भेट...

on शुक्रवार, सप्टेंबर ११, २००९

टर्रर्रर्रर्र...

घड्याळानं भोकाड पसरलं आणि अगदी एका सेकंदात आबासाहेबाचा सरावलेला हात गाप्पकिनी त्या घड्याळाच्या डोक्यावर आपटला. घड्याळाचा आवाज बंद. आबासाहेबानं नुसती कूस बदलल्यासारखी केली आणि परत पहाटेच्या गुलाबी थंडीत विरून गेला. खरं तर आबासाहेबाला घड्याळाची गरजच नव्हती. शाळेत असल्यापासून पहाटे ५ वाजता उठायची सवय लागली होती. आणि आता गेल्या १०-१२ वर्षात तर ही सवय इतकी अंगवळणी पडली होती की एकवेळ घड्याळ बंद पडेल पण आबासाहेबाचा डोळा ५ वाजता उघडणार नाही असं होणारच नाही. शाळेत कॉलेजात अभ्यास तरी असायचा, आता तेही नाही, तरीही येतेच जाग. लोळता लोळता आबासाहेबाला परत छान डुलकी लागली. थोड्यावेळानं खिडकीतून ऊन आत, अगदी डोळ्यावर आलं तसं तो एकदम भानावर आल्यागत उठून बसला.

डोळे चोळत त्यानं आजूबाजूला बघितलं आणि एकदम त्याच्या लक्षात आलं की इतकावेळ आपल्या बाजूला सुमी झोपली आहे असं वाटत होतं ते स्वप्नच होतं. एक क्षणभर तो अगदी कावल्यागत झाला. दबा धरून बसलेलं मांजर आता अगदी दूधाच्या पातेल्यावर झडप घालणार आणि तेवढ्यात त्याच्या पाठीत काठी बसावी अस्सं झालं अगदी त्याला. पण मग त्याला स्वतःचंच हसू आलं. आपल्याच हाताने डोक्यावर टपली मारत तो उठला.

'आबासाहेब, हितं कुटली आली सुमी? तुमचे तुमीच हितं. उटा आनि आवरा. ऑफिसला जायला उशिर होतोय.' स्वतःला समजवल्यागत करत तो चटचट आवरायला लागला.

खरंतर आबासाहेबाला जिल्ह्याच्या गावात एकटं राहणं अगदी जीवावर यायचं. कॉलेजात जाईपर्यंत गावात उंडारत आयुष्य काढलेलं त्यानं. अभ्यासात बरा होता म्हणून बापानं हौसेनं शिकायला कॉलेजात धाडलं त्याला. शहराचं आकर्षण असल्यानं आबासाहेबही खुश झाला होता. पण नव्याची नवलाई ओसरल्यावर 'गड्या आपुला गाव बरा...' असंच वाटायला लागलं त्याला. पण इलाज नव्हता. शिक्षण आवश्यक होतंच. त्याचं घराणं खरं तर तालेवार. एके काळी आपली पाचसहाशे एकर शेती होती असं त्याचा बाप त्याला नेहमी सांगायचा. पण पुढे कूळकायद्यात बरीचशी जमीन गमावली, उरलेली भावकीत वाटण्यात गेली आणि अगदी किरकोळ २५-३० एकर तेवढी राहिली हातात. आबासाहेबाच्या आज्ज्यापर्यंत तर घरात सावकारीही होती आणि जमिनदारीही. आख्खं गाव पायापाशी उभं राहत होतं. दरारा एवढा की वाड्यासमोरून जाताना लोक जोडे हातात घेऊन जात होते. पण जमिनी गेल्या, सावकारी संपली आणि दरारा गेला. समानतेच्या लाटेत जमिनदाराचं घराणं भुईसमान झालं. पण आबासाहेबाच्या बापानं, रावसाहेबानं सगळ्यांशी दिलजमाईचं धोरण ठेवल्यानं आन् संबंध राखल्यानं गावात अजूनही थोडाफार मान होता. पंचवीस एकर जमीन तीन भावात वाटल्यावर काय शिल्लक उरणार आन् कोणाची पोटं भरणार या विचारानं आबासाहेब कॉलेज संपल्यावर तिथं जिल्ह्यालाच नोकरी धरून राहिला. बर्‍यापैकी चेहरामोहरा आणि चालणारं डोकं या बळावर लवकरच तो नोकरीतही व्यवस्थित स्थिरस्थावर झाला.

