ब्बोला प्पुंडलिक व्वरदाऽऽऽऽ

on गुरुवार, जुलै २२, २०१०

माझ्या लहानपणच्या ज्या आठवणी अजून लक्षात आहेत त्यातली अगदीच लख्ख आठवणारी आठवण म्हणजे, संध्याकाळी आजीबरोबर विठोबाच्या देवळात जाणे. आमच्या गोरेगावात घरापासून अगदीच जवळ अशी तीन चार देवळं होती. एक अगदीच जवळ असणारं दुर्गादेवीचं. दुसरं म्हणजे गोगटेवाडीतलं गणपतीचं, पण ते जरा लांब. आणि तिसरं हे गवाणकर वाडीतलं विठोबाचं. आजी हिंडती फिरती असे पर्यंत वारानुसार, तिथीनुसार रोज संध्याकाळी देवळात जायची. विठोबाच्या देवळात जायचं म्हणजे आरे रोड ओलांडावा लागायचा. त्यावेळी तिला सोबत लागायची. मग आमची वरात निघायची तिच्यामागे. खरं तर मलाही तिच्याबरोबर विठोबाच्या देवळात जायला आवडायचं. बाकीच्या देवळांमधून अंगारा किंवा कुंकू लावायचे तिथले पुजारी. पण एकादशीला विठोबाच्या देवळात गेलं की तिथले बुवा काळा काळा बुक्का लावायचे कपाळाला. आणि अगदी तालासुरात तिथे किर्तन चालू असायचं. ते मोहमयी वातावरण अनुभवत तासचेतास तिथे काढलेले आठवत आहे.

आमच्या घरी वातावरण धार्मिक असलं तरी कर्मकांडांचं स्तोम किंवा कसलीच बळजबरी नव्हती. पण साबुदाण्याची खिचडी, किंबहुना उपासाचे सगळेच पदार्थ आवडत असल्याने एकादश्या आणि चतुर्थ्या कधी येतात त्या आम्हाला बरोब्बर माहिती असायचं. एखादे वेळेस आजी विसरली तर आम्ही आठवण करून द्यायचो. पण खरी वाट बघायची ती आषाढी एकादशीची. त्या दिवशी घरात अगदी कंपल्सरी उपास असायचा. अगदी स्वर्गिय चंगळ असायची.

अशीच एक एकादशी येऊ घातली होती. मी साधारण साताठ वर्षांचा असेन. आजीच्या बोलण्यात पालखी शब्द दोन तीन वेळेला आला. मला पालखी म्हणजे साधारणसे माहित होते. पूर्वीच्या काळी राजेमहाराजे पालखीत बसत आणि त्यांचे नोकर त्या पालख्या खांद्यावर उचलून त्यांना इकडे तिकडे फिरवत. पण आजीच्या बोलण्यात काही वेगळेच संदर्भ येत होते. वारी, पालखी, पंढरपूर वगैरे. काही तरी धार्मिक संदर्भात बोलणे चालले होते हे नक्की. शेवटी आजीला विचारले तेव्हा मला ही एकंदर चालत वगैरे पंढरपूरला जायची पद्धत कळली होती. आळंदीहून ज्ञानोबाची आणि देहूतून तुकोबाची पालखी निघते आणि मजल दरमजल करत आषाढीच्या बेतास पंढरीत पोचतात. गावोगावाहून अशाच दिंड्या निघतात. लोक दिवसचे दिवस चालत पंढरीला जातात. असं सगळं तिने मला अगदी रंगवून सांगितलं. मला तर हे सगळं अगदी अद्भुतच वाटायला लागलं होतं. पण खरी गंमत अजून पुढेच होती. ती अशी...

आमच्या घराण्याचा आणि या पंढरीच्या वारीचा अगदी गाढ आणि प्राचीन संबंध आहे. आम्ही 'कार्यकर्ते' सगळे सोलापूर जवळच्या कुर्डूवाडीचे. खरं तर कुर्डूचेच म्हणले पाहिजे. कुर्डूवाडी हे स्टेशन आहे. आणि तिथून साधारण ३-४ मैलांवर कुर्डू गाव आहे. गावात कार्यकर्त्यांची बरीच घरं आहेत. काही नांदती तर काही ओसाड. आमचे घर त्या ओसाड क्याटेगरीत. आमच्या पणजोबांपासून गाव सुटले ते परत कोणीच गेले नाही त्या वाड्यात. पण दर चार वर्षांनी तो वाडा अगदी जुजबी डागडुजी होऊन का होईना पण उभा राहतो. आमच्या घरातली मंडळी, अगदी चुलत, आत्ते, मामे सगळं गणगोत... तिथं जमतात. चार दिवस वाडा गजबजतो आणि परत शांत होऊन पडून राहतो.

