(बोध)कथा

on शुक्रवार, सप्टेंबर २८, २०१२

मला ना हा बोधकथा प्रकार खूप म्हणजे भयानकच आवडतो. घेतला तर बोध, नाही तर नुसती कथा म्हणूनही वाईट नाहीच. हो की नाही? तसंही बघितलेत का तुम्ही बोधबिध घेणारे लोक कधी? पण ते जाऊ दे. आपण लक्ष नाही द्यायचं. गणपती ही बुद्धीची देवता आहे की नै? मग आपण बाता तरी करू बोध वगैरे घ्यायच्या. तर म्हणून या काही (बोध)कथा. आणि या गणपती उत्सव पेश्शल असल्यामुळे प्रत्येकाने रूचेल पचेल तो बोध घ्यावा ही विनंती मात्र नक्कीच आहे.

पण ते ही एक असोच... (हे 'असोच' सुद्धा आम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या बोधांमुळेच बरं का!)

भानगड

तर एकदा काय झालं, विक्रम आजही असा नेहमीसारखा स्मशानातल्या झाडाखाली गेला. किर्र अंधार होताच. वेताळही वाटच बघत होता. (इतक्या वर्षांनानंतर, विक्रम आणि वेताळ एकमेकांना खूप युज्ड टू झालेत, यु नो!) मात्र आता विक्रम वेताळाला खांद्यावर वगैरे घेत नाही. दॅट्स सो ओल्डफॅशन्ड! ते दोघेही आता रात्रीच्या अंधारात मस्तपैकी शतपावली करतात. सुखदु:खाच्या चार गोष्टी बोलतात. रिस्पेक्टिवली, राणी आणि हडळीमुळे होणारा त्रास शेअर करतात एकमेकांशी. आणि स्वस्थपणे घरी जातात. किती वर्षं ते प्रश्न विचारायचे, डोक्याची शंभर शकलं करायची धमकी द्यायची? सो बोरिंग, यु नो!

पण, आज मात्र विक्रम खूपच अस्वस्थ होता. वेताळाच्याही ते लक्षात आलेच होते म्हणा. पण विक्रमाची ती ठसठस त्याने आपणहून व्यक्त करावी याची वाट बघत तो निवांतपणे गवताची काडी चघळत, इकडच्या तिकड्याच्या गप्पा मारत चालत राहिला. शेवटी विक्रम मुद्द्यावर आलाच. वेताळाच्या खांद्यावर हात टाकत तो म्हणला,

"यार वेताळ, काय साली ही दुनिया आहे राव! एक नंबर हरामखोर %&^#$^* !!!"

वेताळ जरा चपापला. मामला संगीन है! विक्रम एकदम अपशब्दांवर उतरला म्हणजे नक्कीच हे यडं काहीतरी उग्गाच मनाला लावून बसलंय.

"अबे! शिव्या काहून द्यायलास बे? काय झालं ते नीट वट्ट सांग भौ."

"यार आत्ता इथे येत असताना एक नवरा बायको आणि एक गाढव रस्त्याच्या कडेला बसलेले दिसले बघ मला."

"आत्ता? इतक्या रात्री? साला हे स्मशान इथून जवळ आहे हे माहित नाही त्यांना? कमाले!"

'त्या नवराबायकोची थोडी गंमत करावी का?' या विचारात वेताळ पडला. विक्रमाला ते कळले.

"अरे छोड ना यार! आधीच बिचारे दु:खी वाटले. डोक्याला हात लावून बसले होते बघ. मी विचारायला गेलो तर बोलेचनात."

"च्याबायलीच्या, आस्सं? काय झालं काय असं?"

"अरे तेच विचारत होतो. खूप छेडलं तेव्हा कळली भानगड."

"काय ती?"

"तो त्या नदीपल्याडच्या गावातला कुंभार होता. सकाळी बायकोला घेऊन बाजाराला गेला होता. तिथे त्याने एक गाढव विकत घेतलं. आणि बाजार उरकून यायला लागले दोघे परत. गाढव होतंच बरोबर. उन्हाचा कडाका होता, तलखी लागत होती, दहा पावलं चालणं कठीण होत होतं म्हणून याने बायकोला गाढवावर बसवलं. तेवढेच श्रम कमी तिला."

"मग?"

"मग काय? तेवढ्यात समोरून काही पोरं आली. गावातली उनाड पोरं रे, काही काम ना धाम, उगाच लोकांची चेष्टा करत फिरणं हाच उद्योग. त्यांनी त्या बाईला म्हणलं की, 'बये, नवरा म्हणजे साक्षात परमेश्वर! त्याला पायी चालवतेस आणि स्वतः गाढवावर बसतेस? कुठे फेडशील हे पाप?'"

"अरारारा! काय बेनं रे हे? मग काय बाई उतरली का गाढवावरनं?"

"आता कोणती बाई हे असं झाल्यावर गाढवावर बसेल? उतरलीच ती. आणि आणाभाका घालून तिने नवर्‍याला गाढवावर बसवलं. पुढे चालू लागले तर वाटेत दुसरी काही माणसं भेटली त्यांना. ते तर त्या कुंभाराला मारायला धावले. त्यांचं म्हणणं की एवढ्या उन्हात बाईला पायी चालवून हा स्वतः मारे गाढवावर बसून चाललाय. त्यांनी त्याला उतरवलाच खाली."

"ही बलाच झाली म्हणायची की रे! मग पुढे?"

"पुढे काय! दोघंही वैतागले. त्यांनी ठरवलं की आपण दोघंही बसू गाढवावर. म्हणजे कोणी बोलायचा प्रश्नच नको. बसले की दोघेही गाढवावर. तर त्यांना अजून काही लोक भेटले रस्त्यात. त्यांनी तर अक्षरशः चार ठेवूनच दिल्या त्या कुंभाराला."

"आँ! आणि त्या का म्हणून?"

"म्हणे दोन माणसांचा भार त्या बिचार्‍या मुक्या जनावरावर टाकला ना रे त्यांनी... ते गाढव पार वाकलं होतं ओझ्याने. मग मार खाल्ल्यावर दोघेही हबकलेच. आता काय करावं हेच त्यांना समजेना बघ, मग त्यांनी ठरवलं की आता आपण दोघांनीही चालायचं, कोणीच बसायचं नाही गाढवावर."

"म्हणजे आधी जसं होतं तसं. बॅक टू स्क्वेअर वन!"

"हो! पण अजून थोड्या वेळाने त्यांना परत काही जण भेटले आणि त्यांनी तर यांना वेड्यात काढलं... हसायला लागले ते यांना. काय तर म्हणे, एवढं गाढव बरोबर असताना कोणीच त्याच्यावर बसलं नाहीये, एवढ्या ऊन्हात पायीच चालतायेत दोघं."

"हाहाहाहा! तूफान विनोदीच सिच्युएशन की!"

"तेव्हापासून ते दोघंही आता काय करावं म्हणून जे बसलेत रस्त्याच्या कडेला ते अजून बसले आहेत. काय करावं त्यांना कळत नाहीये. गाढवावर बसावं तरी पंचाईत, न बसावं तरी पंचाईत. मलाही विचारलं त्यांनी काय करू म्हणून. मला काहीच सुधरेना बघ. चूपचाप सटकलो तिथून. तूच सांग बा वेताळा! काय करावं त्यांनी? कोणाचं ऐकावं?"

"काय साला जमाना आलाय! आजकाल तूच मला गोष्टी सांगायलास बे! आणि उत्तरं पण एक्स्पेक्ट करतोस! हॅहॅहॅ!"

"जा बे, भाव नको खाऊ! नीट सांग. मी पण चक्रावलोय बघ. साला, जगात सल्लागारच सगळे. आणि एकाचं ऐकावं तर दुसरा नावं ठेवतो आणि दुसर्‍याचं ऐकावं तर तिसर्‍याला राग येतो. कटकटच आहे राव!"

"अरे बाबा! अगदी सोप्पंय रे, आय मीन, म्हणलं तर सोप्पंय. म्हणलं तर बेक्कार कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन. जगात शहाणे, दीडशहाणे, अतिशहाणे भरपूर भेटतात. जग म्हणजे वेड्याचा बाजार आहे. पण बेसिकली अशा परिस्थितीत दोन पर्याय असतात."

"कोणते?"

"सांगतो."

***

पर्याय.१

नेहमीप्रमाणे, एक राजा असतो आणि त्याचा एक प्रधान असतो. ऑफ कोर्स तो प्रधान अगदी विश्वासू, मित्रवत इ.इ. असतो. दोघे एकदा असेच गप्पा मारत असतात. तेवढ्यात राजवाड्यासमोरून एक साधू चाललेला असतो. राजा त्याला आत बोलावतो आणि त्याचा आदर सत्कार करतो. साधू खुश. तो राजाला म्हणतो,

"हे राजन! तू माझा इतका आदर केलास तर मी आता तुला काही देणं लागतो. तर ऐक, आजपासून बरोब्बर १५ दिवसांनी या गावात एक वादळ येणार आहे. ते जादूचं वादळ असणार आहे. त्याचं वारं ज्याच्या कोणाच्या कानात जाईल त्याला वेड लागेल." एवढं बोलून साधू निघून गेला. राजा आणि प्रधानाची जाम फाटली. आता काय करायचं? दोघांना काही सुचेना. शेवटी रिवाजाप्रमाणे प्रधानाला एक युक्ति सुचली.

"सरकार, आपण एक काम करू. आपण एक एकदम एअरटाइट खोली बांधू आणि आपल्या कुटुंबियांसमवेत त्यात वादळ यायच्या आधीच जाऊन बसू. वादळ थांबलं की बाहेर निघू. शिंपल!"

राजा खुशच खुश. खोली वगैरे बांधून झाली. ठरल्याप्रमाणे वादळ आलं. वादळाची चाहूल लागताच हे दोघे आपापल्या फ्यामिलीसकट खोलीत गेले आणि दार घट्ट लावून घेतलं. थोड्यावेळाने वादळ शमलं. सगळं काही स्थिरस्थावर झाल्याची खात्री करूनच राजा आणि प्रधान खोलीबाहेर पडले. बघतात तर काय, बाहेर राज्यातले बाकीचे सगळेच लोक वेडे झाले होते. नुसता धिंगाणा चालू होता. कुणी नाचत होतं, कुणी गात होतं, कुणी रडत होतं, कुणी कपडे फाडत होतं. हे दोघेही बघतच राहिले. खोलीत जाताना हे असं होईल हे लक्षातच आलं नव्हतं त्यांच्या. हताशपणे दोघेही बाकीच्या पब्लिककडे बघत बसले. एक दोघांना त्यांनी समजवायचाही प्रयत्न केला. काही फरक पडला नाही. उलट हे दोघे आपल्यासारखे वागत नाही म्हणून लोकच त्यांच्या अंगावर धावून आले. हे दोघे घाबरले आणि त्यांनी परत खोलीत धाव घेतली. दार आतून लावून घेतलं आणि विचार करू लागले. ऑफ कोर्स, आयडिया प्रधानालाच सुचली.

"हुजुर, आता एकच उपाय दिसतो आहे. सगळे जसं वागतायेत ना, आपणही तसंच वागायचं."

"म्हणजे! आपणही वेडं व्हायचं? काय बोलताय काय तुम्ही प्रधानजी? कळतंय का तुमचं तुम्हाला तरी?" राजा ओरडला.

"अगदी बरोबर, अगदी हेच म्हणतोय मी. आणि महाराज, शहाणपण म्हणजे तरी काय? चारचौघे जसे वागतात तसं वागणं म्हणजे शहाणपण. आज शहाणपणाची व्याख्याच बदलली आहे. आपण निमूटपणे ते नवीन शहाणपण मान्य करायचं आणि कातडी बचावायची."

"अहो पण..."

"आता पण नाही नी बिण नाही... जीव वाचवायचा असेल तर एकच मार्ग... एऽऽऽ नाचोऽऽऽ धत्तड तत्तड धत्तड तत्तड"

***

"वेताळा आलं बरं लक्षात! If you cant help it, then just jump in and enjoy it! त्रास नाही करून घ्यायचा, असंच ना?"

"करेक्ट! स्मार्ट आहेस."

"पण आता दुसरा काय ऑप्शन."

"अरे तो तर खूपच सोपा आहे. सांगतो. ऐक."

***

पर्याय.२

राजा, त्याचा तो मित्रासारखा प्रधान, राजवाडा, निवांत गप्पासेशन, साधू वगैरे वगैरे सेमच बरं का. मात्र इथे साधू रस्त्याने चूपचाप जायचं सोडून ओरडत चाललेला असतो,

"सुखी जीवनाचा मूलमंत्र, फक्त एक रूपयात! सुखी जीवनाचा मूलमंत्र, फक्त एक रूपयात!"

हे ऐकून राजा पेटतोच. च्यायला मी एवढा मोठा राजा आहे तरी अजून सुखी नाही आणि हा साधू चक्क सुखी होण्याचा मंत्र विकतोय, तोही फक्त एक रूपयात? तो साधूला बोलावतो आणि एक रूपया देतो.

