माझं खोबार... भाग १ , ... भाग २ , ... भाग ३ , ... भाग ४ , ... भाग ५
*************
मंडळी, खोबारबद्दल मी लिहायला लागलो आणि पटापट पहिले ५ भाग लिहून झाले. तुम्हा सगळ्यांना ते आवडले हे येणार्या प्रतिसादांवरूनच कळतंय. ६व्या भागाला अंमळ उशिरच झाला. त्याबद्दल क्षमस्व. बर्याच जणांनी वैयक्तिकरित्या 'पुढचा भाग कधी?' अशी विचारणा केली. त्याबद्दल खरंच आभारी आहे. आता पुढचा भाग टाकतो आहे.
*************
मूळात मला वेगवेगळ्या धर्मांबद्दल, संस्कृतिंबद्दल, लोकांबद्दल कुतूहल फार आहे. पण त्या दिवशी हा प्रकार बघितल्यावर मनात आलं, "नक्की कसे आहेत हे लोक? काय म्हणतो यांचा धर्म? खरंच का असं काही आहे त्याच्यात? जाणून घेतलंच पाहिजे." आणि हळूहळू मी त्याबद्दल वाचायला लागलो. लोकांना प्रश्न विचारायला लागलो.
*************
सुरूवातीच्या सगळ्या धक्क्यांनंतर मात्र माझे काम आणि रूटीन चालू झाले. ज्या कस्टमरकडे माझे काम सुरू झाले त्याचे ऑफिस माझ्या राहण्याच्या जागे पासून जवळ जवळ ५० कि.मी. दूर होते. सुरूवातीला काही दिवस कंपनीचा ड्रायव्हर गाडी घेऊन सोडायला येत असे. पण नंतर कामाच्या दाबामुळे त्याच्या वेळा पाळणे मलाच अशक्य व्हायला लागले. त्यामुळे मी स्वतंत्रपणे जायला सुरूवात केली. ह्यामुळे माझा खूप मोठा फायदा झाला. सौदीतल्या सर्वसामान्य माणसांशी (स्थानिक, भारतिय, पाकिस्तानी, इजिप्शियन, फिलिपिनो असे सगळेच त्यात आले) माझा खूप जवळून संबंध यायला लागला. स्थानिक टॅक्सीचालकांबरोबर बोलायचे असेल तर त्यांच्याच भाषेत बोलावे लागे. कमीत कमी कामापुरते तरी. (ते काही मराठी नव्हते, माझ्याशी माझ्या भाषेत किंवा इंग्लिश मधे बोलायला :) ) गंमत म्हणजे मला पाकिस्तानी टॅक्सीचालक भेटला की अतिशय आनंद आणि बरे वाटत असे!!! कारण हेच की त्याची माझी हिंदी / उर्दू ही कॉमन भाषा होऊ शकत असे. पण एखादा भारतिय टॅक्सीचालक भेटला तर तो ९९% मल्याळी असे. आणि त्यातल्या बव्हंशी लोकांची, जगात फक्त दोनच भाषा आहेत, मल्याळम आणि अरबी (इन दॅट ऑर्डर) अशी ठाम समजून असे. काही जणांना कामचलाउ इंग्लिश येत असे. आणि हिंदी येणारा मल्याळी टॅक्सीड्रायव्हर म्हणजे त्यांच्यातला अतिशय विद्वान वगैरे म्हणत असतिल.
तर अशी परिस्थिति आल्यामुळे मला हळू हळू अरबी भाषा शिकावीच लागेल हे जाणवले. मला तसाही निरनिराळ्या भाषा शिकायचा नाद होताच. मी सतत रस्त्यांवरून जाता येता दुकानांवरच्या, रस्त्यांवरच्या पाट्यांवर लक्ष ठेवायला लागलो. लागलो म्हणण्यापेक्षा माझे लक्ष आपोआप त्यात गुंतायचे. ह्या पाट्या बहुधा अरबी आणि इंग्लिश अश्या दोन्ही भाषेत असत, त्यामुळे एखादा शब्द अरबी लिपित कसा लिहिला जातो हे मला कळत असे. हळू हळू अरबी भाषेतली अक्षरे आणि त्यांचे आकार माझ्या बर्यापै़की ओळखीचे झाले. बरेच शब्द मी अंदाजाने ओळखू लागलो. मग मला हा चाळाच लागला. हळू हळू मी आधी अरबी शब्द वाचून मग इंग्लिश मधे काय लिहिले आहे हे बघायाला लागलो. त्यातही मला बर्यापैकी यश मिळायला लागले. पण बर्याच वेळा अंदाज चुकत पण असत. पण ते का ते कळत नसे. माझे अरबी भाषेबद्दलचे कुतूहल चाळवायला अजून एक घटना कारणीभूत झाली.
