परवशता पाश दैवे... ३

on शुक्रवार, नोव्हेंबर १३, २००९ही कथा नाही. हा (सुदैवाने) माझा अनुभवही नाही, म्हणजे थोडा माझा आहेच पण अगदी पूर्णपणाने नाही. हे माझ्या अनुभवाचे व काही करोड दुर्भागी आणि अश्राप जीवांच्या अनुभवांचे मिश्रण मात्र आहे. झेपल्यास वाचा. तसेही ढोबळमानाने काय घडले होते हे आपल्याला माहितच असते. वाचले नाही तरी, कमीतकमी मी तरी असे वागणार नाही एवढे स्वतःशीच ठरवा.

परवशता पाश दैवे... भाग १ , भाग २

*************

किती वेळ गाडी धावत होती कोणास ठाऊक. गाडी सरळ एका रेषेत भरधाव चालली होती. पण अचानक गाडीचा वेग बराच मंदावला, गाडीने एक वळण घेतले आणि याची तंद्री भंगली. अंग आंबून गेलं होतं. दोन्ही बाजूला माडाची झाडं दिसत होती. आणि त्या झाडांच्या गर्दीतून निळ्या पाण्यावर नाचणार्‍या शुभ्र फेसाळ लाटा दिसायला लागल्या होत्या. अटलांटिकचे पहिले दर्शन सुखावून गेले. एकदम पिक्चर पर्फेक्ट. आपण कुठे चाललो आहोत याचे पूर्ण विस्मरण झालेले. गाडी तशीच एका गावात शिरली. गाव अगदी आपल्या गोव्यात असल्यासारखे. माणसांचे दिसणे सोडले तर अगदी गोव्यात असल्याची अनुभूती. कोळ्यांची वस्ती प्रामुख्याने असल्याच्या खुणा आणि वास, अगदी जागोजागी.

गावातून जाताजाता गाडीने एकदम एक वळण घेतले, अगदी छोट्याशा खाडीवरचा चिमुकला पूल ओलांडला आणि धाडकन समोर एक महाकाय, प्रचंड पांढरी इमारत उभी राहिली. बघणार्‍याला दडपून टाकेल अशी....

"हिअर वुई आर!!! एल्मिना कॅसल!!!" ड्रायव्हर म्हणाला. एका मोठ्या मैदानात गाडी उभी राहिली आणि सगळे बाहेर पडले.एल्मिना (एल मिना, El Mina in Portuguese language) ... मानवी इतिहासातल्या एका काळ्याकुट्ट आणि महत्वाच्या कालखंडाचा मूक साक्षीदार. अगदी भव्य अशी पांढरी, लालसर कौलं असलेली, अगदी युरोपियन वळणाची इमारत.

पंधराव्या शतकाच्या मध्यावर, उत्तर अटलांटिक महासागरात पोर्तुगिज दर्याचे राजे होते. बलाढ्य आरमाराच्या आणि नौकानयनाच्या वारशाच्या जोरावर ते जग पादाक्रांत करायला नुकतेच बाहेर पडत होते. आफ्रिका आणि भारतातून निघणारा सोन्याचा धूर त्यांना खुणावत होता. धर्मप्रसाराचं अधिकृत आणि पवित्र कर्तव्यही अंगावर होतंच. आफ्रिकेच्या किनार्‍या-किनार्‍याने त्यांची समुद्री भटकंती चालू होती. अशातच त्यांची जहाजं आफ्रिकेच्या पश्चिम किनार्‍यावर, एल्मिनाच्या जवळपास, साधारण इ.स. १४७१ च्या सुमारास येऊन थडकली. सुरूवातीला बरीच वर्षं जम बसवण्यात आणि स्थानिक लोकांशी मैत्री करण्यात गेला. हळूहळू व्यापार वाढला. कायम स्वरूपी तळ उभारण्याची गरज पडू लागली आणि एल्मिना कॅसल इ.स. १४८२च्या सुमारास बांधून झाला, तो अजून उभा आहे. काळाच्या ओघात मालक बदलले... पोर्तुगिज गेले डच आले, डच गेले इंग्रज आले, आता तर गोरेच गेले आणि स्थानिक लोकांची मालकी आहे... व्यापाराचेही स्वरूप बदलले... सोन्याचे साठे जाऊन माणसांचे साठे आले... तब्बल चारशे वर्षे करोडो अभागी जीव दास्यात ढकलले गेले... सध्या टुरिझम नामक व्यापार जोरात आहे.

