. अशा शिव्या, शिव्या दिल्याजाणार्‍या व्यक्तीच्या भविष्याकाळातील अवस्थेबद्दल अघोरी भाष्य करतात. काहीही असले तरी समोरच्याला व्यथित करणे हा उद्देश सफल करण्याच्या दृष्टीनेच सगळ्या कृती होत असतात.

भारताच्या संदर्भात बोलायचे तर जातीवरून दिलेल्या शिव्या अतिशय तीव्र असतात. इतक्या की केवळ या प्रकारच्या शिव्यांबद्दल एक कायदाच अस्तित्वात आला. भारतातील जातिय व्यवस्थेचा नृशंस इतिहास याला कारणीभूत आहे. एखाद्या माणसाला जातिवाचक शिवी देताना ती शिवी ज्याला दिली जात आहे त्याला त्या शब्दामागे हजारो वर्षांचा अन्याय एकवटल्याची जाणिव होत असते आणि म्हणून तो एखादा शब्द खोल जखम करून जातो. त्या माणसाच्या आत्मसन्मानालाच धक्का देऊन जातो.

सुरूवातीला म्हणलं तसं शिव्या मुख्यत्वेकरून मनातील भावनांना वाट करून देणे याकरिता असतात. सहसा राग आल्यावर जरी शिव्या वापरल्या जात असल्या तरी बरेच वेळा आनंदाच्या वेळीही पटकन आपल्या तोंडात शिव्या येतात. तुमचा एखादा शाळेतला जीवलग मित्र शाळा सुटल्यावर दुरावतो... वर्षानुवर्षे भेट होत नाही. एखाद दिवशी अचानक भेटतो... पूर्वीचे प्रेम, दोस्ती उफाळून येते... दोघेही अगदी मनापासून आनंदित होतात तेव्हा ते म्हणतात.... "भो***... अरे आहेस कुठे? साल्या, किती वर्षांनी भेटतो आहोत आपण!!!" .... आता इथे त्या शिव्यांचा शब्दार्थ पूर्णपणे लुप्त होऊन केवळ भावार्थ तेवढा उरतो. आणि तो एकमेकांना बरोब्बर कळतो. सांगावा लागत नाही. जिथे सांगायची गरज पडावी तिथे असे शब्द येतच नाहीत तोंडातून.

महाराष्ट्र संतभूमी आहे असे म्हणतात. मराठी भाषेच्या जोरदार शिवीवैभवाच्या प्रभावातून इथले संतही सुटले नाहीत. अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थांबद्दल कित्येक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. त्यांच्या दर्शनाला गेल्यावर त्यांनी शिव्या घातल्या तर तो विशेष कृपाप्रसाद आहे असे समजले जायचे म्हणे. गाडगेबाबा पण रोखठोक आणि शिव्या वापरून बोलण्याबद्दल प्रसिद्ध होते असे कुठे तरी वाचल्याचे आठवते आहे. यादी फार मोठी आहे.

पण मला खरं विचाराल तर सगळ्यात मोठी शिवी कोणती म्हणाल तर मी एकच सांगेन... दुर्लक्ष. होय... दुर्लक्ष करण्यासारखा दुसरा अपमान नाही कोणाचा. शिवीचे उद्दिष्ट्य जे आहे ते समोरच्याचा अपमान करणे हे होय. आणि समोरच्या माणसाची दखलच न घेणे या सारखा अपमान सगळ्यात जास्त झोंबणारा असतो. शिवाय ही शिवी निर्विवादपणे १००% सगळ्या सभ्यतेच्या आणि कायद्याच्या नियमात बसते. ही शिवी दिली म्हणून कोणावर गुन्हा नोंदवला गेला आहे असे ऐकिवात नाही. बिन्धास्त देऊ शकतो. किमान (म्हणजे अगदी शून्य) शब्दात, कमाल अपमान करणारी अशी ही शिवी आहे.

पण दुर्लक्षाच्या बाबतीत एक गंमतीदार विरोधाभास आहे. मूळात शिव्या या मनातील भावनांचा निचरा करण्यासाठी दिल्या जात असल्या तरी, त्याच भावनांवर पूर्णपणे नाही तरी खूपसा ताबा मिळवल्याशिवाय ही शिवी देता येत नाही. याबाबतीत लहानपणी शाळेत शिकलेली महात्मा गांधींची गोष्ट अजूनही लक्षात आहे...

एकदा एका माणसाने गांधीजींना खूप निंदा करणारे पत्र लिहिले. त्यात त्यांना शिव्याही भरपूर घातल्या होत्या. ते पत्र मिळाल्यावर गांधीजींनी त्याला लावलेल्या टाचण्या काढून घेऊन ते पत्र परत पाठवले... त्यासोबत एका कागदावर हे ही लिहिले... "तुमचे पत्र मिळाले. वाचले. त्यातले मला हवे असलेले, उपयोगी असेलेले ठेवून घेतले. नको असलेले तुम्हाला परत करतो आहे."

मला सांगा, त्या पत्रलेखकाला सणसणीत कानाखाली बसल्यासारखं नसेल वाटलं? नक्कीच वाटलं असणार.

तर, अशा या शिव्या. आता या लेखाकडे दुर्लक्ष करून तुम्ही मला शिव्या घलणार नाही अशी अपेक्षा करतो. ;)

ती

on शनिवार, फेब्रुवारी १३, २०१०

अजून अंधार पडायला खूपच वेळ होता पण उन्हं कलायला लागली होतीच. तशात थंडीचे दिवस म्हणजे अंधार लवकर आणि हवेतला गारठा वाढत जाणारा... टेकून बसल्यामुळं आणि हवेतल्या गारव्यामुळं तिला हलकीशी डुलकी लागलीच.

तेवढ्यात हळूवार पण अगदी ताकदीने मारलेल्या दोन तीन लाथा तिच्या पोटात बसल्या. दुर्लक्ष करावं असं वाटता वाटता अजून एक लाथ बसली आणि आता हे टाळणे शक्य नाही हे समजून तिने डोळे उघडले. समोरच, तो हसत हसत मस्त पहुडला होता मांडीत. तिला एकदम हसूच आलं. एवढंसं कार्टं पण बरोब्बर सगळं मनासारखं करून घेतं... एकदम लबाड पण गोड आहे. कायम हिच्याच कडेवर. तिने सारखं याच्याशी खेळायचं. मस्ती करायची... तिलाही ते खेळणं आवडलंच होतं.

तो यायच्या आधी तिला एकटीला खूप कंटाळा यायचा.

आत्ता सुद्धा जवळ एक चांदी पडली होती... तीच पकडायचा प्रयत्न चालला होता त्याचा. ते जमत नव्हतं... म्हणूनच मग त्या लाथा आणि ढुशा. मस्त वार्‍याच्या झुळकीमुळे छान वाटत होतं. तिने त्याला थोडं घट्ट जवळ ओढून घेतलं. टोपडं नीट केलं. पण सराईतासारखी तिची नजर आजूबाजूला भिरभिरतच होती. वेळ चुकवून चालत नाही हे तिला माहित होतं... शिवाय आत्ताशी कुठे चालू होत होता तिचा दिवस. अजून आख्खी संध्याकाळ जायची आहे.

तशात, एकदम बाजूला वेगाने पळणार्‍या गाड्या मंदावल्या... त्यासरशी ती उठलीच... सिग्नल पिवळा... ती भक्ष्यावर झडप घालताना शेवटच्या क्षणी संपूर्ण अंग ताठ करणार्‍या वाघासारखी पूर्ण फोकस्ड... पुढच्या सगळ्या अ‍ॅक्शन्स ठरलेल्या... किती वेळात सिग्नल लाल होणार... गाड्या थांबे थांबे पर्यंत किती सेकंद लागणार... सगळं सरावाचं...

सिग्नल लाल... तिने पूर्ण ताकदीने त्याच्या ढुंगणावर चिमटा काढला... तो कळवळला... आकांत सुरू...

त्याला काखेला मारून ती पहिल्याच गाडीसमोर तोंड वेंगाडून हात पसरून उभी राहिली...

परवशता पाश दैवे... ३

on शुक्रवार, नोव्हेंबर १३, २००९



ही कथा नाही. हा (सुदैवाने) माझा अनुभवही नाही, म्हणजे थोडा माझा आहेच पण अगदी पूर्णपणाने नाही. हे माझ्या अनुभवाचे व काही करोड दुर्भागी आणि अश्राप जीवांच्या अनुभवांचे मिश्रण मात्र आहे. झेपल्यास वाचा. तसेही ढोबळमानाने काय घडले होते हे आपल्याला माहितच असते. वाचले नाही तरी, कमीतकमी मी तरी असे वागणार नाही एवढे स्वतःशीच ठरवा.

परवशता पाश दैवे... भाग १ , भाग २

*************

किती वेळ गाडी धावत होती कोणास ठाऊक. गाडी सरळ एका रेषेत भरधाव चालली होती. पण अचानक गाडीचा वेग बराच मंदावला, गाडीने एक वळण घेतले आणि याची तंद्री भंगली. अंग आंबून गेलं होतं. दोन्ही बाजूला माडाची झाडं दिसत होती. आणि त्या झाडांच्या गर्दीतून निळ्या पाण्यावर नाचणार्‍या शुभ्र फेसाळ लाटा दिसायला लागल्या होत्या. अटलांटिकचे पहिले दर्शन सुखावून गेले. एकदम पिक्चर पर्फेक्ट. आपण कुठे चाललो आहोत याचे पूर्ण विस्मरण झालेले. गाडी तशीच एका गावात शिरली. गाव अगदी आपल्या गोव्यात असल्यासारखे. माणसांचे दिसणे सोडले तर अगदी गोव्यात असल्याची अनुभूती. कोळ्यांची वस्ती प्रामुख्याने असल्याच्या खुणा आणि वास, अगदी जागोजागी.





गावातून जाताजाता गाडीने एकदम एक वळण घेतले, अगदी छोट्याशा खाडीवरचा चिमुकला पूल ओलांडला आणि धाडकन समोर एक महाकाय, प्रचंड पांढरी इमारत उभी राहिली. बघणार्‍याला दडपून टाकेल अशी....

"हिअर वुई आर!!! एल्मिना कॅसल!!!" ड्रायव्हर म्हणाला. एका मोठ्या मैदानात गाडी उभी राहिली आणि सगळे बाहेर पडले.



एल्मिना (एल मिना, El Mina in Portuguese language) ... मानवी इतिहासातल्या एका काळ्याकुट्ट आणि महत्वाच्या कालखंडाचा मूक साक्षीदार. अगदी भव्य अशी पांढरी, लालसर कौलं असलेली, अगदी युरोपियन वळणाची इमारत.

पंधराव्या शतकाच्या मध्यावर, उत्तर अटलांटिक महासागरात पोर्तुगिज दर्याचे राजे होते. बलाढ्य आरमाराच्या आणि नौकानयनाच्या वारशाच्या जोरावर ते जग पादाक्रांत करायला नुकतेच बाहेर पडत होते. आफ्रिका आणि भारतातून निघणारा सोन्याचा धूर त्यांना खुणावत होता. धर्मप्रसाराचं अधिकृत आणि पवित्र कर्तव्यही अंगावर होतंच. आफ्रिकेच्या किनार्‍या-किनार्‍याने त्यांची समुद्री भटकंती चालू होती. अशातच त्यांची जहाजं आफ्रिकेच्या पश्चिम किनार्‍यावर, एल्मिनाच्या जवळपास, साधारण इ.स. १४७१ च्या सुमारास येऊन थडकली. सुरूवातीला बरीच वर्षं जम बसवण्यात आणि स्थानिक लोकांशी मैत्री करण्यात गेला. हळूहळू व्यापार वाढला. कायम स्वरूपी तळ उभारण्याची गरज पडू लागली आणि एल्मिना कॅसल इ.स. १४८२च्या सुमारास बांधून झाला, तो अजून उभा आहे. काळाच्या ओघात मालक बदलले... पोर्तुगिज गेले डच आले, डच गेले इंग्रज आले, आता तर गोरेच गेले आणि स्थानिक लोकांची मालकी आहे... व्यापाराचेही स्वरूप बदलले... सोन्याचे साठे जाऊन माणसांचे साठे आले... तब्बल चारशे वर्षे करोडो अभागी जीव दास्यात ढकलले गेले... सध्या टुरिझम नामक व्यापार जोरात आहे.

एल्मिनाने सगळे बघितले आणि अजूनही शांतपणे उभा आहे... पुढे येणार्‍या बदलांची वाट बघत.



किल्ल्यामधे शिरण्यासाठी फक्त एकच दार आहे. किल्ल्याच्या चारही बाजूला एका आत एक असे दोन खंदक आहेत. खंदक बरेच खोल आणि भरपूर रूंद आहेत. या खंदकात पाणी सोडलेले असे.



खंदकावरील एकमेव लाकडी पूलाची उघडबंद हालचाल यंत्राच्या सहाय्याने होत असे. पूल बंद झाला की आत शिरणे अशक्य.

आत शिरल्या शिरल्या एक छोटेसे स्वागतकक्ष आहे. माफक किंमतीत सर्व परिसर फिरायचे तिकीट घ्यायचे. सगळा किल्ला हिंडून फिरायला गाईड्स नेमलेले आहेत. हे गाईड्स इतर कोणत्याही ऐतिहासिक स्थळांच्या गाईड्ससारखे एक नंबर बोलबच्चन असतात. पण त्यांच्या बरोबरच आत फिरावे... त्याशिवाय तिथल्या जागांचे वैशिष्ट्य कळत नाही.



आत शिरल्याशिरल्या एक मोकळे पटांगण आहे. पटांगणाच्या चारही बाजूला किल्ल्याच्या इमारती आणि तटबंदी आहे. या पटांगणाच्या एका बाजूला दिसते आहे ती इमारत मुख्य इमारत. तिथे किल्ल्याच्या गव्हर्नराचे कार्यालय आणि खाजगी निवास इत्यादी होते.



पटांगणाचे दुसर्‍या बाजूने दृष्य. समोर दिसत असलेली इमारत पोर्तुगिज काळात कॅथलिक चर्च होती. पुढे डच आले... ते कट्टर कॅथलिकविरोधी. त्यांनी त्या इमारतीत वाचनालय आणि इतर काही कार्यालये थाटली.



किल्ल्यामधे स्त्री आणि पुरूष बंद्यांसाठी वेगवेगळ्या कोठड्या होत्या. एकावेळी साधारणपणे चारशे ते पाचशे माणसं या कोठड्यातून ठेवली जात.



एका अंधार्‍या, भुयारासारख्या बोळकांडीतून किल्ल्याची सफर सुरू होते. या वाटेवर मिट्ट काळोख. दिवसाउजेडी सुद्धा काही दिसणार नाही. कॅमेर्‍याच्या फ्लॅशमुळे उजेड वाटतोय. अन्यथा सगळे अंदाजाने पाऊल टाकत, बिचकत चालले होते.





बायकांसाठीची कोठडी. आणि त्याआधीच्या छायचित्रात त्या कोठडीचे प्रवेशद्वार. या कोठडीत सर्व वयाच्या बायका आणि मुली ठेवलेल्या असत. मोठ्या मुशिलीने साठ सत्तर बायका मावतील, तिथे साधारण दोन-अडिचशे बायका अगदी सहजी कोंडल्या जात!!! कायम अंधार... समुद्राच्या सान्निध्यामुळे दमट खारी हवा... कुबट वास... आजही त्या कोठडीत पाच मिनिटे उभे राहणे मुश्किल होते. कैदी इथे साधारण दीड दोन महिने राहत असत... जहाज येई पर्यंत.