मी जिथे रहायचो तिथेच एक 'बेड्स' (गाद्या) विकायचे दुकान होते. एक दिवस त्या दुकानाकडे माझे लक्ष गेले आणि 'गादी' ला काय शब्द आहे ते बघू म्हणून मी तो अरबी शब्द वाचला. तो होता चक्क 'मरातब' ..... आपण मराठीमधे 'मान मरातब' म्हणतो चक्क तोच शब्द!!! माझ्या आनंदमिश्रित आश्चर्याला भरतीच आली एकदम. एका परक्या मुलुखात, स्वकियांपासून लांब असताना, कानावर मराठीचे एक अक्षरही पडत नसताना चक्क एक आपल्या ओळखीचा शब्द अचानक वाचला जावा? मला एखादा मित्र खूप दिवसांनी अचानक अनोळख्या गावी भेटावा आणि आपल्याला त्याचा आधार वाटावा असं काहीसं झालं. त्या घटनेमुळे तर मी आता अरबी वाचायला शिकायचंच असं ठरवलं. आता पर्यंत बरीचशी मूळाक्षरं कळली होती. आणि अरबी लिपित प्रत्येक अक्षराचा आकार, ते अक्षर शब्दात सुरूवातीला, मधे की शेवटी आहे त्यावरून ठरतो. त्यामुळे माझा प्रथम खूप गोंधळ व्हायचा पण हळू हळू कळत गेलं. पण आता ठरवलं की एखादा गुरू पकडायचा आणि थोडं नीट शिकायचं. माझ्या कस्टमरकडे एक इजिप्शियन होता. त्याची माझी थोडी ओळख झाली होती. आणि तो अरबी - इंग्लिश भाषांतराचंच काम करायचा त्यामुळे त्याच्याशी नीट बोलता यायचं. दुसर्याच दिवशी मी त्याच्याकडे गेलो. त्याला सांगितलं की मला सगळी मूळाक्षरं आणि त्यांचे आकार / नियम वगैरे सांग. एक भारतिय (मुस्लिम नसूनसुद्धा) एवढा रस घेऊन अरबी शिकायचं म्हणातोय बघितल्यावर तो भलताच खूष झाला. त्याने लगेच एका कागदावर मला सगळे लिहून दिले आणि समजावून सांगितले. माझ्या साठी तेवढे पुरे होते. मग तर माझा रस्त्यावरून जाता येता अरबी वाचायचा नाद खूपच वाढला आणि हळू हळू मला ते शब्द आणि त्यांचे साधारण उच्चार कळायला लागले.
आता तर माझी अवस्था चोरांच्या गुहेत अचानक अवाढव्य धन सापडलेल्या अलिबाबासारखीच झाली. नविन नविन शब्द कळायला लागले. आणि आश्चर्य म्हणजे त्यातले खूपसे शब्द मला चांगलेच ओळखीचे होते. काही शब्दांचे अर्थ अरबीत अगदी 'शेम टू शेम' होते तर काही शब्दांचे अर्थ मराठीत पोचे पोचे पर्यंत काहितरी भलतेच झाले होते. वाचताना मजा यायची. 'खराब' हा एक अस्सल अरबी शब्द. आपण ज्या अर्थाने वापरतो त्याच अर्थाने अरबीत वापरला जातो. तसाच शब्द म्हणजे 'गलत' ... अर्थ तोच. पण 'रकम' हा शब्द आपण रक्कम म्हणजे अमाउंट असा वापरतो तर अरबीत त्याचा मूळ अर्थ आहे 'संख्या' (नंबर) आणि तो 'क्रमांक' ह्या अर्थाने पण वापरला जातो. आपल्याला जर का 'राँग नंबर' आला, तर आपण म्हणायचे 'रकम गलतान', सोप्पं एकदम. आपण 'तमाम' हा शब्द 'खतम' / 'पूर्ण' असा वापरतो. पण मूळ अरबी अर्थ मात्र 'ठीक' असा आहे!!! म्हणजे कोणी आपल्याला 'केफ हाल?' (कसे आहात? .... बघा हाल हा शब्द पण आपण हिंदी / उर्दूत तसाच वापरतो) तर आपण म्हणायचं, 'तमाम. अलहमदुलिल्लाह.' किंवा तो समोरचाच विचारताना विचारतो 'केफ हाल? तमाम?' (कसे आहात? ठीक ना?) ... मग आपण नुस्तं म्हणायचं, 'अलहमदुलिल्लाह' (देवाच्या दयेने). अजून एक शब्द म्हणजे 'बरकत'. हा शब्द पण डिट्टो त्याच अर्थाने. अरबी भाषेत कोणालाही, अगदी अनोळखी माणसाला पण 'सलाम आलेकुम' करायची पद्धत आहे. समजा आपण लिफ्ट मधे आहोत आणि दुसरा एखादा लिफ्ट मधे शिरतो, तर 'सलाम आलेकुम' आवश्यकच. आपण आपल्या सवयीप्रमाणे गप्प राहतो पण ते अपमानास्पद असतं. एक तर आपणच आधी म्हणायला पाहिजे किंवा त्याने म्हणलं तर 'आलेकुम सलाम' म्हणून प्रत्युत्तर करणं भागच आहे. कोणत्याही अधिकृत पत्राचा मायना, 'सलाम आलेकुम व रहमतुल्लाह व बरकतु' असाच होणार. मंडळी ह्या वाक्यातला 'व' बघितलात? आपण मराठीत 'व' हे अक्षर जसे दोन शब्दांना जोडणारे (अव्यय) म्हणून वापरतो अगदी तोच प्रकार. (मला वाटते मराठी 'व' हा अरबी /फारसीचाच प्रभाव आहे.) मला दर महिन्याला माझ्या बँकेचं 