एल्मिनाने सगळे बघितले आणि अजूनही शांतपणे उभा आहे... पुढे येणार्‍या बदलांची वाट बघत.किल्ल्यामधे शिरण्यासाठी फक्त एकच दार आहे. किल्ल्याच्या चारही बाजूला एका आत एक असे दोन खंदक आहेत. खंदक बरेच खोल आणि भरपूर रूंद आहेत. या खंदकात पाणी सोडलेले असे.खंदकावरील एकमेव लाकडी पूलाची उघडबंद हालचाल यंत्राच्या सहाय्याने होत असे. पूल बंद झाला की आत शिरणे अशक्य.

आत शिरल्या शिरल्या एक छोटेसे स्वागतकक्ष आहे. माफक किंमतीत सर्व परिसर फिरायचे तिकीट घ्यायचे. सगळा किल्ला हिंडून फिरायला गाईड्स नेमलेले आहेत. हे गाईड्स इतर कोणत्याही ऐतिहासिक स्थळांच्या गाईड्ससारखे एक नंबर बोलबच्चन असतात. पण त्यांच्या बरोबरच आत फिरावे... त्याशिवाय तिथल्या जागांचे वैशिष्ट्य कळत नाही.आत शिरल्याशिरल्या एक मोकळे पटांगण आहे. पटांगणाच्या चारही बाजूला किल्ल्याच्या इमारती आणि तटबंदी आहे. या पटांगणाच्या एका बाजूला दिसते आहे ती इमारत मुख्य इमारत. तिथे किल्ल्याच्या गव्हर्नराचे कार्यालय आणि खाजगी निवास इत्यादी होते.पटांगणाचे दुसर्‍या बाजूने दृष्य. समोर दिसत असलेली इमारत पोर्तुगिज काळात कॅथलिक चर्च होती. पुढे डच आले... ते कट्टर कॅथलिकविरोधी. त्यांनी त्या इमारतीत वाचनालय आणि इतर काही कार्यालये थाटली.किल्ल्यामधे स्त्री आणि पुरूष बंद्यांसाठी वेगवेगळ्या कोठड्या होत्या. एकावेळी साधारणपणे चारशे ते पाचशे माणसं या कोठड्यातून ठेवली जात.एका अंधार्‍या, भुयारासारख्या बोळकांडीतून किल्ल्याची सफर सुरू होते. या वाटेवर मिट्ट काळोख. दिवसाउजेडी सुद्धा काही दिसणार नाही. कॅमेर्‍याच्या फ्लॅशमुळे उजेड वाटतोय. अन्यथा सगळे अंदाजाने पाऊल टाकत, बिचकत चालले होते.

बायकांसाठीची कोठडी. आणि त्याआधीच्या छायचित्रात त्या कोठडीचे प्रवेशद्वार. या कोठडीत सर्व वयाच्या बायका आणि मुली ठेवलेल्या असत. मोठ्या मुशिलीने साठ सत्तर बायका मावतील, तिथे साधारण दोन-अडिचशे बायका अगदी सहजी कोंडल्या जात!!! कायम अंधार... समुद्राच्या सान्निध्यामुळे दमट खारी हवा... कुबट वास... आजही त्या कोठडीत पाच मिनिटे उभे राहणे मुश्किल होते. कैदी इथे साधारण दीड दोन महिने राहत असत... जहाज येई पर्यंत.कोठडीतून एवढे एकच दृष्य दिसते.गाईड विचारतो, "हे काय आहे? कोणी ओळखणार का? प्रयत्न करा." सगळे विचार करत असतात. कोणालाच नीट ओळखता येत नाही. गाईड सांगतो... "मेहेरबान गोर्‍या लोकांनी आतल्या बायका मरू नयेत म्हणुन बनवलेले हे एक व्हेंटिलेटर आहे. वरची मोकळी हवा खाली कोठडीत यावी म्हणून. फक्त एकच लोचा आहे. हे व्हेंटिलेटर वर दारूगोळा ठेवायच्या खोलीत उघडते. त्यामुळे कायम तिथली दूषित हवा इथे खाली येत असे."बायकांच्या कोठडीबाहेरचे छोटे पटांगण. मोकळी जागा. रोज संध्याकाळी बायकांना इथे जमवले जात असे. हे छायाचित्र जिथून काढले आहे तिथे गव्हर्नर उभा राहत असे आणि निवड करत असे. मग त्या निवडलेल्या स्त्रीला इतर खास गुलाम बायका छान आंघोळ वगैरे घालून, सजवून गव्हर्नराच्या खोलीत पाठवत असत. औटघटकेची राणी. घटका संपली की राणीची परत दासी.निवडलेल्या स्त्रीला इतरांपासून वेगळे करून वर न्यायचा मार्ग.