कोठडीतून एवढे एकच दृष्य दिसते.



गाईड विचारतो, "हे काय आहे? कोणी ओळखणार का? प्रयत्न करा." सगळे विचार करत असतात. कोणालाच नीट ओळखता येत नाही. गाईड सांगतो... "मेहेरबान गोर्‍या लोकांनी आतल्या बायका मरू नयेत म्हणुन बनवलेले हे एक व्हेंटिलेटर आहे. वरची मोकळी हवा खाली कोठडीत यावी म्हणून. फक्त एकच लोचा आहे. हे व्हेंटिलेटर वर दारूगोळा ठेवायच्या खोलीत उघडते. त्यामुळे कायम तिथली दूषित हवा इथे खाली येत असे."



बायकांच्या कोठडीबाहेरचे छोटे पटांगण. मोकळी जागा. रोज संध्याकाळी बायकांना इथे जमवले जात असे. हे छायाचित्र जिथून काढले आहे तिथे गव्हर्नर उभा राहत असे आणि निवड करत असे. मग त्या निवडलेल्या स्त्रीला इतर खास गुलाम बायका छान आंघोळ वगैरे घालून, सजवून गव्हर्नराच्या खोलीत पाठवत असत. औटघटकेची राणी. घटका संपली की राणीची परत दासी.



निवडलेल्या स्त्रीला इतरांपासून वेगळे करून वर न्यायचा मार्ग.

आज हे ऐकायला भयंकर वाटते. पण तेव्हा या अमानुष यातनांमधून सुटायचा हा एकमेव मार्ग असायचा या स्त्रियांसाठी. अशा गोर्‍या लोकांनी उपभोगलेल्या स्त्रिया जर का गरोदर राहिल्या तर त्यांचे नशिबच पालटून जायचे. अशा गरोदर स्त्रिया वेगळ्या काढून त्यांना गावात दुसरीकडे चांगल्या व्यवस्थेत ठेवत. त्यांच्यासाठी खास सोयी असत. त्यांच्या मुलांना गोरे लोक आपले नाव देत. त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण वगैरे मिळत असे. आजही एल्मिना परिसरात डच / इंग्लिश / स्कँडिनेव्हियन आडनावे असलेली आणि रंगाने खूप उजळ असलेली खूप मोठी प्रजा सुखेनैव नांदत आहे.



नाठाळपणा करणार्‍या बायकांना पायात असे जड लोखंडी गोळे बांधून दिवस दिवस उभे करत असत.

या सगळ्या प्रकारात बरेच बंदी दगावत असत. साहजिकच असा प्रश्न पडतो की ज्या लोकांना विकून पैसा कमवायचा त्यांना असे मारून नुकसानच ना? मग तरीही असे का व्हायचे?

या प्रश्नाची दोन उत्तरं आहेत. मुख्य उत्तर हे की या कैद्यांचं मनोधैर्य खच्ची करणे. त्यांच्यामधून बंडाची भावना कायमची हद्दपार करणे, मानसिक दृष्ट्या त्यांना पूर्णपणे निर्बल करणे हा एक फार मोठा महत्वाचा भाग असे. दुसरे असे की, या सगळ्यातून तावून सुलाखून निघालेले बंदी अगदी चिवट आणि उत्तम प्रतीचे असत. अशा गुलामांना जास्त भाव येत असे.

या सगळ्या प्रकाराला 'ब्रेकिंग डाऊन' म्हणत. रानटी घोड्यांना माणसाळवायच्या प्रकाराला पण 'ब्रेकिंग डाऊन'च म्हणतात !!!!!





अशा रितीने पूर्णपणे खच्ची झालेले कैदी संपूर्णपणे 'मवाळ' होऊन आता पुढे काय वाढून ठेवले आहे याची वाट बघत शांत बसून असत. एक दिवस जहाज येई. मग लगेच 'सामान' जहाजात भरायची लगबग सुरू होई. या दरवाज्यातून त्यांचा अखेरचा प्रवास सुरू होई... कधीही न परतण्यासाठी. या दरवाजातून गेल्यावर एक खोली आहे. बंदी निमूटपणे एकामागोमाग चालत राहत.



दुसरा दरवाजा. मग अजून एक लहान अंधारी खोली.



तिसरा दरवाजा. मग शेवटची खोली. शेवटचा दरवाजा.



शेवटचा दरवाजा. डोअर ऑफ नो रिटर्न. इथून बंद्यांना लहान होड्यांमधे बसवून जहाजापर्यंत नेले जाई.

इथे येई पर्यंत बहुतेक कैद्यांना आपले भवितव्य समजलेले असे. इथेच त्यांचा आफ्रिकेच्या भूमीला शेवटचा स्पर्श. कित्येकदा आख्खी कुटुंबच्या कुटुंब पकडली गेली असत. इथे शेवटची ताटातूट, शेवटची भेट. या नंतर स्त्रिया आणि पुरूष परत वेगळे वेगळे 'स्टोअर' केले जात जहाजात. आणि मग जहाज अमेरिकेत पोचले की थेट विक्रीच. कायमची ताटातूटच. शिवाय, कित्येक लोकांना जहाज, समुद्र वगैरे माहितच नसत. असे लोक समुद्राच्या इतक्या जवळून दर्शनाने आणि होडीच्या हलण्याने बिथरून जात.



अमेरिका खंडातील कृष्णवर्णिय लोकांच्या दृष्टीने आज या स्थळाला, विशेषत: या शेवटच्या खोलीला एका तिर्थस्थळाचे स्वरूप आले आहे. खास करून या शेवटच्या दालनात वातावरण अगदी गंभीर असते... कोणी फारसे बोलत नाही. सगळेच नि:शब्द असतात. प्रत्येकजण त्या वेळच्या परिस्थितीची कल्पना करायच्या प्रयत्नात असतो. भेट देणारे कृष्णवर्णिय, आपल्या न बघितलेल्या पूर्वजांच्या स्मृतीने, त्यांच्या अनाम वेदनेने व्यथित होऊन रडत असतात. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करत असतात. फार वेळ उभे राहवत नाही तिथे. खायला उठते... गर्दी असूनही. कधी तिथून बाहेर पडतो असे होते.





या चार खांबांवर धक्का होता... तिथे जहाजं नांगरून पडत. छायाचित्र शेवटच्या दारात उभे राहून काढले आहे. त्या काळी पाणी या दारापर्यंत होते. तिथे बोटीत बसवून बंदी जहाजाकडे रवाना केले जात. गेल्या पाच सहाशे वर्षात समुद्र मागे हटला आहे आणि शेवटच्या दारापासून धक्क्यापर्यंत आता वाळू आहे नुसती.

याच छायाचित्रात अगदी मागे एक जमिनीचा सुळका दिसतो आहे. त्या जमिनीच्या टोकावर केप कोस्ट नावाचा इंग्रजांनी वसवलेला स्लेव्ह कॅसल आहे. डचांची आणि इंग्रजांची जबर दुश्मनी होती इथे.

एकदा इथून बाहेर पडलं की बाकीचा किल्ला अगदी यंत्रवत फिरून होतो. कोणताही संवेदनक्षम माणूस त्या कोठड्या आणि ती शेवटची खोली बघून आल्यावर बाकीचे काही बघण्याच्या अवस्थेत असू शकत नाही. तरीही गाईडच्या मागे मागे फिरतोच हा.



इथे एका गव्हर्नराला पुरले आहे. त्याचा मृत्यू इथेच झाला. त्याच्या स्मरणार्थ लिहिलेला हा लेख. त्यात त्याचे वर्णन 'दयाळू, न्यायी आणि पापभीरू' (काइंड, जस्ट अँड गॉडफिअरिंग) असे केले आहे !!!!!!!!!!!



गव्हर्नराचे निवासस्थान / शयनकक्ष... रंगल्या रात्री अशा...

***

युरोपियन आले. स्थिरस्थावर झाले. त्यांनी हळूहळू व्यापार वाढवला. अगदी माणसांचा व्यापार मांडला. एक नाही दोन नाही... तब्बल चार शतके हा व्यापार अव्याहत चालू होता. हा व्यापार त्रिकोणीय होता. युरोपातून तयार सामान आफ्रिकेत येई. हा फर्स्ट पॅसेज. ते सामान स्थानिक राजे घेत आणि त्याबदल्यात पकडलेले युध्दकैदी आणि पळवून आणलेले इतर बंदी युरोपियनांना देत. हा व्यापार बार्टर पध्दतीचा होता. हे गुलाम मग अमेरिकेत नेले जात असत, या आफ्रिका ते अमेरिका प्रवासाला मिडल पॅसेज म्हणत. गुलामांची विक्री करून त्या जागी वसाहतींमधे तयार झालेला कच्चा माल म्हणजे कापूस आणि साखर इत्यादी युरोपात नेले जात असे. हा फायनल पॅसेज.

सुरूवातीला या सामानाच्या बदल्यात आफ्रिकेतून सोने घेत असत गोरे लोक. पण पुढे अमेरिकेत वसाहती उभ्या राहिल्या. आधी पोर्तुगिज / स्पॅनिश लोकांनी प्रचंड मोठे भूभाग पादाक्रांत केले, मागोमाग इंग्रज आणि फ्रेंच आले. या नवीन वसाहतींमधे कापसाचे, उसाचे मोठमोठे मळे उभे राहिले. त्यासाठी मनुष्यबळ लागायला लागले. सुरूवातीला अमेरिकेतील स्थानिक लोकांना गुलाम बनवून काम करून घेणे सुरू झाले, पण हे स्थानिक लोक अतिश्रमामुळे आणि नवीन आलेल्या रोगराईमुळे लवकरच जवळपास नष्ट झाले. तेव्हा हा आफ्रिकेतून गुलाम आणायचा व्यापार फोफावला. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत हा व्यापार अधिकृतरित्या चालू होता. आधी पोर्तुगिज मग डच आणि नंतर इंग्रजांनी या व्यापारावर वर्चस्व गाजवले. गुलामांचा व्यापार बंद व्हायची दोन मुख्य कारणे सांगितली जातात.

एक, मध्ययुगात युरोपात झालेल्या ज्ञानक्रांती (रेनेसां) मुळे एकोणिसावे शतक उजाडता उजाडता अनेक समाजशास्त्रज्ञांनी / सुधारकांनी, या अमानुष व्यापाराला विरोध सुरू केला. ब्रिटनमधे अ‍ॅबॉलिशनची मोठी चळवळ उभी राहिली. दुसरे असे की, याच सुमारास युरोपात झालेल्या औद्योगिक आणि यंत्र क्रांतीमुळे शेती यंत्रांच्या सहाय्याने होऊ लागली. मोठमोठे मळे पिकवण्यासाठी माणसांची तितकीशी गरज नाही राहिली. त्यामुळे गुलामांची मागणी हळूहळू कमी होत गेली. या दोन महत्वाच्या कारणांमुळे हा व्यापार हळूहळू बंद झाला. अर्थात हे सगळे पूर्णपणे बंद होण्यास एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध उजाडावा लागला.

ढोबळमानाने, असा अंदाज केला जातो की एकूण ६ कोटी आफ्रिकन या व्यापाराकरिता पकडले गेले. त्यातले अंदाजे २ करोड लोक जहाजात चाढायच्या आधीच छळामुळे मृत्यू पावले. अंदाजे २ करोड लोक जहाजांवर, मिडल पॅसेज (अवधी साधारण अडिच महिने) मधे, मरण पावले. त्यांचे मृतदेह समुद्रात फेकून देण्यात येत. आणि फक्त २ करोड लोक अमेरिकेत पोचले. या २ करोडमधील एक फार मोठा हिस्सा, एल्मिना आणि केप कोस्ट मधून पाठवला गेला आहे. त्या दृष्टीने या दोन स्थळांचे महत्व जास्त आहे.

अजून एक समजूत अशी की हा व्यापार प्रामुख्याने गोर्‍या लोकांनी केला. पण वस्तुस्थिती अशी आहे की यात गोर्‍यांबरोबर स्थानिक काळे लोकही बरोबरीने सहभागी होते. स्थानिक टोळ्यांचे म्होरके / राजे (यांना आज 'चीफ' असे संबोधले जाते.) आपापसात सतत लढत आणि युध्दकैदी गुलाम म्हणून आणत. पुढे हे युध्दकैदी गोर्‍यांना विकले जाऊ लागले. किंबहुना गोर्‍यांना विकायला कैदी हवेत म्हणूनच युद्धं व्हायला लागली. त्यात, युरोपियन लोकांनी आफ्रिकेत बंदूक हे एक नवीन शस्त्र आणले. ते स्थानिक चीफ्सना विकले. आज असे म्हणतात की बंदूक हा एक खूप मोठा घटक ठरला या व्यापारात.

खरं तर आफ्रिकेत गुलामगिरीची प्रथा पूर्वापार होती. पण हे गुलाम काही झाले तरी आफ्रिकेत, बहुतेक वेळा आपल्याच गावात किंवा आजूबाजूच्या गावात राहत. त्यांना काही प्राथमिक असे अधिकारही असत. हुशारीच्या जोरावर ते आयुष्यात पुढे येऊ शकत. पण अ‍ॅटलांटिक गुलाम व्यापारामुळे हे गुलाम आपल्या भूमीपासून, संस्कृतींपासून, कुटुंबांपासून समूळ 'तुटले'. आणि हेच तुटलेपण हा या व्यापारातील अमानुषपणाचा कळस आहे. थोडक्यात म्हणजे, त्यांचे माणूसपण पूर्णपणे नाकारले गेले आणि त्यांना पशूंच्या पातळीवर आणले गेले.

या व्यापाराचे अनेकविध आणि अतिशय दूरगामी परिणाम आफ्रिकेवरच नव्हे तर आख्ख्या जगावरच झाले.

पहिला परिणाम म्हणजे, आफ्रिकेतून जे लोक गुलाम म्हणून पाठवले गेले ते सगळेच्या सगळे तरूण अथवा वाढत्या वयातली मुलं असे होते. इतक्या मोठ्या प्रमाणावर असे लोक बाहेर पाठवले गेले त्यामुळे स्थानिक शेती अथवा उद्योगधंद्यांवर अतोनात वाईट परिणाम झाले. या लोकांत बरेचसे कुशल कारागिर होते, कलाकार होते. हे सगळे थांबलेच.

दुसरे म्हणजे, आफ्रिकेचा हा भाग सोन्यासाठी प्रसिध्द होता. युरोपियनांनी या भागावर कब्जा केला आणि सोने अक्षरशः लुटले. 'बार्टर सिस्टिम' प्रमाणे इतर माल देऊन टनावारी सोने लंपास केले. त्यायोगे तत्कालिन युरोपियन राजसत्ता गब्बर झाल्या. त्यांची अर्थव्यवस्था वाढली. त्या जोरावर जागतिक वसाहतवाद अजून जोमाने फोफावला. आफ्रिकेतले सोने नसते मिळाले तर या राजसत्तांना एवढे वर येणे तितकेसे सोपे गेले नसते. आजही बरेच वेळा आफ्रिकन राजकारणी लोक या दोन्ही नुकसानांची भरपाई प्रगत आणि समृध्द राष्ट्रांनी करावी अशी मागणी करताना दिसतात.