'बयान' (स्टेटमेंट) येत असे. बँकेत किंवा इमिग्रेशनला रांग लावयची असली की तिथे 'इंतधार' (इंतझार) करायला सांगत. अरबी भाषेत 'धाल' नावाचं एक मुळाक्षर आहे, त्याचा उच्चार फारसी मधे (आणि म्हणून उर्दू) मधे 'झ' असा होतो. म्हणून अरबी 'इंतधार', 'रमधान', 'रियाध' आपल्या कडे 'इंतझार', 'रमझान', 'रियाझ' असे होऊन येतात. मी कधी बरं नसेल तर हॉस्पिटल (मुस्तश्फा) मधे 'मरिध' (मरिझ) म्हणून जाऊन 'तबीब' (डॉ़क्टर, हा शब्द आता नाही पण पूर्वी प्रचलित होता आपल्याकडे, धारवाडकडचे एक 'तबीब' आडनावाचे एक ब्राह्मण कुटुंब पण आहे माझ्या माहितीचे) कडून 'इलाज' करून घ्यायचो. आजारपण 'खलास' झाले की परत कामावर जायला लागायचो. माझ्या व्हिसाला किंवा पासपोर्टला 'मुदत' असायची, ती 'खलास' झाली की तो रिन्यू करावा लागायचा. कोणत्याही सार्वजनिक स्थळी मला 'शुरता' (पोलिस) ची भिती असायची. कारण तिकडे 'कानून' एकदम कडक आणि त्याची अंमलबजावणी पण कडक. वर्षातून दोन वेळा 'इद' ची सुट्टी असायची त्याची नोटीस यायची ती अरबी मधे 'ऐलान' असायची. एखाद्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर 'इन - आउट' मधे 'इन' च्या जागी 'दखल' हा शब्द असे. अशी किती उदाहरणं द्यायची? हळू हळू मला असे खूप ओळखीचे मित्र भेटत गेले आणि अरबी भाषा अधिकाधिक समजत गेली.
पण हे सगळं छापिल भाषेबद्दल बरं का. भाषा समजायला लागली पण नीट बोलता पण आली पाहिजे ना. मग मी जाता येता टॅक्सी ड्रायव्हर्स बरोबर गप्पा मारायचा प्रयत्न करायचो. तोडकं मोडकं जमायला लागलं. अरबी भाषेतले आकडे वाचायला येतच होते पण म्हणता सुद्धा यायल्या लागल्या. (१ वाहेद, २ इथनेन, ३ तलाता, ४ अरबा, ५ खमसा, ६ सित्ता, ७ सबाह, ८ तमानिया, ९ तिस्सा'आ, १० आशरा) गोंधळ पण व्हायचे. एकदा मी एका टॅक्सीवाल्याला 'अरबाईन' (४०) ऐवजी अरबाता'आशर (१४) रियाल दिले. तो मला सांगत होता पण माझ्या अरबी भाषेच्या ज्ञानावर माझा तो पर्यंत बराचसा विश्वास बसलेला असल्या मुळे मी पण त्याला उलट काहितरी सांगत होता. बिचारा भला होता. त्याने दुसर्या एका पाकिस्तानी टॅक्सीवाल्याला थांबवून माझ्या ज्ञानाचे करेक्शन करून मला योग्य मार्ग दाखवला. पण असे गंमतिदार प्रसंग घडायचे आणि मग तो धडा मी नीट लक्षात ठेवायचो.
मला कामानिमित्त जितके अरबी लोक भेटायचे त्या बहुतेकांना इंग्लिश नीटच यायचं. ते पॅलेस्टिनी वगैरे असले तर काही विचारूच नका. त्यांना भारताबद्दल एक विशेष ममत्व असायचं. बहुतेकांची शिक्षणं भारतातच झालेली असायची. पुणे, मुंबई, बंगलोर ही ठिकाणं ठरलेली. त्यांच्या आयुष्याची काही उभारीची उमेदीची वर्षं त्यांनी तिथे घालवलेली असायची. काही लोकांना तोडकं मोडकं हिंदी, मराठी, कन्नडा वगैरे स्थानिक भाषांचं पण ज्ञान असायचं. एका पॅलेस्टिनियन माणसाने तर 'मला लागली कुणाची उचकी' हे गाणं त्यातल्या उचकी सकट म्हणून दाखवलं होतं. अर्थात ते गाणं त्या उचकी मुळेच मला कळलं, नाही तर त्याच्या त्या भयंकर उच्चारांमुळे ते गाणं मला बापजन्मात कळलं नसतं. त्याने चालीचीही बर्यापैकी काशी केली असल्याने, गाणं ओळखीचं तर वाटत होतं पण शेवटची 'हिक्' येई पर्यंत काही कळत नव्हतं. मग मी ते त्याला नीट (म्हणजे फक्त शब्द नीट, चाल नीट, सूर झीट आणणारे) म्हणून दाखवलं. त्याने (तो एका कस्टमरकडे होता आमच्या) खूष होऊन मला माझ्या प्रोजेक्ट संबंधित कागदावर त्याची सही हवी होती ती फक्त २५% खळखळ करून दिली. अजून एक भेटला. त्याचे शिक्षण बहुतेक बंगलोर का मैसूरला झाले होते. मी भारतिय आहे म्हणल्यावर त्याचा पार गोळाच झाला. त्याला त्याच्या कॉलेज मधल्या सगळ्या आठवणी आल्या. त्याचा 'मुकुंद जोशी'च झाला पार. त्याची सगळी 'शाळा' (त्यातल्या सुर्या, केवडा आणि 'शिरोडकर' सकट) ऐकावी लागली मला.