आज हे ऐकायला भयंकर वाटते. पण तेव्हा या अमानुष यातनांमधून सुटायचा हा एकमेव मार्ग असायचा या स्त्रियांसाठी. अशा गोर्‍या लोकांनी उपभोगलेल्या स्त्रिया जर का गरोदर राहिल्या तर त्यांचे नशिबच पालटून जायचे. अशा गरोदर स्त्रिया वेगळ्या काढून त्यांना गावात दुसरीकडे चांगल्या व्यवस्थेत ठेवत. त्यांच्यासाठी खास सोयी असत. त्यांच्या मुलांना गोरे लोक आपले नाव देत. त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण वगैरे मिळत असे. आजही एल्मिना परिसरात डच / इंग्लिश / स्कँडिनेव्हियन आडनावे असलेली आणि रंगाने खूप उजळ असलेली खूप मोठी प्रजा सुखेनैव नांदत आहे.नाठाळपणा करणार्‍या बायकांना पायात असे जड लोखंडी गोळे बांधून दिवस दिवस उभे करत असत.

या सगळ्या प्रकारात बरेच बंदी दगावत असत. साहजिकच असा प्रश्न पडतो की ज्या लोकांना विकून पैसा कमवायचा त्यांना असे मारून नुकसानच ना? मग तरीही असे का व्हायचे?

या प्रश्नाची दोन उत्तरं आहेत. मुख्य उत्तर हे की या कैद्यांचं मनोधैर्य खच्ची करणे. त्यांच्यामधून बंडाची भावना कायमची हद्दपार करणे, मानसिक दृष्ट्या त्यांना पूर्णपणे निर्बल करणे हा एक फार मोठा महत्वाचा भाग असे. दुसरे असे की, या सगळ्यातून तावून सुलाखून निघालेले बंदी अगदी चिवट आणि उत्तम प्रतीचे असत. अशा गुलामांना जास्त भाव येत असे.

या सगळ्या प्रकाराला 'ब्रेकिंग डाऊन' म्हणत. रानटी घोड्यांना माणसाळवायच्या प्रकाराला पण 'ब्रेकिंग डाऊन'च म्हणतात !!!!!

अशा रितीने पूर्णपणे खच्ची झालेले कैदी संपूर्णपणे 'मवाळ' होऊन आता पुढे काय वाढून ठेवले आहे याची वाट बघत शांत बसून असत. एक दिवस जहाज येई. मग लगेच 'सामान' जहाजात भरायची लगबग सुरू होई. या दरवाज्यातून त्यांचा अखेरचा प्रवास सुरू होई... कधीही न परतण्यासाठी. या दरवाजातून गेल्यावर एक खोली आहे. बंदी निमूटपणे एकामागोमाग चालत राहत.दुसरा दरवाजा. मग अजून एक लहान अंधारी खोली.तिसरा दरवाजा. मग शेवटची खोली. शेवटचा दरवाजा.शेवटचा दरवाजा. डोअर ऑफ नो रिटर्न. इथून बंद्यांना लहान होड्यांमधे बसवून जहाजापर्यंत नेले जाई.