"आता बोला बाबाजी, काय आहे तो मंत्र!"

"हे राजन, नीट ऐक... तो मंत्र आहे 'जो भी होता है भले के लिए होता है'... दॅट्स ऑल!"

साधू निघून जातो.

राजा चक्रावतो. पण काय करणार! एका रूपया अक्कलखाती गेला असं म्हणून तो गप्प बसतो.

बरेच दिवस जातात. राजा हे सगळं विसरूनही जातो. परत एकदा एका निवांत संध्याकाळी राजा अँड प्रधान अगेन रिलॅक्स करत असतात राजवाड्याच्या बागेत. फळं वगैरे पडलेली असतात समोर. गप्पा मारता मारता राजा एक सफरचंद घेतो कापायला आणि बोलायच्या नादात स्वतःचं बोट कापतो. ही धार लागते रक्ताची. बोटाचा तुकडाच पडलेला असतो. सगळीकडे बोंबाबोंब सुरू होते, गोंधळ होतो. राजा ओरडत असतो, विव्हळत असतो. कोणी मलम आणायला धावतो कोणी पट्टी आणायला धावतो. प्रधान राजाला शांत करायचा प्रयत्न करायला लागतो. आणि तो बोलून बसतो,

"महाराज, साधूने काय सांगितलं होतं? 'जो भी होता है भले के लिए होता है'. यातूनही काही चांगलंच होईल बघा. शांत व्हा!"

राज क्रोधायमान वगैरे होतो. साला मला एवढं लागलंय आणि हा असलं काय काय ज्ञान देतोय. प्रधानजीची रवानगी तडकाफडकी तुरूंगात होते. राजाची मलमपट्टीही होते. काही दिवसांनी त्याचं बोटही बरं होतं. रुटीन लाइफ सुरू होतं. आणि एक दिवस राजा शिकारीला जातो. हरणाचा पाठलाग करता करता तो भरकटतो आणि बरोबरच्या सैन्यापासून दूर जातो. अशा अवस्थेत तो जंगलात हिंडत असतो. तेवढ्यात काही आदिवासी त्याला पकडतात आणि त्यांच्या गावात त्याला घेऊन जातात. आपल्या नायकापुढे त्याला उभं करतात. नायक असा रूबाबदार माणूस बघून खुश होतो. नाही तरी देवीला बळी देण्यासाठी माणूस शोधतच असतो तो. हा मस्त भेटलाय! यालाच बळी देऊ, असा विचार करतो तो. मग काय, बळी द्यायची तयारी सुरू होते. बळी द्यायच्या आधी राजाच्या शरीराचं निरीक्षण होतं आणि त्यात नेमकं ते तुटकं बोट त्यांना दिसतं. खलास! असा बळी चालत नसतो. राजाला सोडून देण्यात येतं. राजा आपल्या राज्यात परत येतो, आणि थेट तुरूंगात जाऊन प्रधानाला मुक्त करतो. साधूचं म्हणणं त्याला पटलेलं असतं. प्रधानाची क्षमाही मागतो राजा.

"मित्रा, मला माफ कर. आता मला पटलं बघ, 'जो भी होता है भले के लिए होता है'! पण एक समजत नाहीये मला, इतके दिवस तू तुरूंगात खितपत पडलास त्यात तुझं काय भलं झालं? त्रासच झाला की तुला."

"हुजुर, असं कसं? हे बघा, मी तुमचा जिवलग मित्र आहे. तुमच्याबरोबर सावलीसारखा असतो. त्या दिवशी जंगलात आपण दोघे बरोबर असतो आणि दोघेही पकडले गेलो असतो. आणि माझं काही बोट वगैरे तुटलेलं नाहीये महाराज, तेव्हा तुमच्यानंतर माझाच नंबर लागला असता ना?"

***

"हाहाहा! ग्रेट! ग्रेट! वेताळा ही गोष्ट तर अप्रतिमच रे! जे चाललंय ते ठीकच चाललंय असं म्हणायचं आणि शांतपणे बघत रहायचं. दुनियेला करू दे काय फालतूपणा करायचा तो, आपण निवांत गंमत बघायची, असंच ना?"

"अगदी! अगदी! कळले तुला! मर्म कळले. अरे दुनिया बोलत राहणार, पाहिजे तसं वागत राहणार, आपण लोकांच्या वाटेला नाही गेलो तरी मुद्दाम येऊन टोचे मारणारे खूप असणार. आपण आपली शांती ढळू द्यायची नाही बघ. त्यांना हसून, गंमत बघायची. मनावर घ्यायचं नाहीच. उलट यातूनही काही चांगलंच निघेल असा भरवसा ठेवायचा."

"थँक्स वेताळा! आत्ता जातो आणि त्या कुंभाराला सांगून येतो."

"जरूर. पण एक अजून सल्ला... त्या कुंभाराला त्याने काय करावं ते न सांगता फक्त या दोन गोष्टी सांगून ये. मग तो आणि त्याची बुद्धी! जे काय करायचं ते त्याचं त्यालाच ठरवू देणे इष्ट! काय समजलास?"

"ऑफ कोर्स!"

विक्रम गावाकडे वळला आणि वेताळाने पिंपळाकडे झेप घेतली.

बडबड

on बुधवार, सप्टेंबर १२, २०१२

"ए हळू रे!"

"काय हळू? अशीच मजा येते!"

"म्हणून काय इतकी फास्ट चालवायची?"

"नाही तर काय? ही काय बैलगाडी आहे का?"

"ही बैलगाडी नाहीये... मात्र तू बैल आहेस हे नक्की!"

"आणि तू माझी गाय"

"पुरे! बाइक चालवताना जास्त चावटपणा नको, नाही तर चिमटे घेईन मागून!"

"ब्वॉर्र! राह्यलं! पण जरा अजून जवळ सरक ना. घट्ट पकडून बस ना."

"नक्को... आधीच तू सारखे ब्रेक मारतो आहेस ते काय कळत नाहीये का मला?"

"हा हा हा"

"जरा हळू रे... खूप स्पीड वाढवला आहेस... मला भिती वाटतेय... वळणावर तरी हळू कर ना. प्लीज!"

"काही नाही होत गं... माझा कंट्रोल................. आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ"

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

"बघ तरी तुला सांगत होते... हळू चालव, हळू चालव."

"हो गं! ओव्हरकॉन्फिडन्समधे गेलो मी."

"आता समजून काय उपयोग! त्या दिवशी समजलं असतं तर आज हे असं रोज याच वेळी याच वळणावर येऊन हीच बडबड करायची अंतहीन पाळी नसती आली आपल्यावर."

आमचे गोंय - भाग १ - प्राचीन इतिहास

on मंगळवार, एप्रिल १२, २०११






***



आमचे गोंय - प्रास्ताविक (१) , प्रास्ताविक - (२) , प्राचीन इतिहास



***



कोकणीत गोवा म्हणजे गोंय.



ऐतिहासिक काळात गोव्याला अपरान्त, गोमंतक, गोवापुरी, गोपकपट्टण, गोवाराष्ट्र अशी नावे दिलेली आढळतात. तर अरबी व्यापारी या प्रदेशाला 'सिंदाबुर' या नावाने ओळखत असत. यापैकी अपरान्त हे नाव सर्व कोकणाला दिलेले आहे. तर 'गोमंतक' म्हणजे 'गायींनी भरलेला' असा अर्थ आहे. जरासंधाबरोबरच्या लढायांमधून जरा उसंत घ्यावी म्हणून कृष्ण आणि बलराम गोव्यात आले होते, ही कथा प्रचलित आहे. आपल्या मुलांच्या विरहाने दु:खी होऊन देवकीमाता त्यांच्यामागोमाग गोव्यात आली, आणि तिला पान्हा फुटला. तोच दूधसागर धबधबा अशी कथा गोव्यात सांगितली जाते. या आई मुलांची भेट झाली तिथे माशेलला आजही देवकी-कृष्णाचं मंदिर प्रसिद्ध आहे. 'सिंदाबुर' हे नाव 'चंद्रपूर' या कदंबांच्या राजधानीवरून आले असावे. आज ही प्राचीन राजधानी 'चांदोर' किंवा 'चांदर' म्हणून ओळखली जाते.



पण या सर्वांपेक्षाही जुने नाव म्हणजे 'गोंय'. भारतात आर्य लोक सगळीकडे पसरण्यापूर्वी प्रोटोऑस्ट्रोलॉईड / द्रविड वंशाचे लोक सर्व भारतभर पसरलेले होते. छोटा नागपूर पठारावरून कोळ, मुंड वंशाचे आदिवासी कर्नाटकमार्गे गोव्याच्या, जंगलानी भरलेल्या प्रदेशात येऊन राहिले असावेत असा काही इतिहास संशोधकांचा अंदाज आहे. त्यांच्या अतिप्राचीन मुंडारी भाषेत 'गोयंबा' म्हणजे भाताच्या लोंब्या. तर गुव्वा म्हणजे सुपारी. त्यामुळे या सुपारी आणि भाताच्या प्रदेशाला त्यानी 'गोंय' किंवा गोवा म्हटले असावे असा काही लोकांचा तर्क आहे. गोव्यातले काही स्थानिक संशोधक म्हणतात की या आदिम जमाती गोव्यातून इतरत्र गेल्या!



या आदिम लोकांच्या उगमस्थानाविषयी अनेक तर्क वितर्क असले तरी प्राचीन काळात म्हणजे अगदी मानवी संस्कृतीच्या जन्मानंतरच्या लगेचच्या काळात गोव्यात मानवी वस्ती होती हे निर्विवाद. सांगे तालुक्यात आणि सत्तरी तालुक्यात भारतीय पुरातत्त्व खात्याने केलेल्या उत्खननात अश्मयुगीन आणि अगदी प्राथमिक स्वरूपातली दगडांची ओबडधोबड हत्यारे, हातकुर्‍हाडी सापडल्या आहेत. तर सत्तरी तालुक्यात 'म्हाऊस' आणि सांगे तालुक्यात रिवण-कोळंबच्याजवळ 'उसगाळीमळ-पणसईमळ' आणि 'काजूर' इथे प्रस्तरचित्रे अर्थात 'पेट्रोग्लिफ्स' सापडले आहेत.



यापैकी उसगाळीमळ आणि काजूर इथली अश्मयुगीन दगडी रेखाचित्रे आम्ही पाहिली आणि डोळ्याचे पारणे फिटले. काजूर इथली प्रस्तरचित्रे एका काळ्या ग्रॅनाईट पाषाणावर कोरलेली आहेत. अनेक प्राण्यांचे आकार इथे सापडतात.







मानवी संस्कृतीच्या इतिहासातले आणखी एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे रिवण-कोळंब जवळचे उसगाळीमळ-पणसईमळ. पूर्वीची अघनाशिनी म्हणजेच आताची झुआरी नदी. तिची एक उपनदी कुशावती. ती सांगे तालुक्यातून वाहत येते. कोळंबजवळ तिच्या पात्रात काहीसा वर आलेला एक जांभ्या दगडाचा मोठा भाग आहे. सच्छिद्र असला तरी काहीसा सपाट. ६ महिने हा खडक पाण्यात असतो. दिवाळीनंतर पाणी कमी झालं की आपल्याला दिसतात अतिशय सुरेख असे दगडात कोरलेले आकार. प्राणी, माणसं, काही त्या लोकांच्या धार्मिक विधींशी संबंधित असावेत असे आकार. कोरीव काम करायला अतिशय कठीण अशा जांभ्या दगडावर या पूर्वजानी नक्की कशासाठी हे आकार कोरले असावेत, आज आपण काहीच सांगू शकत नाही. पण या आकृत्या इतक्या सुंदर आहेत की बस्स! रानरेडा, ससा, कोल्हा, मोर, हरिणं वगैरे आहेतच, पण बरोबर नुकतंच जन्मलेलं बाळ असलेली एक मातृदेवताही आहे. एक मोठा वर्तुळाकार आहे, त्याला स्थानिक लोक चक्रव्युह म्हणतात, तर या प्रस्तर चित्राना 'गुराख्यांची चित्रं' म्हणतात. या खडकाच्या एका बाजूने कुशावती वाहते तर जास्तीचं पाणी वाहून जावं म्हणून दुसर्‍या बाजूने एक चर खणलेला आहे. त्यात सध्या माती पानं पडून तो अर्धा बुजलाय. तिथे सरकारचा एक रखवालदार असतो असं ऐकलं पण आम्हाला काही तो भेटला नाही. या सगळ्या खडकावरची माती अद्यापही काढलेली नाही. आता साधारण १२५ आकृत्या दिसतात. माती नीट काढली तर कदाचित आणखीही काही सापडतील.