अरबी माणसं पण अगदी आपल्या कडच्या रामभाऊ, जनूभाऊंसारखी अगदी अघळ पघळ. एकमेकांना बर्यापैकी ओळखणारे दोन अरब भेटले की होणारा सोहळा बघण्यासारखा असतो. ह्या सोहळ्याच्या काही ठराविक स्टेप्स आहेत. म्हणजे आपल्याकडे कसं गणपा हणमंताकडे काही काम घेऊन गेला की एकदम कामाचं बोलत नाही, आधी पाउसपाण्याबद्दल बोलणं होतं. मग घरची वास्तपूस्त होते. गुदस्ता लग्न झालेली सरोज कशी आहे त्याची आस्थेनं चौकशी होते, नविन तलाठी कसा हरी पत्ती पाह्यल्याशिवाय कागदाला हातच लावत नाही वगैरे वगैरे गप्पा झाल्या की मग पुढचं. आमचे अरबी गणपा / हणम्या पण थेट असेच. दोघं भेटले की आधी दोघं गालाला गाल लावणार. दोन्ही गाल आळीपाळीने. किती वेळा ते संबंध किती दृढ आणि गरजेचे आहेत त्यावर डायरेक्टली अवलंबून. अगदी ४-५ वेळा पण. मग कधी तरी नाकाच्या शेंड्याला नाकाचा शेंडा लावायचा. मग गाडी सुरू. केफ हाल? केफ सहात? (सहात = सेहत = तब्येत... बाय द वे तब्येत हा पण अरबोद्भव शब्दच.) केफ आयले'ए? (कुटंब कसं आहे?) केफ अवलादात? (पोरं बाळं कशी आहेत?) अशी प्रश्नमालिका, अजून बरेच आहे, आता विसरलो. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तो दुसरा अरब 'तमाम', 'अलहमदुलिल्लाह' अशी देत जाणार. मग तो दुसरा अरब पहिल्याला हेच सगळे प्रश्न विचारणार आणि पहिला अशीच उत्तरं देणार. ही झाली सुरूवात. मग नीट स्थानापन्न व्हायचं. (बूटाची टोकं किंवा पायाचे तळवे त्याच्या दिशेला न रोखता). आता आग्रह चहापाण्याचा, सिगारेटचा. (घ्या हो वाईच घोट घोट च्या. च्या टाक गं आन्शे!!!, फक्त (हाही साला अरबी शब्द, अगदी सेम अर्थ, 'ओन्ली') इथे 'आंशी'च्या ऐवजी एखादा भारतिय / बांग्लादेशी बॉय यायचा :) ) असा सगळा प्रकार आटोपला की मग हळूऽऽऽच गाडी मुख्य विषयावर न्यायची. ती सुध्दा आडून आडून. आपल्या भारतिय मनाला ह्या गोष्टींची सवय असल्याने तिथे रूळायला फार त्रास होत नाही. पण पाश्चात्य लोक मात्र पुरतेच गोंधळलेले असतात सुरूवातीला. अर्थात ते लोक नेहमी खूप मोठ्या अधिकाराच्या जागेवरच असतात त्यामुळे त्यांना इतका त्रासही होत नाही.
पण भाषेच्या आणि काही सामाजिक आचारांच्या बाबतीत इतका जवळ वाटणारा अरब, धार्मिक वगैरे बाबती एकंदरीत कडवेपणा जपून असतो. विशेषतः मुस्लिमेतरांना तर तो खूपच जाणवतो. अर्थात हा कडवेपणा स्थलकालव्यक्ति सापेक्ष बदलतोच. पण मूलतः कडवेपणा आहेच. पूर्णपणे नास्तिक असलेला अरब अजून तरी माझ्या पाहण्यात नाही. भले एखादा अरब रोज पाच वेळा 'सलाह' करत नसेल, दारू वगैरे पीत असेल, फारसा धार्मिक नसेल पण तो बहुतेक शुक्रवारी तरी जाईलच नमाजाला. रमदानमधे न चुकता रोझे ठेवेल. 'झकात' भरेल. तिथे बहुतेक वेळा तडजोड नसते. मी वर म्हणल्याप्रमाणे जरी हे वेगळेपण मुस्लिमेतरांना विशेषत्वाने जाणवत असले तरी अरब नसलेल्या मुसलमानांना पण ते बरेच जाणवते. जगात इस्लाम जिथे जिथे पोचला तिथे तिथे त्याने स्थानिक चालीरितींचा एक सहज असा स्वीकार केला आहे. एखाद्या भारतिय, पाकिस्तानी किंवा इंडोनेशियन मुस्लिम व्यक्तिला जी धर्माची ओळख असते ती सौदी अरेबियात आल्यावर पूर्णपणे नाही तरी बर्यापैकी घुसळून निघते. धर्माचे हे वेगळे रूप पाहून तो अस्वस्थ होतो. आजपर्यंत धार्मिकतेत अंतर्भाव असणार्या किती तरी प्रथा / गोष्टी ह्या अतिशय वाईट आहेत, पाप आहेत, पीर, दर्गे, ताईत, पैगंबरांची भक्ति करणे, त्यांच्या स्तुतिपर कव्वाल्या गाणे वगैरे अनिष्ट चाली आहेत हे जेव्हा त्याच्या वाचनात येते तेव्हा तो हादरतो. त्यातले जे पापभीरू, धर्मभीरू असतात (म्हणजेच बहुसंख्य) ते आधीच 'धर्मभूमीत' आल्या मुळे भारावलेले असतात. तिथे आपला धर्म अगदी शुद्ध स्वरूपात असणार असेच ते धरून चालतात आणि हळूहळू समरस होतात. जे कुंपणावरचे असतात ते हळूहळू इतरांच्या दबावाने आत पडतात. फार कमी लोक मी बघितले की जे डोळसपणे विचार करतात आणि तो डोळसपणा टिकवून ठेवू शकतात. पण हे सगळं वैयक्तिक पातळीवर. समाजात वावरताना त्यांना थोडंफार बदलावंच लागतं.