तिसरा परिणाम असा की साधारण गेल्या पाचेकशे वर्षांपासून आफ्रिकेबाहेरच्या जगाला आफ्रिका म्हणजे रानटी, असुसंस्कृत, राक्षसी लोकांचा प्रदेश अशीच ओळख आहे. याला कारणीभूत म्हणजे तत्कालिन प्रगत जगात काळे लोक फक्त गुलामांच्या स्वरूपातच आले होते. त्यामुळे तीच ओळख होती. गोर्‍या लोकांनी जसजसे जग पादाक्रांत केले त्यांनी त्यांची संस्कृती / विचार / शिक्षणपध्दती सगळीकडे पोचवली. त्यामुळे आपल्यासारख्या आशियाई देशांना प्रामुख्याने आफ्रिका तशीच वाटायला लागली. पण वस्तुस्थिती मात्र तशी नव्हती. युरोपियन लोकांच्या आगमना पूर्वी आफ्रिकेतही मोठमोठी साम्राज्ये होती. त्यांचे अनुशासन, शासनपध्दती इत्यादी अगदी प्रगत होती. स्थानिक कारागिर होते आणि त्यांच्या कला होत्या. आफ्रिकन्स म्हणजे फक्त रानटी टोळ्या वगैरे समजुती निखालस खोट्या आहेत.

विसाव्या शतकाच्या मध्यावर जेव्हा आफ्रिका हळूहळू पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त होऊ लागली तसतशी या अमानवी व्यापाराबद्दल नुकसानभरपाईची मागणी व्हायला लागली. या व्यापारावर संशोधन होऊ लागले. साहजिकच या व्यापारात गोर्‍यांच्या बरोबरीने स्थानिक काळ्या लोकांच्या टोळ्यांनी बजावलेली भूमिका उठून दिसायला लागली. या सगळ्याचे प्रायश्चित्त म्हणून आणि जबाबदारीची स्विकृती म्हणून स्थानिक लोकांनी ही पाटी तिथे बसवली आहे.



***

मनोगत

मेन्साह, अगोसी, अनानी, आकोसिवा यांचं पुढे काय झालं?

सोप्पंय हो, इतर करोडो मेन्साह, अगोसी, अनानी आणि आकोसिवा यांचं पुढे जे झालं तेच... एक तर मिडल पॅसेजचा प्रवास सहन न झाल्याने माशांचं खाद्य बनणे किंवा मृत्यूची कृपा होऊन जीवनाच्या शापातून सुटका होई पर्यंत तो शाप भोगत राहणे. तिसरा काही पर्याय नव्हताच. नियतीची पकड चिरेबंदी होती.

या सर्व प्रकारात गुलामांचे माणसातून पशूत रूपांतर केले गेले असे म्हणले जाते, पण मला तर वाटते की माणसातून पशूत रूपांतर खरे तर हा व्यापार करणार्‍यांचेच झाले होते. अन्यथा खाली जिथे शे-दीडशे माणसे अशी जेरबंद करून ठेवली होती तिथे बरोब्बर त्याच्याचवरच्या खोलीत चर्च बनवून प्रभूची आळवणी करण्याची हिंमत माणुसकी जरातरी शिल्लक असणार्‍यांची होऊच शकत नाही.

हा सर्व परिसर फिरताना मी सतत अस्वस्थ होतो. लहानपणापासून या विषयावर वाचलेली सगळी माहिती सतत आठवत होती. गाईड कडून नविन तपशिल कळत होते. अस्वस्थतेत भर पडत होती. 'शेवटच्या खोलीत' मात्र क्षणभर डोळे मिटून उभा राहिलो, त्या असंख्य अनाम आत्म्यांना श्रध्दांजली वाहिली. राक्षसी अत्याचारांच्या, जिवंत माणसांना पशूंना डागतात तसे डागण्याच्या कथा ऐकल्या. राक्षस ही व्यक्ति नाही, प्रवृत्ति आहे हे परत परत जाणवत राहिले. तसे नसते तर हा व्यापार शेकडो वर्षे चाललाच नसता. एखाद्या व्यक्तिच्या नृशंसपणामुळे चाललेला प्रकार त्या व्यक्तिनंतर बंद पडेल, पण इथे तसे नाही. देवीच्या पुराणांमधून एक गोष्ट आहे... एक राक्षस असतो, लढाईत त्याच्या रक्ताचे जितके थेंब जमिनीला लागतील तितक्या थेंबांपासून त्याची एक एक प्रतिकृती तयार होते. तसेच, वर्षानुवर्षे... एक गोरा गेला की दुसरा आला असे चक्र चालू राहिले.

साधारणपणे नविन ठिकाण बघितल्यावर जालावर फोटो टाकणे, प्रवासवर्णन वगैरे लिहिणे असे प्रकार आपण करतो. तसं (म्हणजे तेवढंच) खरं तर इथेही करता आलं असतं. पण मला नुसते फोटोच टाकायचे नव्हते तर हा सगळा 'अनुभव'च तुमच्यापर्यंत पोचवायचा होता. आणि तुम्हाला वाचताना आलेली अस्वस्थता बरोबर घेऊन फोटो बघितल्याशिवाय तो अनुभव येणार नाही असे वाटल्याने आधीचे दोन भाग टाकले आहेत. त्यात वापरलेली नावं, व्यक्तिरेखा आणि त्यांचे अनुभव काल्पनिक तर नाहीत, पण प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत. म्हणूनच सुरूवातीलाच लिहिले आहे की ही कथा नाही.

जाता जाता एवढंच...

सर्वे जना: सुखिनो भवन्तु ... तथास्तु |
सर्वे जना: सुखिनो भवन्तु ... तथास्तु |
सर्वे जना: सुखिनो भवन्तु ... तथास्तु |

ॐ शांति: शांति: शांति: |

परवशता पाश दैवे... २

on बुधवार, नोव्हेंबर ११, २००९



ही कथा नाही. हा (सुदैवाने) माझा अनुभवही नाही, म्हणजे थोडा माझा आहेच पण अगदी पूर्णपणाने नाही. हे माझ्या अनुभवाचे व काही करोड दुर्भागी आणि अश्राप जीवांच्या अनुभवांचे मिश्रण मात्र आहे. झेपल्यास वाचा. तसेही ढोबळमानाने काय घडले होते हे आपल्याला माहितच असते. वाचले नाही तरी, कमीतकमी मी तरी असे वागणार नाही एवढे स्वतःशीच ठरवा.

परवशता पाश दैवे... भाग १

*************

मेन्साह

माझ्या डोळ्यासमोर अंधार झाला. कोणीतरी माझ्या तोंडात बोळा कोंबला. मला दोरीने घट्ट बांधले. मी सुटायची खूप धडपड केली. पण त्या राक्षसांच्या शक्तीपुढे माझे काहीच चालले नाही. मी खूप झटापट केल्याने अगदी थकून गेलो. मला अगोसीचा आवाज येत नव्हता पण ती पण खूप धडपड करत होती बहुतेक. शेवटी त्या माणसाने खूप जोरात मारले मला आणि मी अगदी निपचित झालो. माझ्या आजूबाजूला काय चालले आहे याचे भानच सुटले होते जणू. त्या माणसाने मला खांद्यावर टाकले आणि चालू लागला. मी जवळ जवळ बेशुध्दच झालो होतो. मला जाग आली तेव्हा मी एका मोठ्या घरात होतो. तिथे खूप अंधार होता. मला खूप भिती वाटत होती. डोळे अंधाराला सरावले तसे मला दिसले की त्या खोलीत माझ्यासारखीच अजून बरीचशी मुले होती. सगळेच अगदी भेदरलेले. काही तर माझ्यापेक्षाही लहान. मला अगोसी मात्र कुठेच दिसत नव्हती. काही मुले जागी होती. काही बहुतेक माझ्यासारखीच गलितगात्र होऊन पडली होती. बोलत मात्र कोणीच नव्हते. नुसतेच एकमेकांकडे बघत होते. थोडा वेळ असाच गेला, मी थोडा धीर करून बाजूच्या मुलाशी बोलायला गेलो तर माझ्या तोंडातून शब्दच फुटेना. हातपायही हलेनात. माझ्या लक्षात आले की तोंडात अजूनही बोळा आहे आणि हात पाय बांधलेले आहेत. मी काहीच करू शकत नव्हतो. चूपचाप पडून राहण्याशिवाय काहीच गत्यंतर नव्हते. सारखे रडायला येत होते. आईची आठवण येत होती. अगोसीचे काय झाले? ती पण इथेच आहे का? आमच्या गायब व्हायच्या दु:खाने घरी काय झाले असेल? माझ्या वेड्या साहसामुळे मी आणि अगोसी दोघेही चांगलेच अडकलो होतो. मी स्वतःला शिव्याशाप देण्याशिवाय काहीच करू शकत नव्हतो.

असा बराच वेळ गेला. बाहेर रात्र आहे की दिवस आहे हे पण कळत नव्हते. तेवढ्यात खोलीचे दार उघडले आणि दोनतीन माणसे आत आली. आत आल्या आल्या त्यांनी आम्हाला सगळ्यांना मारायला सुरूवात केली. काय चालले आहे काहीच कळत नव्हते. सगळी मुलं नुसती कळवळत होती. काही काहींनी तर तिथेच कपडे ओले केले. नुसती घाण झाली होती. थोडा वेळ असं मारल्यावर त्यांनी एका एका मुलाच्या तोंडातला बोळा काढून त्याला खायला द्यायला सुरूवात केली. काही मुलांनी खायला नकार दिला त्यांना तोंडात बोळा घालून परत खूप मारले. ते बघून बाकीच्यांनी निमूटपणे तोंडात कोंबलेले गिळले. सगळा प्रकार संपवून ते लोक परत खोली बंद करून निघून गेले. असे बरेच वेळा झाले. बाहेर दिवस रात्र येत होते जात होते, आम्ही त्या सगळ्याच्या पलिकडे गेलो होतो. विचार करून करून थकलो आणि नुसते ग्लानीत पडून राहत होतो. मधेच आमच्यात दोन चार नवीन मुलांची भर पडत असे.

एकदा मात्र दार उघडले, खायला दिले आणि आम्हाला सगळ्यांना बाहेर काढले. आज काही तरी नवीन घडत होते. अजून बर्‍याच खोल्या होत्या आणि त्यातूनही बरीच मुलं बाहेर आली. बाहेर रात्र होती. सगळ्यांना एका रांगेत उभे करून चालायला सुरूवात केली. तेवढ्यात मला अगोसी दिसली. बाप रे!!! कशी दिसत होती!!! मी तर ओळखलेच नसते. पण तिने पण बघितले नेमके माझ्याकडे आणि तिचे डोळे चमकले त्या बरोब्बर मला ओळख पटली. पण मी काय करू शकत होतो? काहीच नाही. नशिबाने काय वाढून ठेवले होते पुढ्यात, काहीच कळत नव्हते. नक्कीच काहीतरी पाप केले असणार आम्ही दोघांनी, या सगळ्याच मुलांनी, म्हणून हे असं झालं होतं. नक्कीच. आम्हाला बहुतेक त्या माणसं खाणार्‍या राक्षसांच्या गावी नेत होते बहुतेक.

चालण्यात जरा जरी उशिर झाला तरी लगेच चाबकाचे फटके पडत होते. रात्रभर चालत होतो आम्ही बहुतेक. बराच वेळ असे चालल्यावर अजून एक घर आले. परत तेच. तिथे एका खोलीत कोंडले आम्हाला. परत अंधार. परत मार. परत ते जबरदस्तीचे खाणे. तोंडात बोळा. उजेड पाहून तर किती दिवस झाले होते कोणास ठाऊक. पण अगोसी अजून जिवंत आहे आणि इथेच आहे हे समाधान होते. आणि तिच्यासाठी तरी हे सगळे सहन करणे भाग होते. संधी मिळताच इथून पळून जाऊ तिला घेऊन. सतत मनाला हेच बजावत होतो मी. जसजसे दिवस जात होते, माझेच मन कच खाऊ लागले, पण पळून जायच्या नुसत्या विचारानेच बरे वाटायचे. म्हणून मी सतत तोच विचार करायचो.

रात्रीचा प्रवास, परत मुक्काम, परत थोड्या दिवसांनी रात्रीचा प्रवास... किती दिवस गेले कुणास ठाऊक. एका रात्री.... एक खूप मोठे पांढरे घर आले. आणि त्याच्या बाजूला खूप मोठ्ठे पाणी होते. त्या पाण्याचा आवाज खूप होता. वाराही खूप होता. मी तर एवढं पाणी कधीच बघितलं नव्हतं. आम्हाला त्या घरात नेलं. तिथे बघतो तर माझी खात्रीच पटली. आपण नक्कीच राक्षसांच्या घरी आलो आहोत. सगळे राक्षस कसे अगदी धिप्पाड आणि पांढरेशुभ्र. त्यांचे चेहरे पण अगदी वेगळेच. भयानक. त्यांना बघून बर्‍याच मुलांची तर बोबडीच वळली. काही बेशुध्द पडली. आम्हाला परत एकदा एका मोठ्या खोलीत नेलं आणि बंद केलं. मधून मधून अगोसी दिसत होती. तेवढंच बरं वाटायचं. आईची लाडकी पोरगी, पण काय अवस्था झाली होती तिची !!! आईने बघितलं असतं तर जीवच दिला असता तिने. इथून पळून जाऊ तेव्हा आधी तिला नीट खाऊ पिऊ घालायचे आहे आणि जरा तब्येत नीट करून घरी न्यायचे. नक्की.

ज्या खोलीत आम्ही होतो तिथे आमच्या सारखे अजून बरेच लोक होते. पण हे मोठे लोक होते. चांगले आडदांड, हट्टेकट्टे. बाप रे !!! म्हणजे हे राक्षस मोठ्या लोकांना पण खातात की काय? आश्चर्याचे धक्क्यावर धक्के बसत होते. तोंडातले बोळे काढले तरी कोणीच बोलत नव्हते. बोलायची सवयच गेली होती. आणि खूप भितीही वाटत होती. हळूहळू ते मोठे लोक बोलायला लागले. पण त्यातल्या बहुतेकांची भाषाच समजत नव्हती. मग सगळे नुसतेच गप्प बसले. पुढे काय होणार याची बहुधा कोणालाच कल्पना नव्हती. हताश होऊन बसले होते सगळे.

अनानी

पहिले एक दोन फटके अंगावर पडले तेव्हा जाणवलंच नाही. पण मारणारा मारतच राहिला. असह्य झालं. कसा तरी उठून उभा राहिलो. दिवस उजाडला होता. पण मला मात्र डोळ्यापुढे अंधारच जाणवत होता. पावलं अडखळत होती. सुदैवाने फार चालावे नाही लागले. अशांतींचा तळ जवळच होता. तिथे सगळ्यांना नेऊन बसवले. सगळ्या श्रमाने पोटात नुसता खड्डा पडला होता. भूक लागली होती. थोड्या वेळाने एक माणूस आला आणि त्याने थोडेसे अन्न जमिनीवर फेकले आणि तो चालता झाला. ते तुकडे मिळवायला नुसती मारामारी झाली. जगायचं असेल तर अन्न मिळवलंच पाहिजे!!! मी पण घुसलो त्या गर्दीत आणि थोडेसे धुळीने माखलेले का होईना पण खाऊ शकेन असे तुकडे मिळाले. पाण्याचा हौद मात्र मोठा होता. पोटभर पाणी प्यायलो. आत्ता पर्यंत थोडा जीवात जीव आला होता. आजूबाजूला कोणी ओळखीचे चेहरे दिसताहेत का ते बघत होतो. माझ्या बरोबर गावातून आलेले चारपाच जण दिसले. त्यांच्या जवळ सरकलो. त्यांचीही अवस्था काही माझ्यापेक्षा वेगळी नव्हती.