हा सगळा प्रदेश अजूनही दुर्गम आहे. सगळीकडे जंगल आहेच. कर्नाटकची सीमा जवळ आहे आणि लोहखनिजाच्या खाणींनी सगळा परिसर व्यापलेला आहे. या प्रस्तरचित्रांपासून फक्त ५०० मीटर्स अंतरावर सध्या बंद असलेली एक खाण आहे. 'ती चालू करायचं उद्या जर कोणाच्या डोक्यात आलं तर?' या विचारानेच अस्वस्थ व्हायला होतं.



या प्रस्तर चित्रांच्या जवळ, ४ ते ५ कि.मी. च्या परिसरात काजूर आणि रिवण इथे मोठ्या नैसर्गिक गुहा आहेत. इथलं नदीचं पात्र काहीसं उथळ आहे. एकूणच अश्मयुगातल्या मानवांना रहायला एकदम आदर्श परिसर आहे! ही सुंदर कोरीव चित्रं तयार करणार्‍या या आदिम रहिवाशांना जंगलातल्या विपुल प्रमाणात उपलब्ध असलेल्या प्राण्यांमुळे खाण्यापिण्याची ददात नसावी. खाणं जमा करून उरलेल्या वेळात आणि त्यांच्या काही धार्मिक रीतीरिवाजांसाठी ही चित्र खोदून काढली असावीत असा एक अंदाज आहे. सगळ्या जगभर अशा प्रकारची चित्रं सापडली आहेत, भारतातील भोपाळजवळचं भीमबेटका हे त्यातलं एक प्रमुख स्थळ. पण ही बरीचशी चित्रं ग्रॅनाईट किंवा वालुकाश्मावर आहेत. मात्र उसगाळीमळची ही चित्र जांभ्या दगडात आहेत, हे त्यांचं विशेष. कारण या दगडात लोखंडाचा अंश असतो, त्यामुळे कोरायला हा दगड अत्यंत कठीण!







अश्मयुगातला हा आदिम रहिवासी हळूहळू शेती करू लागला. प्राणीपालन करू लागला. डोंगर उतारावर पाहिजे तेवढी झाडी, गवत काढून तिथे जरूरीपुरतं भात, नाचणी पिकवायची. पुढच्या वर्षी तो तुकडा रानासाठी सोडून देऊन दुसर्‍या जागी गरजेपुरतीच शेती करायची. अशा प्रकारची शेती गोव्यातले आदिवासी आता आता पर्यंत करत होते. या शेतीला कुमेरी असं नाव आहे. वारुळं, नाग, भूमी, लिंग, जागेचे राखणदार पुरुष अशी त्यांची दैवतं होती. या वारुळांना सांतेरी असं नाव आहे. गोव्यात सगळीकडे आढळणारी सातेरी देवी म्हणजे आता 'शांतादुर्गा'. पण सांतेरी हे नाव अजूनही प्रचारात आहे. तर वेताळ, पाईकदेव, रवळनाथ हे सगळे राखणदार देव. तर लिंगदेवांना नंतर शंकर हे नाव मिळालं. या नैसर्गिक देवतांना त्यांच्या भोळ्या भक्तांनी कोणत्याही उपचारांशिवाय केलेली पूजा मानवत होती. त्यांची देवळंही कुठे नव्हती. तर वारुळं, जमिनीतून वर आलेला एखादा दगड यातच त्यांना त्यांचे देव दिसत होते. सुरुवातीचे कोळ-मुंड म्हणजे नंतरच्या काळातले कुळ-मुंडकार आणि कोळी, गावडे-गावकार हे गोव्याचे आद्य रहिवासी.



काजूर इथे असंच एक पाइकदेवाचं देऊळ दिसलं. देऊळ म्हणजे साधीशी झोपडी. तेही नंतर कधीतरी बांधलेलं आहे. पण त्याच्या समोर चपट्या दगडांची एक वर्तुळाकार पुरातन रचना आहे. त्या रचनेच्या मधोमध एक गुळगुळीत गोल दगड आहे. हे नेमकं कशासाठी, आम्हाला कोणी सांगू शकलं नाही. बहुधा ही आदिम लोकांची स्मशानभूमी असावी. त्या दगडांच्या वर्तुळाच्या मधे उभं राहिलं तर कोणी खोटं बोलू शकत नाही. खोटं बोललं तर भयंकर परिणाम होतात अशी गावकर्‍यांची श्रद्धा आहे.







अंदाजे इ.स. पूर्व ६००० वर्षे या काळात समुद्राची पातळी आणखी कमी झाली, आणि किनारपट्टीला आणखी भूमी उपलब्ध झाली. गोव्यातले द्रविड, कोळ मुंड आपल्या पद्धतीने जगत असताना नंतर म्हणजे साधारण इ.स. पूर्व ५००० वर्षे, लढायांमधे हरून सुमेरियन लोक समुद्रमार्गे गोव्यात आले. त्यानी येताना आपल्याबरोबर देवळांची संस्कृती आणली. आणि ते इथल्या मूळ समाजात मिसळून गेले. यांचे वंशज म्हणजे आताचे पद्दे आणि चित्पावन ब्राह्मण असा काही इतिहास संशोधकांचा समज आहे. आणखी काही काळातच, किंवा याच्या आगेमागे, उत्तरेकडून आर्य लोक सार्‍या भारतवर्षात पसरले. त्यांनी आपली चातुर्वर्ण्य व्यवस्था इथे रुजवली. त्या व्यवस्थेत मूळचे आदिवासी असलेले गावडे आणि महार लोक शूद्र झाले असावेत. परशुरामाने इथे येणार्‍या आर्यांचे नेतृत्व केले असावे म्हणून ही भूमी परशुरामाने निर्माण केली अशा प्रकारच्या कथांचा उगम झाला. आताचं 'रिवण' म्हणजे पूर्वीचं 'ऋषिवन'. आताचं काणकोण म्हणजे पूर्वीचं 'कण्वपूर' कारण तिथे कण्व ऋषींचा आश्रम होता. अशा नावांवरून गोव्यातल्या आर्यांच्या वास्तव्याची माहिती मिळते.



हळूहळू गावगाडा चालवणारी व्यवस्था अस्तित्वात आली. आताच्या पंचमंडळांसारखी काहीतरी ही व्यवस्था असावी. म्हणूनच गोव्यात अनेक ठिकाणी 'बाराजण' नावाची ठिकाणे आहेत. कर्नाटक सीमेवरच्या जंगलातल्या लहान गावांमधे असे पंच म्हणजेच 'बुधवंत' लोक गावातल्या गोष्टींबद्दल निर्णय करतात. हे एकूण शांतताप्रेमी लोक होते. इ. स. पूर्व सुमारे ५०० वर्षांच्या काळात गोव्यात जैन आणि बौद्ध धर्माचे प्रचारक येऊन पोचले. त्यांचेही गोव्यात स्वागत झाले. त्यांच्या वास्तव्यासाठी अनेक ठिकाणी मानवनिर्मित गुहा तयार केलेल्या आहेत. साखळीजवळ हरवळे, फोंड्याजवळ खांडेपार इथे आम्ही अशा गुहा पाहिल्या. यापैकी हरवळे येथील गुहा या पूजास्थान वाटतात, कारण त्यांच्या आतमधे लिंगं आहेत. तर खांडेपार येथे केवळ रहाण्यासाठी गुहा तयार केल्या असाव्यात कारण त्यांत प्रत्येक गुहेच्या आत २ खोल्या केलेल्या आहेत.











आतापर्यंत गोव्यात एकछत्री असं कोणाचं राज्य नव्हतं. जशी उत्तर भारतात आणि महाराष्ट्रात साम्राज्यं उदयाला आली, तसा त्यांचा गोव्यात हळूहळू शिरकाव झाला. गोव्याच्या इतिहासातला अशा साम्राज्याचा पहिला उल्लेख आहे, मौर्य साम्राज्याचा.



इ. स. पूर्व ३२२ मध्ये सम्राट चंद्रगुप्त मौर्य मगधाच्या नंदांचा पराभव करून राज्यावर आला. पुढील २४ वर्षांच्या काळात त्याने आपल्या राज्याला साम्राज्याचे स्वरूप दिले. त्याचा पुत्र बिंदुसार याने हे साम्राज्य दक्षिण भारतातली द्रविड राज्यं वगळता पूर्ण भारतभर वाढवले. त्याच्यानंतर त्याचा महापराक्रमी पुत्र चक्रवर्ती अशोक सम्राट झाला. त्याने इ.स. पूर्व २३२ पर्यंत म्हणजे ४० वर्षे भारतावर राज्य केले. अशोकाने अनेक ठिकाणी शिलालेख लिहून ठेवले आहेत. या सम्राटांपैकी सम्राट चंद्रगुप्ताने उत्तर आयुष्यात जैन विचारसरणीचा अवलंब केला, तर अशोकाने कलिंगाच्या लढाईनंतर बौद्ध मताचा स्वीकार केला. या सर्व काळात गोव्यात मौर्यांचे राज्य होते. या काळात जैन तसेच बौद्ध धर्माचे प्रचारक सर्व भारतभर संचार करत होते. गोव्यात हरवळे सारख्या ठिकाणी जैन बैठक आढळते, तर बौद्ध भिख्खूंच्या वास्तव्यासाठी अनेक ठिकाणी मानवनिर्मित गुहा आढळून येतात. यापैकी काही म्हणजे हरवळे, रिवण, खांडेपार इ. बर्‍याच ठिकाणी उत्खनन करताना इ. स. पूर्व दुसरे शतक ते इ. स. तिसरे शतक या काळातल्या गौतम बुद्धाच्या मूर्ती सापडल्या आहेत.



इ. स. पूर्व २३२ मध्ये अशोकाचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर, त्याचे साम्राज्य फक्त ५० वर्षे टिकले. आणि यानंतर पाटलिपुत्रावर सुंग घराण्याची सत्ता आली. या काळात मौर्यांच्या साम्राज्याची शकले झाली, आणि लहान राज्ये उदयाला आली. यानंतर सुमारे साडेचारशे वर्षे पैठण अर्थात 'प्रतिष्ठान' येथील सातवाहन कुलाची महाराष्ट्राबरोबरच गोव्यात सत्ता राहिली. या कुळात शककर्ता सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी अर्थात "शालिवाहन" होऊन गेला. याच्या काळात गोवा हे महत्त्वाचे बंदर म्हणून प्रसिद्ध झाले, आणि इथून कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या राजांसाठी अरबी घोडे समुद्रमार्गे आणायला सुरुवात झाली.



तिसवाडी, बारदेश आणि साष्टी या तालुक्यात ४५० वर्षे, तर इतर तालुक्यात सुमारे २०० वर्षे पोर्तुगीजांचे राज्य वगळता गोव्याचा इतिहास बराचसा महाराष्ट्राच्या इतिहासाबरोबर निगडित राहिलेला आहे. सातवाहन साम्राज्याच्या लयानंतर सुमारे २०० वर्षे गोव्यात अस्थिर परिस्थिती राहिली होती. या काळात दक्षिण भारतातील चुतु, महाराष्ट्री, हाळसीचे कदंब, कोल्हापूरचे कुरा इत्यादि घराण्यातील राजांच्या सत्ता एकामागून एक गोव्यावर येऊन गेल्या. यापैकी हाळसी-पळसिग्गे (पलाशिका) हे खानापूरजवळचे एक प्राचीन गाव. इथले कदंब घराणे गोव्याच्या दृष्टीने महत्त्वाचे. कारण याच घराण्याच्या एका शाखेने परत गोव्यावर सत्ता स्थापन केली ती इ. सनाच्या ११व्या शतकात. त्यावेळेला हे घराणे गोव्यात राहूनच गोव्यावर राज्य करत होते. आणि ती चारशे वर्षे गोव्याचा सुवर्णकाळ मानला जातो.