प्रसंग असतो, संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांच्या पालखीच्या आगमनाचा.

आमच्या कार्यकर्त्यांच्या भावकीत आता बर्‍याच शाखा उपशाखा झाल्या आहेत. पण चार मुख्या शाखा आहेत. आणि पालखीच्या स्वागताची आणि मुक्कामातील सर्व व्यवस्थेची जबाबदारी दर चार वर्षांनी आमच्या घरात असते. आमचे घर म्हणजे, आमच्या (बहुधा) खापर पणजोबांचे वंशज. पालखीचं वर्ष म्हणजे सगळ्या नातेवाई़कांनी एकत्र येण्याचं वर्ष. कधी मधी भेटणार्‍या आज्या, आजोबा, काका, मामा, भावंडं यांच्याबरोबर दोन दिवस घालवायचं वर्ष.

हे सगळं मला कळलं तेव्हा बहुधा माझ्या जन्मानंतरची दुसरी पालखी असावी आमच्या घरातली. तेव्हा काही जाणं झालं नाही. पण नंतर १२ वर्षांचा असताना मात्र अगदी झाडून सगळे गोळा झाले होते. तेहा हा पालखी सोहळा पहिल्यांदा बघितला. त्यानंतरही जमेल तसे जमेल तितके लोक पालखीला जातात. माझे काही काका आमचं पालखीचं वर्ष नसलं तरी मदतीला वगैरे म्हणून जातात. मला नाही जमत. पण २००८ साली पालखी आमच्या कडे होती तेव्हा ठरवलंच होतं की या खेपेस पोरींना घेऊन जायचंच जायचं. ज्या वयात मला या सगळ्याचं अप्रूप वाटत होतं त्या वयात आता माझ्या पोरी आहेत. ती सगळी गंमत त्यांना दाखवायचीच. चुलत भाऊ तर पार अमेरिकेतून येणार होता. सगळेच जण असेच कुठून कुठून येणार होते.

पालखी आमच्या कुर्डूला पंचमी किंवा षष्ठीला येते. पण आमची तयारी मात्र बरेच दिवस आधीच सुरू होते. आता आमचं घर असं तिथे नसल्यामुळे सगळंच सामान जमवण्यापासून सुरूवात असते. आमचे काही ज्येष्ठ काका / काकू वगैरे खरंच उत्साही आहेत. दहा बारा दिवस आधी जाऊन वाड्याची साफसफाई करून घेणे, धान्य भरून ठेवणे, येणार्‍या लोकांच्या रहण्याची व्यवस्था करणे वगैरे कामे अगदी नीट प्लॅनिंग करून पार पडतात. हळूहळू लोक जमायला लागतात आणि वाडा तात्पुरता का होईना परत नांदता होतो.मोठमोठ्या चुलींवर तेवढीच मोठी पातेली दिसायला लागतात. गप्पांचे फड रंगतात. चहाच्या फेर्‍यांवर फेर्‍या होतात. एखादी आजी आमच्या सोलापूरची खास शेंगादाण्याची (नॉन-सोलापुरी लोक शेंगदाण्याची चटणी म्हणतात, पण सोलापूरात मात्र शेंगादाण्याचीच चटणी म्हणतात. :) ) चटणी बनवते आणि जास्तीत जास्त दोन दिवसात तिचा फडशा पडतो.

... आणि बघता बघता पालखीच्या आगमनाचा दिवस येऊन ठेपतो.