इथे येई पर्यंत बहुतेक कैद्यांना आपले भवितव्य समजलेले असे. इथेच त्यांचा आफ्रिकेच्या भूमीला शेवटचा स्पर्श. कित्येकदा आख्खी कुटुंबच्या कुटुंब पकडली गेली असत. इथे शेवटची ताटातूट, शेवटची भेट. या नंतर स्त्रिया आणि पुरूष परत वेगळे वेगळे 'स्टोअर' केले जात जहाजात. आणि मग जहाज अमेरिकेत पोचले की थेट विक्रीच. कायमची ताटातूटच. शिवाय, कित्येक लोकांना जहाज, समुद्र वगैरे माहितच नसत. असे लोक समुद्राच्या इतक्या जवळून दर्शनाने आणि होडीच्या हलण्याने बिथरून जात.अमेरिका खंडातील कृष्णवर्णिय लोकांच्या दृष्टीने आज या स्थळाला, विशेषत: या शेवटच्या खोलीला एका तिर्थस्थळाचे स्वरूप आले आहे. खास करून या शेवटच्या दालनात वातावरण अगदी गंभीर असते... कोणी फारसे बोलत नाही. सगळेच नि:शब्द असतात. प्रत्येकजण त्या वेळच्या परिस्थितीची कल्पना करायच्या प्रयत्नात असतो. भेट देणारे कृष्णवर्णिय, आपल्या न बघितलेल्या पूर्वजांच्या स्मृतीने, त्यांच्या अनाम वेदनेने व्यथित होऊन रडत असतात. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करत असतात. फार वेळ उभे राहवत नाही तिथे. खायला उठते... गर्दी असूनही. कधी तिथून बाहेर पडतो असे होते.

या चार खांबांवर धक्का होता... तिथे जहाजं नांगरून पडत. छायाचित्र शेवटच्या दारात उभे राहून काढले आहे. त्या काळी पाणी या दारापर्यंत होते. तिथे बोटीत बसवून बंदी जहाजाकडे रवाना केले जात. गेल्या पाच सहाशे वर्षात समुद्र मागे हटला आहे आणि शेवटच्या दारापासून धक्क्यापर्यंत आता वाळू आहे नुसती.

याच छायाचित्रात अगदी मागे एक जमिनीचा सुळका दिसतो आहे. त्या जमिनीच्या टोकावर केप कोस्ट नावाचा इंग्रजांनी वसवलेला स्लेव्ह कॅसल आहे. डचांची आणि इंग्रजांची जबर दुश्मनी होती इथे.

एकदा इथून बाहेर पडलं की बाकीचा किल्ला अगदी यंत्रवत फिरून होतो. कोणताही संवेदनक्षम माणूस त्या कोठड्या आणि ती शेवटची खोली बघून आल्यावर बाकीचे काही बघण्याच्या अवस्थेत असू शकत नाही. तरीही गाईडच्या मागे मागे फिरतोच हा.इथे एका गव्हर्नराला पुरले आहे. त्याचा मृत्यू इथेच झाला. त्याच्या स्मरणार्थ लिहिलेला हा लेख. त्यात त्याचे वर्णन 'दयाळू, न्यायी आणि पापभीरू' (काइंड, जस्ट अँड गॉडफिअरिंग) असे केले आहे !!!!!!!!!!!गव्हर्नराचे निवासस्थान / शयनकक्ष... रंगल्या रात्री अशा...

***

युरोपियन आले. स्थिरस्थावर झाले. त्यांनी हळूहळू व्यापार वाढवला. अगदी माणसांचा व्यापार मांडला. एक नाही दोन नाही... तब्बल चार शतके हा व्यापार अव्याहत चालू होता. हा व्यापार त्रिकोणीय होता. युरोपातून तयार सामान आफ्रिकेत येई. हा फर्स्ट पॅसेज. ते सामान स्थानिक राजे घेत आणि त्याबदल्यात पकडलेले युध्दकैदी आणि पळवून आणलेले इतर बंदी युरोपियनांना देत. हा व्यापार बार्टर पध्दतीचा होता. हे गुलाम मग अमेरिकेत नेले जात असत, या आफ्रिका ते अमेरिका प्रवासाला मिडल पॅसेज म्हणत. गुलामांची विक्री करून त्या जागी वसाहतींमधे तयार झालेला कच्चा माल म्हणजे कापूस आणि साखर इत्यादी युरोपात नेले जात असे. हा फायनल पॅसेज.

सुरूवातीला या सामानाच्या बदल्यात आफ्रिकेतून सोने घेत असत गोरे लोक. पण पुढे अमेरिकेत वसाहती उभ्या राहिल्या. आधी पोर्तुगिज / स्पॅनिश लोकांनी प्रचंड मोठे भूभाग पादाक्रांत केले, मागोमाग इंग्रज आणि फ्रेंच आले. या नवीन वसाहतींमधे कापसाचे, उसाचे मोठमोठे मळे उभे राहिले. त्यासाठी मनुष्यबळ लागायला लागले. सुरूवातीला अमेरिकेतील स्थानिक लोकांना गुलाम बनवून काम करून घेणे सुरू झाले, पण हे स्थानिक लोक अतिश्रमामुळे आणि नवीन आलेल्या रोगराईमुळे लवकरच जवळपास नष्ट झाले. तेव्हा हा आफ्रिकेतून गुलाम आणायचा व्यापार फोफावला. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत हा व्यापार अधिकृतरित्या चालू होता. आधी पोर्तुगिज मग डच आणि नंतर इंग्रजांनी या व्यापारावर वर्चस्व गाजवले. गुलामांचा व्यापार बंद व्हायची दोन मुख्य कारणे सांगितली जातात.