गाव तसं फार लांब नव्हतं. एस्टीनं चारेक तासच. पण दर एक दोन दिवसाआड कोणी ना कोणी तरी यायचंच तिथून काहीबाही कामासाठी. त्यांच्याबरोबर माय पाठवायची काहीतरी. कधी भाजी, कधी घरचं तूप, कधी नुसतंच पत्र असं चालायचं. त्यामुळे आबासाहेबाला जरा थंडावा मिळायचा. पंधरा दिवसातून एखादी चक्कर तो स्वतः मारायचा. पण सहा महिन्याखाली लगिन झालं, सुमी आयुष्यात आली आन् आबासाहेबाला करमंना झालं शहरात. बरं सुमीला हिकडं आनावं म्हनावं तर ते पण बरुबर दिसंना. त्यानं एकदा नुसतं हळूच विषय काढायचा प्रयत्न केला तर चुलती फिस्सकनी अंगावर आली त्याच्या.

"मोठी सून हाये ती. येवडी वर्सं तुझ्या मायनं केलं समद्यांचं आन् तू घेऊन चालला लगी तिला. तितं राजा-रानी र्‍हावा मजेत आन् हितं म्हातारा म्हातारी करतेतच अजून दुसर्‍यांचं."

सगळ्या बायका फिदीफिदी हसल्या होत्या. आबासाहेबाला कुटं तोंड लपवावं असं झालं होतं. सुमी पण मान खाली घालून पदर तोंडात धरून हसत होती. त्यानं तर अजूनच चिडला होता आबासाहेब. पण नंतर सुमीनंच समजूत काढली होती त्याची. असं वागणं शोभून दिसणार नाही, आपल्याला चार लोकांत रहायचं आहे, थोडं दमानं घ्या. थोडे दिवस जाऊ द्या मग हळूच जमवून आणू आपण, असं समजवल्यावर आबासाहेबाला पण हुरूप आला. अशी समजूतदार बायकू मिळाल्याबद्दल त्यानं खंडोबाला मनोमन नमस्कार घातला. आणि नाईलाजाने का होईना पण नोकरीच्या गावी रुजू झाला. तेव्हापासून हे असं चालू होतं.

आत्तासुध्दा तोंड धुताना, दाढी करताना आरशासमोर उभं राहिल्यावर त्याला सुमीच दिसत होती. पण आता पुढची चक्कर आलीच आहे चार पाच दिवसांवर या विचाराने त्याने मनाला लगाम घातला आणि निमूटपणे आवरून ऑफिसच्या रस्त्याला लागला. पण आज काय त्याचं चित्त थार्‍यावर येईना. सारखी सुमीची आठवन यायलागली. कसातरी ऑफिसात पोचला आणि मग मात्र जरा ते मागं पडलं. नेमका दुपारी गावाकडचा कैलास ऑफिसात हजर. आबासाहेबाला अगदी तापल्या रानावर हलकेच पाऊस पडून जावं तसं झालं. आज लई आटवन यायलागली होती आन् आला बाबा हा कैलास. कैलास तर त्याच्याच वयाचा, शाळूसोबती. चार घटका त्याच्या संगतीत घालवल्यावर आबासाहेब शांत झाला. कैलासनं रावसाहेबांची चिठ्ठी आणल्याली. त्यानं गडबडीनं पाकिट फोडलं. त्यातनं दोन कागद निघाले. नेहमी चार ओळी लिहिणार्‍या रावसाहेबांनी आज चक्क २ पानांचं पत्र लिहिलंय!!! त्यानं कागद समोर धरला. त्यात लिहिलेलं,

चिरंजीव आबासाहेबांस,

अनेक आशिर्वाद, उपरी विशेष. सध्या गावात थोडीफार थंडीतापाची साथ चालू आहे, बरेच लोक आजारी आहेत. चार पाच मयती झाल्या आहेत. तरी आम्ही सगळे रानात रहायला जात आहोत. खबरदारी म्हणून. घरात कोणासही त्रास नाही. महादा राखणीला म्हणून राहिल वाड्यावर.