पालखी किंवा एकंदरीतच वारी हा प्रकार अगदी जबरदस्त शिस्तशीर आणि अगदी अचूक व्यवस्थापन असलेला असतो. पालखी यायच्या आदल्या दिवशी पालखीच्या व्यवस्थापकांकडून आगाऊ निरोप येतो. त्याही बरेच आधी पालखी नक्की पंचमीला येणार की षष्ठीला येणार ते पण कळवलेले असते. तर आदल्या दिवशी पालखी साधारण किती वाजेपर्यंत येईल, किती माणसं आहेत वगैरे तपशील कळवले जातात. त्याप्रमाणे सगळी तयारी घेतली जाते. आमच्या तिकडे जोडगहू म्हणून गव्हाचा एक प्रकार आहे. पालखीला त्या जोडगव्हाच्या खिरीचा नैवेद्य असतो. ते ठरलेलेच आहे.पण इतक्या लोकांसाठी खीर करायची, ती पण गुळाची हे एक अवघड कामच असते. वाड्याच्या परसात एक भलं मोठं चुलाण तयार करून त्यावर एक अजस्त्र कढई चढवली जाते. खीर पूर्ण पणे तयार व्हायला साधारण पाच सहा तास तरी लागतात. तो पर्यंत ते सगळं मिश्रण सतत ढवळत रहावं लागतं. खूप ताकद लागते. शिवाय हा सगळा स्वयंपाक सोवळ्यात असतो. तीन चार काका लोक यात तज्ञ आहेत त्यांची ड्युटी तीच. शिवाय भावकीतले अजून काही जाणते लोक मदत करू लागतात. एवढ्या सगळ्या लोकांच्या मेहनतीवर ती खीर एकदाची तयार होते.

मग वाट बघणे सुरू होते. सुवासिनी नटतात. बाप्ये लोक ठेवणीतले कपडे घालून उगाच इकडे तिकडे करत असतात. पोरांना हे गाव, वाडा वगैरे सगळं अगदी परिकथेतल्या अद्भुत जगासारखंच वाटत असतं त्यामुळे त्यांचे काही काही उद्योग चाललेले असतात. आजोबा वगैरे दारासमोरच्या मंडपात बसून गपांचे गुर्‍हाळ घालतात. आज्या घरातल्या सुनांचे विश्लेषण करत बसतात. पण हे सगळे वरवरचे. अगदी आतून कधी एकदा पालखी येते आहे याचीच घालमेल चालू असते सगळ्यांच्या मनात.

साधारण सहा सात वाजता सांगावा येतो, पालखी यायलीय हो... एकच गोंधळ होतो. सगळे जण गावाच्या वेशीकडे जायला निघतात. पालखीच्या स्वागताचा मान कार्यकर्त्यांचा. आमच्या घरातले सर्वात मोठे आजोबा नाहीतर काका पालखीला सामोरे जातात. घरातल्या सवाष्ण्या पालखीला पंचारती करतात. पालखीचा थाट तर काय विचारावा. चांदीचा पत्रा लावलेली, त्यात मधोमध नाथांच्या पादुका विराजमान, अशी ती पालखी अगदी भालदार चोपदार आणि छत्रचामरांच्या समवेत दिमाखात येत असते. तुतार्‍या शिंगं फुंकली जातात. एकच कल्लोळ.

पण मला आजही आठवते आहे, अगदी लख्ख आठवते आहे, मी पहिल्यांदा हा सोहळा बघितला तेव्हा मला अगदी खोलवर स्पर्शून गेलं होतं ते हे वैभव थाटमाट नव्हे, तर पालखीच्या संगतीनं चालणारे साधे सुधे वारकरी. टाळांच्या गजरात, मुखाने भजन किर्तन हरिनाम गात अगदी तल्लीन झालेले वारकरी. डोक्यावर तुळशी घेतलेल्या बाया, गळ्यात जाड जाड टाळ मिरवणारे बाप्ये, अंगावर अगदी साधे मळके, क्वचित फाटके कपडे असलेले वारकरी. त्या दिवशी भरपूर पाऊस पडून गेला होता. गावातले मातीचे रस्ते. घोटा आत जाईल एवढा चिखल. पाय रूतत होते. पण त्या सगळ्या पासून खूप दूर, नाथांच्या मानसिक सान्निध्यात देहभान हरपलेले वारकरी. आयुष्यात बरंच काही विसरलो / विसरेन, पण तो क्षण, जेव्हा मला या वारकर्‍यांचं पहिल्यांदा एवढं जवळून दर्शन झालं तो क्षण, मात्र मी मरेपर्यंत विसरणंच शक्य नाही. मला जेव्हा भान आलं तेव्हा मी त्या तालावर पावली घालत असल्याचं माझ्या लक्षात आलं. आजही ते आठवलं की अंगावर रोमांच येतात.