इस्लाम मधील ह्या कडवेपणाबद्दल किंवा एकंदरीत इस्लामबद्दलच मला पहिल्यापासूनच एक कुतूहल वाटत आले आहे. सौदी अरेबियाला जायच्या आधी पण मी बर्यापैकी माहिती बाळगून होतो. पण इथे मात्र इस्लामचे एक वेगळे रूप आणि साधनांची उपलब्धता असल्याने मी ह्या धर्माबद्दल नीट माहिती करून घ्यायचं ठरवलं.
इस्लामची दोन सगळ्यात मोठी श्रध्दास्थानं
इस्लाम हा जगातील तीन 'अब्राहामिक' धर्मांपैकी एक. अब्राहमिक म्हणजे ज्याची प्रेषितपरंपरा अब्राहम (इब्राहिम) पासून सुरू होते असा धर्म. सर्वशक्तिमान दयाळू इश्वराने धर्माचे ज्ञान पहिल्यांदा अब्राहमला करून दिले. त्याने ते त्याच्या मुलाबाळांना शिकवले. कालपरत्वे त्या धर्माचरणामधे विकृति येत गेल्या म्हणून इश्वराने वेळोवेळी त्याचे दूत (प्रेषित) त्या विकृति दूर करण्यासाठी पाठवले. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मातली प्रेषित परंपरा जवळजवळ सारखीच आहे. ज्यूंची परंपरा मोझेस (मुसा) बरोबर संपते, ख्रिश्चनांची येशू (इसा) बरोबर संपते आणि मुस्लिम हे मानतात की मुहंमद हे शेवटचे आणि सगळ्यात परिपूर्ण प्रेषित. त्यांनी धर्म शुद्ध आणि परिपूर्ण स्वरूपात प्रस्थापित केला आणि म्हणूनच आता ह्या पुढे त्यांनी सांगितलेल्या धर्माचारात एवढीशीही ढवळाढवळ होऊ शकत नाही. त्यांच्या आधी आलेल्या सगळ्या प्रेषितांबद्दल (मुसा इसा सकट !!!) इस्लामला पूर्ण आदर आहे. पण मुहंमद ते मुहंमद. त्यामुळेच इस्लाम मधे धर्माची जी पाच व्यवच्छेदक लक्षणं (फाईव्ह पिलर्स ऑफ फेथ) सांगितली आहेत त्या पैकी पहिलं आहे 'शहादा'. (ह्याचा अर्थ विटनेसच्या जवळ जातो, आपण कबूल करणं म्हणू). शहादा म्हणजे 'ला इलाहा इल्लल्ला, मुहंमद रसूलल्लाह' (अल्लाशिवाय देव नाही आणी मुहंमद त्याचा प्रेषित आहे.... रसूल / पैगंबर = निरोप पोचवणारा, दूत) बाकीची चार लक्षणं म्हणजे 'नमाज (प्रार्थना)', 'उपवास (रमदान)', 'दान (झकात... ही प्रत्येक मुसलमान स्त्री पुरूषाला द्यावीच लागते. ती किती द्यायची हे ठरवायचे एक शास्त्र आहे, नियम आहेत. साधारण पणे मालमत्तेच्या २.५% असे प्रमाण आहे. मुस्लिम अंमलाखाली राहणारे मुस्लिमेतर झकात देत नाहीत त्यांच्ब्या साठी 'जिझिया' नावाचा कर असतो.)' आणि 'हाज'.
मुहंमद स्वतः मक्केमधे 'कुरेश' टोळीतल्या एका सधन कुटुंबात जन्मले. जरी ते सत्प्रवृत्त असले तरी वयाच्या ४०व्या वर्षापर्यंत त्यांना आपल्या जीवनकार्याबद्दल काहीही माहिती नव्हती. आज जो परिसर काबा म्हणून ओळखला जातो तो त्यावेळीही (आणि अनादीकालापासून) पवित्र मानला जात असे. अब्राहामचे घर तिथे होते असे मानले जाते. (ते घर इश्वरानेच अब्राहामला बांधायला सांगितले होते.) तत्कालिन धार्मिक समजुतिंप्रमाणे ती सर्वात पवित्र जागा होतीच. पण तिथे बजबजपुरी माजली होती. त्या जागेची देखभाल आणि रक्षण करण्याचे परंपरागत हक्क 'कुरेश' टोळीकडे होते. मक्केजवळ एका डोंगरात एक गुहा होती, पैगंबर नेहमी तिथे जाऊन ध्यान करत असत. वयाच्या साधारण ४०व्या वर्षापासून पैगंबरांना साक्षात्कार व्हायला सुरूवात झाली. आणि त्यांच्या जीवनाची पुढची २३ वर्षे ते होतच राहिले. ह्या साक्षात्कारांमधूनच त्यांना कुर'आन स्वतः इश्वराने सांगितले. आणि इस्लामचा उदय झाला. इस्लाम मधील खूपश्या प्रथा आधीपासूनच प्रचलित होत्या. उदाहरणार्थ हाज वगैरे. पैगंबरांनी त्यांना एक विशिष्ट स्वरूप दिले. सुरूवातीला त्यांना खूप त्रास झाला. सामाजिक छळ झाला. त्यांच्यावर मारेकरी घालण्यात आले. त्यांना मक्केतून बाहेर निघावे लागले. (हिजरा) त्यांना जवळ असलेल्या मदिनावासियांनी आसरा दिला आणि त्यांची शिकवण स्वीकारली. बर्याच संघर्षानंतर त्यांना मक्केवर विजय मिळाला.