इ. स. ४०० च्या दरम्यान यादवकुळातल्या भोज राजांची सत्ता मध्य आणि दक्षिण गोव्यात प्रस्थापित झाली. त्यांची राजधानी चंद्रपूर अर्थात चांदोर ही होती. चांदोर इथे उत्खनन करताना अनेक पुरातन अवशेष सापडले आहेत. या राजांचा कुलदेव म्हणजे चंद्रेश्वर भूतनाथ. चांदोर इथे सापडलेल्या अवशेषांमधे मोठा नंदी, राजवाड्याचे अवशेष इत्यादि आजही पहायला मिळतात. हे भोज राजे अतिशय उदार होते. त्यांनी अनेक मोठी देवळे बांधली, आणि या देवळांच्या उत्पनासाठी अनेक गावे इनाम म्हणून लावून दिली. त्यानी दिलेले ताम्रपट आणि शिलालेख गोव्यात अनेक ठिकाणी सापडले आहेत. या काळात चंद्रपूर सार्‍या जगभर प्रसिद्ध झाले. सुमारे २०० वर्षे या राजघराण्याने गोव्याची खूप भरभराट केली आणि आपल्या राज्याचा विस्तार कारवार बेळगाव या भागातही केला. यांच्या एका चेदी या उपकुलातील काही लोकांना पुढे पोर्तुगीजांनी बळाने ख्रिश्चन केले, पण ते स्वत:ला चाड्डे म्हणवीत राहिले. आणि आपापल्या कुलदैवताना वर्षासने द्यायचेही त्यानी सुरूच ठेवले. "गोव्यातल्या प्रत्येक ख्रिश्चन माणसाला आपले हिंदू असतानाचे आडनाव माहिती आहे" असे आम्हाला रिवण येथे भेटलेल्या एका ख्रिश्चन व्यावसायिकाने सांगितले. विशेष म्हणजे हा टुरिझम मध्ये असलेला माणूस आम्हाला रिवणच्या जीवोत्तम पर्तगाळी मठात भेटला होता, आणि आसपासच्या अनेक, हिंदूंच्या दृष्टीने पवित्र, ठिकाणांची माहिती त्याने दिली होती. एवढंच नव्हे तर त्याने "पर्तगाळी मठातल्या झर्‍याच्या पाण्याने सगळे रोग बरे होतात कारण ते डोंगरावरच्या गणपतीच्या पायापासून आलं आहे" अशी माहितीही दिली! त्याशिवाय "वेताळाच्या देवळात दिवेलागणीच्या वेळी जाऊ नका, घाबराल." असा प्रेमळ सल्लाही दिला!







इ. स. ५२५ मध्ये घारापुरीच्या कोकण मौर्यांनी भोजांचा पराभव केला. आणखी ५० वर्षांत बदामीच्या चालुक्यानी कोकण मौर्यांकडून गोवा जिंकून घेतला. त्यांचे राज्य सुमारे २०० वर्षे टिकले. याच काळात पुलकेशी पहिला, पुलकेशी दुसरा, कीर्तिवर्मा इ. महान राजे होऊन गेले. आणि इ.स. ७६८ मध्ये दक्षिण कोकणातल्या शिलाहारांच्या वंशातल्या शानफुल्ल नावाच्या राजाच्या मदतीने राष्ट्रकूट घराण्याच्या कृष्ण राजाने गोवा जिंकला. या शिलाहारांचे जे वंशज बाटवाबाटवीच्या काळात सक्तीने ख्रिश्चन झाले, त्यानी नाव घेतले 'सिल्व्हा'! या शिलाहारांची सत्ता गोव्यात सुमारे अडिचशे वर्षे चालली. ते राष्ट्रकूटांचे मांडलिक राहिले. याच कालावधीत खांडेपार येथे सप्तकोटेश्वराचे पूर्ण दगडी बांधणीचे पहिले देऊळ बांधण्यात आले. अगदी साधे आणि लहानसे असे हे देऊळ वैशिष्ट्यपूर्ण दिसते ते त्याच्या कळसावरील जांभ्या दगडात कोरलेल्या बैल, हत्ती या प्राण्यांमुळे. या देवळातही चौकोनी पिंडिका आढळते.







राष्ट्रकूटांच्या, कल्याणी चालुक्यानी केलेल्या पराभवांनंतर, शिलाहारांचे राज्य दुबळे झाले आणि कदंबानी गोवा जिंकून घेण्याचे प्रयत्न सुरू केले. लवकरच कल्याणी चालुक्यांनी म्हणजे दुसरा जयसिंह याने रट्टराज शिलाहाराचा पराभव करून गोव्यासकट पूर्ण सप्तकोकणावर आपली सत्ता प्रस्थापित केली, आणि इ. स. १०४२ पासून कंटकाचार्य अर्थात शष्ठदेव कदंबाने चालुक्यांचा मांडलिक म्हणून गोव्याचा कारभार पहायला सुरुवात केली. हा खर्‍या अर्थाने गोव्याच्या वैभवाचा काळ होता. हे तेच कदंब राजे, ज्यानी "श्रीसप्तकोटीश्वरलब्ध वीरवर" हे बिरूद अभिमानाने मिरविले आणि आपल्या नाण्यांवरही "श्री सप्तकोटीश्वरलब्ध वरप्रसाद" असे लिहून श्री सप्तकोटीश्वराबरोबर आपले नाव अजरामर केले.



क्रमशः



**



विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.



- टीम गोवा (पैसा, प्रीत-मोहर, बिपिन कार्यकर्ते)

आमचे गोंय - प्रास्ताविक (२)

on मंगळवार, एप्रिल १२, २०११






***



आमचे गोंय - प्रास्ताविक (१) , प्रास्ताविक - (२) , प्राचीन इतिहास



***



गोवा म्हणलं, की सगळ्याना आठवतो तो निळाशार समुद्र, चंदेरी वाळू, मासळीचा स्वाद दुणा... आणि बरोबरची झिंग आणणारी पेयं.



सगळेच जण यांचा आस्वाद घेण्यासाठी कधी ना कधी तरी गोव्याला भेट देतातच. पण गेली १८ वर्षं गोव्यात राहून मला एक गोष्ट कळलीय ती म्हणजे, खरा गोवा या सगळ्यात आहेच, पण या सगळ्यापलीकडे एक गंभीर पुराणपुरुष गोवा आहे, जो तुम्हा आम्हाला २ दिवसांच्या बस टूरमध्ये अजिबात दिसत नाही. त्याला भेटण्यासाठी गोव्यातल्या सांदीकोपर्‍यातल्या गावांमधे जायला हवं. जंगलं धुंडाळायला हवीत आणि गांवकार लोकांच्या पुराण्या कथा ऐकायला हव्यात. म्हणून चला तर, मी, पैसा, आणि प्रीतमोहर तुम्हाला या एका वेगळ्याच गोव्याच्या सफरीवर घेऊन जातोय.



काही दिवसांपूर्वी प्रीतमोहरने गोव्याच्या पोर्तुगीजकालीन इतिहासाबद्दल एक लेखमालिका लिहायला सुरुवात केली. अत्यंत मनोरंजक भाषेत तिने महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांना अपरिचित असलेला गोव्याचा इतिहास सांगायला सुरुवात केली होती. पहिला भाग प्रसिद्ध झाल्यानंतर बिपिनला एक छान कल्पना सुचली.



ती म्हणजे गोव्याचा संपूर्ण इतिहास मिपाकरांच्या समोर आणण्याची. त्याच्या सूचनेवरून आम्ही हे शिवधनुष्य उचलायचा प्रयत्न करतोय. मी ६ डिसेंबर १९९२ पासून गोव्यात राहते आहे. माझी मुलं तर आता गोंयकारच झाली आहेत. प्रीतमोहर गोव्यातलीच "अस्सल गोंयकार". अशा आम्ही दोघीजणी वेगवेगळ्या तर्‍हांनी गोव्याशी संबंधित. आम्ही या संपूर्ण लेखमालिकेतले लेख लिहिणार आहोत.



आमच्यात कोणीच तसा इतिहासाचा शास्त्रशुद्ध, पद्धतशीर अभ्यास केलेला नाही, पण शक्य तेवढी अधिकृत माहिती जमा करून आणि शक्य तेवढ्या ठिकाणाना भेटी देऊन, लोकांशी बोलून, काही ऐकिवातल्या गोष्टींची मदत घेऊन लेखमाला आपल्यापुढे आणत आहोत. कोणाला आणखी काही माहिती असेल तर ती या निमित्ताने सगळ्यांपुढे आणावी ही विनंती. तसंच, लेखमालिकेत जर काही चुका झाल्या, काही उणीव राहिली तर जरूर दाखवून द्या. कारण गोव्याचा इतिहास अभ्यासायचा तर मोठी अडचण म्हणजे, पोर्तुगीजांच्या पूर्वीचा फारसा इतिहास स्थानिक लोकांच्या स्मरणात नाही. देवळांशी संबंधित कथा लोकमानसात आहेत खर्‍या, पण त्या ऐकिव अशाच आहेत, आणि त्यावरून अचूक काळनिश्चिती करणं खूपच कठीण आहे.



दुसरा एक अनुभव मी प्रीतमोहरच्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून लिहिला होता, की छत्रपती शिवाजी आणि संभाजी यांचा गोव्याशी खूप जवळून संबंध आला होता पण लोक त्याबद्दल फारसं बोलत नाहीत, किंवा जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाहीत. पोर्तुगीजानी त्याना सोयिस्कर तेवढाच इतिहास लोकांच्या कानी पडेल याची व्यवस्था केली होती. त्यामुळे, "शिवाजी महाराज आणि संभाजी यांच्या मोहिमांमुळे अर्ध्याहून जास्त गोव्यातले लोक धर्मांतरे होण्यापासून बचावले होते." किंवा "मुघलांनी आणि आदिलशहाने शिवाजी आणि संभाजीच्या विरोधात ऐन वेळेला पोर्तुगीजाना मदत केली नसती तर गोवा आणखी साधारण ३०० वर्षे पारतंत्र्यात राहिला नसता" यासारख्या गोष्टी शोधूनच कुठेतरी वाचायला मिळतात. पोर्तुगीजानी जुने किल्ले पूर्ण उध्वस्त करून टाकले आणि सगळीकडे फक्त आपलाच ठसा राहील याची पुरेपूर काळजी घेतली होती. किंबहुना, जुना वैभवशाली इतिहास लोकांनी विसरून जावा अशीच त्यांची इच्छा असावी. त्यामुळे गोव्यातले बहुतेक ख्रिश्चन लोक हे धर्मांतरित स्थानिकच असले, तरी पोर्तुगीज राजवटीचे गोडवे ते अजूनही गातात आणि त्यांच्या दृष्टीने शिवाजी आणि संभाजी हे "भायले" लोक होते हे क्लेशकारक आहेच, पण सत्य आहे.



गोव्यात एकूणच सुशेगाद वृत्तीमुळे असेल किंवा सध्याच्या बदलत्या परिस्थितीनुसार असेल. पण इतिहासाबद्दल खूप अनास्था आहे. माहितीच्या शोधात भटकताना अगदी अर्ध्या कि.मी.च्या अंतरावर असलेल्या गोष्टींबद्दलही "माहिती नाही" हे उत्तर अनेकदा मिळालं. ऐतिहासिक स्थळांजवळ योग्य दिशादर्शक पाट्या नाहीत, माहिती विचारायला आसपास कोणी नाही असे अनुभव अनेकदा आले. पाषाणयुगीन गुहांना सरसकट "पांडवांच्या गुहा" म्हणलं जातं, असे कित्येक प्रकार अनुभवले!



या लेखमालिकेच्या निमित्ताने महाराष्ट्राचा धाकटा भाऊ असलेला जो गोवा, त्याच्या इतिहासाबद्दल, तिथल्या लोकांबद्दल, गोव्याच्या भाषेबद्दल आणि एकूणच सामाजिक / सांस्कृतिक अंगांबद्दल, तुमच्या मनात काही कुतुहल जागं झालं तरी आमचे प्रयत्न सफल झाले असं मी म्हणेन.



- पैसा



क्रमशः



**



विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.



- टीम गोवा (पैसा, प्रीत-मोहर, बिपिन कार्यकर्ते)

आमचे गोंय - प्रास्ताविक (१)

on मंगळवार, एप्रिल १२, २०११



***

आमचे गोंय - प्रास्ताविक (१) , प्रास्ताविक - (२) , प्राचीन इतिहास


***

खूप जुनी गोष्ट आहे. त्यावेळी टीव्ही नव्हता, म्हणजे आमच्याकडे नव्हता. करमणुकीचे साधन म्हणजे चित्रपट आणि नाटके! करमणूक घरबसल्या हवी असेल तर, रेडिओ! आमच्याकडे जुना फिलिप्सचा व्हॉल्व्हवाला रेडिओ होता. कॉलेजमधे जाणारा काका आणि थोडी मोठी आत्या त्यावर गाणी वगैरे ऐकत. मी अगदीच लहान, शाळेतही जात नसेन तेव्हा. एके दिवशी एक गाणे कानावर पडले आणि त्यानंतर चित्रपटाचे नाव पण... 'बॉम्बे टू गोवा'!

बॉम्बे तर ऐकून माहित होतं, हे गोवा काय आहे? पण ते पटकन दोन शब्दात संपणारे नाव का कोणास ठाऊक, चांगलेच लक्षात राहिले. पण तेवढेच. पुढे बरीच वर्षे हे नाव उगाचच कधीतरी आठवायचे. वर्गात एकदोन मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीत गोव्याला जाणारी. त्यांच्याकडून कधीतरी उडत उडत गोव्याबद्दल ऐकलेलं. तिथली देवळं, चर्चेस, बीचेस यांची वर्णनं माफक प्रमाणात ऐकली. असंच कधीतरी मंगेशकर लोक मूळचे गोव्याचे असं वाचलं होतं.

बरीच वर्षं गोव्याचा संबंध एवढाच.