इकडे पालखीला खांदा द्यायला एकच धावपळ होते. प्रत्येकालाच ते भाग्य हवं असतं. पालखीच्या मार्गावर पायघड्या घालत असतात. ती लांबच्या लांब कापडं इतकी शिताफीने बदलली जातात की बघत रहावं. पालखी कुठंही अडत नाही. पालखी हळू हळू मार्ग काढत नागनाथाच्या, कुर्डूच्या ग्रामदैवताच्या देवळात मुक्कामी पोचते. पालखी बरोबर पैठणच्या संस्थानाचे लोक आणि नाथांचे वंशज वगैरे मानकरी असतात. त्यांची व्यवस्था अगदी उत्तम केलेली असते. पालखीच्या बरोबरच्या सगळ्याच वारकर्‍यांची कुठे ना कुठे सोय ठरलेली असते. मुक्कामाला आल्यावर पालखी खाली उतरवली जाते आणि नाथांच्या पादुका बाहेर काढून त्या एका चौरंगावर ठेवल्या जातात.आता सुरू होतो तो पूजेचा सोहळा. आमच्याच घरातल्या एखादं जोडपं, सहसा मधल्या चार वर्षात लग्न झालेलं जोडपं यजमान म्हणून बसतं पूजेला. अगदी षोडषोपचार पूजा होते. चांगली एक दोन तास चालते. सगळ्यांना मनसोक्त दर्शन घडतं.नाथांची थोरवी आठवत, त्यांच्या आयुष्यातल्या घटना आठवत, तसं वागायचा प्रयत्न करायचा संकल्प करत नाथांच्या चरणी डोकं ठेवलं जातं. पादुका तर केवळ संकेतस्वरूप. जो पर्यंत संतांच्या जीवनातून आपण शिकत नाही तो पर्यंत तो नमस्कार नुसताच त्या पादुका नामक धातूच्या अथवा लाकडी वस्तूला असतो. त्या वस्तूची तेवढीच किंमत.

आता मात्र खूप उशिर झालेला असतो, आणि लोकांना परत सकाळी लवकर उठून पुढच्या मुक्कामाकडे जायचं असतं. घरातली ज्येष्ठ मंडळी, काका काकू वगैरे, नाथांचे उत्तराधिकारी जिथे मुक्कामाला असतात तिथे त्यांना जातीने जेवायला बोलावणं करायला जातात. तिथे परत थोड्या गप्पा होतात. विचारपूस होते. वर्षभराने भेटी होत असतात. जुने जाणते ख्याली खुशाली विचारतात एकमेकांची. उत्तराधिकार्‍यांच्या पत्नीच्या हातून कुंकू लावून घ्यायला सवाष्ण्या झुंबड करतात. लेकरांना त्यांच्या पायावर घातलं जातं. इतकं दमून आल्यावरही उत्तराधिकारी आणि त्यांच्या पत्नी शांतपणे आणि हसतमुखाने हे सगळं कौतुक करत असतात, करून घेत असतात. एकदाची मंडळी हलतात आणि आमच्या दारासमोरच्या मांडवात खाशी पंगत बसते. प्रत्येक वारकर्‍याचे जेवणाचे घर ठरलेले असते. मुख्य मंडळी आणि मानकरी आमच्याकडे असतात. गावातली प्रतिष्ठित आणि इतर पदाधिकारी मंडळी पण या मानाच्या पंगतीत सामिल असतात. आग्रह कर करून खीर वाढली जाते. खास पोळीचा बेत असतो. अजूनही तिकडे गव्हाची पोळी म्हणजे सण, एरवी भाकरी. जेवणं उरकतात. उशिर बराच झालेला असतो. सगळी आवरासावर करूण मग घरचे लोक जेवायला बसतात. पालखीचा मुख्य ताण गेलेला असतो. पण अजून सकाळचा निरोप समारंभ बाकीच असतो. म्हणून निजानिज लवकर होते.