सगळेच दमले होते, त्यापेक्षाही आता पुढे काय याचाच विचार चालू होता. हे अशांती म्हणजे फारच भयंकर लोक. अतिशय क्रूर. यांना सतत काही ना काही कारणाने बळी द्यायला माणसं लागतात. आजूबाजूच्या राज्यातून माणसं पळवतात त्यासाठी हे लोक. माझी तर खात्रीच पटली की आपलंही आता हेच होणार. आईची, घरची खूप आठवण आली. गाव डोळ्यासमोर दिसायला लागला. पण योग्य संधीची वाट बघत गप्प बसावे लागणार हे तर स्पष्टच दिसत होते समोर. भेटलेल्या लोकांशी हळूच बोलत बसलो. सगळ्यांचे म्हणणे माझ्यासारखेच पडले.

पुढचे दोनचार दिवस अशांती असेच आमच्यासारखे अजून लोक पकडून आणत होते. आणि आमची संख्या वाढत होती. अन्नाचे तर हालच होते. नुसत्या पाण्यावर दिवस काढत होतो आम्ही. चौथ्या दिवशी आम्हाला सगळ्यांना एका जाड दोरखंडाने बांधले आणि एका मागोमाग एक असे बाहेर काढून चालवायला सुरूवात केली. भयानक उन्हाळा होता. डोक्यावर सूर्य आग ओकत होता. आणि जंगलातून जाताना अजूनच त्रास होत होता. रस्त्यात कुठे साप तर कुठे अजून काही आडवे येत होते. चालणे फार जिकिरीचे होत होते. तसेच पाय ओढत चाललो होतो आम्ही. आमच्या आजूबाजूला सारखे अशांती सैनिक चालत होते. एखादा माणूस थोडातरी अडखळला किंवा हळू चालायला लागला की सगळी रांगच अडखळायची. आणि मग नुसता चाबकांचा वर्षाव चालू!!!

देवा, हे लोक काय सैतान आहेत की राक्षस? मला वाचव देवा....

तेवढ्यात रांगेच्या पुढून खूप आवाज ऐकायला यायला लागले. सगळ्यांना थांबवण्यात आलं. बराच वेळ आरडाओरडा ऐकू येत होता. शेवटी एक जोराची किंचाळी ऐकू आली आणि सगळाच आवाज बंद झाला. थोड्या वेळाने एक-दुसर्‍या कडून कळले की पुढे एकाने तो दोरखंड धारदार दगडाने हळूहळू तोडून पळायचा प्रयत्न केला होता. त्याच्या दुर्दैवाने तो दोरखंड तुटायच्या आतच काही सैनिकांच्या ते लक्षात आले. त्या माणसाला वेगळे काढून खूप मारले आणि मग त्याचे हात पाय तोडून त्याला तसेच, जिवंतच, रस्त्याच्या बाजूला टाकून दिले. पुढे जात असताना सगळ्या लोकांच्या नजरेस तो पडेल असा ठेवला त्याला, बाकीच्यांची हिंमत होऊ नये म्हणून. वेदनेने जवळजवळ बेशुध्दच झाला होता तो. आणि आम्ही गेल्यावर थोड्याच वेळात रक्ताच्या वासाने आलेल्या कोणत्यातरी जनावराने त्याला खाल्ला असणार. पण आता वाटतं, नशिबवान होता, सुटला बिचारा. थोडक्यात सुटला. पुढचे भोग तरी टळले त्याचे.

तीन दिवस सतत चालल्यावर आम्ही अशांतींच्या मोठ्या गावात पोचलो. गावातली पोरंसोरं आमची मिरवणूक बघायला जमली. आमच्या मागे ओरडत चालली होती. कोणी मधेच दगडं मारत होते. सैनिक त्यांना पिटाळत होते आणि पोरं परत परत जवळ येत होती. एकदाचे आम्ही अजून एका मोठ्या मैदानात पोचलो. तिथे असेच आमच्यासारखे बरेच लोक आधीच बसवलेले होते. चारी बाजूंना मोठे कुंपण आणि सैनिकांचा पहारा. आता मात्र हळूहळू माझं मन कच खाऊ लागलं होतं. पळून जायची जी काही थोडी फार आशा होती ती मावळायला लागली होती. रात्री खायला काहीच मिळालं नाही. पाणीही नव्हतं इथे. भुकेने ग्लानी आली.

सकाळ झाली. तेवढ्यात मैदानाचे दार उघडले आणि जे काही दिसलं त्यामुळे तर बहुतेक लोक पार घाबरून गेले. काही अशांती सैनिक आत आले आणि त्यांच्या मागोमाग दोनतीन उंच, धिप्पाड पण पांढरेफटक कातडी असलेली माणसं आत आली. त्यांचे केस पण वेगळेच होते. त्यांनी अंगात रंगीबेरंगी कपडे घातले होते. असली माणसं मी कधीच बघितली नव्हती. माझी खात्री पटली, हे नक्कीच राक्षस आहेत आणि या महाभयानक अशांती लोकांनी त्यांच्याशी मैत्री केली आहे. याच लोकांना ते माणसं खायला देत असणार. मी डोळे मिटून घेतले. ती माणसं सगळ्यांच्या जवळ जाऊन जाऊन त्यांचे हात, पाय, दात, डोळे बघत होते. सगळ्यांची तपासणी झाली. ते राक्षस माझ्याजवळ आले तेव्हा मला नुसता घाम फुटला होता. एकमेकांशी काहीतरी बोलत होते ते सगळेच.

थोड्या वेळाने सगळ्यांना खायला दिलं आणि परत एकदा आमचा प्रवास सुरू झाला. पळून जायची खूप इच्छा होत होती. पण तो विचार मनात आला की तो हातपाय तोडलेला माणूस डोळ्यासमोर यायचा आणि सगळं अवसानच गळून पडायचं. यावेळी आम्ही जवळजवळ पाचसहा दिवस चालत होतो. बरेच दिवस चालल्यानंतर एक दिवस एकदम खूप मोठं पाणी डोळ्यासमोर आलं. एवढं पाणी मी कधीच बघितलं नव्हतं. त्या पाण्याजवळ खूप मोठं पांढर्‍या रंगाचं घर होतं. आणि तिथे त्या पांढर्‍या राक्षसांचे अजून बरेच भाऊबंद उभे होते. सगळीकडे नुसते राक्षसच राक्षस. ते मोठ्ठं पाणी सारखं जोरात त्या घरावर आपटत होतं आणि त्याचा खूप आवाज होत होता. आम्हाला बघताच ते सगळे राक्षस ओरडायला लागले. एवढी माणसं खायला मिळणार म्हणून बहुतेक खुश झाले असावेत.

आम्हाला त्या घरात नेलं आणि एक भल्या मोठ्या अंधार्‍या खोलीत ढकललं. सगळे नुसतेच दमून पडले होते. कोणीही बोलत नव्हतं. हलत सुद्धा नव्हतं. पुढे काय होणार ते सगळ्यांनाच कळलं होतं. आता हे राक्षस आम्हाला खाणार. मनात निराशा दाटून आली होती. देवा... आईला सुखरूप ठेव. तिला कोणीच नाही माझ्याशिवाय. आत्ता पर्यंत इतके दिवसांत तिचं काय झालं असेल? माझ्या गायब होण्याने तिला किती त्रास झाला असेल?

आई... आई... आई... आई... !!!!!!!!!

आकोसिवा

पुढे काय झालं कळलंच नाही. जाग आली तेव्हा मी एका मोठ्या खोलीत होते आणि तिथे अजून बर्‍याच बायका होत्या. आणि त्यात अगदी लहान लहान मुली पण होत्या. बहुतेक जणी सुन्न झाल्यासारख्या गप्प बसल्या होत्या. काही लहान मुली रडत होत्या. काही बायका जमेल तसे त्यांना शांत करत होत्या. सगळ्यांना बांधून ठेवलं होतं. बहुतेक मलापण. हात पाय जास्त हलवता येत नव्हते. अंगात त्राणच नव्हते. किती दिवस मधे गेले होते कुणास ठाऊक. बाहेर रात्र आहे की दिवस तेसुध्दा कळत नव्हतं. मला एकदम माझ्या बाळाची आठवण आली. बाळ!!!!! काय झालं असेल त्याचं? भुकेने तडफडलं असेल. कोमी बिचारा एकटा काय करू शकेल त्याचं? मनात नुसती तडफड चालू होती.

बाळा!!! मी आले रे.

मधनंच त्या खोलीचं दार उघडायचं आणि एक माणूस काही खाणं आत टाकायचा. ते तुकडे ज्यांच्या जवळ पडतील ते भाग्यवान. दोन तीन दिवस असेच गेले. भुकेने, विचारांनी डोकं थकून गेलं होतं. एक दिवस ती माणसं आत आली आणि सगळ्यांना दोरखंडाने गच्च बांधून टाकले. आणि बाहेर काढून चालवायला सुरूवात केली. किती दिवस चालत होतो माहित नाही. पण चालताना मधे मधे बर्‍याच बायका खाली पडायच्या. त्यांच्या कडे ढुंकूनही न बघता त्या लोकांनी आम्हाला चालवतच ठेवले. काय झाले असेल त्या बायकांचे? बाप रे!!! विचारही करवत नाही.

एक दिवस चालता चालता मला एकदम एका झाडाखाली माझं बाळ दिसलं. काही समजायच्या आतच मी त्या झाडाकडे धाव घेतली. त्याच क्षणी मोठा काडकन् आवाज झाला आणि माझ्या पाठीवर आगीचा डोंब उसळला. मी भानावर आले. माझं बाळ नव्हतंच तिथे. मला भास झाला होता. आवाज आणि चाबकाचे फटके मात्र चालूच होते. शेवटी मी खाली पडले... पुढचं आठवत नाही.

देवा!!! कसले रे हे लोक? हा काय प्रकार चालू आहे? त्यापेक्षा मरण का नाही देत मला? अजून किती छळ करणार आहेस माझा? माझं बाळ सुखरूप असेल ना?

एका रात्री, तो प्रसंग, ज्याची भिती होती, तो आलाच. मी खूप ओरडले, रडले, नुकतीच बाळंत झाले आहे, परोपरीने विनवले... पण त्याने सोडले नाही. रात्रभर चालू होते. पहिल्या तिघांनंतर मी बेशुध्द झाले. नंतर काय झाले ते माहित नाही. परत शुध्दीवर आले तेव्हा मला दोन माणसांनी एका काठीला बांधून खांद्यावर घेऊन चालले होते. मला शुध्द आलेली बघून लगेच खाली उतरवले आणि पाणी पाजून चालायला लावले.

दिवसा चालायचे आणि रात्री मुक्काम... मुक्काम झाला की, आज कोणाची पाळी हाच विचार सगळ्याजणी करायच्या. दिवसा चालणे बरे, रात्र नको असे चालू होते. दिवस जात होते, रात्री जात होत्या. आम्ही पाय ओढत ओढत चाललो होतो. जरा कुठे पाऊल अडखळले की चाबूक पडलाच पाठीवर. मधे एक तळं होतं त्यात उडी मारून जीव द्यायचा प्रयत्न केला काहीजणींनी, पण त्या माणासांनी त्यांना बाहेर काढलं आणि परत तेच.... जीवघेणी मारझोड. धड मेला जीवही जात नाही.

एक दिवस खूप मोठा आवाज यायला लागला. वाराही सुटला होता. थोड्या वेळाने एक मोठ्ठे पांढरे घर दिसले. एवढे मोठे घर!!! बाप रे!!! आणि जसजसे ते घर जवळ आले तसतश्या बायका किंचाळायला लागल्या. असले भयानक लोक याआधी कधीच बघितले नव्हते आम्ही कोणी. पांढरेफट्टक!!! विचित्र चेहरे!!! केस सोनेरी!!! तोंडावर पण केसच केस. शी: !!! भयानक. राक्षसांनी जबरदस्तीने आम्हाला सगळ्यांना त्या घरात नेले आणि एका मोठ्या खोलीत ढकलून दिले.

खोलीत मिट्ट अंधार आणि.... अक्षरशः किळसवाणी दुर्गंधी. आमच्या आधीच अजून बर्‍याच बायका तिथे होत्या. खोलीत उभं रहायची पण जागा नव्हती. आणि खालची जमीन अगदी निसरडी आणि ओली झालेली होती. खोलीत पाऊल टाकल्या टाकल्या काहीजणीतर भडभडून ओकल्या. आधीच्या वासात अजून भर पडली. त्या वासाने श्वासदेखील बंद झाला. तशाच थकव्याने आलेल्या ग्लानीत सगळ्या दाटीवाटीने उभ्या होतो. बायका आळीपाळीने बसत होत्या. पण खाली बसायची पण इच्छा होत नव्हती इतकी खालची फरशी घाण होती.

सकाळ झाली तसा खोलीत थोडा उजेड आला. डोळे खरेतर अंधारालाच सरावले होते. तो थोडासा उजेडही सहन होत नव्हता. उजेडामुळे त्या भयानक वासाचे कारणमात्र कळले. त्या बायका त्यांचे सगळे विधी तिथेच, बसल्याजागीच, करत होत्या बहुतेक. आणि काहीजणी तर... त्या घाणीतच ते सगळं मिसळलेलं. त्यानेच ती जमीन निसरडी झालेली. पण ज्या बायका तिथे आधी आल्या होत्या त्या आता त्या सगळ्याच्या पलिकडे पोचल्या होत्या. थोड्याच दिवसात मी पण निर्जीव होईन... तो पर्यंत धीर धरायचा...

ब्रिगेडियर विल्हेल्म व्हान डाइक

कमांडर्स लॉगबुक,
ता. २७ मार्च १६६७

अजून एक दिवस गेला. आज अजून माल आला. यावेळचा माल जरा बरा आहे. मागचे जहाज गेल्यापासून जवळ जवळ अडिचशे जिन्नस आले आहेत. यावेळी पुरूष कमी आहेत आणि मुलं व बायका जास्त आहेत. पुढचं जहाज येईपर्यंत पुरूष वाढवले पाहिजेत. नाहीतर जहाजाची फेरी तोट्यात जाईल आणि कंपनीच्या डायरेक्टर्सकडून तंबी मिळेल ती वेगळीच. काही तरी केलेच पाहिजे. दोन तीन दिवसांनी अशांतीला एखादी चक्कर मारावी आणि तिथल्या लोकांना जरा सरळ करावं हेच ठीक राहिल. पुरूष काय सगळे गायब झाले की काय एकदम? का हे हरामखोर अशांती त्या इंग्रजांना परस्पर विकत आहेत चांगला माल? आणि गाळ इथे आणत आहेत? लक्ष ठेवले पाहिजे.

नशीब, आजपण बहुतेकांनी जेवण घेतले निमूटपणे. एवढं चांगलं मिळतं ते खायचं सोडून फेकून देतात. परवा दोन बायकांना असं काही फोडून काढलं आणि बेशुध्द होईपर्यंत उन्हात उभं केलं की, नंतर सगळेच निमूटपणे जे समोर येईल ते खात आहेत. पण हा परिणाम आठदहा दिवस टिकतो. मग परत तेच. ते काही नाही. मधनं मधनं दोघाचौघांना फोडून काढलं पाहिजे, म्हणजे मग नीट राहतात. इलाज नाही. हडकुळ्या जिन्नसांना भाव येत नाही नीट आणि एवढी सगळी मेहनत वाया जाते. जेवढा माल जमलाय तेवढ्याची तपासणी सुरू करून द्यावी उद्याच. नाही तर जहाज आले की खूप गडबड उडून जाते. आणि जहाज दिसलं की हे रानटी राक्षस बिथरतात, जहाजात चढायला घाबरतात, अजिबात आवरत नाहीत कोणाला... आणि मग तपासणी उरकून घ्यावी लागते गडबडीत. डॉक्टर झूसना उद्याच हुकूम जारी करून टाकावा.