पैगंबरांच्या जीवनातील अजून एक महत्वपूर्ण घटना म्हणजे त्यांचे सदेह स्वर्गभ्रमण. एका रात्री त्यांच्या स्वप्नात गाब्रिएल नावाचा देवदूत आला. त्याने त्यांना बुराक नावच्या पंख असलेल्या घोड्यावर बसवून पूर्ण स्वर्गाची (सात मजली) सफर (अजून एक अरबोद्भव शब्द!!!) घडवली. त्या वेळी त्यांना साक्षात अल्लाहचे दर्शन झाले. तसेच आधीचे सगळे देवदूत पण भेटले. अल्लाने तेव्हाच त्यांना 'सर्व मुस्लिमांनी रोज ५० वेळा प्रार्थना करावी' असा आदेश दिला पण त्यांनी वरंवार विनंति करून ती संख्या हळूहळू ५ वर आणली असा उल्लेख आहे!!! ही घटना आजही मुस्लिमांसाठी एक अतिशय महत्वपूर्ण घटना आहे. आणि त्यांचा त्याच्या सत्यतेवर पूर्ण विश्वास आहे. 'जन्नत'च्या ज्या काही संकल्पना आहेत त्या बहुतेक इथूनच उगम पावलेल्या आहेत.
त्यांचा अंत मदिनेत झाला. पैगंबरांच्या मृत्यूनंतर त्यांचा वारस कोण ह्या बाबत मात्र खूप मोठे वादंग झाले. ज्यांनी पैगंबरांचे एक सहकारी अबू बकर ह्यांना पाठिंबा दिला ते सुन्नी आणि ज्यांनी पैगंबरांचा जावई 'अली' ह्याला पाठिंबा दिला ते शिया. हा झगडा आजतागायत संपलेला नाहिये.
साधरणपणे इस्लामची स्थापना पैगंबरांनी केली असे आपण वाचतो म्हणतो. पण कट्टरपंथियांमधे असा मतप्रवाह आहे की इस्लाम हा आधी पासून होताच. हा जगातील आदि आणि एकमेव धर्म आहे. तो विकृत झाला होता त्याची पैगंबरांनी फक्त शुध्दी केली. म्हणूनच हे लोक जेव्हा एखादी मुस्लिमेतर व्यक्ति इस्लामचा स्वीकार करते त्याला 'कन्व्हर्जन' म्हणत नाहीत. 'रिव्हर्जन' म्हणतात. (म्हणजे तो मूळ धर्मात परत आला, नविन धर्मात नव्हे). हेच लोक कुराणाला 'फायनल टेस्टामेंट' असेही म्हणतात (ओल्ड आणि न्यू टेस्टामेंटच्या धर्तीवर).
इस्लामची सुरूवातीची वर्षे अशी संघर्षात गेली. आणि तत्कालिन अरबस्तानातल्या अनेक रूढी समजुती धर्माचा भाग होऊन बसल्या. तत्कालिन अरब हे बव्हंशी भटके होते. जगातल्या अतिशय वैराण अश्या प्रदेशात ते पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असे भटकत असत. साहजिकच त्यांच्या सामाजिक आचारविचारांमधे आणि त्यांना चिकटून राहण्याच्या वृत्ति मधे एक प्रकारचा चिवटपणा कडवेपणा होता. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे आज एखादा सर्वसाधारण मुस्लिमही धर्माच्या बाबतीत अतिशय हळवा आणि कडवा असतो. सुरूवातीला इस्लाम खरंच 'खतरे मे' होता. त्या वेळी पैगंबरांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी मोठ्या जिकिरीने हा धर्म तगवला त्या आठवणी इतक्या घट्ट आहेत की आजही 'इस्लाम खतरेमे' म्हणले की सामान्य मुस्लिम कुठेतरी आतून व्यथित होत असावा. धर्म टिकवताना कडक शिस्त आवश्यक असेल तीच अजून चालू राहिली असेल. इस्लाम मधल्या बहुतेक सगळ्या प्रथा स्वतः पैगंबरांनी चालू केलेल्या आहेत आणी म्हणूनच त्यात काहीही ढवळाढवळ होऊ शकत नाही आणि त्या प्राणापलिकडे जपल्या पाहिजेत असे बहुतेकांना मनापासून वाटते.
अर्थात हे सगळं माझं मत आहे. मला माझ्या वास्तव्यात खूप वेगवेगळे अनुभव आले ह्या धर्माचरणाचे, अतिरेकी तसेच समजूतदारही. कधीही 'स्टिरिओटाईप' / 'पूर्वग्रहदूषित' विचार करू नये हे मी शिकलो. पण त्याबद्दल पुढे...