बाकी क्षेम. काळजी नसावी. यावेळचे येणे थोडे लांबवता आले तर उत्तम. काळजी घ्या, तब्येतीला जपा.

रावसाहेब.


आबासाहेबाने घाईघाईने दुसरा कागद उलगडला. त्यात लिहिलं होतं,

आवो, या ना.

सुमी


आधीच आज आबासाहेबाचं चित्त भरकटलं होतं, आता तर पार ढेपाळलाच गडी. कैलासनेच जरा समजूत घालून शांत केले त्याला. गावात तशी काही फार गंभीर परिस्थिती नाहीये. काळजी घेतली तर आटोक्यात येईल. आबासाहेबाला नीट समजवून कैलास निघून गेला. आबासाहेबाला मात्र काही गोड लागेना. त्याची पंचाईतच झाली होती. ऑफिसचं इनिस्पेक्शन दोन दिवसावर आल्यालं, रजा घेता येईना. आन् गावात फोन तरी कुटं करनार. आख्ख्या गावात फक्त दोन फोन. एक पंचायतीच्या कार्यालयात आन् दुसरा पतपेढीच्या कार्यालयात. जरी केला फोन तरी तिथं सुमी कशी येणार? मोठ्या मुश्किलीने त्याने कसेबसे दोन दिवस घालवले. घालमेल चालूच होती. तिसर्‍या दिवशी संध्याकाळी ऑफिस बंद व्ह्यायच्या वेळी नेमका फोन आला.

'हॅलो, कोण?'

'आवो...'

'सुमे.... तू?'

आबासाहेब हातभर उडालाच. आत्ता या वेळेला सुमीचा फोन? आन् ती कशी काय फोन करतीये? कुठनं?

'आवो, ओरडू नका. मला लै आटवन यायलागली. म्हनून म्हादूकाकाला सांगाती घेऊन आले मी हितं पंचायतीच्या हापिसात. तुमी या ना.'

'अगं पण आत्ता संध्याकाळ व्हायलीये... गाडी गेली आसंल. आता कसं निगू?'

'ते काय मला माहित नाय. तुमी या मंजी या. आन् ऐका, रानात कोनीच न्हाय. समदे आत्याबाईकडे गेले हायेत आज दुपारच्याला. मी उगाच कंबर धरल्याचं नाटक करून मागं र्‍हायले. रानात येकटी नको म्हनून आज वाड्यावरच हाय, महादूकाका हाय सोबतीला. बरं मी ठिवते फोन, लोकं बघायलेत.' सुमीनं धाडधाड गाडी सोडून फोन बंद केला सुध्दा.

आबासाहेब खुळ्यागत बघतच राहिला. आता काय करावं? कसं जावं? आज मात्र त्याला स्वतःला आवरता येत नव्हते. आलंच नाही. इनिस्पेक्शनही झालंच होतं. त्याने साहेबाला २ दिवसाच्या रजेचा अर्ज दिला आणि तडक दिलप्याच्या घरी थडकला. दिलप्या त्याचा कॉलेजपासूनचा दोस्त. मारवाड्याचा. घरी तीनचार मोटरसायकली वगैरे बाळगून असणारा.

'दिलप्या लेका एक काम कर रे माजं...'

'आरं बोल की... '

'तुझी गाडी दे मला दोन तीन दिवसांकरता. आर्जंट गावी जाऊन यायचंय. सुमीचा फोन आला होता ल्येका... आता काय मला दम न्हाय बघ. गाडी दे नाहीतर चालत जातू बघ मी.'