फादर व्हान डेर वाल नाराज आहेत. चर्चमधली उपस्थिती खूप कमी झालीय म्हणे. कमीत कमी रविवारी तरी उपस्थिती सक्तीची केली पाहिजे म्हणत होते. हरकत नाही. हुकूम जारी केला पाहिजे. म्हातारं खुश होईल तेवढ्यावर.

आजकाल घरची फार आठवण येते आहे. ख्रिस्टिनाचा वाढदिवस होता काल. सतरा पूर्ण केले. मागच्या पत्रात खूप हट्ट केला होता तिने... नाही जमले वाढदिवसाला जायला. सहा महिन्याची काय तीन महिन्याची पण सुट्टी नाही सध्या. सिझन चालू आहे... जंगलातून एकदा का पावसाळा चालू झाला की माल यायला उशिर होतो आणि माल कमीही येतो. याच दिवसात काय ती जास्तीची कमाई. जाऊ दे. जाईन तेव्हा तिच्यासाठी खूप छान छान वस्तू घेऊन जाईन. जमलंच तर खास तिच्यासाठी म्हणून दोन जिन्नस घेऊन जाईन. घे म्हणावं तुझ्या खाजगी मालकीच्या पोरी. खुश होऊन जाईल एकदम. असंच करावं.

पण यावेळी बायका जास्त आल्या हे एकापरीने चांगलेच. माल जाईपर्यंत मजा येणार एकंदरीत. बाकीचे लोक पण खुश आहेत. या ओसाड जागी बायकापोरं घेऊन रहायचं म्हणजे शक्यच नाही. आणि नुसतं रहायचं म्हणजे हे शिपाई एकमेकांचा जीव घेतील!!! जहाज येईपर्यंत मजा करा लेको. मग आहातच तुम्ही परत एकटे.... नविन माल येई पर्यंत.

चला, उशिर झाला. आजची पोरगी तयार झाली असेल एव्हाना.

क्रमशः

परवशता पाश दैवे... १

on मंगळवार, नोव्हेंबर १०, २००९



ही कथा नाही. हा (सुदैवाने) माझा अनुभवही नाही, म्हणजे थोडा माझा आहेच पण अगदी पूर्णपणाने नाही. हे माझ्या अनुभवाचे व काही करोड दुर्भागी आणि अश्राप जीवांच्या अनुभवांचे मिश्रण मात्र आहे. झेपल्यास वाचा. तसेही ढोबळमानाने काय घडले होते हे आपल्याला माहितच असते. वाचले नाही तरी, कमीतकमी मी तरी असे वागणार नाही एवढे स्वतःशीच ठरवा.

- १

थंडगार पहाटवार्‍याच्या झुळकीने आणि पक्ष्यांच्या आवाजाने मेन्साह हळूहळू जागा झाला. बराच वेळ तसाच बसून होता तो. आख्ख्या गावात ही त्याची सगळ्यात आवडती जागा होती. घरामागच्या अंगणातल्या भल्याथोरल्या झाडावरची ही जाडजूड फांदी. कधीही करमेनासे झाले की तो निवांत इथे बसायचा. कधी कधी तिथेच झाडाच्या बेचक्यातच झोपायचा तो. इथून सूर्य, चंद्र, तारे, गावाबाजूची नदी अगदी सगळं सगळं कसं स्वच्छ दिसायचं. खाली उतरलं की गावाच्या कुंपणामुळे नदी दिसायचीच नाही. आणि आजकाल सारखं सारखं नदीवर जाता पण यायचं नाही. आई सारखं लक्ष ठेवून असायची. आजकाल अचानक गावातली मुलं माणसं नाहीशी होत असतात म्हणे. कोणी म्हणतं की पूर्वजांचा कोप झालाय, कोणी म्हणतं की शेजारच्या गावातले लोक त्यांना पळवून नेतात. खरंच असावं ते... गायब झालेला एकही माणूस कधीही परत दिसला नाही. तेव्हापासून कधीही मनासारखं नदीत डुंबायची पण सोय नाही राहिली. मेन्साहला अगदी कंटाळा यायचा. नदीवर जायचं किंवा जंगलात हुंदडायला जायचं तर बरोबर भरपूर हत्यारबंद मोठे लोक असले तरच. पण त्यात काहीच मजा नाही ना!!! थोडं इकडे तिकडे गेलं की लगेच ओरडायला लागतात ते. आणि मोठ्या लोकांना कंटाळा पण फार लवकर येतो. चारपाच सूर मारले पाण्यात की लागलेच ओरडायला आटपा आटपा म्हणून. अगदी कंटाळवाणं झालं होतं त्याला. तरी बरं घरातल्या घरात खेळायला धाकटी बहिण अगोसी तरी होती. पण ती तरी काय आणि किती खेळणार. त्यात परत मुलगी. काही झालं की लगेच आईला हाक मारते. जाऊच दे. आज कसंही करून कुंपणाच्या बाहेर जायचं म्हणजे जायचंच. तेवढीच मजा. बेत पक्का. कोणी आलं बरोबर तर ठीकच. नाही तर एकटाच. तसा मेन्साह फारच स्वच्छंदी. एवढासा लहान पण उनाडक्या मात्र फार त्याला.

बर्‍याच वेळाने मेन्साह खाली उतरला. आईची नजर चुकवून हळूच घराबाहेर सटकला. सावधपणे फिरत फिरत कुंपणाच्या दिशेने सरकायला लागला. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं... त्याच्यामागे कोणीतरी आहे. गर्रकन वळून बघतो तो अगोसी त्याच्या मागेच उभी होती. हे एक लफडंच आता. हिला कसं टाळावं? आणि ही बरोब्बर जाऊन आईला सांगणार. त्यापेक्षा हिलाही सामिल करून घ्यावं हे बरं. नदीवर जायचंच आज. योग्य ती मांडवली झाली आणि बहिण भाऊ दोघे निघाले हळूच. कुंपणाच्या एका बाजूला एक अगदी लहानसा भाग थोडा मोकळा झाला होता. अगदी एखादं लहान मूल सरपटत जाऊ शकेल एवढं. दोघांनी मिळून ते भोक थोडं अजून मोठं केलं आणि सरपटत बाहेर गेले. समोरच नदी. मेन्साह आणि अगोसी धावतच गेले आणि नदीत उड्या मारल्या. मनसोक्त डुंबले दोघे. बर्‍याच वेळाने बाहेर आले आणि एका झाडाखाली अंग वाळवत बसले. तेवढ्यात मेन्साहला झाडामागे काहीतरी आवाज ऐकू आला. त्याने मान वळवली, पण त्या आधीच एक जाडजूड राकट हात आधी त्याच्या तोंडावर आला आणि मग डोळ्यावर.

डोळ्यापुढे अंधार व्हायच्या आधी त्याला अगोसी दिसली... एक भलामोठा माणूस तिचे तोंड दाबत होता.

- २

बाळाला पाजता पाजता ते झोपून गेलं. त्याला हळूच खाली ठेवून आकोसिवाने परत एकदा दाराकडे नजर फिरवली. दिवस पार डोक्यावर आला पण अजून कोमीचा पत्ता नाही. भल्या पहाटे उठून सावकाराकडे गेला होता. चारच दिवसापूर्वी सासरा वारला. त्याचं सगळं दिवसपाणी करायचं म्हणजे केवढा खर्च. नातेवाईक होतेच म्हणा मदतीला पण खर्चच खूप मोठा. सावकाराचं तोंड बघितल्याशिवाय उपायच नाही. पण सावकार म्हणजे मोठी असामी. पार राजापर्यंत पोच त्याची. त्याचं नुसतं दर्शन व्हायलाच नशिब लागतं. तो काय असा सुखासुखी भेटतो का... कोमीला उशिर होणार हे गृहितच होते. पण दिवस डोक्यावरून बाजूला गेला तरी अजून त्याचा पत्ता नाही. काळजीने आकोसिवा पार घाबरून गेली. आता कसं आणि कुठे शोधावं. परत हे बाळ लहान पदरात. आत्ताशी कुठे दोन अंधार्‍या रात्री होऊन गेल्या आहेत. अंगावरच पितंय ते अजून. सासरा होता आधाराला, तो ही गेला. अजून रांधायचं राहिलं होतं. दमून भागून कोमी येईल तर त्याला काहीतरी पुढ्यात सरकवायला पाहिजेच. त्याच विचारात ती उठली आणि चुलीपाशी जाऊन बसली. एकदम तिच्या लक्षात आलं... काटक्या संपल्याच आहेत की!!! हे मात्र फारच मोठं संकट आता. आता या वेळी कुठून आणू लाकडं? सकाळी पोराच्या रगाड्यात राहूनच गेलं. विसरूनच गेलं. आता मात्र काही तरी करणं आवश्यक आहे.

पण पोराला टाकून कसं जायचं? शेजारच्या अयावाला पोराकडे थोडावेळ बघ म्हणून सांगून ती रानाकडे निघाली. आत्तापुरत्या काटक्या मिळाल्या तरी पुरे. बाकीचं नंतर बघू. सगळ्या बायका सोबतीने सकाळीच जाऊन आल्या होत्या. एकटं दुकटं रानात फिरणं आजकाल फारच धोकादायक झालं होतं. काय काय ऐकायला यायचं. लोक अचानक गायब होतात म्हणे रानात. कोणी नदीतच गायब. म्हातारा आदोबायो म्हणतो की रानातले आत्मे फार असंतुष्ट झालेत सध्या आणि त्यांना माणसं खायची चटक लागली आहे आजकाल. माणूस गेला की परत त्याचं नखही दृष्टीस पडत नसे. जसा काही तो हवेतल्या हवेत विरघळून जातो. नाही म्हणायला काही तरूण पोरं गेली माग काढायला रानामधे. पण ती सुध्दा गायबच झाली. त्यानंतर परत कोणाची माग काढायला जायची पण हिंमत नाही झाली. शक्य तेवढं घोळक्याघोळक्याने रानात जायचं आणि लवकरात लवकर परत यायचं, हाच काय तो उपाय. आज मात्र नाईलाज म्हणून अगदी जीवावर उदार होऊनच चालली होती आकोसिवा.

रानात फार आत न जाता ती भराभर काटक्या गोळा करायला लागली. कुठे काही आवाज येतोय का यासाठी ती फार सावध होती. तेवढ्यात तिला काही तरी विचित्र जाणिव झाली. कोणीतरी तिच्या अगदी जवळ आले आहे हे स्पष्टपणे जाणवले. तिला आपण अगदी उलटे पालटे होत हवेत तरंगत आहोत असेही वाटले. मग तिला कळले की तिचा पाय एका दोरीत अडकलाय आणि ती झाडाला लटकते आहे.

डोक्यावर फटका बसण्यापूर्वी तिला एवढेच कळले, एक भलामोठा काळाकभिन्न धिप्पाड माणूस तिच्या बाजूला उभा होता.

- ३

शिपाई दारात उभे राहिले तेव्हा आतल्या बाजूला अनानी नुकताच जेवायला बसायच्या तयारीत होता. कालच्या शिकारीत भलं मोठ्ठं डुक्कर सापडलं होतं. दहाबारा लोकांना अगदी पुरून उरलं होतं ते. शेवटी अनानीच्या भाल्याच्या अचूक वारालाच बळी पडलं होतं ते. तरी सुध्दा पळत राहिलं ते. खूपच दमवलं बेट्याने. पण शेवटी सापडलंच. अनानीचा नेम अचूक. सकाळी सूर्य उगवणार नाही एखाद वेळेस, पण अनानीने भाला फेकला आणि तो लागला नाही असं होणारच नाही, असं आख्य्ख्या पंचक्रोशीतली माणसं छातीवर हात ठेवून म्हणायची. भलं मोठं डुकराचं धूड घेऊन सकाळीच परतले होते सगळे. एवढं मोठं डुक्कर बघून सगळेच खुष झाले होते. आपल्या वाट्याचं डुक्कर आईच्या तावडीत देऊन अनानी मस्त पसरला. त्याला जाग आली तीच मुळी डुकराच्या खमंग वासाने. तसाच तोंड धुवून तो जेवायला बसणार एवढ्यात दारात शिपाई हजर.

राजाने बोलावणं धाडलं होतं. काही दिवसांपासून गडबड चालूच होती. लवकरच त्यांच्या गावावर अशांति हल्ला करणार हे बहुतेक नक्की झाल्यातच जमा होतं. तसेही हे अशांति लोक जरा भांडखोरच. निमित्ताची वाटच बघत बसलेले. कुठे काही खुट्ट झाले की लगेच लढाया मारामार्‍या करायला धावतात. आणि त्यात परत आजकाल त्यांच्याकडे काहीतरी नवीनच हत्यारं आली आहेत म्हणे. नुसता आवाज होतो आणि समोरची दोनपाच माणसं जागीच पडतात, त्यांच्या अंगातून रक्त येतं, पण बाण नाही भाला नाही सुरा नाही... नुसताच आवाज येतो म्हणे. काही तरी चेटूक नक्कीच. पण अनानी असल्या चेटकाला वगैरे घाबरणार्‍यातला नव्हता. त्याच्या जन्माच्यावेळी गावच्या म्हातार्‍याने त्याच्यासाठी खास, रानातनं एक सिंहाचं नख आणलं होतं आणि त्याने त्याची नाळ कापली होती. अनानीला नेहमी तो सिंह आपल्या बाजूला आहे आणि आपले रक्षण करतो आहे असे वाटायचे.

शिपायांना पंगतीला घेऊन अनानीने जेवण पूर्ण केलं आणि निरोप घेऊन तो निघाला. नेहमीप्रमाणे आईच्या डोळ्याला पाणी आलं. पण माया तोडून, तिच्या नजरेला नजर न देता तो तिथून गडबडीने निघाला. नाहीतर त्याच्याही डोळ्यात पाणी आलं असतं. आणि सगळ्या गावभर त्याची छी:थू झाली असती. गावातले असेच अजून वीसपंचवीस लोकसुध्दा निघाले त्यांच्याबरोबर. दिवसभर चालल्यावर रात्री मुक्कामाला राजाच्या गावात पोचले ते. रात्री जेमतेम झोप लागते न लागते तोच, अशांतीचा हल्ला झाला. खूप गदारोळ झाला. अनानीने अगदी शिकस्त केली. चारपाचांना तर अगदी सहज लोळवले त्याने. पण शेवटी अशांतीच्या नवीन हत्याराने जादू केलीच आणि अनानी आणि त्याच्या साथीदारांना माघार घ्यावीच लागली. तेवढ्यात अंधारात कोणीतरी त्याला घट्ट पकडलं आणि दोरीने बांधलं. सकाळ होई होईपर्यंत सगळं शांत होऊनसुध्दा गेलं होतं.

अनानीचा राजा मारला गेला होता. सगळं उध्द्वस्त झालं होतं. अशांतींनी गाव जाळलं आणि जे सापडतील ते लोक, पकडलेले सैनिक वगैरेंना बांधून ते चालू पडले. नदी ओलांडताना अनानीने मागे वळून बघितले, त्याला क्षणभर भास झाला, तो सिंह अजून त्या गावाच्या वेशीवरच थांबला आहे. म्हणजे!!! सिंहाने साथ सोडली की काय? नाही नाही... असे कसे... आत्ता पर्यंत बेफिकिर असलेला अनानी एकदम भानावर आला आणि त्याच्या हातापायातले त्राणच गेले एकदम. तो खाली कोसळला.