साल १९८१. अर्धवट, कळत्या न कळत्या वयात आलो होतो. अचानक एक तूफान आलं... 'एक दुजे के लिये'. सुप्परडुप्परहिट्ट सिनेमा! भयानक गाजला. आम्हाला आधी तो बघायची परमिशन नव्हती घरून. पण सिनेमा जेव्हा प्रमाणाबाहेर हिट झाला तेव्हा कशीतरी परमिशन काढून बघितला. वासू सपनाच्या प्रेमकहाणीच्या जोडीने लक्षात राहिला तो त्यात दिसलेला गोवा. हे माझं गोव्याचं प्रथम दर्शन. भन्नाटच वाटलेला गोवा तेव्हाही.

पण, गोव्याचं प्रत्यक्ष दर्शन होईपर्यंत अजून पाच वर्षं वाट बघायची होती. बारावीची परिक्षा संपली आणि रिकामपण आलं. कुठेतरी जाऊया म्हणून बाबांच्यामागे भूणभूण लावली होती. खूप पैसे खर्च करून लांब कुठेतरी जाऊ अशी परिस्थिती नव्हती. विचार चालू होता. एक दिवस बोलता बोलता बाबांनी त्यांच्या एका स्नेह्यांसमोर हा विषय काढला. गोव्यात त्यांच्या चिक्कार ओळखी होत्या. त्यांनी गोव्याला जा म्हणून सुचवलं. एवढंच नव्हे तर 'तुमची राहण्याची / खाण्याची सोय अगदी स्वस्तात आणि मस्त करून देतो' असं सांगितलं. एवढं सगळं झाल्यावर नाही वगैरे म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. निघालो आम्ही गोव्याला. आठ दहा दिवसांचं ते गोव्यातलं वास्तव्य, भटकणं, ते एक वेगळंच जग. आजही माझ्या डोळ्यासमोर त्यातला क्षणन् क्षण जिवंतपणे उभा आहे. पंचवीस वर्षं झाली, गोव्याने मनातून जागा रिकामी केली नाहीये.

माझं अजून एक भाग्य म्हणजे त्यावेळी आम्ही अगदी घरगुती वातावरणात गोव्यात सैर केली होती. त्यावेळीही गोवा म्हणजे फक्त बीचेस, तारांकित रिसॉर्टस, दारू, विदेशी पर्यटक एवढीच गोव्याची जनमान्यता होती. पण आम्ही ज्यांच्या बरोबर गोवा हिंडलो, त्यांनी या सगळ्याच्या व्यतिरिक्त असलेला, सदैव हिरव्या रंगात न्हालेला, शांत (सुशेगाऽऽऽत हा शब्द तेव्हाच ऐकलेला), देवळातून रमलेला गोवाही दाखवला. माझी तो पर्यंत गोवा म्हणजे चर्चेस, गोवा म्हणजे ख्रिश्चन संस्कृती अशी समजूत. हा दिसत असलेला गोवा मात्र थोडा तसा होता, पण बराचसा वेगळाही होता. गोवा दाखवणार्‍या काकांनी गोव्याबद्दलची खूपच माहिती दिली. जसजसे ऐकत होतो, चक्रावत होतो. गोव्याच्या इतिहासातील ठळक घटना, पोर्तुगिज राजवटीबद्दलची माहिती वगैरे प्रथमच ऐकत होतो. शाळेत नाही म्हणायला गोव्यात पोर्तुगिजांची सत्ता होती वगैरे वाचले होते, पण ते तितपतच. काकांकडून प्रत्यक्ष ऐकताना खूप काही कळले.

माझ्या मनावर अगदी खोल कोरला गेलेला प्रसंग म्हणजे आम्ही एका देवळात (बहुतेक दामोदरी का असेच काहीसे नाव होते) गेलो होतो आणि एक लग्नाची मिरवणूक आली वाजत गाजत. देवळाच्या बाहेरच थांबली. पुजारी लगबगीने बाहेर गेला. लगीनघरच्या मुख्य पुरूषाने पुजार्‍याच्या हातात काहीतरी बोचके दिले. पुजारी आत आला. त्याने ते बोचके देवाच्या पायावर घातले, एक नारळ प्रसाद म्हणून बाहेर जाऊन त्या पुरूषाला दिला. वरात चालू पडली. मला कळे ना! हे लोक देवळात आतमधे का नाही आले? कळले ते असे, ती वरात ख्रिश्चनांची होती. बाटण्याआधी त्या घराण्याचे हे कुलदैवत, अजूनही मंगलप्रसंगी कुलदैवताचा मानपान केल्याशिवाय कार्य सुरू होत नाही! पण बाटल्यामुळे देवळाच्या आत पाऊल टाकता येत नाही. देवळाच्या बाहेरूनच नमस्कार करायचा.

असलं काही मी आयुष्यात प्रथमच ऐकत / बघत होतो. गोव्याच्या ऊरात काही वेदना अगदी खोलवर असाव्यात हे तेव्हा जाणवलं होतं. (वेदना असतीलही, नसतीलही. तेव्हा मात्र एकंदरीत त्या वरातीतल्या लोकांच्या तोंडावरचा भक्तिभाव आणि बाहेरून नमस्कार करण्यातली अगतिकता जाणवली होती असे आता पुसटसे आठवते आहे.)

अशीच एक आठवण म्हणजे त्रिकाल चित्रपटात, एका ख्रिश्चन मुलाचे लग्न दुसर्‍या एका ख्रिश्चन मुलीशी होत नाही कारण तो मुलगा ब्राह्मण ख्रिश्चन असतो आणि मुलगी इतर जातीची ख्रिश्चन!!! त्रिकाल लक्षात राहिला तो असल्या सगळ्या बारकाव्यांनिशी. याच चित्रपटात मी गोव्यातील राणे आणि त्यांचे बंड हा उल्लेख प्रथम ऐकला.

गोव्याहून परत येताना गोवा माझ्याबरोबरच आला. कायम मनात राहिला. कधी मधी अचानक, गोवा असा समोर येतच गेला.

गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याचे उल्लेख वाचताना, त्या लढ्याबद्दल कुठे फुटकळ वाचताना, गोव्याच्या दैदिप्यमान लढ्याचा इतिहास कळला. पुलंच्या 'प्राचीन मराठी वाङमयाचा गाळीव इतिहास' वाचताना तर मला "जैसी हरळामाजी रत्नकिळा | रत्नामाजी हिरा नीळा | तैसी भासामाजी चोखुळा | भासा मराठी" म्हणणारा फादर स्टीफन भेटला. या बहाद्दराने तर 'ख्रिस्तपुराण' हे अस्सल भारतीय परंपरेला शोभून दिसेल असे पुराणच लिहिले ख्रिस्तावर. हा गोव्याचा, आणि ही पुराण रचना गोव्यातली. ज्या गोव्यात मराठीचा एवढा सन्मान झाला, त्याच गोव्यात मराठी विरूद्ध कोंकणी वाद उफाळला आणि मराठीवर 'भायली' असल्याचा आरोप झाला हे वर्तमानपत्रातून वाचत होतो. सुभाष भेंड्यांची 'आमचे गोंय आमका जांय' नावाची कादंबरी वाचली होती. तपशील आठवत नाहीत, पण गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याचे आणि त्याचबरोबर, 'भायले' लोकांबद्दलची एकंदरीतच नाराजी याचे चित्रण त्यात होते एवढे मात्र पुसटसे आठवत आहे.

असा हा गोवा! अजून परत जाणे झाले नाहीये. कधी होईल सांगताही येत नाहीये.

काही दिवसांपूर्वी 'प्रीत-मोहर'ने गोव्याबद्दल एक लेख लिहिला. गोव्याच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त. तेव्हा तिची ओळख झाली आणि असे वाटले की ती गोव्याबद्दल अजूनही बरेच काही लिहू शकेल. त्याच वेळेस आमची 'पैसा'बायसुद्धा गोव्याची आहे असं कळलं. तीही उत्तम लिहू शकेल असे वाटले. या सगळ्यामुळे गोव्यावर एखादी साग्रसंगीत लेखमाला का होऊन जाऊ नये? असा विचार मनात आला. अर्थात, त्या दृष्टीने माझा उपयोग शून्य! पण पैसा आणि प्रीत-मोहर यांनी कल्पना तत्काळ उचलून धरली. पैसातैने पुढाकार घेतला आणि लेखमालेची रूपरेषाही ठरवून टाकली.

या मेहनतीचं फळ म्हणजे, 'आमचे गोंय' ही लेखमाला!

या निमित्ताने एक वेगळीच लेखमाला वाचायला मिळेल म्हणून मलाही आनंद होत आहे. सर्वच वाचकांना ही लेखमाला आवडेल आणि महाराष्ट्राच्या या नितांत सुंदर लहान भावाची चहूअंगाने ओळख होईल ही आशा!

- बिपिन कार्यकर्ते

क्रमशः

**

विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.

- टीम गोवा (पैसा, प्रीत-मोहर, बिपिन कार्यकर्ते)

प्रिय विनील

on बुधवार, फेब्रुवारी २३, २०११

श्रावण मोडक यांनी प्रसिद्ध केलेलं हे बोलकं पत्र विचार करायला लावणारं आहे. तुमच्याशी ते शेअर करावंसं वाटलं, म्हणून इथे कॉपी - पेस्ट केलंय. तुम्हाला भावलं, तर तुम्हीही अवश्य ब्लॉगवरून, मेलमधून हे अजून पुढे प्रसारित करा !

*******

ओरिसातील मलकनगिरीचे जिल्हाधिकारी आर. विनील कृष्णा यांचे, त्यांच्यासमवेत असणारे अभियंता पवित्र माझी यांच्यासह, माओवाद्यांनी अपहरण केले. विनील यांचे मलकनगिरीतील काम असे आहे, की त्यांच्या सुटकेसाठी माओवाद्यांचा प्रभाव असूनही आदिवासीच रस्त्यावर आले आहेत. फक्त आदिवासीच नव्हे, तर सर्वदूर समाजही. नेमकं काय घडतं आहे तिथं? सुरक्षा न घेता विनील जंगलात गेले, हा आता मुद्दा होऊ पाहतोय. खरंच त्यांचं चुकलं? ओरिसातच आयएएस अधिकारी असणारे सचिन जाधव यांनी विनिलला उद्देशून लिहिलेलं हे खुलं पत्र. त्यांच्या परवानगीनेच येथे प्रसिद्ध करतो आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रिय विनील,

परवा मध्यरात्री एका जिल्हाधिकारी मित्राचा फोन आल्यापासून झोप उडालीय. म्हणाले, ‘माओवाद्यांनी विनीलला डिटेन केलंय’. फोन कलेक्टरांचाच असल्यामुळे बातमीची खातरजमा करण्याचा प्रश्नच नव्हता. मग निष्फळ फोनाफोनी सुरु झाली. काय झालंय हे समजून घेण्यासाठी फक्त. तपशील समजले. डिटेन नव्हे तर अपहरणच. पण उपयोग काय?

रात्री दोन वाजता एका मित्र एसपींचा (पोलीस अधीक्षक) फोन आला. माझ्याकडून त्यांना तपशील पाहिजे होते. मी काय कप्पाळ तपशील देणार? ते पूर्वी मलकनगिरीत एसपी होते. “कशाला असं सिक्युरिटी न घेता नक्षल भागात फिरता रे?” कळवळ्याने ते म्हणाले. त्यांची अस्वस्थता माझ्या लक्षात आली. तुझ्यावर सगळेच पोलीस वैतागले असले तर आश्चर्य नाही रे. तुझ्यावर आख्खी एस्टॅब्लिशमेंटच वैतागली असणार. अस्वस्थ करण्याची शक्ती घेऊनच जन्माला आलायस.

तू मयूरभंजमध्ये आयएएस प्रोबेशनर असतानाच एखाद्या कार्यकर्त्यासारखं स्वत:ला झोकून दिलं होतंस. मोटरसायकल घेऊन सिमलीपालच्या जंगलात वेळी-अवेळी एकटाच जायचास. आदिवासी पाड्यांवर फिरायचास. त्यांना जवळून बघायचास. त्यांच्यासाठी योजनांमध्ये, नियमांमध्ये अपवाद करण्यासाठी कलेक्टरांशी बोलायचास. आम्हाला सिमलीपाल दोनच गोष्टींसाठी माहीत होतं – पर्यटन स्थळ, आणि नंतर माओवाद्यांचा अड्डा. तू याच्या पलीकडे गेला होतास. वयाच्या पंचविशीतच. ही समज घेऊनच तू जन्माला आला होतास.

तुला एका ठिकाणी पोस्टिंग मिळालं, आणि त्याचवेळी कंधमाळमध्ये धार्मिक दंगली सुरु झाल्या. या दंगलींना आदिवासी विरुद्ध दलित असा कुठेही न सापडणारा रंग होता. सरकारला एक कलेक्टर, एक एस्पी आणि एक सबकलेक्टर हवा होता. टू फिक्स द थिंग. आणि चारच महिन्यांत तुला डिस्टर्ब करुन कंधमाळला पाठवला. तुम्ही तिघांनी तिथे अजोड कामगिरी केलीत. आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचा पूर्वग्रहही तुमचे काम झाकोळू शकला नाही.