क्रमशः
रविवार, २८ डिसेंबर, २००८
माझं खोबार... भाग ६
Posted by मी बिपिन. on रविवार, डिसेंबर २८, २००८
लेबल्सः अनुभव, खोबार, माहिती, सय
कांदा टोमॅटोची 'बॅचलर' भाजी... उर्फ सुगरण्याचा सल्ला
Posted by मी बिपिन. on रविवार, डिसेंबर २८, २००८
लेबल्सः पाककृती
आधी नमू स्वाती अन्नपूर्णा | जीने तृप्त केले बहुतांना |
आणि दुसरी ती मेघना | आयडियादाती ||
या दोघींबरोबरच ही पाकृ आमच्या अजून एका मित्राला अर्पण... कुंदन . हा भला माणूस निष्णात स्वैपाक करतो, सध्या दुबईत असतो आणि रोज मला फोन करून 'काल पनीर मटर केलं होतं', 'आज आलू पराठे करणार आहे' असं सांगून कसला सूड उगवत असतो कोण जाणे.
***
मिपावर बर्याच नविन नविन पाककृति नेहमीच येत असतात. आणि या विभागात आमच्या स्वातीताईचा नंबर पहिला आहे. तिच्या पाकृ माझ्यासाठी तरी नेहमीच फक्त एक बघायचा / ऐकायचा विषय आहे. खाणार कसं? ते आधी बनवायला लागेल ना? ती भानगड कोण करणार? तर हे असं.
आणि दुसरी मेघना. तिने एकामागोमाग दणक्यात ३-४ खत्तर्नाक पाकृ अतिशय मस्त लिहिल्या होत्या. त्यातल्या साबुदाण्याच्या खिचडीच्या पाकृ नंतर तर ३-४ दिवस लाळेरं लावून फिरायची पाळी आली होती. हो ना राव... तर मेघनाच्या ष्टाईलने प्रभावित होऊन आम्ही पण एक पाकृ लिहायचीच असं ठरवलं.
तर या दोघींच्या प्रभावाखालीच असताना आम्हाला एक गुरू भेटला आणि त्याने आम्हाला एक झटपट आणि सर्वोपयोगी अशी पाकृ शिकवली.
तो मेहेरबान, कदरदान पेश है... १० मिनट मे तैयार होने वाली और संकट समय मे काम आने वाली 'कांदा टोमॅटोची बॅचलर भाजी'. बॅचलर भाजी यासाठी की, एकटं असताना, रात्री दमून घरी आलं आणि फारसं चवीढवीकडे लक्ष न देता काही तरी पटकन करायचं असेल तर बरेच 'बॅचलर' जे पाकशास्त्रात फारसे पारंगत नाही आहेत (माझ्यासारखे) ते अश्याच काहितरी पाकृचा आधार घेतात. :)
***
खरं म्हणजे, लहानपणापासूनच मला पाकशास्त्रात आज्जिब्बात गति नाहिये. स्वैपाक हा खाण्याचा प्रकार आहे, करण्याचा नव्हे, असं वाटायचं. अजूनही वाटतं. लहानपणी आईने आणि लग्नानंतर बायकोने मला या बाबतीत बिघडवायचा खूप प्रयत्न केला. मी काही माझ्या मतांपासून ढळलो नाही. बरं माझ्यावर कधी हॉस्टेलवर रहायची पाळी नाही आली त्यामुळे एकंदरित निभावलं होतं. पण गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर एक मोठी आफत आली आहे. झालंय असं की सध्या एकटं रहायची पाळी आली आहे. स्वैपाकाबाबतचा माझा दृष्टिकोण असा असल्याने जेवणखाण सहजिकच बाहेर हॉटेल मधे सुरू झाले.
तशी काही ही माझी एकटं राहायची पहिलीच वेळ नाही. आधीही राहिलो आहे. आणि प्रत्येकवेळी सुखेनैव निरनिराळ्या उपाहारगृहांना उदार आश्रय दिला आहे. या वेळी पण तसेच निभेल याची खात्रीच होती. पण नाही, तसे होणे नव्हते. सुरूवातीला काही दिवस हॉटेल मधे जेवलो. पण मग तेच तेच खाऊन कंटाळा आला. एक दिवस तर मी जाऊन बसलो माझ्या नेहमीच्या हॉटेलात तर त्या वेटरने ऑर्डर न घेताच पदार्थ आणून ठेवले समोर. मी म्हणलं 'हे काय रे भाऊ?' तर म्हणाला, 'साहेब, तुमच्या आवडत्या डिशेस माहीत झाल्या आता.' मग मी हॉटेल्स बदलून जेवायला लागलो. पण लक्षात आलं की हॉटेल मधलं जेवण काही झेपत नाहिये आपल्याला. (कोण रे तो वय झालं म्हणतोय माझं? आधीच च्यायला मिपावर काही तथाकथित मित्र 'काका' म्हणताहेत. येडे लेकाचे.) पण मग आता करायचं काय? कैतरी कराच्चं म्हणजे कराच्चंच. मग हळू हळू एकदम प्राथमिक स्वैपाकाला सुरूवात केली. म्हणजे ब्रेड-बटर खाणे आणि वरती थोडा फलाहार. किंवा नुसताच भात करणे. आणि तो दह्यात कालवून खाणे. मग पुढची पायरी, टिन मधले 'सरसों का साग' नाहीतर 'पालकपनीर' गरम करून ब्रेड बरोबर खाणे वगैरे. मग माझी भीड चेपली आणि मी खिचडी वगैरेचा प्रयत्न केला. ते पण जमलं. मग माझा एक माझ्या सारखाच बॅचलर मित्र, प्रशांत, धावून आला आणि माझा गुरू बनला. माग आम्ही काय काय बनवून खायला लागलो. म्हणजे बनवायचा तो, खायचो आम्ही दोघं आणि साफसफाई करायचो मी. पण परत माझं नशिब फुटलं आणि प्रशांत गेला परत भारतात. आता आली का पंचाईत? परत एक्सपरीमेंट सुरू झाले. आणि माझ्या एका मल्याळी मित्राने मला ही झटपट पाकृ शिकवली. आता एवढं सगळं वाचून तुम्हाला वाटेल काय जबरी असेल पदार्थ वगैरे. पण तसे काही नाही. पदार्थ आहे साधाच, पण पटकन तयार होणारा आणि म्हणूनच अडीअडचणीला उपयोगी पडणारा, ही खरी महती त्याची. आणि तो सर्वोपयोगी पण आहे. म्हणजे भात, पोळी, ब्रेड, खुबूस कशाही बरोबर खा. (खुबूस म्हणजे अरब देशात मिळणारा एक भाकरी सारखा प्रकार. सगळ्या दुकानात मिळतो. त्याचे २ प्रकार असतात, मैद्याचा आणि गव्हाच्या पीठाचा. सगळ्या बॅचलर्सचा तारणहार.)