पडता पडता त्याला एवढेच जाणवले... कोणीतरी त्याच्या अंगावर चाबकाचे फटके मारत आहे आणि त्याला मात्र त्याचे काहीच वाटत नव्हते.

- ४

गाडी शहराबाहेर पडली आणि गाडीचा वेग वाढला. वेग वाढला तसा गाडीतल्या एसीचा थंडावाही वाढला आणि हा सुखावला. मस्तपैकी पाय ताणून देत त्याने अंग मागे झोकून दिले. बाहेर पावसाळी हवा होती. मधेच थोडा पाऊसही लागला होता. हवा कुंद वगैरे म्हणतात तशी होती. पण हा मात्र बराच एक्सायटेड होता. बर्‍याच वर्षांपासून मनात होते ते आज पूर्ण होणार होते.

हळूहळू, जीव सुखावल्यामुळे, डोळेही जडावले. एकीकडे, जिकडे चालला होता त्याबद्दल, विचार चालू होते मनात. डोळे मिटता मिटता याचं मन एकदम पंचवीस तीस वर्षं मागे, भूतकाळात गेलं. असाच पावसाळी मोसम. शाळा सुरू होऊन दोनेक महिनेच झाले होते. अशीच कुंद हवा. कंटाळवाणा गणिताचा तास अगदी संपण्यात होता. पुढचा तास इतिहासाचा. म्हणजे आवडीचा. त्या तासाची वाट बघण्यात गणिताचा उरलेला तास बराच सुसह्य झालेला. बेल झाली आणि क्षणार्धात गणिताचं पुस्तक आत दप्तरात गेलं, इतिहासाचं पुस्तक बाहेर आलं. सातपुतेबाई बाहेर उभ्याच होत्या. त्या नेहमीसारख्या भरभर चालत टेबलापाशी गेल्या. या बाईही आवडीच्याच. इतिहास शिकवता शिकवता बरंच काही सांगायच्या. आयुष्यात समाजाकडे बघायची दृष्टी असते त्याचं भान बाईंनीच नकळत दिलेलं. अगदी गप्पा गोष्टी करत सगळं चालायचं.

त्या दिवशी मात्र बाईंनी जो धडा शिकवायला घेतला त्याने मात्र हा अगदी गुदमरून गेला. असंही घडतं जगात? माणसं अगदी आपल्यासारख्या दुसर्‍या माणसांशी असं वागू शकतात? आणि एक नाही दोन नाही करोडो माणसांनी हे भोगलं? शेकडो वर्षं हे चाललं होतं? कोणालाच काही वाटत नव्हतं? त्या इतिहासाच्या पुस्तकातली, सभ्य घरातल्या सन्मार्गी मुलामुलींना रूचतील अशी चित्रं एकाएकी बदलून, त्यांच्यामागची खरी भयानक चित्रं समोर आली. बाईंनी नुसत्या शब्दांनी ती उभी केली याच्या डोळ्यांसमोर. तेव्हापासून आजतागायत याला या विषयाबद्दल भयानक कुतूहल वाटत आलेलं. मोठं होता होता जमेल तेव्हा जमेल तसे वाचन करताना या विषयावर बरीच माहिती गोळा केली याने. शाळेत का कॉलेजात असतानाच 'एक होता कार्व्हर' नजरेस पडलं होतं. त्यातनं या लोकांच्या यातनांचं झालेलं दर्शन याला बरेच दिवस अस्वस्थ करून गेलं. ती अस्वस्थता पूर्णपणे गेलीच नाही कधी. अजूनही कधी कधी तो न पाहिलेला छोटा जॉर्ज मनात दिसतो. आई बापांपासून तोडला गेलेला, दुबळा, अशक्त, मायेचे फार कमी क्षण वाट्याला आलेला. पण भयानक चिवट.

याला या लोकांच्या शारिरिक कष्टांबद्दल, छळाबद्दल भरपूर वाचायला मिळाले होते. पण याला खरे वाईट वाटायचे, ते या लोकांच्या 'तुटण्याबद्दल'... आपापल्या आयुष्यात रमलेले हे लोक असे अचानक एकाएकी बाजूला फेकले गेले... आई बाप बायको नवरा मुलं बाळं आप्त... संपलं, एका क्षणात संपलं अगदी. कोणतीही पूर्वसूचना न देता, मनाची तयारी न होऊ देता... नियतीने घाला घातला आणि चालत्या बोलत्या स्वतंत्र माणसांचे केवळ बाह्य स्वरूप माणसाचे असलेले जनावर करून टाकले... या जनावराला मन, भावना वगैरे बाळगण्याची मुभा नव्हती. पण मन असे थोडेच जाते. ते तर सतत आपल्या बरोबरच येते आणि शेवटपर्यंत साथ देते. या लोकांना किती मानसिक यातना झाल्या असतील? आपल्याबरोबर काय होते आहे? काय होणार आहे? त्यात परत शारिरीक यातना. आप्तांचे, गावाचे शेवटचे दर्शन... त्या क्षणी पुढे काय वाढून ठेवले आहे त्याची काही कल्पना नाही... कसे झाले असेल त्यांना? जेव्हा कधी मरण आले असेल तेव्हा, आईच्या मऊमऊ हाताची आठवण आली नसेल? घरातून निघताना बिलगलेल्या बायकापोरांची याद आली नसेल? जे लगेच मेले नाहीत पण कित्येक वर्षं लांबलेलं दिर्घायुष्य ज्यांच्या नशिबी आलं त्यांचा जीव असा सुखासुखी गेला असेल? ज्यांच्यामुळे हे भोग वाट्याला आले त्यांना शाप दिले नसतील? आणि त्या लोकांना हे तळतळाट भोवले नसतील? त्यांच्या शेवटच्या क्षणी हे पाप त्यांच्या भोवती फेर धरून नाचलं नसेल?

सगळेच भयानक, अगदी मुळापासून हलवून टाकणारे. अंतर्मनात खोलवर हे अगदी रुतून बसलेले.

याला प्रत्यक्ष आफ्रिकेत जायचा योग आला, नोकरीनिमित्ताने. आफ्रिकेचे आकर्षण होतेच मनात. पण संचारही वाढला. त्यामुळे हा खुष होता. एके दिवशी कळलं की ज्या ठिकाणी या भयानक नाट्याचा एक फार मोठा अंक खेळला गेला ते ठिकाण हा नेहमी जिथे जायचा त्या गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. अंतर्मनातलं आकर्षण उसळून बाहेर आलं. कसंही करून तिथे जायचंच. विचार पक्का ठरला आणि एक दोन मित्रांना घेऊन हा निघाला....

क्रमशः

भेट...

on शुक्रवार, सप्टेंबर ११, २००९

टर्रर्रर्रर्र...

घड्याळानं भोकाड पसरलं आणि अगदी एका सेकंदात आबासाहेबाचा सरावलेला हात गाप्पकिनी त्या घड्याळाच्या डोक्यावर आपटला. घड्याळाचा आवाज बंद. आबासाहेबानं नुसती कूस बदलल्यासारखी केली आणि परत पहाटेच्या गुलाबी थंडीत विरून गेला. खरं तर आबासाहेबाला घड्याळाची गरजच नव्हती. शाळेत असल्यापासून पहाटे ५ वाजता उठायची सवय लागली होती. आणि आता गेल्या १०-१२ वर्षात तर ही सवय इतकी अंगवळणी पडली होती की एकवेळ घड्याळ बंद पडेल पण आबासाहेबाचा डोळा ५ वाजता उघडणार नाही असं होणारच नाही. शाळेत कॉलेजात अभ्यास तरी असायचा, आता तेही नाही, तरीही येतेच जाग. लोळता लोळता आबासाहेबाला परत छान डुलकी लागली. थोड्यावेळानं खिडकीतून ऊन आत, अगदी डोळ्यावर आलं तसं तो एकदम भानावर आल्यागत उठून बसला.

डोळे चोळत त्यानं आजूबाजूला बघितलं आणि एकदम त्याच्या लक्षात आलं की इतकावेळ आपल्या बाजूला सुमी झोपली आहे असं वाटत होतं ते स्वप्नच होतं. एक क्षणभर तो अगदी कावल्यागत झाला. दबा धरून बसलेलं मांजर आता अगदी दूधाच्या पातेल्यावर झडप घालणार आणि तेवढ्यात त्याच्या पाठीत काठी बसावी अस्सं झालं अगदी त्याला. पण मग त्याला स्वतःचंच हसू आलं. आपल्याच हाताने डोक्यावर टपली मारत तो उठला.

'आबासाहेब, हितं कुटली आली सुमी? तुमचे तुमीच हितं. उटा आनि आवरा. ऑफिसला जायला उशिर होतोय.' स्वतःला समजवल्यागत करत तो चटचट आवरायला लागला.

खरंतर आबासाहेबाला जिल्ह्याच्या गावात एकटं राहणं अगदी जीवावर यायचं. कॉलेजात जाईपर्यंत गावात उंडारत आयुष्य काढलेलं त्यानं. अभ्यासात बरा होता म्हणून बापानं हौसेनं शिकायला कॉलेजात धाडलं त्याला. शहराचं आकर्षण असल्यानं आबासाहेबही खुश झाला होता. पण नव्याची नवलाई ओसरल्यावर 'गड्या आपुला गाव बरा...' असंच वाटायला लागलं त्याला. पण इलाज नव्हता. शिक्षण आवश्यक होतंच. त्याचं घराणं खरं तर तालेवार. एके काळी आपली पाचसहाशे एकर शेती होती असं त्याचा बाप त्याला नेहमी सांगायचा. पण पुढे कूळकायद्यात बरीचशी जमीन गमावली, उरलेली भावकीत वाटण्यात गेली आणि अगदी किरकोळ २५-३० एकर तेवढी राहिली हातात. आबासाहेबाच्या आज्ज्यापर्यंत तर घरात सावकारीही होती आणि जमिनदारीही. आख्खं गाव पायापाशी उभं राहत होतं. दरारा एवढा की वाड्यासमोरून जाताना लोक जोडे हातात घेऊन जात होते. पण जमिनी गेल्या, सावकारी संपली आणि दरारा गेला. समानतेच्या लाटेत जमिनदाराचं घराणं भुईसमान झालं. पण आबासाहेबाच्या बापानं, रावसाहेबानं सगळ्यांशी दिलजमाईचं धोरण ठेवल्यानं आन् संबंध राखल्यानं गावात अजूनही थोडाफार मान होता. पंचवीस एकर जमीन तीन भावात वाटल्यावर काय शिल्लक उरणार आन् कोणाची पोटं भरणार या विचारानं आबासाहेब कॉलेज संपल्यावर तिथं जिल्ह्यालाच नोकरी धरून राहिला. बर्‍यापैकी चेहरामोहरा आणि चालणारं डोकं या बळावर लवकरच तो नोकरीतही व्यवस्थित स्थिरस्थावर झाला.

गाव तसं फार लांब नव्हतं. एस्टीनं चारेक तासच. पण दर एक दोन दिवसाआड कोणी ना कोणी तरी यायचंच तिथून काहीबाही कामासाठी. त्यांच्याबरोबर माय पाठवायची काहीतरी. कधी भाजी, कधी घरचं तूप, कधी नुसतंच पत्र असं चालायचं. त्यामुळे आबासाहेबाला जरा थंडावा मिळायचा. पंधरा दिवसातून एखादी चक्कर तो स्वतः मारायचा. पण सहा महिन्याखाली लगिन झालं, सुमी आयुष्यात आली आन् आबासाहेबाला करमंना झालं शहरात. बरं सुमीला हिकडं आनावं म्हनावं तर ते पण बरुबर दिसंना. त्यानं एकदा नुसतं हळूच विषय काढायचा प्रयत्न केला तर चुलती फिस्सकनी अंगावर आली त्याच्या.

"मोठी सून हाये ती. येवडी वर्सं तुझ्या मायनं केलं समद्यांचं आन् तू घेऊन चालला लगी तिला. तितं राजा-रानी र्‍हावा मजेत आन् हितं म्हातारा म्हातारी करतेतच अजून दुसर्‍यांचं."

सगळ्या बायका फिदीफिदी हसल्या होत्या. आबासाहेबाला कुटं तोंड लपवावं असं झालं होतं. सुमी पण मान खाली घालून पदर तोंडात धरून हसत होती. त्यानं तर अजूनच चिडला होता आबासाहेब. पण नंतर सुमीनंच समजूत काढली होती त्याची. असं वागणं शोभून दिसणार नाही, आपल्याला चार लोकांत रहायचं आहे, थोडं दमानं घ्या. थोडे दिवस जाऊ द्या मग हळूच जमवून आणू आपण, असं समजवल्यावर आबासाहेबाला पण हुरूप आला. अशी समजूतदार बायकू मिळाल्याबद्दल त्यानं खंडोबाला मनोमन नमस्कार घातला. आणि नाईलाजाने का होईना पण नोकरीच्या गावी रुजू झाला. तेव्हापासून हे असं चालू होतं.

आत्तासुध्दा तोंड धुताना, दाढी करताना आरशासमोर उभं राहिल्यावर त्याला सुमीच दिसत होती. पण आता पुढची चक्कर आलीच आहे चार पाच दिवसांवर या विचाराने त्याने मनाला लगाम घातला आणि निमूटपणे आवरून ऑफिसच्या रस्त्याला लागला. पण आज काय त्याचं चित्त थार्‍यावर येईना. सारखी सुमीची आठवन यायलागली. कसातरी ऑफिसात पोचला आणि मग मात्र जरा ते मागं पडलं. नेमका दुपारी गावाकडचा कैलास ऑफिसात हजर. आबासाहेबाला अगदी तापल्या रानावर हलकेच पाऊस पडून जावं तसं झालं. आज लई आटवन यायलागली होती आन् आला बाबा हा कैलास. कैलास तर त्याच्याच वयाचा, शाळूसोबती. चार घटका त्याच्या संगतीत घालवल्यावर आबासाहेब शांत झाला. कैलासनं रावसाहेबांची चिठ्ठी आणल्याली. त्यानं गडबडीनं पाकिट फोडलं. त्यातनं दोन कागद निघाले. नेहमी चार ओळी लिहिणार्‍या रावसाहेबांनी आज चक्क २ पानांचं पत्र लिहिलंय!!! त्यानं कागद समोर धरला. त्यात लिहिलेलं,

चिरंजीव आबासाहेबांस,

अनेक आशिर्वाद, उपरी विशेष. सध्या गावात थोडीफार थंडीतापाची साथ चालू आहे, बरेच लोक आजारी आहेत. चार पाच मयती झाल्या आहेत. तरी आम्ही सगळे रानात रहायला जात आहोत. खबरदारी म्हणून. घरात कोणासही त्रास नाही. महादा राखणीला म्हणून राहिल वाड्यावर.

बाकी क्षेम. काळजी नसावी. यावेळचे येणे थोडे लांबवता आले तर उत्तम. काळजी घ्या, तब्येतीला जपा.

रावसाहेब.


आबासाहेबाने घाईघाईने दुसरा कागद उलगडला. त्यात लिहिलं होतं,

आवो, या ना.