मलकनगिरी जिल्हाधिकारी पदासाठी तुझी निवड झाली तेंव्हा बऱ्याच जणांना आश्चर्य वाटले. एवढे चांगले काम करणाऱ्याला ही शिक्षा? हाच अनेकांचा प्रश्न होता. मलकनगिरीमध्ये कुणी पाय ठेऊ धजत नाही. नक्षलवाद्यांची अघोषित राजधानी. पण सुजाण मुख्यमंत्री इथे कर्तव्यकठोर अधिकारीच पाठवतात हे फार थोड्या जणांच्या लक्षात येते. तुझ्याअगोदर इथे नितीन जावळेंनी चांगल्या कामांचा पायंडा पाडून ठेवलेला होताच. तुझे ग्राऊंड बऱ्यापैकी तयार होते. तू त्यावर सुंदर बाग फुलवलीस. मलकनगिरीत आजमितीस तू जेमतेम एक वर्ष पूर्ण केलेस. लाल दिव्याच्या गाडीचे तुला कधीच आकर्षण नव्हते. मलकनगिरीत त्याची गरजही नव्हती तुला. नाडलेल्या आदिवासींना मदत करण्यासाठी तुला कशाचीच गरज नव्हती. मनासारखे काम करता येण्यासाठी तुला फक्त स्वातंत्र्य आणि एक यंत्रणा हवी होती. ती तुला मिळाली.

तुझ्या मनात या आदिवासींसाठी इतके प्रेम आहे की तुला भीती म्हणून काय ती नाहीच. या भागात दुसरा एखादा अधिकारी काय करेल? एकतर बाहेर पडायचे नाही. पडले तर हेवी सिक्युरिटी असल्याशिवाय नाही. आर ओ पी (रोड ओपनिंग पार्टी) आधी पुढे जाणार. लॅण्डमाइन्स तपासणार. साग्रसंगीत उपचार होणार. अर्धा दिवस त्यातच जाणार. मग आपलं भोज्जाला शिवून अधिकृत भेट उरकून अंधार पडायच्या आत आपल्या सुरक्षित ठिकाणी परत यायचं. पण तुझी रीतच न्यारी. तू आणि तुझा ड्रायव्हर. पीएसओ नाही, आरओपी नाही. हत्यार तर नाहीच नाही. जिथंपर्यंत गाडी जाईल तिथंपर्यंत जायचं. जिथं रस्ता संपेल तिथं तुला घ्यायला एखादा तहसीलदार, एखादा बीडीओ, एखादा इंजिनियर आलेला असायचा. मोटरसायकल घेऊन किंवा चालत. जेवण त्यांच्यासोबतच. सगळं एकदम शिवाजी महाराज स्टाइल. लोकांच्यात बसायचं. बोलायचं. आणि जे करता येण्यासारखं असेल ते लगेच करायचं. जे करता येण्यासारखं नाही, ते त्यांना समजावून सांगायचं.

हे एवढं आदिवासींसाठी खूप होतं. तू त्यांच्यासाठी वनवासात आलेला रामच जणू.

आदिवासी गांजलेले. एका बाजूने नक्षल. दुसऱ्या बाजूने पोलीस, सीआरपी. दोन्हीकडून मार. खायची मारामार. नक्षलवाद म्हणजे काय हे त्यांना कुठून समजणार? नक्षलींनी आदिवासींची पोथी बरोबर वाचलेली होती. त्यांची मनं जिंकायची त्यांना गरजच नव्हती. जे त्यांना जरा बरे वाटत, त्यांना ‘रिक्रुट’ करीत. बाकीच्यांचा काही फरक पडत नसे. अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी स्वत: त्यांच्या पाड्यावर येत असेल तर त्यांना तुझ्यात देव दिसल्यास नवल नाही.

हे आम्हाला आज समजलं. तुला नक्षलवाद्यांनी पकडून नेल्यावर ज्या गावातून तुला त्यांनी नेलं, त्याच गावातल्या आदिवासींनी उत्स्फूर्त मोर्चे काढले, तुला सोडावा म्हणून. सगळं मलकनगिरी बंद आहे आज. कुणीही न सांगता. तू याआधी काम केलेला कंधमाळ जिल्हाही बंद आहे. तोही तसाच. उत्स्फूर्तपणे. ज्या आदिवासींसाठी काम करत असल्याचा दावा नक्षल करतात, त्याच आदिवासींनी नक्षलांना ठणकावून सांगितले, आमच्या कल्याणाची काळजी असेल, तर अगोदर कलेक्टरांना सोडा. आम्हाला तेंव्हा कळलं, तू काय आणि कसं काम करतोयस ते. आज सगळ्या राज्यात निदर्शने चालू आहेत. कलेक्टरसाठी नाही, तर विनीलसाठी.

एक फार मोठा विरोधाभास आज लोकांना पहायला मिळाला.

कुडमुल्गुमा नावाच्या दुर्गम ब्लॉकमध्ये तू गेला होतास. जनसंपर्क मेळाव्यासाठी. तिथं जाणं सोपंही नाही, आणि शहाणपणाचंही नाही. रस्त्या-रस्त्यावर सुरुंग लागलेले असतात. तू गेलास ते गाव तर भलतंच कुप्रसिद्ध. हे कुडमुल्गुमा त्याच भयावह बालिमेडा जलाशयाच्या जवळ, जिथे दोन वर्षांपूर्वी जवानांनी भरलेली आख्खी बोट नक्षल्यांनी बॉंबहल्ल्याने बुडवली होती. हा ‘त्यांचा’ इलाका. पंधरा ग्रामपंचायती त्यांच्या. या भागात सरकारी माणसानं यायचं नाही. पोलीस, सीआरपी तर लांब.

तू इथे जायचास. एकदा नाही, दोनदा नाही, नेहेमी. खरं तर तू इथेच, १५१ गावांवर, कट ऑफ गावांवर, तुझं लक्ष केन्द्रित केलंस. तू जाऊ लागलास, आणि लोकांनाही वाटलं इथं काम होतंय. इथल्या लोकांनी एकदा मागणी केली, आम्हाला ब्लॉक ऑफिस लांब होतंय, तर तू थेट त्या गावांमध्ये गेलास, आणि ब्लॉक ऑफिस आठवड्यातून एक दिवस तिथे, असं खरंच चालू केलंस देखील. लोकांमध्ये जसजसा प्रिय होत गेलास, नक्षली वेट अॅण्ड वॉच करत राहिले असावेत बहुदा, तुझा आत्मविश्वास वाढत गेला. तुला सिन्सिअरली वाटत होतं, इथं सरकार पोचलं नाही म्हणून नक्षलवाद आला. आता तो घालवायचा असेल, तर सरकार तिथं गेलं पाहिजे.

विनील, ज्या दिवशी तू गेलास तो दिवस इदचा होता. सरकारी सुट्टीचा. तू सुट्टी न घेता काम करत होतास. भीतीने सुनसान ओस पडलेले रस्ते पार करून तू सिलेरू नदीच्या काठी गेलास. तिथून बोटीने नदी ओलांडून त्या गावी पोहोचलास. का, तर सरकार गावांत पोचलं पाहिजे यासाठी. शिबिर झालं. लोकांचे समाधान केलंस. वनाधिकाराचे दाखले वाटलेस. पेन्शन दिलीस. आवास योजनेचे लाभ दिलेस. मग एका स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकर्त्याने तुला आग्रह केला, “सर, इथे जनतापै गावात विद्युतीकरणाचं काम बघायला चला.” आणि तू विनाविलंब गेलासही. मोटरसायकलवर. सोबत फक्त दोन ज्युनिअर इंजिनियर घेऊन. जंगलात. खोल गुहेत जणू. जिथून परत आलेली पावलं दिसत नाहीत. तुझे एकूणच स्वयंसेवी संघटनांवर भाबडे प्रेम आहे. त्या लोकांनी तुला परत पाठवलेच नाही. एका इंजिनियरला परत पाठवले – असं सांगून की, ‘आम्ही सरांची काळजी घेतो, तू जाऊन सरकारला ही चिठ्ठी दे, सांग अठ्ठेचाळीस तास, आमच्या मागण्या आणि कलेक्टरचे प्राण.’ तुझे डोळे बांधून तुला चालवत सहा जण जंगलात घेऊन गेले.

आजही तुला चालवलंच जातंय. रोज वेगळ्या ठिकाणी. जागा बदलत. का, तर तुझ्या सुटकेसाठी सारं काही पणाला लावू पाहणाऱ्या आदिवासींनाही ते शक्य होऊ नये. असं म्हणतात की, त्यांनी आता मोर्चेबांधणीही केली आहे.

विनील, तू म्हणायचास, या लोकांसाठी काम करायला मला पाठवलंय, मी ते करतोय, हे लोक मला कसा काय अपाय करतील? तुझा विश्वासघात झाला दोस्ता.

आता आज बऱ्याच जणांच्या मनात काय विचार सुरू असतील ठाऊक आहे? ऐक.

विनिल, वेड्या, तुला कल्पना आहे का तू सरकारला किती मोठ्या काळजीत टाकलंयस त्याची? आम्हाला एकाच वेळी तू उत्तम अधिकारी, प्रशासक वाटतोस, आणि त्याच वेळी अविचारी साहसी आदर्शवादी तरुणही वाटतोस. तुला काय गरज होती तिथं जायची? पकडलेले जे नक्षल आता तुझ्या बदल्यात सोडले जातील त्याबद्दल तुलाच आता सगळे जबाबदार धरणार असं वाटत नाही तुला? एकतर तिथं जायचंच नव्हतंस. किंवा गेलास तर सुरक्षेचा जामानिमा घेऊनच जायचंस. वेडा. बेजबाबदार. अदूरदर्शी. असा कसा रे कलेक्टर तू?

हे आणि असंच बऱ्याच जणांच्या मनात येत असणार याची मला कल्पना आहे. हे असले प्रसंग तर होतच असतात असंही म्हणणारे महाभाग मला भेटले आहेत. विनायक सेनांच्या मानवी अधिकारांची चिंता वाहणाऱ्यांना तुझ्या मानवी हक्कांचा विचार करावासा वाटणारच नाही, कारण तू तर जालीम सरकारी व्यवस्थेतला बाबू! सरकारचा जावई! चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला वगैरे वगैरे. तुझ्यासाठी सरकार आकाशपाताळ एक करणार याची या विचारवंतांना पक्की खात्रीच. त्यामुळे ते आपली वाफ कशाला दवडतील?

पण मला काय वाटतं सांगू? तू जिंकलायस विनील. तू हादरवून सोडलंयस या तथाकथित माओवाद्यांना. ज्यांच्या कल्याणाच्या गोष्टी ते करतात, त्या आदिवासींनीच आज त्यांना सणसणीत चपराक मारलीय, ‘आम्हाला तुम्ही नको, विनील हवाय,’ असं ठणकावून सांगून. तुला प्यादं म्हणून वापरायच्या नादात नक्षल्यांनी आपलं थडगं खणून ठेवलं. यू आर देअर नेमेसिस.

विनील, आम्हाला क्रांतिकारक हवेत. आणि तेही तुझ्यासारखे. यंत्रणेचा योग्य वापर करून लोकांचं आयुष्य बदलवण्यासाठी स्वत:चं आयुष्य पणाला लावणारे. यंत्रणेच्या नावाने खडे फोडणारे विचारवंतही नकोत, आणि यंत्रणाच बदलायला हवी म्हणून अजून एक अन्याय्य यंत्रणा बळजबरीने माथी मारणारेही नकोत. तू हे अशा प्रकारे काम नसतंस केलं तरी तुला कुणी जाब विचारणार नव्हतं. उलट तुला सहानुभूतीच मिळाली असती, बिचारा मलकनगिरीत पोस्टिंग झालंय, याच्या कुटुंबाचं, मुलांचं कसं होणार, याच्या सॉफ्ट पोस्टिंगसाठी कुठे प्रयत्न करायला सांगूयात, इत्यादी.

तू हिरो आहेस विनील. आय ए एस आहेस म्हणून नाही. जिल्हाधिकारी आहेस म्हणून नाही. जिवाची बाजी लावून जग बदलायला निघालेला शिलेदार आहेस. केवळ स्वप्न न बघता झोकून देणारा कार्यकर्ता आहेस. म्हणूनच तू हवा आहेस आम्हाला.

तुझा वेडेपणा हवाय विनील आम्हाला. तुझ्यासारखे ‘वेडे’च नक्षलवादाच्या वेडाला मूठमाती देऊ शकतात.

आय सॅल्यूट यू, सर!

सचिन जाधव, आयएएस, ओरिसा.