'मायला आब्या, आसं इचारून गाडी घेऊन जायची वाईट चाल कधी पासून पडली रं आपल्यात? आँ? धर ही चावी आन् सूट. नेमका आजच टँक फुल्ल केलाय. नीट ग्येलास तर आकरा बारा पर्यंत पोचशील पण. ये निवांत, सगळं आटपून', डोळा घालत दिलप्या म्हणाला.

तिथेच चहा नाश्ता करून आबासाहेब थेट निघालाच. अंधार आणि हायवेची रहदारी. आबासाहेब अगदी जपूनच चालवत होता गाडी. गाव जवळ आलं, दिवे दिसायला लागले. आबासाहेब गावात शिरला तेव्हा साडेअकरा वाजून गेले होते. गाव अगदी शांत होतं. उगाच कोण चुकार भेटला तर चौकशा नकोत म्हणून आबासाहेब, थोडा आडवाटेनंच गावात शिरला आणि थेट वाड्यासमोरच गाडी लावली. वाड्यात उजेड दिसत होता. त्याने गाडी बंद करायच्या आतच दार उघडलं गेलं. दारात स्वतः सुमीच होती. आबासाहेब आत शिरला तशी तिनं पटकन दरवाजा लोटून दिला. सोप्यात आल्यावर तिथल्या उजेडात त्याने सुमीला बघितलं आणि बघतच राहिला. लग्नातही सजली नव्हती तशी सजून सुमी त्याच्या स्वागतासाठी वाट बघत होती. आबासाहेबाला एवढा शीण करून आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. चारपाच तास मोटारसायकलवर रात्रीच्या अंधारात हायवेवरून यायचं म्हणजे काय चेष्टा नाही. त्याचं अंग अगदी मोडून गेलं होतं. पण सुमीला बघून त्याला अगदी राहवेना,

'सुमे, काय गं? आज काय पेश्शल बेत हाय का काय?'

'तर, मी येवडं प्रेमानं बोलावलं आन् तुमी धावत आलेत मंग पेश्शल खातिरदारी नकू का?'

'सुमे, माझा तर इश्वासच बसंना गं!!! दुपारधरून कासावीस झालो होतो बघ. कोन तरी ओढतंय आसं होत होतं बघ. तुझा फोन येई पर्यंत वाटलं पन नव्हतं की रात्री मी हितं असेन. तुझ्याबरूबर.'

'आसंच आसतंय. कधी काय व्हईल काय सांगावं? आन् आसं अचानक भेटन्यातच गंमत जास्त आसती.'

'आगं पन एकटीच कशी तू? म्हादूकाका कुटं हाये? तू म्हनाली व्हतीस की त्यो पन हाये सोबतीला.'

'आवो हितंच होता की. गेला आसंल मागं गोठ्यात. मी बगते त्याला.'

'बरं, आदी च्या कर गं फस्क्लास. जेवायचं बगू नंतर. तशीबी जेवनाची भूक न्हाईच मला फारशी.' आबासाहेब सुमीकडं रोखून बघत म्हणाला.

'चला...' लाजून हसत हसत सुमी आत मधे पळाली.

आबासाहेब पटकन हातपाय धून कापडं बदलून एकदम हुश्शार होऊन चुलीपाशी सुमी जवळ पाटावर येऊन बसला. सुमी पुढ्यात च्याचा कप घेऊन बसली होती. कसल्यातरी तंद्रीत होती जनू. तो येऊन बसल्याचंही तिला कळलं नाही. निवांत बसत तो भिंतीला टेकला.

'ए सुमे, काय झालं गं? कसला विचार करतेस एवढा? आन तो च्या इकडं.' कप हातात घेत तो म्हणाला. तिला हळूच हलवलं त्याने. सुमी भानावर आली,

'मी काय म्हंते, आता परत जाऊच नका. हितंच र्‍हावा. काय आसंल ते आपन गोड करून खाऊ. पन आता दूर नाही र्‍हानार मी.'