सुमी


आधीच आज आबासाहेबाचं चित्त भरकटलं होतं, आता तर पार ढेपाळलाच गडी. कैलासनेच जरा समजूत घालून शांत केले त्याला. गावात तशी काही फार गंभीर परिस्थिती नाहीये. काळजी घेतली तर आटोक्यात येईल. आबासाहेबाला नीट समजवून कैलास निघून गेला. आबासाहेबाला मात्र काही गोड लागेना. त्याची पंचाईतच झाली होती. ऑफिसचं इनिस्पेक्शन दोन दिवसावर आल्यालं, रजा घेता येईना. आन् गावात फोन तरी कुटं करनार. आख्ख्या गावात फक्त दोन फोन. एक पंचायतीच्या कार्यालयात आन् दुसरा पतपेढीच्या कार्यालयात. जरी केला फोन तरी तिथं सुमी कशी येणार? मोठ्या मुश्किलीने त्याने कसेबसे दोन दिवस घालवले. घालमेल चालूच होती. तिसर्‍या दिवशी संध्याकाळी ऑफिस बंद व्ह्यायच्या वेळी नेमका फोन आला.

'हॅलो, कोण?'

'आवो...'

'सुमे.... तू?'

आबासाहेब हातभर उडालाच. आत्ता या वेळेला सुमीचा फोन? आन् ती कशी काय फोन करतीये? कुठनं?

'आवो, ओरडू नका. मला लै आटवन यायलागली. म्हनून म्हादूकाकाला सांगाती घेऊन आले मी हितं पंचायतीच्या हापिसात. तुमी या ना.'

'अगं पण आत्ता संध्याकाळ व्हायलीये... गाडी गेली आसंल. आता कसं निगू?'

'ते काय मला माहित नाय. तुमी या मंजी या. आन् ऐका, रानात कोनीच न्हाय. समदे आत्याबाईकडे गेले हायेत आज दुपारच्याला. मी उगाच कंबर धरल्याचं नाटक करून मागं र्‍हायले. रानात येकटी नको म्हनून आज वाड्यावरच हाय, महादूकाका हाय सोबतीला. बरं मी ठिवते फोन, लोकं बघायलेत.' सुमीनं धाडधाड गाडी सोडून फोन बंद केला सुध्दा.

आबासाहेब खुळ्यागत बघतच राहिला. आता काय करावं? कसं जावं? आज मात्र त्याला स्वतःला आवरता येत नव्हते. आलंच नाही. इनिस्पेक्शनही झालंच होतं. त्याने साहेबाला २ दिवसाच्या रजेचा अर्ज दिला आणि तडक दिलप्याच्या घरी थडकला. दिलप्या त्याचा कॉलेजपासूनचा दोस्त. मारवाड्याचा. घरी तीनचार मोटरसायकली वगैरे बाळगून असणारा.

'दिलप्या लेका एक काम कर रे माजं...'

'आरं बोल की... '

'तुझी गाडी दे मला दोन तीन दिवसांकरता. आर्जंट गावी जाऊन यायचंय. सुमीचा फोन आला होता ल्येका... आता काय मला दम न्हाय बघ. गाडी दे नाहीतर चालत जातू बघ मी.'

'मायला आब्या, आसं इचारून गाडी घेऊन जायची वाईट चाल कधी पासून पडली रं आपल्यात? आँ? धर ही चावी आन् सूट. नेमका आजच टँक फुल्ल केलाय. नीट ग्येलास तर आकरा बारा पर्यंत पोचशील पण. ये निवांत, सगळं आटपून', डोळा घालत दिलप्या म्हणाला.

तिथेच चहा नाश्ता करून आबासाहेब थेट निघालाच. अंधार आणि हायवेची रहदारी. आबासाहेब अगदी जपूनच चालवत होता गाडी. गाव जवळ आलं, दिवे दिसायला लागले. आबासाहेब गावात शिरला तेव्हा साडेअकरा वाजून गेले होते. गाव अगदी शांत होतं. उगाच कोण चुकार भेटला तर चौकशा नकोत म्हणून आबासाहेब, थोडा आडवाटेनंच गावात शिरला आणि थेट वाड्यासमोरच गाडी लावली. वाड्यात उजेड दिसत होता. त्याने गाडी बंद करायच्या आतच दार उघडलं गेलं. दारात स्वतः सुमीच होती. आबासाहेब आत शिरला तशी तिनं पटकन दरवाजा लोटून दिला. सोप्यात आल्यावर तिथल्या उजेडात त्याने सुमीला बघितलं आणि बघतच राहिला. लग्नातही सजली नव्हती तशी सजून सुमी त्याच्या स्वागतासाठी वाट बघत होती. आबासाहेबाला एवढा शीण करून आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. चारपाच तास मोटारसायकलवर रात्रीच्या अंधारात हायवेवरून यायचं म्हणजे काय चेष्टा नाही. त्याचं अंग अगदी मोडून गेलं होतं. पण सुमीला बघून त्याला अगदी राहवेना,

'सुमे, काय गं? आज काय पेश्शल बेत हाय का काय?'

'तर, मी येवडं प्रेमानं बोलावलं आन् तुमी धावत आलेत मंग पेश्शल खातिरदारी नकू का?'

'सुमे, माझा तर इश्वासच बसंना गं!!! दुपारधरून कासावीस झालो होतो बघ. कोन तरी ओढतंय आसं होत होतं बघ. तुझा फोन येई पर्यंत वाटलं पन नव्हतं की रात्री मी हितं असेन. तुझ्याबरूबर.'

'आसंच आसतंय. कधी काय व्हईल काय सांगावं? आन् आसं अचानक भेटन्यातच गंमत जास्त आसती.'

'आगं पन एकटीच कशी तू? म्हादूकाका कुटं हाये? तू म्हनाली व्हतीस की त्यो पन हाये सोबतीला.'

'आवो हितंच होता की. गेला आसंल मागं गोठ्यात. मी बगते त्याला.'

'बरं, आदी च्या कर गं फस्क्लास. जेवायचं बगू नंतर. तशीबी जेवनाची भूक न्हाईच मला फारशी.' आबासाहेब सुमीकडं रोखून बघत म्हणाला.

'चला...' लाजून हसत हसत सुमी आत मधे पळाली.

आबासाहेब पटकन हातपाय धून कापडं बदलून एकदम हुश्शार होऊन चुलीपाशी सुमी जवळ पाटावर येऊन बसला. सुमी पुढ्यात च्याचा कप घेऊन बसली होती. कसल्यातरी तंद्रीत होती जनू. तो येऊन बसल्याचंही तिला कळलं नाही. निवांत बसत तो भिंतीला टेकला.

'ए सुमे, काय झालं गं? कसला विचार करतेस एवढा? आन तो च्या इकडं.' कप हातात घेत तो म्हणाला. तिला हळूच हलवलं त्याने. सुमी भानावर आली,

'मी काय म्हंते, आता परत जाऊच नका. हितंच र्‍हावा. काय आसंल ते आपन गोड करून खाऊ. पन आता दूर नाही र्‍हानार मी.'

'शाब्बास गं माज्जी रान्नी!!! आदी कोन बोलत होतं? तुमी जावा, मी र्‍हाते, हळूहळू येईन मी तिकडं. आन् आता काय झालं?'

'व्हय हो... मीच म्हनलं होतं. पन आता येगळं हाय. आता न्हाय जमनार तसं. तुमी हितंच र्‍हावा.' त्याच्या कुशीत शिरून सुमी मुसमुसत म्हणाली. तिच्या डोळ्याला ज्या धारा लागल्या त्या थांबेचनात. बराच वेळ आबासाहेब तिला समजवत राहिला. पण रडणं काही कमी होईना. शेवटी आबासाहेब उगाच तिचं लक्ष हटवायला काहीतरी म्हणायचं म्हणून म्हणाला,

'आर्रर्र, च्यात साखर कमी झाली बघ. तो डबा घे जरा साखरंचा.'

त्याच तंद्रीत सुमीनं हात लांब करून फडताळाच्या अगदी वरच्या फळीवर असलेला साखरेचा डबा अल्लाद उचलला आन् आबासाहेबाच्या पुढ्यात ठेवला. क्षणभर आबासाहेबाला काहीतरी चुकतंय, काहीतरी विचित्र घडतंय असं वाटलं पण नीट कळेना. तेवढ्यात त्याच्या ध्यानात आलं. जमिनीवर बसलेल्या सुमीनं हात लांब लांब लांब करत नेऊन फडताळाच्या अगदी वर म्हणजे अगदी चार पाच फूट लांब असलेला साखरंचा डबा उचललाच कसा. त्याला काहीतरी जाणवलं. तो ताडकन् उठला आणि जीवाच्या आकांताने पळत सुटला. मागनं सुमीचा आवाज आला,

'आवो, कुटं जाताय? पळू नका. थांबा.'

आबासाहेब कुठला थांबायला. पळत पळत तो सोप्यापर्यंत आला. तेवढ्यात त्याला समोर सुमी उभी दिसली. तशीच सुंदर, नटलेली. चेहर्‍यावर गोड हसू. शांतपणे उभी. तो तिच्याकडे बघतच राहिला.

'मला सोडून जाताय? नका ना. आता नाही राहणार मी तुमच्याशिवाय. तुम्ही आणि मी. आपण दोघंच. बाकी कुण्णी कुण्णी नाही. या ना...' ती दोन्ही हात पसरत म्हणाली.

भारावल्यासारखा आबासाहेब हळूहळू पुढे सरकला. सुमीच्या सान्निध्यात त्याला आता शांत वाटत होतं. त्याने स्वतःला झोकून दिलं आणि तिच्या मिठीत विरघळून गेला.

****

'हवालदार, बॉडीची पोझिशन नीट आखून घ्या. फोटोग्राफर आलाय ना? तेही उरकून घ्या. आणि नातेवाईक कुठे आहेत?'

'साहेब, ते सगळे रानात होते, वाड्यात कोणीच नव्हतं. आत्ताच आलेत, तिथे चौकीत बसवून ठेवलं आहे त्यांना. हे अजून सांगितलेलं नाहीये साहेब त्यांना.'

'का?'

'सकाळी वाड्याचं दार अर्धवट उघडं दिसलं आणि बाहेर ही गाडी दिसली म्हणून लोकं डोकावले तर बॉडी दिसली. लगोलग सांगावा धाडला. तर काल संध्याकाळीच या इसमाची बायको मयत झाली होती साहेब. काल सकाळपासूनच अचानक तापानं फणफणली होती. साथ चालूच आहे साहेब गावात. संध्याकाळी झोपली तर घरच्यांना वाटलं की शांत पडली आहे, सकाळी पत्ता लागला, बहुतेक संध्याकाळीच आटोपली असणार. काय भानगड आहे कळेना साहेब.'

समाप्त

चित्रपट ओळख - लाइव्ह्ज ऑफ अदर्स

on बुधवार, जुलै ०१, २००९

लहानपणी शाळेत असताना संस्कृतात 'स्त्रियश्चरित्रम्, पुरुषस्य भाग्यम् | न जानामि दैवम्, कुतो मनुष्यः||' असे एक सुभाषित आम्हाला शिकवले गेले होते. त्याचा अर्थ अगदी सहज समजेल असा आहे. पण तेव्हा त्या वयात त्यावर फारसा विचार केला नव्हता. ५० मार्कापैकी सुभाषितं आणि त्यांची भाषांतरं फारतर ४-५ मार्कांपुरती असतील. तेवढाच उपयोग. पण हे सुभाषित कायम आठवायचं. अगदी कधीही. पुढे पुढे मोठं होत असताना मला नेहमी आजूबाजूला काय चाललंय, कोण कसं वागतंय, कसं बोलतंय अशा गोष्टी निरिक्षण करायची सवयच लागली. त्यावरून एक गोष्ट पटली... वरच्या सुभाषितात ते स्त्रीचे चरित्र, पुरुषाचं भाग्य वगैरे जाऊ दे, पण माणूस हा प्राणि मात्र नक्कीच 'न जानामि दैवम | कुतो मनुष्यः' असा आहे हे नक्की.

माणूस हा माझ्या मते जगातला सगळ्यात अनाकलनिय, गूढ असा प्रकार आहे. आपल्याला अगदी रोजच्या आयुष्यातसुध्दा असे अनुभव येतातच. एखाद्या व्यक्तीला आपण वर्षानुवर्षे ओळखत असतो. आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव पूर्ण माहित असतो (असं आपल्याला छातीठोकपणे वाटते) पण एखाद्या क्षणी ती व्यक्ती असं काही वागून बोलून जाते की आपला अंदाज साफ चुकतो. अजून अशीही उदाहरणं दिसतात की माणूस एका विशिष्ट प्रकारे घडलेला असतो. पण एखादी घटना त्या व्यक्तीच्या आयुष्यात अशी घडते आणि खोलवर परिणाम करते की तो माणूस अगदी बदलूनच जातो. त्याचे एकंदरीत व्यक्तिमत्व १८० डिग्रीमधे फिरते आणि तो अगदी पूर्णपणे बदलतो. हेच कशाला, आपण स्वतःलाही ओळखत नाही नीट. कधी कधी आपण स्वतःच स्वतःला चकित करतो. म्हणूनच ते... 'न जानामि दैवम्, कुतो मनुष्यः'.

आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे, नुकताच पाहिलेला चित्रपट 'लाइव्ह्ज ऑफ अदर्स'.



काही दिवसांपूर्वी गुडबाय लेनिन या चित्रपटावर लिहिले होते. बर्‍याच लोकांनी तो चित्रपट पाहिलाही होता. बहुतेक सगळ्यांनाच आवडला होता तो. त्याच वेळी बर्‍याच समानव्यसनी लोकांनी अजूनही काही चित्रपटांची नावे सुचवली होती. त्यापैकी हा 'लाइव्ह्ज ऑफ अदर्स' एक. हा चित्रपट सुचवल्याबद्दल मुक्तसुनितचे आभार नक्कीच मानावे लागतील.

हाही चित्रपट पूर्व जर्मनीशी संबंधित आहे. पुढची गोष्ट सुरू व्हायच्या आधी पूर्व जर्मनीतल्या काही गोष्टींबद्दल थोडेसे... पूर्व जर्मनी हा देश दुसर्या महायुध्दानंतर सोविएत सैन्याच्या अधिपत्याखालील भूभागावर जन्माला आला. साहजिकच पूर्णपणे कम्युनिस्ट पक्षाची अगदी पोलादी पकड असलेली राज्यव्यवस्था. फारसे वैचारिक स्वातंत्र्य नाही. कोणत्याही एकाधिकारशाही असलेल्या देशात ज्या प्रकारे दडपशाही असते तसेच वातावरण. कोणत्याही प्रकारच्या विरोधाला किंवा बंडखोरीला आळा घालण्यासाठी सरकारने एक प्रचंड मोठे गुप्तहेरखाते उभारले होते आणि अतिशय प्रेमाने पोसले होते. त्या संघटनेचे नाव 'श्टाझी' (झबल्यातला झ). अतिशय कडव्या आणि ध्येयप्रेरित लोकांनाच या संघटनेमधे प्रवेश मिळत असे. या संघटनेचे खास बलस्थान म्हणजे त्यांनी तयार केलेले खबर्या्चे जाळे. हा प्रकार इतका भयानक होता की अगदी नवरा - बायको वगैरे तर राहु द्या पण लहान मुलांनाही आपल्या आईवडिलांवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल श्टाझी कडे चुगल्या करण्यासाठी पद्धतशीरपणे शिकवले जात असे. (पूर्व जर्मनी कोलमडल्यानंतर श्टाझीची कागदपत्रं खुली करण्यात आली. त्यात कोणालाही आपल्याबद्दल श्टाझी कडे काय माहिती होती हे बघता यायला लागले. त्यात आपल्यावर कोण कोण पाळत ठेवत होते हे पण कळणे क्रमप्राप्तच. ही कागदपत्रं खुली झाल्यावर कितीतरी नातेसंबंध पार मोडून पडले.)