भल्या पहाटे सूर्योदयाच्या सुमारास पालखी परत सज्ज झालेली असते. गावकरी परत एकदा पालखी भोवती जमतात. सवाष्णी नाथांना ओवाळतात. पालखीच्या मानकर्‍यांच्या बरोबर असलेल्या सवाष्ण्यांची खणानारळाने ओटी भरली जाते. इशारा होतो आणि पालखी झटदिशी परत एकदा भोयांच्या खांद्यावर अदबशीर तोलली जाते आणि पुढच्या गावची वाट धरते. गावकरी चार पावलं पुढे जाऊन सोबत करतात आणि मग मागे फिरतात. वारकर्‍यांच्या पावलाखालची माती कपाळाला लावत, पालखी गेली त्या दिशेने नमस्कार करत सगळे परत घराकडे परततात.

दर चार वर्षांनी उपभोगायला मिळणारा सोहळा संपलेला असतो. कोणतंही गडबडीचं मंगलकार्य उरकल्यावर येतो तसा एक निवांतपणा, तो कंटाळवाणा नसतो, पण अगदी शांत निवांत वाटत असतं असा, सगळीकडे पसरलेला असतो. आवराआवरी सुरू होते. कधी तरी चार वर्षांनी गाव बघितलेले आम्ही आणि आमची पोरं गावाजवळ आमचं शेत आहे तिथे जायला उत्सुक असतो. पालखीच्या नंतरचा दिवस शेतात घालवायचा हे ही ठरलेलं असतं. सगळं काही साग्रसंगीत होतं.आणि संध्याकाळ होते. बहुतेक लोक त्याच दिवशी निघतात. नोकर्‍या, पोरांच्या शाळा असतात. जड पावलाने सगळे निघतात. पाया पडणं वगैरे सुरू होतं. म्हातारे कोतारे पोरांना लाडाने जवळ घेतात आणि पोरं तिथून सुटायला धडपडतात. मी पण सगळ्या आजी आजोबा काका काकू समोर वाकतो. मागच्याच पालखीच्या वेळी, माझ्या आजोबांच्या पिढीतले शेवटचे आजोबा, बाबांचे काका अगदी व्यवस्थित तब्येत असूनही निघताना नमस्काराच्य वेळी बाबांना अगदी अचानक म्हणाले होते, "ही माझी शेवटची पालखी." आणि थोड्याच दिवसात ते गेले. ते सगळे काळजात अगदी रूतलेले असते. न रेंगाळता तिथून काढता पाय घेतो, गाड्या निघतात.

रस्त्यात सगळीकडे वारकरीच दिसत असतात. लहान रस्त्यावर गाडीसमोर अचानक एक अशीच छोटीशी दिंडी येते... त्यांना वाट करून द्यायला म्हणून गाडी बाजूला लावतो. दिंडीतले वारकरी माझ्याकडे बघून म्हणतात,

"ब्बोला प्पुंडलिक व्वरदाऽऽऽऽऽ...."

मी पुढचं बोलायच्या आतच माझी मुलगी नवीनच शिकलेलं ... "हाऽऽऽरी विठ्ठल" म्हणते. मी चमकतो. पण त्याच क्षणी, कार्यकर्त्यांच्या घरात पालखीची सेवा करायला पुढची पिढी तयार होते आहे या समाधानात गाडी परत गियर मधे टाकतो आणि पुढच्या पालखीपर्यंत परत ऐहिक जगात परत येतो.

***

मनोगत: परवा मीमराठीवर प्रसन्नने (पुणेरी) वारी वगैरे वर लिहिलेले वाचले आणि बर्‍याच दिवसांपासून आमच्या गावच्या पालखीवर लिहायचे मनात होते ते परत वर आले. राजे म्हणाला की नुसता प्रतिसाद देण्यापेक्षा एखादा वेगळा लेखच टाका म्हणून खास त्याच्या विनंतीला मान देऊन हे लिहायचा प्रयत्न केला आहे.

1 comments:

sskaryakarte@yahoo.com म्हणाले...

Ha s s s s ri Vittha s s s llll

Gelya baryach Varshat palakhi cha Yog julun alla navhata,

Yanda tharavun hi jamale navhate pan Ain Diwalit nathanche darshan anubhavale

Dhanyawad

Tumha sarvana dipawali chya
man:purvak shubhechaaa