एक, मध्ययुगात युरोपात झालेल्या ज्ञानक्रांती (रेनेसां) मुळे एकोणिसावे शतक उजाडता उजाडता अनेक समाजशास्त्रज्ञांनी / सुधारकांनी, या अमानुष व्यापाराला विरोध सुरू केला. ब्रिटनमधे अ‍ॅबॉलिशनची मोठी चळवळ उभी राहिली. दुसरे असे की, याच सुमारास युरोपात झालेल्या औद्योगिक आणि यंत्र क्रांतीमुळे शेती यंत्रांच्या सहाय्याने होऊ लागली. मोठमोठे मळे पिकवण्यासाठी माणसांची तितकीशी गरज नाही राहिली. त्यामुळे गुलामांची मागणी हळूहळू कमी होत गेली. या दोन महत्वाच्या कारणांमुळे हा व्यापार हळूहळू बंद झाला. अर्थात हे सगळे पूर्णपणे बंद होण्यास एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध उजाडावा लागला.

ढोबळमानाने, असा अंदाज केला जातो की एकूण ६ कोटी आफ्रिकन या व्यापाराकरिता पकडले गेले. त्यातले अंदाजे २ करोड लोक जहाजात चाढायच्या आधीच छळामुळे मृत्यू पावले. अंदाजे २ करोड लोक जहाजांवर, मिडल पॅसेज (अवधी साधारण अडिच महिने) मधे, मरण पावले. त्यांचे मृतदेह समुद्रात फेकून देण्यात येत. आणि फक्त २ करोड लोक अमेरिकेत पोचले. या २ करोडमधील एक फार मोठा हिस्सा, एल्मिना आणि केप कोस्ट मधून पाठवला गेला आहे. त्या दृष्टीने या दोन स्थळांचे महत्व जास्त आहे.

अजून एक समजूत अशी की हा व्यापार प्रामुख्याने गोर्‍या लोकांनी केला. पण वस्तुस्थिती अशी आहे की यात गोर्‍यांबरोबर स्थानिक काळे लोकही बरोबरीने सहभागी होते. स्थानिक टोळ्यांचे म्होरके / राजे (यांना आज 'चीफ' असे संबोधले जाते.) आपापसात सतत लढत आणि युध्दकैदी गुलाम म्हणून आणत. पुढे हे युध्दकैदी गोर्‍यांना विकले जाऊ लागले. किंबहुना गोर्‍यांना विकायला कैदी हवेत म्हणूनच युद्धं व्हायला लागली. त्यात, युरोपियन लोकांनी आफ्रिकेत बंदूक हे एक नवीन शस्त्र आणले. ते स्थानिक चीफ्सना विकले. आज असे म्हणतात की बंदूक हा एक खूप मोठा घटक ठरला या व्यापारात.

खरं तर आफ्रिकेत गुलामगिरीची प्रथा पूर्वापार होती. पण हे गुलाम काही झाले तरी आफ्रिकेत, बहुतेक वेळा आपल्याच गावात किंवा आजूबाजूच्या गावात राहत. त्यांना काही प्राथमिक असे अधिकारही असत. हुशारीच्या जोरावर ते आयुष्यात पुढे येऊ शकत. पण अ‍ॅटलांटिक गुलाम व्यापारामुळे हे गुलाम आपल्या भूमीपासून, संस्कृतींपासून, कुटुंबांपासून समूळ 'तुटले'. आणि हेच तुटलेपण हा या व्यापारातील अमानुषपणाचा कळस आहे. थोडक्यात म्हणजे, त्यांचे माणूसपण पूर्णपणे नाकारले गेले आणि त्यांना पशूंच्या पातळीवर आणले गेले.

या व्यापाराचे अनेकविध आणि अतिशय दूरगामी परिणाम आफ्रिकेवरच नव्हे तर आख्ख्या जगावरच झाले.