तर घ्या...
***
वाढणी: एका माणसासाठी. (दुसरा असेल आपल्याबरोबर तर आधी त्याला संभाव्य धोक्याची पूर्ण कल्पना द्यावी आणि त्याच्या स्वत:च्या जबाबदारीवर तो सामिल होत आहे असे वदवून घ्यावे.)
साहित्यः २ मध्यम आकाराचे कांदे, २ मध्यम आकाराचे टोमॅटो, २ लहान मिरच्या, ४ लसणाच्या पाकळ्या, एवढंस्सं आलं. १-१|| चमचा चिकन मसाला. (चिकन मसाला का? तर त्याच्यात सगळे इतर मसाले असतात म्हणून. म्हणजे आपल्याला बाकी काही घालत बसावे लागत नाही हो. आणि हो, त्या चिकन मसाल्यात चिकन नसतं त्यामुळे शाकाहारी मंडळींना खायला हरकत नाही अजिबात.)
कृती: मिरचीचे आडवे - तिरके काप करायचे. लसणाच्या पाकळ्या बारीक चिरायच्या. खरं म्हणजे लसूण ठेचायचा. पण आपण बॅचलर आहोत ना... मग आपल्याकडे खलबत्ता किंवा मिक्सर वगैरे नसणार. म्हणून बारीक चिरायचा (जमेल तसा, कारण परत तेच, आपण नवशिके बॅचलर ना? मग इतकं बारीक चिरायची वगैरे सवय नसते ना.) आल्याचं पण तेच. मस्त बारीक चिरायचा.
कांद्याच्या आणि टोमॅटोच्या लांब फोडी (काप) करायच्या. मला वाटतं मसाला डोश्यात जी भाजी असते त्याच्यात असा लांब कापलेला कांदा असतो.
एका कढईत तेल गरम करून मोहरीची फोडणी करायची. मोहरी तडतडली की त्यात आधी मिरची, त्यानंतर लसूण आणि शेवटी आलं घालायचं. ते चांगलं लालसर होईपर्यंत परतायचं त्या फोडणीत.
आता आधी चिरलेला कांदा घालायचा आणि मग थोड्या वेळाने चिरलेला टोमॅटो घालायचा. (किती वेळाने? तसं नक्की सांगता नाही येणार. पण २-३ वेळा भाजी करून खाऊन झाली आणि कांदा कच्चट राहिला की मग आपोआप येतो अंदाज :) )
थोडा वेळ हे सगळं नीट हलवत राहायचं. नाहीतर करपेल एका बाजूने. (तुम्हालाच खायचं आहे हे लक्षात असू द्या.) टोमॅटो आणि कांदा बर्या पैकी शिजला की मग त्यात हे सगळं मिश्रण बुडेल इतपत पाणी घालायचं. चवीपुरतं मीठ आणि चिकन मसाला घालायचा. नीट ढवळायचं.
साधारण ५-१० मिनिटं मध्यम आचेवर उकळत ठेवायचं. झाली भाजी तयार.
आहे की नाही झटपट? आणि सोप्पी पण. साहित्य पण फार नाही लागत. या भाजीत अजून एक करता येतं. खाताना त्यात मस्त पैकी तिखट जाडी शेव टाकून खायची. फारच छान लागते मग तर.
तर ही पाककृति इथेच संपली. पण कृति मात्र नाही संपली. पुढची कृति म्हणजे ही भाजी भाताबरोबर आणि खुबूस बरोबर ओ येईपर्यंत हाणायची. जेवायला बसताना जवळ दह्याची वाटी घ्यायला विसरू नका. कारण भाजी एकदम तिखटजाळ होते. आणि त्या बरोबर थोडं दही खाणं दुसर्या दिवसाच्या दृष्टीने बरं असतं. ;)
या तर मंडळी खायला. आजच केली होती. आणि खाल्ल्यावर हे लिहू शकलो म्हणजे नक्कीच बरी झाली होती. ;)