'शाब्बास गं माज्जी रान्नी!!! आदी कोन बोलत होतं? तुमी जावा, मी र्‍हाते, हळूहळू येईन मी तिकडं. आन् आता काय झालं?'

'व्हय हो... मीच म्हनलं होतं. पन आता येगळं हाय. आता न्हाय जमनार तसं. तुमी हितंच र्‍हावा.' त्याच्या कुशीत शिरून सुमी मुसमुसत म्हणाली. तिच्या डोळ्याला ज्या धारा लागल्या त्या थांबेचनात. बराच वेळ आबासाहेब तिला समजवत राहिला. पण रडणं काही कमी होईना. शेवटी आबासाहेब उगाच तिचं लक्ष हटवायला काहीतरी म्हणायचं म्हणून म्हणाला,

'आर्रर्र, च्यात साखर कमी झाली बघ. तो डबा घे जरा साखरंचा.'

त्याच तंद्रीत सुमीनं हात लांब करून फडताळाच्या अगदी वरच्या फळीवर असलेला साखरेचा डबा अल्लाद उचलला आन् आबासाहेबाच्या पुढ्यात ठेवला. क्षणभर आबासाहेबाला काहीतरी चुकतंय, काहीतरी विचित्र घडतंय असं वाटलं पण नीट कळेना. तेवढ्यात त्याच्या ध्यानात आलं. जमिनीवर बसलेल्या सुमीनं हात लांब लांब लांब करत नेऊन फडताळाच्या अगदी वर म्हणजे अगदी चार पाच फूट लांब असलेला साखरंचा डबा उचललाच कसा. त्याला काहीतरी जाणवलं. तो ताडकन् उठला आणि जीवाच्या आकांताने पळत सुटला. मागनं सुमीचा आवाज आला,

'आवो, कुटं जाताय? पळू नका. थांबा.'

आबासाहेब कुठला थांबायला. पळत पळत तो सोप्यापर्यंत आला. तेवढ्यात त्याला समोर सुमी उभी दिसली. तशीच सुंदर, नटलेली. चेहर्‍यावर गोड हसू. शांतपणे उभी. तो तिच्याकडे बघतच राहिला.

'मला सोडून जाताय? नका ना. आता नाही राहणार मी तुमच्याशिवाय. तुम्ही आणि मी. आपण दोघंच. बाकी कुण्णी कुण्णी नाही. या ना...' ती दोन्ही हात पसरत म्हणाली.

भारावल्यासारखा आबासाहेब हळूहळू पुढे सरकला. सुमीच्या सान्निध्यात त्याला आता शांत वाटत होतं. त्याने स्वतःला झोकून दिलं आणि तिच्या मिठीत विरघळून गेला.

****

'हवालदार, बॉडीची पोझिशन नीट आखून घ्या. फोटोग्राफर आलाय ना? तेही उरकून घ्या. आणि नातेवाईक कुठे आहेत?'

'साहेब, ते सगळे रानात होते, वाड्यात कोणीच नव्हतं. आत्ताच आलेत, तिथे चौकीत बसवून ठेवलं आहे त्यांना. हे अजून सांगितलेलं नाहीये साहेब त्यांना.'

'का?'

'सकाळी वाड्याचं दार अर्धवट उघडं दिसलं आणि बाहेर ही गाडी दिसली म्हणून लोकं डोकावले तर बॉडी दिसली. लगोलग सांगावा धाडला. तर काल संध्याकाळीच या इसमाची बायको मयत झाली होती साहेब. काल सकाळपासूनच अचानक तापानं फणफणली होती. साथ चालूच आहे साहेब गावात. संध्याकाळी झोपली तर घरच्यांना वाटलं की शांत पडली आहे, सकाळी पत्ता लागला, बहुतेक संध्याकाळीच आटोपली असणार. काय भानगड आहे कळेना साहेब.'

समाप्त