पहिला परिणाम म्हणजे, आफ्रिकेतून जे लोक गुलाम म्हणून पाठवले गेले ते सगळेच्या सगळे तरूण अथवा वाढत्या वयातली मुलं असे होते. इतक्या मोठ्या प्रमाणावर असे लोक बाहेर पाठवले गेले त्यामुळे स्थानिक शेती अथवा उद्योगधंद्यांवर अतोनात वाईट परिणाम झाले. या लोकांत बरेचसे कुशल कारागिर होते, कलाकार होते. हे सगळे थांबलेच.

दुसरे म्हणजे, आफ्रिकेचा हा भाग सोन्यासाठी प्रसिध्द होता. युरोपियनांनी या भागावर कब्जा केला आणि सोने अक्षरशः लुटले. 'बार्टर सिस्टिम' प्रमाणे इतर माल देऊन टनावारी सोने लंपास केले. त्यायोगे तत्कालिन युरोपियन राजसत्ता गब्बर झाल्या. त्यांची अर्थव्यवस्था वाढली. त्या जोरावर जागतिक वसाहतवाद अजून जोमाने फोफावला. आफ्रिकेतले सोने नसते मिळाले तर या राजसत्तांना एवढे वर येणे तितकेसे सोपे गेले नसते. आजही बरेच वेळा आफ्रिकन राजकारणी लोक या दोन्ही नुकसानांची भरपाई प्रगत आणि समृध्द राष्ट्रांनी करावी अशी मागणी करताना दिसतात.

तिसरा परिणाम असा की साधारण गेल्या पाचेकशे वर्षांपासून आफ्रिकेबाहेरच्या जगाला आफ्रिका म्हणजे रानटी, असुसंस्कृत, राक्षसी लोकांचा प्रदेश अशीच ओळख आहे. याला कारणीभूत म्हणजे तत्कालिन प्रगत जगात काळे लोक फक्त गुलामांच्या स्वरूपातच आले होते. त्यामुळे तीच ओळख होती. गोर्‍या लोकांनी जसजसे जग पादाक्रांत केले त्यांनी त्यांची संस्कृती / विचार / शिक्षणपध्दती सगळीकडे पोचवली. त्यामुळे आपल्यासारख्या आशियाई देशांना प्रामुख्याने आफ्रिका तशीच वाटायला लागली. पण वस्तुस्थिती मात्र तशी नव्हती. युरोपियन लोकांच्या आगमना पूर्वी आफ्रिकेतही मोठमोठी साम्राज्ये होती. त्यांचे अनुशासन, शासनपध्दती इत्यादी अगदी प्रगत होती. स्थानिक कारागिर होते आणि त्यांच्या कला होत्या. आफ्रिकन्स म्हणजे फक्त रानटी टोळ्या वगैरे समजुती निखालस खोट्या आहेत.

विसाव्या शतकाच्या मध्यावर जेव्हा आफ्रिका हळूहळू पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त होऊ लागली तसतशी या अमानवी व्यापाराबद्दल नुकसानभरपाईची मागणी व्हायला लागली. या व्यापारावर संशोधन होऊ लागले. साहजिकच या व्यापारात गोर्‍यांच्या बरोबरीने स्थानिक काळ्या लोकांच्या टोळ्यांनी बजावलेली भूमिका उठून दिसायला लागली. या सगळ्याचे प्रायश्चित्त म्हणून आणि जबाबदारीची स्विकृती म्हणून स्थानिक लोकांनी ही पाटी तिथे बसवली आहे.***

मनोगत

मेन्साह, अगोसी, अनानी, आकोसिवा यांचं पुढे काय झालं?

सोप्पंय हो, इतर करोडो मेन्साह, अगोसी, अनानी आणि आकोसिवा यांचं पुढे जे झालं तेच... एक तर मिडल पॅसेजचा प्रवास सहन न झाल्याने माशांचं खाद्य बनणे किंवा मृत्यूची कृपा होऊन जीवनाच्या शापातून सुटका होई पर्यंत तो शाप भोगत राहणे. तिसरा काही पर्याय नव्हताच. नियतीची पकड चिरेबंदी होती.