डूड...

on गुरुवार, सप्टेंबर ३०, २०१०

"लेडिज अँड जंटलमन, वी हॅव रिच्ड छॅट्रपॅटी शिवॅजी इंट'नॅशनल एअ'पोऽट मुंबाय. वी विल कमेन्स आऽर डिसेंट शॉर्टली. यु आऽ रिक्वेस्टेड..."

समोरच्या छोट्या स्क्रीनवर चाललेल्या टायटॅनिकमधे पार बुडालेला समीर एकदम भानावर आला. मान उंचावून दोन सीट सोडून डावीकडे असलेल्या खिडकीतून त्याने बाहेर नजर टाकली. विमान डावीकडे वळत होते. त्याबाजूला झुकल्यामुळे खाली चमचमणारा दिव्यांचा समुद्र अगदी लख्ख दिसत होता. सोळा सतरा तासाच्या प्रवासाने त्याचे अंग अगदी आंबून गेले होते. मस्त हात उंच करून त्याने आळस दिला. खिडकीच्या बाजूला शाय, आय मीन, शलाका काचेला नाक लावून खाली बघत होती. तिच्या बाजूला आई अगदी सराईतपणे घोरत होती. तिचे तोंड उघडे होते. आत्ता जर का आईचा हा अवतार मोबाईलवर शूट केला आणि नंतर तिला दाखवला तर स्वतःला अतिशय टापटीप ठेवणार्‍या आईची काय अवस्था होईल ते घोरणे आणि तोंड उघडे वगैरे, ते ही चार लोकांत, हे बघून या विचाराने समरला एकदम हसायला आलं आणि त्याच्या बाजूला बसलेले बाबा एकदम दचकून जागे झाले. चार पाच पेग तब्येतीत लावलेले असल्यामुळे ते दोन सेकंदात परत झोपले. थकवा, कंटाळा, जाग्रण सगळं एकदम धावून आलं आणि कधी एकदा या कैदेतून सुटतोय याची वाट बघत समीर स्वस्थ बसून राहिला. प्रथेप्रमाणे हवाईसुंदर्‍या आणि सुंदरे फेर्‍या मारून सगळ्यांच्या आसनांचे पट्टे वगैरे तपासत होते. खुर्च्या सरळ करत होते. तेवढ्यात चाकं बाहेर आल्याचा धप्प आवाज झाला आणि पाचच सेकंदात एक जोरदार हादरा बसून विमान लँड झाले. अगदी मागे बसलेल्या साताठ पोरांच्या टोळक्याने टाळ्या शिट्ट्या वाजवल्या आणि विमानात एकच गलका झाला.

एखाद्या गोष्टीसाठी वर्षानुवर्षे अगदी शांतपणे धीराने वाट बघावी, पण ती गोष्ट अगदी हाताशी आली की मात्र भयानक अधीरता यावी तसे झाले होते त्याला. आजी आजोबांना बघून जवळजवळ पाचेक वर्षं झाली होती. काका मामा आत्या मावश्या तर त्याहून जुन्या झाल्या होत्या. कधी एकदा घरी जातोय आणि आजीला घट्ट मिठी मारतोय असं झालं होतं त्याला. आजोबांची रिअ‍ॅक्शन मात्र माहिती होती त्याला. हळूच हसतील, डोक्यावरून हात फिरवतील आणि मग दुसरीकडे तोंड करून थोडे पुढे जाऊन चटकन डोळे पुसतील. आणि मग थेट गाडीत जाऊन बसतील. पाच वर्षांपूर्वी अमेरिकेत आले होते तेव्हा असंच केलं होतं त्यांनी.

जोरात धावणारे विमान वेग कमी करत करत मग एका ठराविक वेगाने बराच वेळ हळूहळू चालत राहिले. बाहेर नुकताच पाऊस पडून गेला होता बहुतेक. टर्मिनल बिल्डिंगचे दिवे लखाखत होते. विमान धक्क्याला लागलं. इतके तास शहाण्या मुलांसारखे बसलेलं पब्लिक एकच झुंबड करून उठलं आणि वरच्या कप्प्यातलं सामानसुमान बाहेर काढू लागलं. यथावकाश दारं उघडली आणि विमान रिकामं व्हायला लागलं. इमिग्रेशन वगैरे सोपस्कार आटोपून बाहेर येईपर्यंत बराच वेळ लागला. समीर शलाका अगदी भिरभिर सगळीकडे बघत होते. त्यांच्यासाठी हे एक काहीतरी वेगळंच जग होतं. काहीतरी ओळखीचं पण बरंचसं अनोळखी. आजूबाजूचे लोक काय बोलतायत ते कळल्यासारखं वाटत होतं पण कळतही नव्हतं धड. एखाद्या ठार अडाणी माणसाला रस्त्यावर पाट्या बघत पत्ता शोधायला लागला तर कसं होईल, तसं वाटत होतं त्यांना. प्रत्येक गोष्ट अगदी नीट व्यवस्थित विचार करून करणारे बाबा तर अक्षरशः एखाद्या लहान मुलाच्या वरताण वागत होते. त्यांची आणि आईची एक्साईटमेंट आणि त्यापायी होणारी धांदल गडबड बघून समीरला खूपच गंमत वाटत होती.

"मॉम, व्हाय आ' यु गाइज गेटिंग सो एक्सायटेड? आय मीन, आय नो तुम्ही लोक जवळजवळ सेवन एट इयर्सनंतर येताय इंड्याला. बट यु बोथ आ' सिंपली लॉस्ट".

"शट अप सन, यु वोंट नो... द एन्टायर फॅमिली मस्ट बी वेटिंग आउट देअ' टू ग्रीट अस... गॉश... दादा, वहिनी, प्रभा... किती वर्षांनी भेटणारे मी सगळ्यांना."

आईला बोलू न देताच बाबा समीरला उत्तर देता देता स्वतःशीच बडबडायला लागले. आई तर त्याही पलिकडे गेली होती. तिला लांबूनच सगळे दिसायला लागले होते. त्यांची अवस्था बघून शलाका पण हसत होती. ती काहीतरी बोलणार तेवढ्यात समीरने तिला कोपराने ढोसली...

"शाय, डोन्ट डिस्टर्ब देम. ईट्स देअर मोमेंट, लेट देम एन्जॉय इट."

एकदाच्या बॅग्ज आल्या आणि लटांबर बाहेर पडलं. बाहेर काका आणि चिन्मय उभे होतेच. साग्रसंगीत स्वागत झालं. बॅगा गाडीत गेल्या आणि गाडी निघाली. आई, बाबा काकांशी अखंड बोलत होते. समीर चूपचाप गाडीच्या खिडकीतून बाहेर बघत होता. इतकी रात्र झाली होती तरीही रस्ते कसे माणसांनी भरलेले होते. मूळात रस्त्यावर इतकी माणसं का? आणि ती माणसं नीट रस्त्याच्या कडेकडेने चालायचं सोडून अशी मधेच एकदम गाडीच्या बरोब्बर समोर का येतात? हा ड्रायव्हर अजून वेडा कसा झाला नाही? एका मागून एक प्रश्न समीरच्या मनात धुडगूस घालायला लागले.

एकदम त्याला आठवलं, इंड्या हॅज अ बिलियन पीपल. गॉश, इट मीन्स दॅट आयॅम अ‍ॅक्चुअली इन द मिडल ऑफ अ बिलियन पीपल. रिअली? एकदम त्याला वाटलं, पंचवीस तीस वर्षांपूर्वी रत्नाकर कुलकर्णी नावाचा एक हुशार विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला गेला नसता तर कदाचित आज आपण पण आज त्या रस्त्यावर चालणार्‍या लोकांमधलेच एक असतो. आपणही असेच आपल्या बापाची बाग असल्यासारखे भर रस्त्यावर बागडलो असतो. पण रत्नाकर कुलकर्णी अमेरिकेला गेला, खूप शिकला आणि यथावकाश नंदिताशी लग्न वगैरे करून तिथेच स्थायिक झाला. सॅम आणि शाय जगात प्रवेश करते झाले. रत्नाकर कामात गुरफटला आणि दोन भारतभेटींमधली गॅप वाढत गेली. पूर्ण वीस वर्षात फारतर तीन चार वेळा समीरने भारत बघितला होता. शलाकाने तर त्याहून कमी. आणि मागची ट्रिप तर खूपच जुनी. तरी बरं, मधे एकदा काका, मग मावशी, मग अजून कोणी कोणी... आणि दोन तीन वेळा आजी आजोबा, अशा नातेवाईकांच्या अमेरिकेच्या चकरा चालू होत्या.

आई, बाबा, काका यांच्या बडबडीने गाडीत नुसता गलका झाला होता. त्या सामुहिक समाधानाच्या उबेने समीर जडावत गेला आणि त्याने मस्त डोळे मिटून घेतले.

त्याला जाग आली तेव्हा गाडी पुण्यात शिरत होती. पहाट व्हायला आली होती. अजून उजाडायचे होते. रस्ते रिकामे होते. गाडी सोसायटीत शिरली. काकाचा फ्लॅट कोणता ते खालूनच कळत होते. घरातले लाईट चालूच होते. बाल्कनीत आजी आजोबा दिसले, समीर लिफ्टची वाट न बघता थेट जिन्यावरूनच पळत सुटला. मागे शलाका. घरात गोकुळच होतं. झाडून सगळे जमले होते. आजी आजोबा, अ‍ॅज एक्स्पेक्टेड, नुसते डोळ्यांनीच बोलत होते, डोळ्यांनीच हसत होते. समीर शलाकाने त्यांना मिठी मारली. गाडीतली इतर मंडळी, सामानसुमानासहित व्यवस्थित वर आले. सुरूवातीच्या गप्पाटप्पा झाल्या आणि हळू हळू दिवस सुरू झाला. पाहुणे मंडळी झोपली, घरातले इतर लोक कामाला लागले.

दुपारची जेवणं झाली आणि परत एकदा गप्पाष्टक सुरू झालं. पोरांना जवळ घेऊन आजोबा शांतपणे त्यांच्या खुर्चीत बसून सुखासमाधानाने भरल्या घराकडे बघत होते. आता महिन्याभरात साताठ वर्षांचे आयुष्य जगून कसे घेता येईल याचे प्लॅनिंग सुरू झाले होते.

"आता निवांत आराम करा बरं... काय लोळायचं ते लोळून घ्या महिनाभर, परत गेलात की आहेच परत रगाडा." आजी म्हणाली.

"कसला आराम हो आई. भेटीगाठीतच वेळ आणि जीव जाईल सगळा." नंदिताला महिनाभराचं भविष्य लख्ख दिसत होतं.

"काही नाही, मी सांगेन सगळ्यांना, ज्याला कोणाला भेटायचं त्यांनी इथे या. उगाच तुम्हाला दगदग नको आणि वेळ जातोच इकडून तिकडे जाण्यात."

"ते सगळं ठीक आहे हो, आई. पण देवदर्शनाला तर जावंच लागेल ना? तो काय येणार आहे स्वतः आपल्याकडे चालत 'घे माझं दर्शन' म्हणत?"

"व्हाय नॉट?", समीर उगाच आईला चिडवायचं म्हणून म्हणाला. अपेक्षेप्रमाणे रिअ‍ॅक्शन आलीच.

"तू गप्प बस हं समीर. तुम्हा मुलांना यातलं अजून काही कळत नाही. माहिती तर काहीच नाही. ते काही नाही. बाबा, आता महिनाभरात तुम्हीच शिकवा जरा चार गोष्टी पोरांना देवाधर्माबद्दल. आमच्यामागे घरात कमीत कमी देवापुढे दिवा तरी लागावा. बाकी सगळं स्वीकारलंच आहे मी, एवढं तरी होऊ दे." नंदिताने आजोबांना साकडं घातलं.

आजोबा गंमतीने हे सगळं बघत ऐकत होते. त्यांनी हळूच पोरांच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांना वाटलं, हिलाच काहीतरी शिकवावं. अशा गोष्टी सांगून शिकवून कळत नसतात. त्या आतूनच याव्या लागतात. समीर शलाकालाही कळेल त्यांचं त्यांनाच. आपण फक्त त्यांना योग्य काय आणि अयोग्य काय याची जाणिव देत रहायची.

पण ते बोलले मात्र काहीच नाहीत, नुसतेच मंद हसत राहिले. त्या आश्वासक मुद्रेनेच नंदिताचं समाधान झालं. तिचे पुढचे बेत भराभर ठरायला लागले. फारसे कुठे जायचे नाही, पण देवदर्शनाला मात्र गावी जाऊन यायचे नक्की झाले.

"मॉम, तिथे जायलाच पाहिजे का? आय मीन, यु गाय्ज कॅन गो... मी राहतो इथेच. मला कंटाळा येईल तिथे."

"अजिब्बात नाही. आपण सगळे जायचं. आणि हे फायनल. नो आर्ग्युमेंट्स. एकदा तिथे आलास की कसं शांत वाटेल बघ." समीरला आईसमोर कधी गप्प बसायचं हे कळत होतं. तिचा चेहरा बघून, आता काही उपयोग नाही हे त्याला कळले.