तर अशा वातावरणात घडणारी एका अतिशय भावनाशुन्य, कोरड्या, कडक शिस्तीच्या अधिकार्‍याची आणि एका संवेदनशील अशा लेखकाची ही कहाणी.

श्टाझी कॅप्टन गेर्ड विस्लर हा खात्यातला एक अतिशय हुशार, अनुभवी, बुध्दिमान आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे पूर्णपणे निष्ठावान असा कर्तबगार अधिकारी. त्याचा वरिष्ठ ले. कर्नल ग्रुबित्झ याचा पण त्याच्यावर पूर्ण विश्वास. चित्रपटाच्या सुरूवातीलाच संशयितांकडून कबुलीजबाब घेण्याचे विविध मार्ग (अर्थात मानवी आणि अमानवी दोन्ही) हा कॅप्टन विस्लर हाताळताना आणि ते नवीन भरती झालेल्या विद्यार्थी सहकार्‍यांना शिकवताना दाखवले आहे. तर असा हा विस्लर आणि त्याचा बॉस ग्रुबित्झ. ग्रुबित्झ हा एका वरिष्ठ मंत्र्याच्या, हेम्फच्या, अगदी जवळचा असतो. गेओर्ग ड्रेयमान हा पूर्व जर्मनीतला अतिशय प्रतिभावान असा लेखक, नाटककार. तो विचाराने कम्युनिस्ट असतो. त्याचे तत्कालिन पूर्व जर्मन राज्यकर्त्यांच्या एका गटाशी खूप जवळून संबंध असतात. मंत्र्याला या ड्रेयमानविषयी संशय असतो की त्याला पश्चिम जर्मनी बद्दल सहानुभूती आहे आणि त्यासाठी तो ग्रुबित्झला ड्रेयमानवर नजर ठेवायला सांगतो. ग्रुबित्झ हे काम त्याचा सगळ्यात विश्वासू सहकारी कॅप्टन विस्लरवर ही अतिशय नाजूक जबाबदारी टाकतो.


गेर्ड विस्लर


ख्रिस्टा-मारिया आणि गेओर्ग ड्रेयमान

एक दिवस विस्लर ड्रेयमानच्या घरी कोणीही नसताना काही टेक्निशियन्सना घेऊन घुसतो आणि त्याच्या पूर्ण घरभर गुप्त माइक्स आणि कॅमेरे लावतो. त्या इमारतीच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर एक अडगळीची खोली असते त्या खोलीत कंट्रोल रूम थाटतो. अशी व्यवस्था होते की ड्रेयमानच्या घरात जे जे काही घडते ते सगळे व्यवस्थित ऐकू येते. त्या घरात ड्रेयमान आणि त्याची मैत्रिण ख्रिस्टा-मारिया राहत असतात. ही ख्रिस्टा मारिया अतिशय गुणवान आणि गाजलेली अभिनेत्री असते. इथून सुरू होतो विस्लर आणि त्याच्या एका साथीदाराकडून २४ तास पहारा. प्रत्येक घटनेची लेखी नोंद ठेवली जाते. ड्रेयमान जरी निष्ठावान असला तरी त्याला बर्‍याच गोष्टी पसंत नसतात. त्याचा एक प्रसिध्द दिग्दर्शक मित्र येर्स्का हा केवळ राज्यकर्त्यांच्या नाराजीमुळे अक्षरशः आयुष्यातून उठलेला असतो. अशा अनेक घटना तो मूकपणे बघत असतो. त्याचे काही कलाकार मित्र आवाज उठवतात पण याचे धोरण मात्र जमेल तेवढे जुळवून घेण्याचे असते. हा म्हणजे आपल्या विचारांबरोबर केलेला एक प्रकारचा व्याभिचारच असतो. इकडे ख्रिस्टा-मारियाचे पण एक प्रकरण असते. मिनिस्टर हेम्फ आपल्या अधिकाराचा गैरवापर करून तिचा यथेच्छ भोग घेत असतो. या सगळ्या भानगडी हळूहळू विस्लरला कळत जातात आणि त्याच्या सारखा खरोखर कम्युनिझमवर निष्ठा असलेला कर्तव्यदक्ष अधिकारी स्वतःला कम्युनिस्ट म्हणवणार्‍या राज्यकर्त्यांचे हे उघडे नागडे रूप पाहून हादरून जातो. तो डळमळू लागतो. एक दिवस ख्रिस्टा-मारिया हेम्फला भेटून येत असते तेव्हा विस्लर असे काही जुळवून आणतो की ड्रेयमानला ही भानगड कळते. पुढच्या वेळी ती जेव्हा परत हेम्फला भेटायला जायला निघते तेव्हा तो तिला जाब विचारतो. तेव्हा ती त्याला रोखठोक जबाब देते... मी शरीराच्या बदल्यात तर तू विचारांचा बळी देऊन, पण आपण दोघेही केवळ आपल्या कलेकरिता का होईना व्याभिचारच करत आहोत. पण त्याचवेळी विस्लर तिला रस्त्यात गाठून तिचा एक चाहता म्हणून भेटतो. आणि तिला योग्य-अयोग्यची जाणिव करून देऊन हेम्फला भेटण्यापासून परावृत्त करतो. ती परत घरी ड्रेयमानकडे जाते.

या सगळ्यात विस्लरला हळूहळू ड्रेयमान समजत जातो आणि विस्लर पूर्णपणे बदलत जातो. तो रोज सगळ्या खोट्या नोंदी करत जातो की काहीही संशयास्पद नाही वगैरे. आणि हळूहळू ग्रुबित्झला पटवून त्याच्या कनिष्ठ सहकार्‍याला या केसवरून हटवतो आणि पूर्णपणे स्वत:कडे सूत्रं घेतो.

काही दिवसांनी येर्स्का एका भकास आयुष्याला कंटाळून आत्महत्या करतो आणि ड्रेयमान अंतर्बाह्य हादरून जातो. तो पूर्व जर्मनी मधे वैफल्यग्रस्त मनःस्थितीमुळे होणार्‍या आत्महत्यांवर एक लेख लिहितो आणि तो काही मित्रांच्या सहाय्याने पश्चिम जर्मनीमधे प्रसिद्ध करतो. सगळीकडे खळबळ माजते. हेम्फ ग्रुबित्झला जाब विचारतो. ग्रुबित्झ विस्लरला फैलावर घेतो. त्या लेखाची मूळ प्रत श्टाझीचे पश्चिम जर्मनीमधील हेर मिळवतात. पूर्व जर्मनीमधला प्रत्येक टाईपरायटर हा रजिस्टर्ड असतो. पण हा लेख एका अशा टाइपरायटर वर टाइप केलेला असतो जो गुप्तपणे पूर्व जर्मनी मधे आणलेला असतो. ग्रुबित्झ पिसाळतो. त्याला कोणत्याही प्रकारे या घटनेचा उलगडा करायचाच असतो. त्याला पूर्ण खात्री असते की हा लेख ड्रेयमाननेच लिहिलेला आहे पण त्याच्याकडे काहीच पुरावा नसल्याने तो काहीच करू शकत नाही. ड्रेयमानच्या घाराची पूर्ण झडती घेतली तरी काहीच मिळत नाही. तो टाइपरायटर फरशीच्या खाली लपवलेला असतो. तो काही सापडत नाही.



त्याच वेळी ख्रिस्टा-मारियाने झिडकारल्यामुळे सूडाने पेटलेला हेम्फ ग्रुबित्झला पुरावा देतो की ख्रिस्टा-मारिया ही काही प्रतिबंधित गोळ्यांचं सेवन करते. ग्रुबित्झ तिला अटक करतो. तो विस्लरला सांगतो की तुला जर का स्वतःची प्रतिमा स्वच्छ करायची असेल तर ख्रिस्टा-मारिया कडून तुला माहिती काढावीच लागेल. दडपणाखाली विस्लर तयार होतो आणि ग्रुबित्झच्या देखरेखीखाली ख्रिस्टा-मारियाची चौकशी करतो. त्यात ती टाइपरायटर बद्दल सांगते. चौकशी संपते. ग्रुबित्झ ख्रिस्टा-मारियाला खबरी व्हायला भाग पाडतो. हे सगळे चालू असताना, विस्लर हळूच सटकतो आणि ड्रेयमानच्या घरी जाऊन तो टाइपरायटर गायब करतो. ग्रुबित्झच्या लक्षात येईपर्यंत विस्लरने आपला कार्यभाग साधलेला असतो. ग्रुबित्झ श्टाझीची माणसं घेऊन ड्रेयमानच्या घरी येतो पण तो पर्यंत काहीच नसतं तिथे. ड्रेयमान बाहेर गेलेला असतो तो पण परत येतो. इकडे ख्रिस्टा-मारिया हे सगळे सहन न होऊन बाहेर रस्त्यावर जाऊन एका गाडीखाली जीव देते. ड्रेयमानला वाटते की टाइपरायटर तिनेच लपवला. ख्रिस्टा-मारिया मेल्यामुळे हेम्फचा इन्टरेस्ट संपतो आणि हे प्रकरण गुंडाळले जाते. पण ग्रुबित्झला विस्लरने केलेल्या विश्वासघाताची पूर्ण कल्पना आलेली असते. केवळ पुरावा नाही म्हणून त्याला शिक्षा होत नाही, केवळ पदावनती आणि एका अती फडतूस कामावर त्याला पाठवले जाते. इथे चित्रपटाचा एक मुख्य भाग संपतो.



पुढे साधारण साडेचार वर्षांनी पूर्व जर्मनीत उलथापालथ होते, कम्युनिस्ट राजवट कोसळते आणि श्टाझी नष्ट होते. ड्रेयमान हेम्फला त्याच्याच एका नाटकाच्या प्रयोगात भेटतो. त्यावेळी त्याला कळते खरे काय काय घडले आहे. तो पूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी श्टाझीच्या कार्यालयात जाऊन स्वतःच्या बाबतीत असलेली सगळी कागदपत्रं बघतो. त्याला एक गोष्ट लक्षात येते की ज्या ऑफिसरचा कोड HGW XX/7 असा आहे तो आपल्यावर पाळत ठेवत होता पण त्याने जाणूनबुजून आपल्याबद्दल चुकीची माहिती देऊन आपल्याला वाचवले असते. तो HGW XX/7 हा कोड कोणाचा आहे असे विचारतो आणि त्याला गेर्ड विस्लरचे नाव कळते.



तो विस्लरचा शोध घेतो. त्याला कळते की आता विस्लर हँडबिलं वाटपाचे / कुरिअरचे काम करत असतो. तो विस्लरला भेटायचे टाळतो. काही दिवसांनी विस्लर रस्त्यावरून जात असताना त्याला एका पुस्तकाच्या दुकानात ड्रेयमानच्या नवीन पुस्तकाची जाहिरात दिसते.



तो दुकानात शिरतो. एक प्रत उचलतो, उघडतो. ड्रेयमानने ते नवीन पुस्तक HGW XX/7 ला अर्पण केलेले असते. विस्लरला मनोमन कळते की ड्रेयमानला सगळे कळले आहे.



तो पुस्तकाचे पैसे देत असताना काउटरवरचा माणूस विचारतो,

'पुस्तकाला गिफ्टरॅप करू?'

विस्लर त्याच्याकडे मोठ्या अभिमानाने बघतो, त्याच्या डोळ्यात एक चमक असते, तो अगदी शांतपणे उत्तरतो.

'नाही, हे पुस्तक माझ्यासाठी आहे.'

चित्रपट संपतो.


'नो, धिस इज फॉर मी.'

एक अतिशय सुंदर चित्रपट बघितल्याचे समाधान देऊन जातो. विस्लरसारखा कडवा माणूस कसा हळूहळू बदलतो आणि अगदी विरुध्द बाजूपर्यंत त्याचा प्रवास कसा होतो हे अतिशय हळूवारपणे चित्रण केले आहे. त्याचा हा प्रवास चालू असताना आपण त्याच्याबरोबर असतोच. पण आपण एवढे समरस झालेलो असतो की तो बदलतो आहे हे आपल्याला दिसत असते पण जाणवत नाही. शेवटी आपण एकदम भानावर येतो आणि विचार करतो, 'अरे!!! केवढा बदलला हा. कुठून कुठपर्यंत पोचला.' अप्रतिम. सगळेच कलाकार अप्रतिम काम करून गेले आहेत.

चित्रपटाची मला जाणवलेली दोन वैशिष्ट्ये म्हणजे कोणताही भडकपणा नाही. विस्लरचा प्रवास अगदी सहज आणि हळूवारपणे दाखवला आहे. एक प्रसंग असा आहे. तो घरी येतो, लिफ्टमधे शिरतो. एक अगदी लहान मुलगा पण त्याच्या मागोमाग शिरतो. विस्लरचा गणवेष पाहून तो लहान मुलगा विचारतो 'तू श्टाझी आहेस का?' विस्लर त्याला उलट विचारतो 'तुला रे काय माहित श्टाझी काय आहे ते?' तो मुलगा म्हणतो, 'मला माहित आहे. माझे बाबा म्हणतात की श्टाझी दुष्ट असतात.' इतक्या वर्षांच्या सवयीने, अगदी प्रतिक्षिप्तक्रिया असल्याप्रमाणे विस्लर त्या मुलाला त्याच्या वडिलांचे नाव विचारायला जातो पण प्रश्न पूर्ण न करता अर्धवट सोडून देऊन गप्प बसतो आणि विषय बदलतो. हा प्रसंग विस्लरमधला फरक खूपच यथार्थपणे जाणवून देतो. भाषणबाजी नाही, ड्रामा नाही. फक्त एक लहान मुलगा, लिफ्टमधली शांतता आणि विस्लरच्या चेहर्‍यावरचे मूक भाव. लाजवाब.


'श्टाझी दुष्ट असतात!!!'

दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाचा शेवट. ख्रिस्टा-मारिया मरते तिथे हा चित्रपट संपतच नाही, पण जेव्हा ड्रेयमान नंतर विस्लरला शोधून काढतो तिथेही संपवला नाहीये. त्यावेळी ड्रेयमान विस्लरशी काही बोलतच नाही. बहुधा, तो असले हलके काम करताना त्याच्यासमोर जाणे त्याला प्रशस्त वाटत नाही. तो पुस्तक प्रसिध्द करतो आणि HGW XX/7 ला अर्पण करतो. नंतर विस्लरला ते पुस्तक दिसते आणि अर्पणपत्रिकाही दिसते आणि तो जे काही समजायचे ते समजतो. क्लास. कुठेही शब्दबंबाळ संवाद नाहीत. किंबहुना संवादच नाहीत. तसेही, जेव्हा जेव्हा भावना खरोखर व्यक्त होतात तेव्हा क्वचितच शब्द उपयोगी पडतात. या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला ते पुरेपूर माहित आहे हे जाणवते.

असा हा... 'लाइव्ह्ज ऑफ अदर्स'. २००७ च्या ऑस्कर मानांकनात 'बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म' पुरस्कार मिळालेला चित्रपट. अजूनही य पुरस्कार मिळालेले आहेत. पण सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे, मला आवडलाय. तुम्ही बघाल तर तुम्हालाही आवडेल, नक्की बघा.