या सर्व प्रकारात गुलामांचे माणसातून पशूत रूपांतर केले गेले असे म्हणले जाते, पण मला तर वाटते की माणसातून पशूत रूपांतर खरे तर हा व्यापार करणार्‍यांचेच झाले होते. अन्यथा खाली जिथे शे-दीडशे माणसे अशी जेरबंद करून ठेवली होती तिथे बरोब्बर त्याच्याचवरच्या खोलीत चर्च बनवून प्रभूची आळवणी करण्याची हिंमत माणुसकी जरातरी शिल्लक असणार्‍यांची होऊच शकत नाही.

हा सर्व परिसर फिरताना मी सतत अस्वस्थ होतो. लहानपणापासून या विषयावर वाचलेली सगळी माहिती सतत आठवत होती. गाईड कडून नविन तपशिल कळत होते. अस्वस्थतेत भर पडत होती. 'शेवटच्या खोलीत' मात्र क्षणभर डोळे मिटून उभा राहिलो, त्या असंख्य अनाम आत्म्यांना श्रध्दांजली वाहिली. राक्षसी अत्याचारांच्या, जिवंत माणसांना पशूंना डागतात तसे डागण्याच्या कथा ऐकल्या. राक्षस ही व्यक्ति नाही, प्रवृत्ति आहे हे परत परत जाणवत राहिले. तसे नसते तर हा व्यापार शेकडो वर्षे चाललाच नसता. एखाद्या व्यक्तिच्या नृशंसपणामुळे चाललेला प्रकार त्या व्यक्तिनंतर बंद पडेल, पण इथे तसे नाही. देवीच्या पुराणांमधून एक गोष्ट आहे... एक राक्षस असतो, लढाईत त्याच्या रक्ताचे जितके थेंब जमिनीला लागतील तितक्या थेंबांपासून त्याची एक एक प्रतिकृती तयार होते. तसेच, वर्षानुवर्षे... एक गोरा गेला की दुसरा आला असे चक्र चालू राहिले.

साधारणपणे नविन ठिकाण बघितल्यावर जालावर फोटो टाकणे, प्रवासवर्णन वगैरे लिहिणे असे प्रकार आपण करतो. तसं (म्हणजे तेवढंच) खरं तर इथेही करता आलं असतं. पण मला नुसते फोटोच टाकायचे नव्हते तर हा सगळा 'अनुभव'च तुमच्यापर्यंत पोचवायचा होता. आणि तुम्हाला वाचताना आलेली अस्वस्थता बरोबर घेऊन फोटो बघितल्याशिवाय तो अनुभव येणार नाही असे वाटल्याने आधीचे दोन भाग टाकले आहेत. त्यात वापरलेली नावं, व्यक्तिरेखा आणि त्यांचे अनुभव काल्पनिक तर नाहीत, पण प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत. म्हणूनच सुरूवातीलाच लिहिले आहे की ही कथा नाही.

जाता जाता एवढंच...

सर्वे जना: सुखिनो भवन्तु ... तथास्तु |
सर्वे जना: सुखिनो भवन्तु ... तथास्तु |
सर्वे जना: सुखिनो भवन्तु ... तथास्तु |

ॐ शांति: शांति: शांति: |

4 comments:

श्रद्धा म्हणाले...

नुसत्या कल्पनेनेही काळजाला घरं पडावी असाच हा इतिहास आहे. कधी कधी वाटतं देवाला किती दु:ख होत असेल "माणसा"ला जन्माला घातल्याचे!

तरी इतक्या वेगळ्या पद्धतीने ही माहिती दिल्याबद्दल आभार. कदाचित त्याशिवाय माझ्यासारख्या बऱ्याच वाचकांना त्यामागचे 'खरे' शल्य लक्षात आले नसते. मनाची 'हळहळ' आणि 'तगमग' यातला फरक असतो तो हाच.

Asha Joglekar म्हणाले...

हे आपले सो कॉल्ड प्रगत देश लाखो लोकांची हाय खाऊन मिळवलेली संपत्ती ही शापित संपत्ती . अमेरिका प्रयत्न करतेय पश्चात्ताप करायचा पण शेवटी तो प्रयत्नच . अजूनही गोरी कातडी श्रेष्ठ अशा विचारसरणी चे लोक आहेतच . तुमची ही कथा हे फोटो हे सर्व काळजाला घरं पाडणारं आहे .

Mahendra म्हणाले...

शब्दंच नाहीत काही लिहायला. धन्यवाद..

padmavati म्हणाले...

निशब्द, सुन्न करणारा लेख...