***

जायचा दिवस ठरला. तयारी झाली. सगळेच जाणार होते. मोठी गाडी बुक झाली. आईला यावेळी सगळे पेंडिंग राहिलेले सोपस्कार, कुळाचार वगैरे उरकायचे होते. तिची तयारी चालू होती आणि सगळं काही नीट होईल का या टेन्शनमधे ती बुडून गेली. तिची ही धावपळ आणि टेन्शन बघून समीरला खरंच कळत नव्हतं की जिथे शांत वाटतं म्हणून जायचं तिथे जायला एवढी अशांती का? हे म्हणजे उलटंच की.

"आजोबा, टेल मी समथिंग. आपण गेलो नाही तर तो देव रागावेल का?" समीरने त्यातल्यात्यात जिथे उत्तर मिळायची अपेक्षा होती तिथे प्रश्न टाकला. बाकी लोकांनी नुसतीच दटावणी केली असती भलतेच प्रश्न विचारतो म्हणून.

"अजिबात नाही, समीर. अरे त्याला खरंतर काहीच गरज नाही या सगळ्या सोपस्कारांची. तो जिथे कुठे आहे तिथे निवांत आहे. आपली गंमत बघून स्वतःची करमणूक करून घेत असेल." आजोबा डोळे मिचकावत बोलले.

समीरला आजोबांचे फर कौतुक, ते एवढ्यासाठीच. त्यांना रागावलेले कधी बघितले नव्हतेच. आणि काहीही विचारले तरी त्यांचे उत्तर अगदी नेमके आणि गंमतीशीर असायचे. सकाळी आंघोळ करून ते पूजेला बसले की ते ज्या तल्लिनतेने पूजा करत, ते बघायलाच समीरला आवडत होते. अगदी देवाशी गप्पा मारत मारत पूजा चालायची.

"काय पांडोबा? काय म्हणताय? काल रखुमाईने पाय चेपले की नाही? की अजून रूसवा चालूच आहे? आणि तुम्ही हो मारुतराय, जरा शांत बसत जा हो."

असं चालायचं. सकाळी सकाळी मित्र गप्पा मारत बसले आहेत असं. समीरला तर वाटायचं की ते देव पण त्यांच्याशी बोलत असावेत. पण ते फक्त आजोबांनाच ऐकू येत असावं बहुतेक. त्याने एकदा त्यांना तसं विचारलंही. आजोबा काहीच बोलले नाहीत. फक्त त्यांचं ते ठराविक मिश्किल हसू आलं चेहर्‍यावर.

"पण आजोबा, मग हे आईचं जे काही चाललं आहे ते का? मला काहीतरी राँग वाटते आहे ते."

"समीर, माणसाला निराकार देव जवळच वाटत नाही म्हणून त्याने देवाला आपल्यासारखं रूप दिलं, तो जवळचा वाटावा, सखा वाटावा म्हणून. आणि मग एकदा देवाला माणसाचं रूप दिलं की बाकीचे सोपस्कार आले. आणि हळूहळू मूळ हेतू बाजूला राहून भिती मात्र वाटायला लागली. पण जर का तो कृपाळू आहे, आपला मित्र आहे, आपल्याला सुबुद्धी देतो तर घाबरायचं कशाला? पण लोकांना कळत नाही. आणि या गोष्टी सांगूनही काही उपयोग नसतो. ज्याचं त्यालाच कळतं आणि वेळ यावी लागते. आपण स्वतःपुरतं नीट वागावं."

बहुतेक सगळं समीरच्या डोक्यावरून गेलं, पण आजोबांच्या आश्वासक आणि कधी नव्हे ते गंभीर झालेल्या चेहर्‍यामुळे त्याला खूप काहीतरी वाटलं. त्याला कळलं ते एवढंच की देव हा आपला फ्रेंड असतो. आणि त्याला घाबरून रहायची अजिबात गरज नसते. त्याच्या मनात आईबरोबर देवदर्शनाला जायचा तो काही विरोध होता तो कमी झाला आणि थोडीशी उत्सुकताही लागून राहिली.

***

गावाला जायचा दिवस उजाडला आणि भल्या पहाटे मंडळी निघाली. शहराच्या बाहेर गाडी आली आणि समीर शलाका इंड्याची कंट्रीसाईड बघत राहिले. पावसाळ्याचे दिवस असल्याने बर्‍या पैकी हिरवाई होती सगळीकडे. घाट वगैरे बघून तर पोरांनी गाड्या थांबवल्याच. आजूबाजूला उंडारून झालं आणि आईचा चेहरा हळूहळू विशिष्ट मोडमधे जायला लागला म्हणून मग परत गाडीत येऊन बसले.

दुपारी गाव आलं तो पर्यंत ड्रायव्हर सोडून बाकी सगळे घोरत डुलत होते. गाडी गावात शिरली आणि एक दोन ब्रेक कच्चकन लागल्यानंतर मंडळी उठून बसली. गावात स्वतःच घर असं नव्हतंच. आजोबांच्या आजोबांनी गाव सोडलेलं... आडनावात गावाचं नाव असलं तरी गावात लॉजमधे रहायची पाळी होती. काकांनी गाडी बरोब्बर नेहमीच्या ठरलेल्या लॉजपर्यंत नीट आणली. बुकिंगवगैरे आधीच झालं होतं. सगळे आत घुसले. खोल्यांचा ताबा घेतला आणि ताजे तवाने झाले.

सगळे कुळाचार, अभिषेक वगैरे दुसर्‍या दिवशी करायचे. त्यामुळे आजचा दिवस तसा रिकामाच. जेवण वगैरे झाल्यावर, दर्शनाला जायचा बेत ठरला. देवस्थान तसं आजूबाजूच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध. बर्‍याच लांबलांबून लोक यायचे. दर्शनाला बर्‍यापैकी गर्दी होती. रांग बरीच लांब गेली होती. समीरला खरं तर त्या रांगेत उभं रहायचं जीवावर आलं. पण उगाच आईला अजून त्रास नको म्हणून तो निमूटपणे रांगेत उभा राहिला.

"आजोबा, ते टेंपलच्या वर पॉइंटेड असं स्ट्रक्चर आहे ना..."

"त्याला कळस म्हणतात बरं का..."

"हां हां तेच आजोबा, त्याच्यावरची डिझाईन्स किती छान आहेत. आणि कलर पण एकदम ब्राईट आहे. आय लाइक्ड दॅट."

"अरे जेव्हा इथे यात्रा असते ना तेव्हा दर्शनाची रांग इतकी मोठी असते की बर्‍याच लोकांना वेळ नसल्याने दर्शन मिळतच नाही. मग ते लांबूनच कळसाला नमस्कार करतात आणि परत जातात."

"का? कळसाला नमस्कार का? नमस्कार तर देवाला करतात ना?"

"समीर, नमस्कार हा खरा मनापासून असेल ना तर करायची पण गरज नसते. तो आपोआप घडतो. मुद्दाम करावा लागत नाही. ती एक भावना आहे. आपण हात जोडून त्याला मूर्त रूप देतो. पण मूर्त रूप देण्यामुळेच तो पूर्ण होतो असे नाही. ज्या क्षणी तो करायची इच्छा मनात होते त्याच क्षणी तो पोचलेला असतो. पण देवाचं दर्शन नाही तर नाही, त्याचं प्रतिक म्हणून कळसाला नमस्कार करायची पद्धत आहे आपल्याकडे. आणि देव काय फक्त देवळात असतो का? कोणतंही सत्कृत्य करताना ते देवत्व आपल्यातच असतं. फक्त त्याचं अस्तित्व सतत जाणवावं म्हणून हा सगळ खटाटोप, कर्मकांडं वगैरे."

समीर ऐकत होता. हा असा अजिबात फॉर्मॅलिटी नसलेला देव त्याला आवडत होता. आईसारखं घाबरून वगैरे नमस्कार करण्यापेक्षा हे बरं. त्याने एक ठरवलं, आत जाऊन देवासमोर उभं रहायचं आणि त्यावेळी वाटलं तरच नमस्कार करायचा. कोणालाही जुमानायचं नाही. आईलासुद्धा.

बराच वेळ झाला, रांग हळूहळू पुढे सरकत होती. समीरला मनापासून कंटाळा आला होता. प्रवास आणि इतका वेळ उभं राहिल्याने त्याचे पाय सॉलिड दुखायला लागले होते. कधी या पायावर तर कधी त्या पायावर भार देत तो उभा होता. पण एका क्षणी त्याचा पेशंस संपला आणि तो सरळ रांगेच्या बाहेर पडला.

"अरे काय झालं? आणि कुठे चाललास? जास्त लांब जाऊ नकोस. पटकन ये परत." नंदिता म्हणाली.

"आयॅम बोअर्ड, मॉम. मी जाऊन गाडीत बसतो. यु गाय्ज गो अहेड अँड फिनिश धिस बिझिनेस."

"आणि दर्शन रे?"

"बघू. त्यालाही वाटत असेल तर भेटेल तो मला. काय आजोबा?" ... परत आजोबांचं तेच गंमतीशीर हसू. समीरचा हुरूप वाढला. तो निघालाच.

मागनं आई ओरडत राहिली, पण आजोबांनी जे सांगितलेलं होतं त्याचा विचार करत समीर सरळ तिथून निघून आला. तंद्रीतच तो गाडीजवळ आला. तेवढ्यात त्याला जाणवलं की कोणीतरी त्याला काहीतरी सांगत आहे. त्याने त्या दिशेने नजर फिरवली आणि एकदम दचकलाच तो.

भारतात येऊन आठ दहा दिवस झाले असले तरी त्याचे डोळे, मन अजून इतक्या दैन्याला सरावले नव्हते. गाडीच्या मागच्या बाजूला एका कोपर्‍यात एक म्हातारा बसला होता. अगदी थकलेला, गलित गात्र झालेला. अंगावरचे कपडेही अगदीच साधे, साधे कसले फाटकेच. बाजूला एक म्हातारी. ती पण तशीच. दोघांची नजर अधू. जवळ काठी. त्या काठीला लावलेली भगवी पताका.

"पोरा, कालधरनं चालतोया आम्ही दोगं. आज पोचलो हितं. दर्सन काय हुईना रं... पोटात भुकेचा डोंब उठलाय बग. येवडा येळ लागंल आसं वाटलं न्हवतं... बरूबर काय बी नाय बग खायला. आता दम धरवत नाही म्हणून भीक मागतुया. म्हातारपण वाईट बघ... आमाला भिकारी समजून हाटेलवाला पण काही दीना रं... पोरा, काही तरी दे बाबा पोटाला."

समीरला काहीच कळलं नाही. गावाकडची भाषा त्याला कळलीच नाही. पण त्या म्हातार्‍याच्या नजरेतले भाव त्याला व्याकुळ करून गेले. म्हातार्‍याने पोटावरून हात फिरवलेला त्याला कळला आणि त्याला अंदाज आला की हा खायला मागतो आहे. तो पटकन गाडीत शिरला. आजीने मागच्या बाजूला फराळाचा डबा ठेवलेला होता तो त्याला दिसला. त्याने आख्खा डबा त्या म्हातारा म्हातारीच्या समोर ठेवला. दोघांनी अगदी थोडं खाल्लं आणि ढेकर दिली.

"आजोबा, अजून खा ना. आम्ही खूप स्नॅक्स आणले आहेत बरोबर."

"लेकरा, आजोबा म्हन्लास, बरं वाटलं. हाटेलवाला भिकारी म्हन्ला आन तू आजोबा म्हन्तूस. चांगल्या घरचा दिसतूस. द्येव तुजं भलं करंल रं बाबा. म्हातारा म्हातारी किती खानार आमी? बास झालं. प्वॉट भरलं आन मन बी."

दोघं उठले, समीरने हात दिला. तिथून जायच्या आधी म्हातारीने समीरच्या केसांमधून हात फिरवला. स्पर्शाची भाषा समीरला समजावून सांगावी लागली नाही. आतून अर्थ आला. नकळत समीर वाकला आणि त्याने दोघांना नमस्कार केला. म्हातारा म्हातारी चालू पडली... समीर काही तरी वेगळ्याच तृप्तीच्या तंद्रीत हरवला... तेवढ्यात त्याचं लक्ष एकदम देवळाच्या कळसाकडे गेलं... त्याचा एक हात आपोआप उंचावला. तंद्रीतच तो म्हणाला,

"अ‍ॅट लास्ट वी मेट, डूड, अ‍ॅट लास्ट..."

हे सगळं लांबून बघत असलेल्या आजोबांच्या चेहर्‍यावर मात्र गंमतीशीर हसू नव्हतं... त्यांनी हळूच तोंड दुसरीकडे करून पटकन डोळे टिपले. आणि मग परत तेच गंमतीशीर प्रसन्न हसू त्यांच्या चेहर्‍यावर परत आलं.